महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,48,214

जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील प्राचीन अवशेष भाग २

By Discover Maharashtra Views: 1434 10 Min Read

जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील प्राचीन अवशेष भाग २ –

जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील प्राचीन अवशेष भाग १ वाचण्यासाठी येथे क्लीक करा.

५) भाजलेल्या मातीची मूर्ती —-
जुन्नर परिसरात सातवाहन कालीन लोकवस्ती स्थळाच्या भागातून पक्क्या भाजलेल्या मातीच्या काही मूर्ती सापडले आहेत. येथील सापडलेल्या मूर्तीत पुरुषांचे चेहरे तसेच लहान मुलांची बनवलेल्या खेळण्यातील घोडा, हत्ती, बैल या जनावरांच्या मूर्ती सापडलेल्या आहेत. प्राण्यांच्या मूर्तीना गोल आकाराची चाके लावली जायची ति खेळण्याची चाके अगरगांव, दिल्ली पेठ, गोळेगाव परिसरातून आढळलेली आहेत.

६) हाडांच्या वस्तू —
जुन्नर परिसरातून हाडांपासून बनवलेल्या डोळ्यात काजळ घालण्यासाठी बनवलेल्या काड्या ( कज्जल शलाका ) मिळाल्या आहेत. कज्जल शलाका ह्या तेर , पैठण, नेवासा, भोकरदन येथे मिळालेल्या प्रमाणे सातवाहन कालीन आहेत. काही काड्या ह्या शलाका नसून बहुतेक सुया असल्यासारख्या वाटतात.

७) समुद्र शंखाचे अवशेष —
जुन्नर परिसरात आढळलेल्या वस्तू मध्ये शंखा पासून बनवलेल्या अनेक व्यासाच्या बांगड्यांचे अवशेष मोठ्या प्रमाणात आढळून आलेले आहेत. शंखापासून बांगड्या तयार करण्यासाठी जाड कवचाचा शंख लागत असे. बागड्या बनविल्या जाणाऱ्या शंखास शास्त्रीय भाषेत ” टर्बोनीला पायरम” असे नाव असून हे शंख समुद्रात मोठ्या आकाराचे असल्याने ते भंडोज, कल्याण सारख्या मोठ्या तत्कालीन बंदरातून जुन्नर च्या बाजारपेठत येत असत.

सातवाहन काळात जुन्नर भागातून शंखाच्या बांगड्यांना त्याकाळी मोठी मागणी होती. या बांगड्या बनवण्यासाठी लागणारे ” टर्बोनीला पायरम” जातीचे शंख केवळ तामिळनाडू किंवा सौराष्ट्रातील कच्छ पाल्क / खंबातच्या आखातातील समुद्रात सापडत असत. हे शंख कल्याण – नाणेघाट मार्गाने जुन्नरच्या बाजारपेठेत आणले जात असे. सातवाहन काळात जुन्नर मधील महिला शंखापासून बनवलेल्या बांगड्या, मणी वापरत असत. सातवाहनकालीन लोकसंस्कृतीशी संबंधित म्हणून बांगड्या वापरत नव्हते तर शंखाच्या बांगड्या बनवण्याचा कारखाना सातवाहन काळात जुन्नर येथे होता असे सिद्ध होते. समुद्रातील शंखामुळे नाणेघाट मार्गाने जुन्नरशी इतर बाजारपेठेचा व्यापार संपर्क जुळला गेला. जुन्नर परिसरातील अगरगांव, दिल्ली पेठ, सुसरबाग, खालचा माळीवाडा, गोळेगांव, निरगुडे, कुसूर, पाडळी, उदापूर अशा सातवाहन काळातील लोकवस्तीच्या स्थळा मध्ये आढळलेल्या शंखाच्या काही नाभी भागा वरील तुकड्यांवर तीक्ष्ण हत्यारांनी खाचा पाडलेल्या आढळून आलेल्या आहेत. बांगड्या बनविताना शंखाचे विशिष्ट अवजारांच्या साह्याने तिरपे काप घेऊन त्यांच्या चकत्या काढल्या जात असत. शंखाचा बाह्यभाग बांगड्या बनविण्यासाठी वापरला जात असत.

शंखाच्या बांगड्या तयार करण्यासाठी निरनिराळ्या प्रकारच्या करवती त्याकाळी जुन्नर मध्ये तयार करण्यात आल्या असणार. त्याचप्रमाणे बांगड्याच्या कातरलेल्या कडा गुळगुळीत घासून करण्यात येणाऱ्या सहानी जुन्नर परिसरातून पुढे उजेडात येऊ शकतील . शंखापासून बागड्या तयार झाल्यावर त्यावर काही वेळा लाखेची व सोनेरी वर्खाची नक्षी किव्हा लेपन करीत असत. अंखड बांगडी बनवताना काही वेळा बांगड्याचे तुकडे होत असत ते तुटलेले तुकडे ऐकमेकाना विशिष्ट पध्दतीने जोडून बांगड्या बनवित असत. ‘मेसोपोटेमिया’ भागातून शंखाच्या बांगड्याना मोठी मागणी असल्याने जुन्नर मध्ये तयाय होणाऱ्या शंखाच्या बांगड्या नाणेघाट मार्गाने समुद्र बदरातून तिकडे जात असाव्यात. सातवाहन काळातील महिला ,नर्तकीच्या शिल्पामध्ये दंडापर्यत शंखाच्या बांगड्या घातलेल्या दिसून येतात.

शंखा मध्ये असणारे प्राणी अपृष्ठवंशीय प्रकारचे म्हणजेच पाठीचा कणा नसणारे असून त्यांचा समावेश मृदूकाय कवची या वर्गात होतो. या प्राण्याच्या शरीरात हाडे नसली तरी त्यावर बाहेरच्या बाजूस भक्कम कठीण कवच असते ते कवच “कॅल्शियम कार्बोनेट “चे बनलेले असते. अशा प्रकारच्या शंखाचे कवच निरनिराळ्या आकाराचे व रंगाचे असते. शंखामध्ये हे कवच सलग तसेच एक संघ असते. अशा प्रकारच्या शंखाच्या कवचात “कॅल्शियम कार्बोनेट” आणि “काँन्कोलीन” हे प्रथिने असल्यामुळे शंखाचा वापर
किरणोत्सर्गी कार्बन कालमापनासाठी करता येते .

प्राचीन सातवाहन कालीन जुन्नरच्या लोकसंस्कृती वस्तीस्थळाच्या भागातून मिळणाऱ्या शंखाचे वेस्टेज अवशेषावरून जुन्नरच्या नागरी व्यापारी विषयावर अभ्यास करता येतो. पूर्वी जुन्नर परिसरात शंखकारी या समाजाचे लोक परंपरागत पद्धतीने शंखा च्या बांगड्या बनवण्याचा व्यवसाय करीत होते. “टर्बोनीला पायरम , प्युगिलिन बुचिफेला, चिकोरिस रामोसस” ह्या जातीच्या शंखापासून बांगड्या जुन्नर च्या सातवाहन काळात तयार होत असत. जुन्नर परिसरातील प्राचीन काळातील शंखाच्या अवशेषा वरुन त्या काळातील पर्यावरण संबंधी अत्यंत उपयुक्त माहिती , त्या काळातील प्राचीन सागरी तापमान समुद्रकिनाऱ्या संबंधी माहिती मिळू शकते. शंखाच्या अवशेषा वरुन कोणती वसाहत कोणत्या ऋतूमध्ये वसवली गेलेली आहे. त्याचे अनुमान शंखाच्या अवशेषावरुन संशोधक काढत असतात.

८) सातवाहन कालीन घराच्या छप्परावरील कौल –
जुन्नर परिसरातील सातवाहन कालीन घराची छपरे ही भिंतीत आणि जमिनीत लाकडी वासे पुरून त्यावर आडव्या लंगी टाकून तयार करीत आणि त्यावर एका विशिष्ट प्रकारच्या मातीची भट्टीत भाजून काढलेली कौले ठेवीत असत . या कौलांच्या वरील भागास पन्हाळ्या केलेल्या असंच पावसाचे पाणी झटकन निघून जाता यावे म्हणून ही व्यवस्था केलेली असायची. शिवाय कौलाच्या खालच्या भागास एक खाच असून ती शेजारच्या कौलाच्या कडेत अडकविली जात असत. या कौलांना वरच्या अंगास दोन छिद्रे असत त्यातून ती खिळ्यानी लाकडी वाशांना ठोकून किंवा झाडा – झुडूपाच्या वेलांनी लाकडी वाशाना बांधली जात असावीत. त्यामुळे ति कौले छप्परावरील लाकडी वाशांना घट्ट धरुन राहात असे.

अशा प्रकारची भाजलेल्या मातीची पक्की कौले जुन्नर, गोळेगाव, अगरगांव परिसर, उदापूर त्याच प्रमाणे नाशिक, कोल्हापूर, तेर, पैठण, भोकरदन आदी सातवाहन कालीन लोकवस्ती स्थळाच्या ठिकाणी केल्या गेलेल्या उत्खनना मधील थरामध्ये सापडली आहेत. कौलांना दिलेला उतार व त्यांच्यावर काढलेली पन्हाळी यावरून महाराष्ट्रात सध्या विद्यमान असलेल्या पावसाच्या मानापेक्षा जास्त पाऊस सातवाहन काळात जुन्नर परिसरात पडत असावा असे कौलाच्या रचनेवरून कळते.

जुन्नर परिसरातील सातवाहन काळातील घरे आकाराने लहान – मोठ्या विटांच्या भिंतीची व योजनापूर्वक पाया भरणी केलेली असत. ही छप्परे लाकडी खांबांच्या आधारावर होती. सर्व साधारण घर पडवी, बैठक खोली व स्वयंपाक घर अशा तीन भागात विभागलेली होती. जुन्नर परिसरातील लेण्याद्री, शिवनेरी, अंबा – अंबिका, भूतलेणी, भिमाशंकर लेणी, तुळजा अशा प्रकारच्या असंख्य लेण्यात जे शेकडो भिक्षु निवास ( वर्षावास) करीत असतील त्यांच्या भिक्षेसाठी, निर्वाहासाठी आश्रय देणाऱ्या लोकांच्या वस्त्या या जुन्नर परिसरात ठिकठिकाणी दिसून येतात.

९) सातवाहनकालीन जुन्नरची नाणी —
सातवाहन राजवंशाचा इतिहास समजून घेण्यासाठी जुन्नरची नाणी अत्यंत उपयोगी पडतात . जुन्नर येथील सातवाहन कालीन विशेष करून सिंह छापाची नाणी प्रसिद्ध आहे . या नाण्याच्या एका बाजूस सिंहाची आकृती दाखवली असून सिंहाच्या मानेभोवती बिंदूयुक्त आयाळ असून शेपटी वर उचललेली आहे .हा सिंह लढाईच्या तयारीत नाण्यावर दाखविण्यात आलेला आहे. सिंहाच्या पोटात कमानीचा चैत्य आहे. सिंह डावीकडे तोंड करून उभा दाखविला असून त्याच्या तोंडा पुढे ध्वज चिन्ह दाखवले आहे.
नाण्याच्या दुसऱ्या बाजूस उज्जैन चिन्ह व नंदीपाद चिन्ह आहेत . दोन डंबेल्स एकमेकांवर एक उभा आणि एक आडवा ठेवलेला असून त्यांच्या चारी टोकांना चार पोकळ वर्तुळे आहेत.जुन्नर परिसरातून श्री सातवाहन, श्री सातकर्णी, वासिष्ठीपुत्र, नहपान, नागनिका, सिव सातकर्णी, पुलमावली ही नाणी अभ्यासकांना उपलब्ध झालेली आहे. सिंह छाप नाणी हे सातवाहन काळातील जुन्नर टांकसाळीचे वैशिष्ट्य आहे. ही नाणी तांबे,पोटीन, शिसे, चांदी या धातुची आढळली आहेत. जुन्नर परिसरातून उपलब्ध झालेल्या नाण्यावर सिंह,घोडा, हत्ती इत्यादी राजपददर्शक प्राणी ,कुपणातील झाड, नंदिपद, स्वस्तिक वगैरे सारखी चिन्हे आढळून आली आहे. नाण्यावरील लेखाची सुरुवात राजपद दर्शक ” राज्ञौ ” शब्दाने झालेली दिसते.

सातवाहन राजा सातकर्णी यांची पत्नी आणि एक शूर महिला राज्य करणारी राणी नागणिका ही भारतातील पहिली राणी होती. तिने आपले स्वतःचे नाणे टांकसाळीत केले. नाण्यावर पुढील बाजूने मध्यभागी ” नागणिकाय” असे लिहीलेले असून त्या बाजूने ” राज्ञौ सिरी सातकनिस” असे पतीचे नाव ब्राह्मी लिपीमध्ये अंकित आहे. तसेच नाण्यावर घोडा असून मागील बाजूस उज्जैन चिन्ह अंकित आहे. जुन्नर मधील काही नाण्यावर हत्ती आणि त्याच्या पुढे कुंभ असलेली नाणी सापडली असून ह्या नाण्यावरुन असे समजते की, रोमन लोकांच्या अँम्फोरा या विशिष्ट प्रकारच्या कुंभावरुन भारतीय लोकांनी स्फूर्ती घेतली असावी.

जुन्नर मधील नहपान नाण्यावर तेथील सातवाहन कालीन नाण्यावरील नेहमीचा सिंह असून सिंहाच्या समोर विजयध्वज असून सिंहाच्या पोटात कमानीचा चैत्य दाखविला आहे. सिंहाच्या पाठीवर ” राज्ञौ महाखतपस नहपानस” अशा लेखाचा मजकूर आहे. पाठी मागच्या बाजूस ‘ वर्ज’ आणि ‘ धनुष्यबाण’ ही चिन्ह आहेत महाखतपस हे बिरुद नहपानाने सातवाहनांच्या विजया नंतर घेतले असावे. जुन्नर येथील सिंह छाप नाण्याचे वजन १५ ग्रँम, १६.२२ ग्रँम, ४.६ ग्रँम , १.५० ग्रँम अशा वजनाची आहे. वरील नाणी प्रस्तुत लेखकाच्या नाणी संग्रहात आहे. जुन्नर येथील सर्व वरील प्राचीन अवशेष , वस्तू , नाणी यावरून असे सिद्ध होते की, जुन्नर ही सातवाहन काळात एक व्यापारी व कला केंद्र होते हे आपल्याला माहित होते.अशा प्रकारे जे अल्पसे संशोधन माझ्या हातून गेल्या काही वर्षात जुन्नर परिसरात केले गेले त्यावरून जुन्नरची तुलना भरभराटीस आलेल्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण, तत्कालीन पैठण , तेर, भोकरदन, नेवासा अशा सातवाहन काळातील आदी प्राचीन नगराशी करता येईल असे मला वाटते.

बापूजी ताम्हाणे, गोळेगाव – लेण्याद्री
ता. जुन्नर, जिल्हा. पुणे ( महाराष्ट्र )

संदर्भ :
१) सुरेश वसंत जाधव – जुन्नर परिसरातील संशोधन , पुणे त्रैमासिक ६२: १-४,जुलै १९८३ ते एप्रिल १९८४ पृ. ७२
२) संजय गोडबोले – जुन्नर येथील काही प्राचीन अवशेष, पुणे त्रैमासिक ६९: १-४,जुलै १९९० ते एप्रिल १९९१ पृ. २५
३) शांताराम भालचंद्र देव – पुरातत्वविद्या , पुणे १९७६ पृ. १२९
४) डॉ. सौ. दीपा सावळे – मराठे कालीन दागदागिने आणि अलंकार, प्रकरण पहिले – प्रथमावृत्ती जून २००७

Leave a comment