उमा महेश्वर | सिद्धेश्वर मंदिर, लातुर

उमा महेश्वर | सिद्धेश्वर मंदिर, लातुर

उमा महेश्वर (सिद्धेश्वर मंदिर, लातुर) –

लातुर शहराचे मुळ नाव रत्नपुर. येथे रत्नेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर असल्याचे सांगितले जाते. त्या मंदिरातील हे अप्रतिम उमा महेश्वर शिल्प. जे आता सिद्धेश्वर मंदिरात जरा अडगळीत पडलेले आहे. उमा महेश्वर (सिद्धेश्वर मंदिर)या शिल्पात शिव सव्य ललितासनात असून (डाव्या पायाची मांडी घातलेली उजवा पाय मोकळा खाली टेकवलेला) पार्वती वाम ललितासनात (उजव्या पायाची मांडी, डावा पाय खाली सोडलेला) मांडीवर बसलेली आहे.

शिवाच्या डाव्या वरच्या हातात त्रिशुळ आहे, डाव्या खालच्या हातात बीजपुरक आहे. उजवा एक हात पार्वतीच्या स्तनांना स्पर्श करत असून दूसरा हात पाठीमागे आहे. त्या हातात सर्प असावा. नीट दिसत नाही. पार्वतीचा उजवा हात शिवाच्या खांद्यावर आहे त्याची बोटं दिसतात. डाव्या हातात बीज पुरक आहे. एरव्ही जटा मुकुटात असणारा शीव येथे करंड मुकूटात आहे. कपाळावर मुकुटाची छान नक्षीदार महिरप आली आहे. पार्वतीही अशाच नक्षीदार मुकुटात दाखवली आहे. शिवाला नेहमी सर्पालंकार दाखवतात. पण इथे गळ्यात, कानात, दंडात, छातीवर  सुंदर अलंकार आहेत. पायाशी नंदी आहे. या शिल्पाच्या उजव्या बाजूस गणेश आणि डाव्या बाजूस कार्तिकेय आहेत. एका फ्रेममध्ये येत नसल्याने त्यांची छायाचित्रे दिली नाहीत.

शिव पार्वतीच्या मध्ये एक हात दिसत आहे पण तो कुणाचा हे ओळखु येत नाही. पार्वतीचा तो हात असेल तर तिचा चौथा हात कुठे असेल?

ही मूर्ती फार मोठा ठेवा आहे. अभ्यासक जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा. सध्या ज्या अडचणीच्या जागी आहे तिथून बाहेर काढून तिची स्थापना चांगल्या ठिकाणी करावी. जेणेकरून छायाचित्र नीट काढता येईल, अभ्यासकांचे लक्ष जाईल. हे छायाचित्र निवृत्त शिक्षक एस.के. माने यांनी पाठवले आहे.नंदी वाहन असलेली ही शिवपार्वतीचीच मूर्ती आहे . अन्य कुठल्याही मूर्तीशी अर्थ लावू नये . खान्देशात बऱ्याच शिव मंदिरात अशा मुर्ती आहेत .

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here