महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,68,766

चिमाजी अप्पा

By Discover Maharashtra Views: 3227 6 Min Read

चिमाजी अप्पा –

चिमाजी अप्पा हे बाळाजी विश्वनाथ भट यांचे सुपुत्र.चिमाजीआप्पांचे मुळ नाव अंताजी पण पुढे ते चिमाजीआप्पा या नावाने प्रसिद्ध झाले. चिमाजी अप्पा लहानपणापासूनच आपले भाऊ बाजीराव यांच्या बरोबर राहून राजकारणाचे ,युद्धकौशल्याचे धडे गिरवीत होते. वयाच्या विसाव्या वर्षी पेशवेपदाची जबाबदारी शाहू महाराजांनी बाजीराव यांच्यावर सोपवली होती. बाजीराव हे तापट, बेधडक स्वभावाचे होते, तर चिमाजी आप्पा शांत, धोरणी व दरबारी कामात कुशल होते. त्यांनी महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी पोर्तुगीज वर्चस्वातून मुक्त करण्यासाठी यशस्वी मोहीम राबवली. २ वर्ष झुंज देऊन वसईचा किल्ला जिंकला व साष्टी बेटांवर मराठ्यांची सत्ता स्थापली.

थोरले बंधु बाजीराव पेशवे यांच्या झगमगत्या कारकीर्दीत चिमाजीअप्पांनी सदैव सावलीसारखे त्यांच्या पाठी राहिले. या जोडीला ‘राम-लक्ष्मण, सुद्धा म्हणले जाते, अर्थात लक्ष्मण हा कितीही गुणी व कर्तृत्ववान असला तरी रामाच्या कर्तृत्वापुढे त्याचे कर्तृत्व काहीसे झाकोळून जाते हेच खरे आणि तसेच चिमाजींआप्पां बाबत घडले आहे. धोरण आणि अंमलबजावणी याबाबतींतील मुख्य कर्ताकरविता आणि योजक महापुरुष बाजीराव पेशवाच होता आणि चिमाजी हा त्याबाबतची योग्य समज असलेला निष्ठावंत बंधू व सखा होता.

मराठ्यांच्या राजकारणाला उत्तराभिमुख बनवून मराठा साम्राज्यविस्ताराला चालना देण्यात बाजीराव पेशव्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते आणि चिमाजींचे सारे जीवितकार्य त्याला पूरक होते. आपल्या बंधूंप्रमाणेच राजकारण आणि रणकारण यांचा उत्तम मेळ त्यांनी साधत मराठा साम्राज्याचा विस्तार केला.

चिमाजीअप्पा हे बाळाजी विश्वनाथ भट यांचे सुपुत्र आणि बाजीराव पेशव्यांचे धाकटे बंधू होते.

१७३३ मध्ये चिमाजी अप्पांनी सरदार शंकरबुवा यांच्यासोबत बेलापूर किल्ला जिंकला.

१७३७ साली तीन वर्षे मराठ्यांनी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली पोर्तुगिजांशी लढा देऊन वसई किल्ल्यावर विजय मिळवला.

किल्ला ताब्यात येत नसेल तर मला तोफेच्या तोंडी देऊन किल्ल्यावर पाठवा.’ असे चिमाजी अप्पा वसई किल्ल्याच्या लढाईदरम्यान म्हणाले होते.

बाजीराव पेशव्यांइतकेच चिमाजी अप्पा हे शुर आणि पराक्रमी होते, रणनीती बनवण्यात ते कायम अग्रेसर असायचे.वसई मधील एक मैदान व एका  गावाला नरवीर चिमाजी अप्पांचे नाव देण्यात आले .

वसईची लढाई फेब्रुवारी १७, इ.स. १७३९ रोजी मराठ्यांनी चिमाजी अप्पाच्या नेतृत्त्वाखाली खुद्द वसईवर चाल केली. चिमाजीआप्पाची चालून येत असलेली फौज पाहून पोर्तुगीजांनी आपली शिबंदी वसईच्या किल्ल्यात घेतली व वसईचा वेढा सुरू झाला. मराठ्यांनी शिताफीने पूर्ण किल्ल्याभोवती घेरा घातला व किल्ल्याची पूर्ण नाकेबंदी करून टाकली. अत्यंत चिकाटीने चालवलेल्या वेढ्यासोबतच त्यांनी किल्ल्यावर गनिमी काव्याने हल्ले चालू ठेवले. अशाच एका हल्ल्यात पोर्तुगीजांचा सेनापती सिल्व्हेरा दि मेंझेस मृत्युमुखी पडला. तरीही पोर्तुगीजांनी हिमतीने लढा चालू ठेवला आणि चालून येणाऱ्या मराठ्यांच्या लाटांचा हातबाँब, बंदुका आणि उखळी तोफा वापरून प्रतिकार चालू ठेवला. आपल्या वरचढ तंत्रज्ञान, अस्त्रे व शस्त्रांनी पोर्तुगीजांनी मराठ्यांचे बरेच नुकसान केले; परंतु मराठ्यांनी आपला वेढा सैल होऊ दिला नाही. इकडे आंग्र्यांच्या आरमाराने समुद्री मार्गही बंद केलेले होते आणि तेथूनही रसद मिळणे बंद केले होते.

शेवटी मे १६, इ.स. १७३९ रोजी वेढा धसास लागला आणि मराठ्यांनी किल्ल्यावर एल्गार केला. चिमाजी अप्पाने स्वतः पहिली तोफ डागली आणि नारो शंकर दाणी याच्या नेतृत्वाखालील घोडदळ आणि आंग्र्यांचे आरमार दोहो बाजूंनी पोर्तुगीजांवर तुटून पडले. तोफखान्याच्या सरदार गिरमाजी कानिटकराने किल्ला पुरता भाजून काढला आणि मानाजी आंग्र्याच्या बरकंदाजांनी गुराबांवरुन पोर्तुगीज शिपाई टिपून काढणे सुरू ठेवले.वसईच्या लढ्यातील पोर्तुगीजांकडून जप्त केली घंटा या भडिमारामुळे पोर्तुगीजांनी  बचावाने नांगी टाकली आणि त्यांनी मराठ्यांकडे शरणागती मागितली. या मोहिमेवरून  आणलेल्या पोर्तुगीज घडणीच्या  भल्याथोरल्या पितळी घंटा आजही महाराष्ट्रात जागोजागी पाहायला  मिळतात. नाशिकची नारोशंकराची घंटा ही त्यातलीच एक होय.

पोर्तुगीजांनी शरण आले असताही आपल्या सैन्यास मानानिशी वाट काढून द्यावी आणि त्यांना अभय द्यावे, अशी विनंती त्यांनी चिमाजी अप्पाकडे केली. मराठ्यांनी ही विनंती मंजूर केली आणि शरण आलेल्या सैन्याला त्यांनी वाट करून दिली.

सवाई  जयसिंह याला माळव्याची सुभेदारी मिळाली होती पण बादशहाने नायब सुभेदार म्हणून गिरीधर बहादूर व  दयाबहादुर या अत्यंत लढवय्या बंधूंना नेमले होते. ते जयसिंगाचे ऐकत नसल्याने जयसिंगाने बाजीरावांना माळव्यात पाचारण केले. तेव्हा चिमाजीअप्पांनी पवारांच्या सैन्यासह आक्रमण करून सारंगपूरच्याया लढाईत गिरीधर बहादूरला ठार करून मोठा विजय मिळवला. छत्रसालाच्या मदतीला बाजीराव बुंदेलखंडात गेले त्यावेळी चिमाजीअप्पा त्यांचा पाठपुरावा करीत होते. चिमाजीआप्पाने गिरिधर बहादूरचा पराभव करून शिंदे, होळकर, पवारयांच्या साथीने दया बहादुरला ठार मारले. या विजयाने माळवा प्रांत मराठ्यांच्या ताब्यात आला.

चिमाजीआप्पांच्या स्वारीमुळे मराठा सत्ता माळव्यात मजबूत झाली.  कोकणातील सिद्धींचे किनारपट्टीच्या भागात अत्याचार चालूच होते. सिद्धीचा अंजनवेलचा सरदार सिद्धी सात ह्याने  कोकणातील प्रमुख दैवत असलेल्या चिपळूणच्या परशुराम मंदिराचा विध्वंस केला. त्यामुळे संतापून शाहू छत्रपती यांनी  चिमाजीआप्पा व आंग्रे यांना सिद्धीचा नि:पात करायची आज्ञा दिली. या संयुक्त सैन्याने सिद्धीचा पराभव करून सिद्धीला ठार मारले.

चिमाजीआप्पाने अत्यंत चिकाटीने लढाई करून एकामागोमाग एक किल्ले काबीज केले. कोकणाच्याच नव्हे तर मराठ्यांच्या भारतातील पराक्रमाच्या व विजयाच्या मोहिमेत वसईचा रणसंग्राम आणि चिमाजीआप्पा यांचे नाव अजरामर झाले. ठाणे – वसईचा पूर्ण प्रांत त्यातील २० किल्ले, पोर्तुगीजांचा पंचवीस लाखांचा दारूगोळा व इतर सामग्रीसह मराठ्यांनी काबीज केला. एवढ्यात बाजीराव पेशवे रावेरखेडी येथे निधन पावल्याची धक्कादायक बातमी येताच चिमाजीअप्पा तातडीने पुण्याला परतले. बाजीरावांचे थोरले पुत्र बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब यांना सातारा येथे नेऊन त्यांना पेशवाईची वस्त्रे छत्रपती शाहू महाराजांकडून चिमाजीअप्पांनी देवविली.१७४०  मध्ये पोर्तुगीजांचा दमण भागातील एक किल्ला काबीज करून चिमाजीआप्पा परतले व १७ डिसेंबर १७४० मध्ये मरण पावले.

चिमाजीआप्पांचे  मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई पुणे येथील ओंकारेश्वर मंदिराजवळ सती गेल्या.

चिमाजीअप्पा यांचा मुलगा सदाशिवराव भाऊ पुढे पानिपतच्या लढाईचे प्रमुख सेनापती होते व सदाशिवभाऊ या नावाने ते पुढे प्रसिद्धीस आले. वसईच्या किल्ल्यात चिमाजी आप्पा यांचे अश्वारूढ पुतळ्याच्या रुपात  स्मारक आहे. चिमाजी अप्पा वसईच्या स्थानिक जनतेत अजुनही  लोकप्रिय आहेत.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक निंबाळकर पुणे

Leave a comment