कोल्हापूर व परिसरातील गावे आणि त्यांची प्राचीन नावे

By Discover Maharashtra Views: 1651 6 Min Read

कोल्हापूर व परिसरातील गावे आणि त्यांची प्राचीन नावे –

इतिहास विषयास धरुनच भविष्याचा वेध घेता येतो.त्यामुळे ज्या देशाचा इतिहास महान तो देश महान. महाराष्ट्राचा इतिहास तर खूप प्राचीन आहे.या प्रदेशावर अनेक राजांनी आणि त्यांच्या राजघराण्यानी राज्य केलं.त्यात सातवाहक पासून वाकाटक,चालुक्य,राष्ट्रकूट, शिलाहार,यादव,मुघल, मराठा,इंग्रज पर्यंत अनेकांनी सत्ता उपभोगल्या. अनेक शिलालेख, ताम्रपट,विदेशी पर्यटक यांची प्रवास वर्णने,विविध धर्माची साहित्य, रचना यांच्या आधारे हे सिद्ध होते. (कोल्हापूर व परिसरातील गावे आणि त्यांची प्राचीन नावे)

ह्यू एन त्संग या चिनी प्रवाशांच्या वर्णना नुसार ई.स ७ व्या शतकात राजा पुलकेशी दुसरा हा महाराष्ट्राचा राजा होता,आणि याला जैन कवी रविकिर्ती याच्या एहोल प्रशस्ती मधून दुजोरा मिळतो.या साऱ्या राजघराण्याच्या कोल्हापूर आणि परिसराशी जवळचा संबंध आला आहे. एतिहासिकदृष्टा कोल्हापूर हे प्राचीन शहर असून कोल्हापुरातील ब्रह्मपुरितील उत्खनने या शहराचा संबंध थेट रोम साम्राज्याशी जोडला गेला आहे.

कोल्हापूर ही महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी आहे. महाभारत (अश्व८४-११) व बृहत्संहिता (अ.१४-१३) यात कोल्हापूरचा उल्लेख “कोल्लगिरी” म्हणून येतो. हरिवंश पुराणात यास “करवीर” म्हणून उल्लेख आहे.वाड्मयीन ग्रंथात ई.स ११३० मध्ये जैन आचार्य हेमचंद्रच्या “व्दयाश्रयकाव्य” या ग्रंथात पहिला विश्वसनीय  “कोल्लापुर” असा उल्लेख आढळतो. यापूर्वी हरिषेन या जैन ग्रंथ कराने ई.स ९३१ मध्ये लिहलेल्या ‘बृहतकथा कोश’ या ग्रंथात कोल्हापूरचा उल्लेख “कोल्लाडगिरिपट्टन” असा मिळतो.

हे झाले ग्रंथातील अथवा साहित्यिक उल्लेख.त्याच बरोबर कोल्हापूरचे ऐतिहासिक दाखले प्राचीन शिलालेख व ताम्रपट याद्वारे ही मिळतात.चालुक्य राजा विनयादित्य याच्या ७ व्या शतकातील एका बनावट ताम्रपटात कोल्लापुरचा उल्लेख सापडतो.या ताम्रपटात आचार्य पद्मशिव राऊल यांना तावसगाव दान दिल्याने उल्लेख आहे. तावसगाव म्हणजे सध्याचे तासगाव.त्याच बरोबर इतर गावांचाही उल्लेख येतो. हेरिलगे म्हणजे सध्याचे हेरले गाव याचाही उल्लेख मिळतो.हेच हेरले गाव ज्यातील जैन मंदिरात शिलाहार  राजा गंडरादित्य याचा एक शिलालेख सापडलेला असून या   शिलालेखावर हेरिलगे असाच या गावचा उल्लेख आहे.आणि हा शिलालेख आज ही पहावयास मिळतो. वरगाव म्हणजे सध्याचे पेठ वडगाव, नागाव- आजही नागाव म्हणून ओळखलं जातं, टोपवि म्हणजे सध्याचे टोप हे गाव यांचा उल्लेख या विनयादित्याच्या ताम्रपटात येतो.

असाच आणखी एक ताम्रपट जो राष्ट्रकूट अकालवर्ष याचा १० व्या शतकातील असून यात करहटक प्रांतातील म्हणजे सध्याचे कराड,यातील अलतगे ७०० मधील (म्हणजे आळते परिसर ) रिक्कटी म्हणजे सध्याचे रूकडी हे गाव गोविंद भट्ट यास दान दिले.याच ताम्रपटात सिरेग्राम म्हणजे साजणी,मलिग्राम म्हणजे माणगाव,कोडवली म्हणजे पट्टन कोडोली,चोके म्हणजे चोकाक,मुडशिंगे म्हणजे चोकाक जवळील मुडशिंगी गाव, चीचवट म्हणजे रुकडीच्या पश्चिमीकडील चिंचवाड या गावांचाही उल्लेख मिळतो.त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील कोरेगाव चा कुरिग्राम असा उल्लेख सुद्धा या अकलवर्ष याच्या ताम्रपटात मिळतो.

इ.स ११ व्या शतकातील चालुक्य राजा विक्रमादित्य ५ वा याच्या काळातील कवठे येते सापडलेल्या एका ताम्रपटानुसार या राजाने आत्रेय गोत्री देवेवीसोतर या ब्राह्मणांस कुंडी देशातील आळतगे ७०० मधील कोद्दसी हे गाव दान दिले.कोद्दसी म्हणजे खोची असण्याची शक्यता आहे. याच ताम्रपटात वट्टार म्हणजे सध्याचे वाठार गाव, भेडवाड म्हणजे भेंडवडे, दुध्धीग्राम म्हणजे दुधगाव अश्या वारणा नदीच्या तीरावरील गावांची प्राचीन नावे मिळतात.

या नंतर कोल्हापूर ज्यांची राजधानी होती अशा शिलाहार घराण्याचा इतिहास पाहणे तर महत्वाचे आहे.शिलाहार कालखंडात कोल्हापूर हे  क्षुल्लकपुर म्हणून प्रसिद्ध होते,या भूमीत मोठ्या संख्येने क्षुल्लक वेशातील जैन मुनी वास्तवास होते.या शिलाहार वंशातील विविध राजाच्या विविध राजधान्या होत्या.त्यात शिलाहार गंडरादित्य याची व त्याचा मुलगा विजयादीत्य यांची वलयवाड/वळवाड ही राजधानी होती.आज हेच गाव वळीवडे म्हणून प्रसिद्ध असून या गावाशेजारील गांधीनगर हे व्यापारी दृष्ट्या महत्त्वाची बाजारपेठ म्हणून उदयास आली आहे.

आजही कन्नड भाषेत वळीवडे गावास वळवाड असच म्हणतात.आणि याच वळीवडे गावातून या राजांनी अनेक ताम्रपट, दान पत्र,आदेश काढले आहेत.जे आज आपणास ताम्रपट,शिलालेख यातून  पहावयास मिळतात. वळीवडे या गावाबद्दल अनेकांना शंका असून काही लोक ते राधानगरी-वळीवडे असावं असं म्हणतात,मात्र आजही पंचगंगेच्या तीरावर बसलेल्या वळीवडे या गावातील रहिवाश्यांच्या पूर्वजांची माहिती जतन करून ठेवणाऱ्या हेळव्याच्या दस्तऐवजात वळीवडे गावच नाव वळवाड असच मिळत.त्यामुळे कोल्हापूरच्या पूर्वे कडील वळीवडे हेच गाव शिलाहारांची राजधानी होती हे नक्की.

१२ व्या शतकातील शिलाहार राजा गंडरादित्याच्या एका ताम्रपटानुसार वळीवडे येथून या राजांनी त्याचा एक जैन सामंत नोळंब यास अंकुलगे/ अंकुलगोबी व बोप्पायवाड ही गावे दान दिली.त्यातील अंकुलगे/अंकुलगोबी म्हणजे सध्याचे सांगली जिल्ह्यातील कृष्णा तीरावरील अंकलकोप हे गाव असून बोप्पायवाड हे  कोल्हापुरातील आंबेवाडी गाव म्हणून प्रसिद्ध आहे.

गंडारदित्याच्या अनेक शिलालेखात मिरिंज देशाचे नाव येतं,हे मिरींज म्हणजे आजचे मिरज शहर असून याच बरोबर आजुरिका प्रांताचा ही उल्लेख येतो,हे आजुरिका म्हणजे आजचे कोल्हापुरातील आजरा तालुका आणि परिसर आहे.

शिलाहार विजयादित्याचा मुलगा असलेल्या  राजा भोज (द्वितीय) याच्या काळातसुद्धा त्याने आपल्या तीन राजधानी स्थापन करून राज्य केलं.त्यात वळवाड, क्षुल्लकपुर,आणि पदमनाल या त्या निदर्शनास येतात.यातील पदमनाल म्हणजे पन्हाळा असून याच राजा भोज (द्वितीय) याने पन्हाळसह इतर १५ किल्ले बांधले.त्यात सामानगड,विशाळगड,अजिंक्य तारा,कल्याणगड या किल्ल्यांचा समावेश आहे.

राष्ट्रकूट राजा तृतीय इंद्रराज हा त्याच्या पट्टबंधमहोत्सवसाठी कुरुंदक या गावी गेल्याच त्याच्या एका ताम्रपटावरून कळते, तसेच चालुक्य नृपती विनयदित्य हा ही अशाच पट्टबंध महोत्सवासाठी कुरुंदक या गावी गेला होता.आज हेच कुरुंदक गाव कुरुंदवाड म्हणून प्रसिद्ध असून कृष्णा पंचगंगेच्या संगमावर असलेल्या या गावाचं धार्मिक महत्त्व खूप प्राचीन आहे,आज याच कुरुंदवाड गावाशेजारील कृष्णा पंचगंगेच्या संगमावरील नरसोबाची वाडी हे  ठिकाण प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून नावारुपास आले आहे.

महाराष्ट्रातील चंदेरी नगरी म्हणून प्रसिद्ध हुपरी या गावाचे १४ व्या शतकातील नाव पेरीवाड होत अस गेल्याच वर्षी तेथील जैन मंदिराच्या आवारात उत्खननात सापडलेल्या तीर्थंकर मूर्तीवरील लेखातून समोर आले आहे.पेरीवाड या नावाचे अपभ्रंश होऊन ते हूपेरीवाड आणि नंतर हुपरी अस झालं अस या लेखावरून समजून येत.

या शिवाय अनेक गावांचे उल्लेख प्राचीन शिलालेख व ताम्रपट यान व्दारे मिळतात.मात्र त्यांचे वाचन होऊन ते अभ्यासले पाहिजेत…आणि उपलब्ध असलेल्या आपल्या ऐतिहासिक पुराव्यांचे जतन केले पाहिजे.जेणे करून भावी पिढीस आपला समृध्द वारसा सांगणारी ही शिलालेख, ताम्रपट,मंदिरे,मुर्त्या,ऐतिहासिक स्थळे पाहता यावीत.आणि आपला समृद्धी इतिहास समजावा.

श्री.वर्धमान श्रीपाल दिगंबरे

Leave a comment