हत्तीवरून भगवा मराठा ध्वज फडकवणाऱ्या वीराचा समाधी शिलालेख !
हत्तीवरून भगवा मराठा ध्वज फडकवणाऱ्या वीराचा समाधी शिलालेख बीड जिल्ह्यातील बीड शहरातील खंडेश्वरी देवीच्या मागील बाजूच्या रस्त्यावरती कंकाळेश्वर विद्यालयाच्या बाजूला आकाशवाणी टॉवर पाठीमागे मोकळ्या माळावरील जागेत काही समाधी आहेत त्यातील एका समाधीवर हा शिलालेख कोरलेला आहे . लेखाशेजारी हत्तीवर भगवा ध्वजाची पताका घेतलेले एक शिल्प कोरलेले आहेत. सदर शिलालेख हा उठाव स्वरूपाचा असून सात ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. लेखावर वातावरणाचा परिणाम झाला असून लेखातील काही अक्षरे पूर्णपणे झिजून पुसट झाली आहेत तर काही ठिकाणी रंगरंगोटी केल्याने त्याचा उठावपणा मुजला आहे छाप घेतला असता त्यावरील मजकूर स्पष्टपणे वाचता येतो .
========================================
शिलालेखाचे वाचन :
१.श्रीधरदास
२.शके १६८८
३.व्यय ना
४.म संवछ
५.रे मार्गेश्व
६.र वद्य ४
७.शनिवार
अर्थ : शालिवाहन शकाच्या १६८८ व्या वर्षी व्यय नाम संवत्सरात मार्गेश्वर वद्य ४ म्हणजेच २०डिसेंबर १७६६ शनिवार या दिवशी श्रीधरदास यांची समाधी बांधली .किंवा या दिवशी कैलासवासी झाले.
==========================================
शिलालेखाचे महत्व :- हत्तीवर बसून मराठा ध्वज (भगवा झेंडा) फडकवणे ही केवळ युद्ध दृश्य नसून ती एक प्रभावी राजकीय-धार्मिक प्रतीकात्मक कृती असते.हत्ती हा प्राचीन भारतीय परंपरेत राजसत्ता व सामर्थ्याचे प्रतीक मानला जातो.हत्तीवरून ध्वज फडकवणे म्हणजे विजय, अधिकार आणि भूभागावर नियंत्रण जाहीर करणे होय.युद्धात किंवा लढाईत हत्ती अग्रभागी असत (उदा.पानिपत) त्यामुळे हत्तीवरील ध्वज म्हणजे सैन्याचे नेतृत्व करणे होय कोणत्याही सैनिकांसाठी तो ध्वज प्रेरणास्थान व एकत्रीकरणाचे केंद्र असते.
मराठा परंपरेतील भगवा झेंडा ध्वज हा धर्म, त्याग आणि स्वराज्याचे प्रतीक आहे ,तो केवळ राजकीय नसून धार्मिक ओळखही दर्शवत असतो त्यामुळे हत्तीवरील भगवा म्हणजे “धर्मरक्षण व स्वराज्य” यांची घोषणा असते . एखादा किल्ला जिंकताना किंवा मिरवणुकीत हत्तीवरून ध्वज फडकवणे म्हणजे त्या ठिकाणी नवीन सत्ता प्रस्थापित झाल्याची जाहीर घोषणा असते हा दृश्यात्मक संदेश सामान्य जनतेवर प्रभाव टाकणारा असतो.
हत्तीवरून मराठा ध्वज फडकवणे हे विजय, सार्वभौम सत्ता, धर्मरक्षण आणि स्वराज्याच्या अभिमानाचे प्रतीक होते.असे दृश्य एकाच वेळी लष्करी ताकद आणि आध्यात्मिक ध्येय यांचा संगम दर्शवते.. सदर शिलालेख हा एका समाधीवर असून त्यांच्या शेजारी हत्तीवर भगवा ध्वज हाती घेतलेल्या वीरांचे शिल्प आहेत .त्या वीरांचे नाव श्रीधरदास आहे. कदाचित हा वीर युद्धात , लढाईत पराक्रम गाजवून धारातीर्थी पडलेला असावा .आणि त्यांच्याकडे कोणत्या तरी फौजेचे नेत्तृत्व असावे .असे सिद्ध होते.. लेखात समाधी बांधकामाचा सविस्तर तिथीचा उल्लेख आहे.. हि समाधी मार्गशीष महिन्यात बांधली आहे .मार्गशीर्ष महिना हा धार्मिक दृष्ट्या महत्वाचा मानला जातो. अशा लघु लेखांमधून स्थानिक इतिहासाची साखळी तयार होते. मोठ्या राजकीय घटनांपेक्षा गावपातळीवरील धार्मिक व सामाजिक घडामोडींचा पुरावा मिळतो. हे या लेखाचे विशेष महत्व आहे
===========================================
गावाचे नाव :- मु पो.बीड शहर, ता बीड , जि.बीड
जी.पी.एस. :- N-१८.९९६४०० ,E..७५.७७५५२८
शिलालेखाचे स्थान :- समाधीच्या चौथऱ्यावर मध्यभागी कोरला आहे.
अक्षरपद्धती :- उठाव स्वरूपाचा लेख आहे
लिपी व भाषा :- देवनागरी – लिपी , मराठी भाषा
प्रयोजन :- समाधी बांधून पूर्ण केल्याची स्मृती जपणे.
.मिती / वर्ष :- शके १६८८ व्यय नाम संवछरे मार्गेश्वर वद्य ४ शनिवार
काळ वर्ष :- आठरावे शतक – २० डिसेंबर सन १७६६ शनिवार
राजा /कारकीर्द: छ .रामराजे महाराज
व्यक्तीनाम :- श्रीधरदास
शिलालेखाचा संशोधक.:-प्रा .डॉ.श्री.सतीश साळुंखे /श्री अण्णासाहेब गडदे
शिलालेखाचे वाचक :- . श्री. अनिल किसन दुधाणे
संक्षेप :- संवछरे – संवत्सरे, मार्गेश्वर – मार्गशिष
संदर्भ:- .(IE VI -३३५ )
==========================================
©माहिती व संकलन :- श्री अनिल दुधाणे.
टीप :- सदर शिलालेख संशोधन कार्यात बीड जिल्ह्यातील पहिले इंडोलॉजिस्ट अण्णासाहेब गडदे यांची विशेष मदत व सहकार्य लाभले.
