मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग ११ –
पेशवेकालीन कागदपत्रांतील ‘खाशा’ शिक्का आणि त्याचे ऐतिहासिक महत्त्व – पेशवाईच्या प्रशासकीय व्यवस्थेत राज्यकारभाराचे कागदपत्र, सनदा आणि सरकारी हुकूम यांची अधिकृतता ठरवण्यासाठी ‘शिक्या’चे स्थान सर्वोच्च होते. पत्रातील मजकूर कितीही महत्त्वाचा असला, तरी त्यावर अधिकृत शिक्का नसेल किंवा योग्य प्रकारचा शिक्का नसेल तर ते पत्र कायदेशीरदृष्ट्या अमान्य मानले जाई उदा.
१. ‘उपराटा न’ – पेशव्यांच्या अस्सल (खाश्या) शिक्याची खूण
पेशव्यांच्या खाश्या (वैयक्तिक/अस्सल) शिक्याची सर्वात मोठी आणि वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे शिक्यातील ‘प्रधान’ या शब्दातील ‘न’ हे अक्षर मुद्दाम उपराटे (उलटे) कोरलेले असे हे आपण पाहिले. त्यासंबंधी खालील संदर्भ अत्यंत महत्वाचा आहे.
नाना फडणवीस यांच्या काळातील एका पत्रात यासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा उल्लेख आढळतो.
“जिल्हेची पत्रे मुतालकीच्या सिक्याची होतात. खासा सिका ज्याजवरी प्रधान उपराटा सिक्यात आहे ते पत्र आनऊन दाखवा. किंवा सचिवाचे पत्रे दाखवा यैसे म्हणतात… अथवा मुलाणे कसबे मजकुरचे याजपासी मुलाणकी बाबत सनदा आहेत. त्या आणवऊण त्यात सचिवाची किंवा प्रधानपंतांचे नावाच्या सिक्यात उपराटा न आहे. ती सनद जरूर शोध करून लवकर पाठवणे.”
पत्राचे विश्लेषण –
सदर पत्रातील वाद नेमका कशा संदर्भातील आहे हे कळत नाही परंतु पत्रावर केवळ मुतालकी (कारभाऱ्यांचा) शिक्का पाहून नाना फडणवीस यांनी हरकत घेतली, आणि अस्सल खासा शिक्का असलेले पत्र आणून दाखवण्यास सांगितले.
अस्सलतेचा पुरावा यावरून स्पष्ट होते की, ज्या शिक्यात ‘प्रधान’ मधील ‘न’ हे अक्षर उलटे कोरलेले असे, तोच पेशव्यांचा अस्सल ‘खासा शिक्का’ मानला जाई. (पुरंदरे दफ्तर, भाग-३, लेखांक २०२)
२. बिनशिक्याच्या पत्राची अमान्यता –
ज्या ज्या पत्रांवर पेशव्याचा शिक्का असणे अपेक्षित आहे, त्या त्या पत्रावर पेशव्यांचा अधिकृत शिक्का नसणे ही गंभीर प्रशासकीय त्रुटी मानली जाई.
मानाजी आंगरे यांच्या पत्राचे उदाहरण पहाता येईल.
वासुदेव जोशी यांनी पेशव्यांना लिहिलेल्या पत्रातील वाक्यावरून हे स्पष्ट होते.
“स्वामींनी मानाजी आंगरे यांस पत्र पाठवले त्यांजवरी सिका नाही याकरिता स्वामींकडे फिरोन पाठवले आहे.”
निष्कर्ष – खुद्द पेशव्यांनी पाठवलेले पत्र असले, तरी जर त्यावर अधिकृत शिक्का नसेल तर ते अमान्य ठरवून परत पाठवले जाई. यावरून पेशवेकालीन प्रशासनातील कडक शिस्त दिसून येते.
३. शिक्याचे स्थान आणि अलौकिक उपमा –
कागदपत्रावर अस्सल शिक्का असणे हा त्यातील मजकुराच्या खरेपणाचा मुख्य आधार होता. इतिहासकार दा. गो. ढबू यांनी आपल्या ग्रंथात या शिक्याचे महत्त्व सांगताना अतिशय समर्पक रूपक वापरले आहे.
“कागदपत्रावर शिक्का असणे म्हणजे स्त्रीच्या सौभाग्याचा असलेला कपाळावरील जसा टिळा, तसा या कागदपत्रांवरील शिक्का होय.”
संदर्भ – कुलाबकर आंगरे यांचा इतिहास (दा. गो. ढबू, पृ. १४४)
राम वाघोले
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग १०
मराठेशाहीतील शिक्का व मोर्तब भाग १
