महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 95,25,442

हत्ती धरून आणल्याचा प्राचीन मराठी शिलालेख…..!!

Views: 2
4 Min Read

हत्ती धरून आणल्याचा प्राचीन मराठी शिलालेख…..!!

हत्ती धरून आणल्याचा उल्लेख असलेला अकराव्या शतकातील प्राचीन मराठी शिलालेख राणीसावरगाव येथील केदारेश्वर महादेव मंदिरातील वीरगळ वर हा शिलालेख पाहायला मिळतो !!!
उपलब्धि व स्थळ:- हा शिलालेख परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील प्रसिद्ध असलेले मौजे राणीसावरगाव येथील मुख्य गावापासून एक मैलावर असलेल्या गावाच्या दक्षिणेला एका तळ्याकाठी केदारेश्वर महादेव मंदिराच्या समोर ठेवलेल्या एका लढाई निदर्शक वीरगळावर मधल्या भागात एका पट्टीवर कोरलेला आहे. सदर शिलालेख हा दोन ओळीचा असून देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. शिलालेखाच्या शिळेचा भाग मात्र ओबडधोबड आहे.लेखातील अक्षरे वळणदार व एकसारखी कोरलेली आहेत.सदर लेखाची झीज झाली असून त्याचा खोदीवपणा मुजला आहे काही ठिकाणी ओरखडे उमटले आहेत. लेखाचा छाप घेतला असता शिलालेख वाचन करता येते.लेखाचा पूर्वीचा काही भाग खंडित असावा असे वाटते .

शिलालेखाचे वाचन :
१. गंधर्वपुरिचे/सर्वापुरीचे ? हाथि आणियले त्पयके ऐ
२. क इं यः घेइआ

अर्थ : लेखातील अवशिष्ट मजकुराचा अर्थ :
गंधर्वपुरीचे हत्ती आणले त्यांपैकी एकही जो घेतो (घेईल)…असा आहे. त्यापुढचा भाग खंडित आहे.
गंधर्वपुरी/सर्वपुरी असे ग्रामनाम आहे. सर्वपुरी या नावाचे गाव सापडत नाही मात्र गंधर्वपुरी या गावाचे उल्लेख मध्ययुगीन जैन साधनांत येतात. मध्य प्रदेशातील बडवाणी जिल्ह्यात गंधावल नामक गाव आहे. त्याचे जुने नाव गंधर्वपुरी असे होते. कदाचित् लेखात उल्लेखलेली गंधर्वपुरी तीच असावी. चालुक्य राजा विक्रमादित्य सहावा (कार्यकाळ सन १०७६—११२६) याने माळव्याचा राजा जयसिंह यास राज्यावर बसण्यास मदत केली होती. मात्र विक्रमादित्याचा थोरला भाऊ सोमेश्वर दुसरा याने माळव्यावर आक्रमण करून जयसिंहाला पदच्युत केले. कदाचित् त्या आक्रमणाच्या वेळी दुसऱ्या सोमेश्वराच्या कुणातरी सेनानीने माळव्यातील गंधर्वपुरीहून काही हत्ती धरून आणले असावेत. त्यांचे चित्रण करणारा हा वीरगळ असावा. मात्र त्यात कोणतेही व्यक्तीनाम आलेले नाही त्यामुळे हत्ती कुणी आणले ते नक्की सांगता येत नाही. लेखाची अक्षरवटिका ११-१२व्या शतकांतली आहे. तिचा काळ सोमेश्वर आणि विक्रमादित्य यांच्या काळाशी सुसंगत ठरेल. तेव्हा प्रस्तुत लेख अकराव्या शतकाच्या उत्तरार्धातील दिसतो.. या वीरगळाला चालुक्य आणि परमार यांच्या संघर्षाचा संदर्भ असू शकतो ,राणी सावरगाव येथील पूर्वीचा जगद्देव परमार याचा एक शिलालेख प्रसिद्ध आहे.त्यात हि लढाईचा उल्लेख आहे.

यादव नरेश सिंघनदेव प्रथम याचे विक्रमादित्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते.
म्हणूनच हेमाद्रीच्या राजप्रशस्तीत खालील श्लोक उपलब्ध होतो.
”कर्पूर व्रतं पूर्णमकरोत्परमर्दिन”
अशी प्रशस्ती लिहून सिंघनदेव प्रथम याने कर्पुरतिलकनामक हत्ती आणून पेर्मार्डीदेव (हेम्माडीदेव) विक्रमादित्य षष्ठ चाळुक्यांचे ‘कर्पुर व्रत’ पूर्ण केल्याचे लिहिले आहे.

गावाचे नाव :- मु पो.राणीसावरगाव (केदरेश्वर मंदिर ) , ता गंगाखेड , जि.परभणी
जी.पी.एस. :- N-१८.८५०८७० ,W.७६.८७५४७९
शिलालेखाचे स्थान :- केदारेश्वर मंदिराच्या बाहेर प्रवेशद्वाराच्या बाहेर एका लढाई निदर्शक वीरगळवर मधल्या पट्टीवर कोरलेला आहे .
अक्षरपद्धती :- कोरीव स्वरूपाचा लेख आहे
लिपी व भाषा :- देवनागरी – लिपी , मराठी भाषा
प्रयोजन :-युद्धातून किंवा युद्धासाठी हत्ती धरून आणल्याची स्मृती जपणे.
.मिती / वर्ष :- साधारण अकरावे शतक अखेर (अक्षर वळण )
काळ वर्ष :- (सन १०७६ -११२६ )साधारण
राजा /कारकीर्द: चालुक्य विक्रमादित्य सहावा यांच्या कारकिर्दीतील अंदाजे असावा लेख खंडित असल्याने
ग्राम नाम :-गंधर्वपुरी,/सर्वापुरी ?
शिलालेखाचे वाचक :- . श्री. अनिल किसन दुधाणे.
संक्षेप :- स्री-श्री , गंधर्वपुरि-गंधावल/सर्वपूरी ?-सावरगाव? -हाथि -हत्ती ,आणियले –आणले, त्पयकेऐक त्यापैकी इं –हि य:- जो , घेइआ –घेईल
संदर्भ:- .

©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे.

टीप :- सदर शिलालेखाच्या वाचनात डॉ. श्री शैलेंद्र भांडारे सर ,श्री.अमोल बनकर ,श्री अथर्व पिंगळे यांनी काही विशेष सूचना केल्या . तसेच सदर कार्यात श्री लक्ष्मिकांत सोनवटकर सर ,श्री राहुल सरोदे ,श्री नागेश जोशी यांची विशेष मदत व सहकार्य लाभले

Leave a Comment