प्राचीन भारतीय गणराज्यांचे स्वरूप लोकशाही स्वरूपाचे होते असे म्हटले जाते. म्हणजे जवळ जवळ अडीच हजार वर्षांच्या आधी लोकशाही मूल्यांचे अंशतः स्वरूप भारतीयांना सुपरिचित असावे असे नक्की म्हटले पाहिजे. याचे एक उत्तम उदाहरण यौधेय जनपदाचे घेतले पाहिजे. ‘यौधेय’ हे अत्यंत पराक्रमी, स्वाभिमानी आणि लष्करी दृष्ट्या सक्षम गणराज्य म्हणून ओळखले जात. प्राचीन साहित्यात यांना ‘आयुध-जीवी’ म्हणजे लढून किंवा शस्त्रांवर आपली उपजीविका चालवणारे म्हटले आहे. कुशाण साम्राज्यासारख्या विशाल आणि अफाट संसाधने असलेल्या परकीय सत्तेला भारतातून उखडून टाकण्याचा इतर जनपदांप्रमाणे यौधेयांनी सुद्धा प्रयत्न केला होता. कुषाणांवरचा आणि क्षत्रपांवरचा यौधेयांचा तडाखा बराच तिखट होता. कुशाण साम्राज्यापूर्वी यौधेयांचे राज्य उत्तर राजपुताना आणि दक्षिण-पूर्व पंजाबच्या विस्तीर्ण भूभागावर पसरलेले होते. परंतु, कनिष्काच्या नेतृत्वाखाली कुशाणांनी यौधेयांच्या सत्तेचा पराभव करून थेट बनारसपर्यंत मुसंडी मारली. कनिष्क आणि हुविष्क यांच्या कारकिर्दीत कुशाण सत्ता आपल्या उत्कर्षाच्या शिखरावर होती. त्यामुळे जवळपास अर्धा शतकाहून अधिक काळ यौधेयांना कुशाणांचे वर्चस्व सहन करावे लागले.
यौधेयांचे ई.स. १४५ च्या सुमारास उत्तर-पूर्व राजपुतानामध्ये कुशाणांविरुद्ध स्वातंत्र्याचे निशाण उभारले. हा उठाव मोडून काढण्याचे काम शक महाक्षत्रप रुद्रदामन प्रथम याच्याकडे सोपवण्यात आले असावे. त्यामुळे त्याचा यौधेयांसोबत संघर्ष होऊन यौधेयांचा पराभव झाला. या विजयाचा उल्लेख रुद्रदामनने आपल्या जुनागढ शिलालेखात गर्वपूर्वक केला आहे की, “सर्व क्षत्रिय ज्यांच्या पराक्रमाचा आदर करत होते, अशा गर्विष्ठ यौधेयांचा त्याने बळाचा वापर करून पराभव केला”.
अशा या यौधेयांचा इतिहास आणि त्यांचे भौगोलिक स्थलांतरे नाणकशास्त्राच्या आधारे उभे करावे लागते. यौधेयांनी प्रामुख्याने तांब्याची नाणी पाडली, जरी त्यांचे सोन्याचे एक आणि चांदीचे एक नाणे सापडले असले तरी तांब्याची नाणीच सर्वाधिक प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांच्या काही नाण्यांवर आपल्या गणाचे अभिमानदर्शक “यौधेयगणस्य जयः” शब्द आहेत , तर काहींवर ‘योधेयानां बहुधान्यके’ असे लिहिलेले आढळते यांची राजधानी रोहतक असावी आणि याच सुपीक प्रदेशाला बहुधानक म्हणजे विपुल धान्य देणारा प्रदेश म्हटले जात असावे. मुगलपुरा येथून सापडलेले ‘चक्र’ प्रकारचे शिसाचे नाणे यौधेयांच्या प्रजासत्ताक राजकीय व्यवस्थेवर आणि त्यांच्या ‘परिषद धोरणावर’ एक अत्यंत नवीन व महत्त्वपूर्ण प्रकाश टाकते (Ref:-Some Recently Discovered Yaudhey Coins Throwing Fresh Light on Their History and Polity). डॉ. के. पी. जयस्वाल यांच्या मते, प्राचीन प्रजासत्ताक राजकीय व्यवस्थेत ‘परिषद’ ही ‘समिती’ सारखीच एक प्राचीन आणि सर्वोच्च संस्था किंवा सभा होती. छांदोग्य उपनिषदातही पंचाल देशाच्या परिषदेचा उल्लेख आढळतो.
ही ‘परिषद’ संकल्पना काय होती यावर बरेच चिंतन करण्यासारखे आहे. रोमन साम्राज्यात ‘सिनेट’ होते. रोमनांचे साम्राज्य उभे राहिले तेव्हा सत्तेची बरीच सूत्रे या सिनेटकडे असायची. पुढे सिनेटचे राजे अवहेलना करू लागले. म्हणजे सिनेटचे मंत्रिमंडळ आणि रोमन राजा हे एकमेकांविरुद्ध उभे राहिले. सत्तेचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी संघर्ष होऊ लागले आणि साम्राज्याची शक्ति क्षीण होऊ लागली. सिनेट हे नाममात्र राहिले. यौधेयांची परिषद सिनेट सारखी असावी का ? की संपूर्ण कायदेमंडळ आणि न्यायमंडळ एका परिषदेकडेच असावे ? याचे उत्तर देणे तसे सोपे नाही. त्याचे कारण म्हणजे भारतीय जातीव्यवस्थेमुळे परिषदेत असणारे कोणते लोक असायचे हे सांगणे कठीण आहे.
गणाचे असणारे सामाजिक नियम कोण ठरवायचे हे सुद्धा सांगणे कठीण आहे. थोडक्यात या परिषदेची व्यवस्था कोणाकडे असायची हेच सांगणे अवघड आहे. एवढे मात्र म्हणता येईल की परिषद ही एक व्यक्तीकेंद्रित नव्हती. राजा किंवा राजपद होते का ? तर असण्याची शक्यता आहे. पण त्याला तितके गणात महत्व नसावे. यासाठी मराठा काळातील बारभाईंचा काळ लक्षात घेतला तर तिथेही सत्तेची सूत्रे काही काळापुरती एका मंत्रिमंडळाकडे केंद्रीभूत झाली होती. परंतु बारभाई हे एका कारणामुळे एकत्रित आलेली लोक होती. पुढे बरभाईंचा नाना फडणीसांच्या कारभारामुळे ‘एकभाई’ कारभार सुरू झाला. त्यामुळे व्यक्तीकेंद्रित आणि वंशपरागत सत्ता असणे हे भारतीयांची जुनी मानसिकता आहे. यात परिषद निवडून कोण देत असत आणि निवडणूक कशी होत असे हाही मोठा प्रश्न आहे. लोकशाहीत सर्वांना समान मताधिकार ही पद्धत अडीच हजार वर्षां पहिले अवलंबिले गेली असेल याची शक्यता अगदी शून्य आहे. त्यामुळे परिषद सुद्धा वंशपरंपरेने असणारी ठराविक लोकांची एक संगठना असावी का ? खरेतर याचीच शक्यता अधिक वाटते. शेवटी एवढेच की एवढ्या प्राचीन काळात भारतात काही गणराज्ये ही व्यक्तिकेंद्रित सत्ताधारी नसून परिषद केंद्रित सत्ताधारी होती.
©पृथ्वीराज धवड
Written By: Pruthvi Dhawad