महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ पासून Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ३५ हुन अधिक विषयांवर ३०००+ लेख आहेत. वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Website Views: 95,28,463

पहिला आणि शेवटचा राजकीय खून..!!

Views: 2
11 Min Read

मराठ्यांच्या दैदिप्यमान, तेजस्वी इतिहासात उच्चपदस्थ राज्यकर्त्याचा, त्याच्याच रहात्या वाड्यात, त्याच्याच पदरच्या कनिष्ठ लोकांच्याकरवी झालेला हा पहिला आणि शेवटचा राजकीय खून..!!

“विजयनाम संवत्सर, भाद्रपद शुद्ध १३, शके १६९५, सोमवार दि.३० ऑगस्ट १७७३ रोजी श्रीमंत नारायणराव पेशव्यांचा भर शनिवारवाडयात गारद्यांकरवी झालेला निर्घृण खून हा मराठ्यांच्या इतिहासातील एक काळा दिवस ठरला..!!”  श्रीमंत थोरल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर सखारामबापू व राघोबानी नारायणरावांस साताऱ्यास नेऊन पेशवाईची वस्त्रे देववली. राघोबास रीजंट नेमण्यात येऊन सखाराम बापूंस कारभारीपदावर कायम करण्यात आले. नानांस फडणवीशी मिळाली. त्यावेळी नारायणरावांचे वय केवळ १७ वर्षांचेच, पण कैलासवासी श्रीमंत माधवरावांसारखा समजूतदारपणा त्यांचे अंगी न्हवता. मागचे-पुढचे धोरण, माणसांची परिक्षा व त्यांची किंमत ही त्यांस कळत नव्हती.

मरतेसमयी श्रीमंत थोरल्या माधवरावांनी धाकट्या नारायणरावांस सखारामबापुंच्या धोरणाने वागत जा म्हणून सांगितले होते. परंतु नारायणरावाने त्याकडे फारसे लक्ष दिले नाही. एके प्रसंगी सखारामबापूचा त्यांनी भर दरबारात शिवीगाळ करून अपमान केला. सखारामबापू व नारायणराव यांच्यामध्ये खटका उडण्याचे दुसरे कारण असे झाले की, पटवर्धन सरदारांनी सरकारांत भरणा केलेला नव्हता, त्याबद्दल सखारामबापू व राघोबानी पटवर्धनांचे मागे तगादा लावला. या बाबतीत बापू व राघोबा एक मताने वागतात याचे श्रीमंत नारायणरावास वैषम्य वाटू लागले.

नाना फडणीसांसारखे श्रीमंतांचे खरे हितचिंतक शहाणे व मुत्सद्दी होते ते अब्रुच्या भयाने उदासीन राहू लागले व हलक्या लोकांचे श्रीमंतांजवळ प्राबल्य होऊन त्यांच्याच मताने कारभार चालू लागला. श्रीमंत माधवरावसाहेब यांनी केलेले भाकित खरे होण्याची वेळ आली. कारण की, दरबारची अहवाल काय चालली आहे इकडे दादासाहेब व तत्पक्षीय लोकांचे लक्ष वेधून राहिले होतेच. त्यांनी नारायणरावसाहेब यांस कैदेत घालण्याचा बेत केला. सखाराम बापू्नीही तिकडे कानाडोळा केला. नानांस ही कुणकुण कळली होतीच, परंतु श्रीमंतांजवळ उघडपणे बोलणे हे चोरी, कारण श्रीमंतांजवळ अष्टौप्रहर रहाणाऱ्या लोकांपैकी काही या फितुरांत मिळाले होते. खुनापर्यंत मजल येईल ही अटकळ नानांच्याच काय कोणाच्याही स्वप्नी येण्याजोगी नव्हती. ती मसलत आनंदीबाई, गारदी व काही परभू यांनी अगदी आयत्या वेळी केली. नारायणरावसाहेबांस कैद करून दादासाहेबांस गादीवर बसवावे, असे बेत चालले असल्याचे मात्र नानांस कळले होते व त्याविषयी त्यांनी श्रीमतांस आगाऊ इशारत दिली होती.

श्रीमंत नारायणराव हूड होते. कारभारी यांचा बहुमान रक्षीत नसत. एके दिवशी पर्वतीस स्वारी गेली. तेथे सारे बोथाट्या खेळत होते. याप्रमाणे खेळत असता श्रीमंतांनी नाना फडणवीस यांचे पागोटे बोथाटीने पाडले आणि हसू लागले, नाना.. तुमचे पागोटे खाली पडले.!! तेव्हा नानांनी श्रीमंत नारायणरावांना, ‘मी कारकूनच आहे. माझे पागोटे पडले यात काही आश्चर्य नाही. स्वामींनी आपले पागोटे सांभाळावे.!!’ असे सूचक उत्तर केले. पण त्यांत नानांनी (सावधपणा धरण्याविषयी) सूचना केली हे काही (श्रीमतांस) कळले नाही.

पुर्वी एकदा श्रीमंत माधवराव पेशव्यांनी नारायणरावांस असेही सांगितले होते की, ‘जे काही करणे ते हरिपंत यांचे विचारे करत जाणे, तर काही दिवस वाचशील, नाहीतर तुझे जीवास कठीण आहे..’ पण हरिपंतांस श्रीमंत काही विचारीत, काही न विचारीत. कोणतीही गोष्ट त्यांच्या पोटात फारशी रहात न्हवती. त्यामुळे हरिपंत फडकेही त्यांच्यांशी फार लगट करीत न्हवते.

‘श्रीमंत नारायणरावांचा स्वभाव उच्छरुंखल. ते माधवरावांच्या तापट स्वभावाचे अनुकरण करत पण माधवरावांची गुणग्राहकता,स्थिरबुद्धी, विवेकबुद्धी मात्र त्यांच्याजवळ न्हवती.’ सखारामबापू, नाना फडणीस यांच्याशीही त्यांचे नीटसे जमत नसे.

श्रीमंत नारायणरावांस पेशवेपद मिळाले म्हणून रघुनाथराव आणि आनंदीबाई मनातून नाराज होतेच. नारायणरावांचे मनातही त्यांचेबद्दल संशय होताच. त्यामुळे कधी नारायणराव सल्ल्यास राघोबा दादांकडे गेले तर ते त्याकडे दुर्लक्ष करत. या विकल्पांमुळे काका पुतण्यात द्वैतभाव वाढत गेला. पुढे श्रीमंत नारायणरावांनी ह्या उभयतांना संशयापोटी विनाचौकशी नजरकैदेत टाकले. हे बापू व नानांस देखील आवडले नाही. याच सुमारास परभु ज्ञातीच्या एका निवाड्याचे प्रकरण उद्भवून त्याचा निकाल नारायणरावांनी परभूंच्या विरुद्ध दिला. त्यांच्यावर अपमानकारक अटी लादल्या. त्यामुळे परभू लोक असंतुष्ट होऊन राघोबाच्या पक्षास जाऊन मिळाले. त्यात भर म्हणून दि.१२ एप्रिल १७७३ रोजी श्रीमंत नारायणरावांनी त्यांची आई गोपिकाबाईंच्या सल्ल्यानुसार सर्व मुख्य कारभार सखारामबापूंच्या हातून काढून नाना फडणीसांच्या हाती सोपवला. त्यात मुधोजी भोसल्याच्या वकीलाच्या प्रकरणाची आणखी एक भर पडली. मुधोजी भोसल्याचे जे परभु वकील पेशव्यांचे दरबारी होते त्यांना राजद्रोहाच्या संशयावरून एकाएकी नारायणरावांनी कैद केले.

या सर्वांचे परिणाम म्हणून रघुनाथराव व तत्पक्षीय मंडळी फितूर झाली व त्या फितुरीचे पर्यावसन श्रीमंत नारायणरावांच्या अटक करण्याच्या कटात व नंतर खुनात झाले. श्रीमंत नारायणरावांच्या खुनाच्या कटात कोणकोण मंडळी सामील होती हे नक्की ठरवता येत नाही. मात्र नाना फडणवीस व हरिपंत फडके हे निश्चितपणे त्यात नव्हते असे म्हणता येईल. राघोबादादास मुक्त करण्याचा कट श्रीमंत नारायणरावांचा खून होण्यापूर्वी ६ महिने झाला होता. त्यात पुष्कळ मंडळी (नाना व हरिपंत यांच्याशिवाय) सामील होती. त्यात सखाराम हरी, आबाजी महादेव, चिंतो विठ्ठल, शिवाजी कान्हो, सदाशिव रामचंद्र, हैदरचा वकील अप्पाजी राम वगैरे दादाच्या पक्षात होते. राघोबादादाचा हुजऱ्या तुळया पवार ह्याला नारायणरावाने चाबकाने मारलं होतं, त्याचं मन सूडाच्या भावनेनं पछाडलेलं होतं. त्यामुळे सुमेरसिंग, खरकसिंग, महंमद इसफ आणि बाकीच्या गारद्यांना फितवण्याचं काम तुळया पवारने केलं. हे सगळे कटवाले श्रीमंत नारायणरावांना अटकेत टाकण्याच्या प्रयत्नात होते. परंतु तशी संधीच त्यांना मिळत न्हवती.

दि.३० ऑगस्ट रोजी मात्र शनिवारवाड्यात पहारेकर्‍यांशिवाय आणि राघोबाच्या पक्षातील मंडळी वगळता खासे कोणी नव्हते, ही संधी कटवाल्यांनी बरोबर साधली. यावेळी नाना फडणवीस हे मुख्य कारभारी होते. परंतु त्यांनाही कटाचा सुगावा नव्हता. गारदी अस्वस्थ आहेत हे कळूनसुद्धा नाना व हरिपंत फडके यांनी कोणीच त्याबद्दल फिकीर बाळगली न्हवती. प्रत्यक्ष खून करण्याचे कामी पुढाकार घेण्यामध्ये महमद इसफ व सुमेरसिंग गारदी हे प्रमुख होते त्यांच्यासह ५०० गारदी होते असं म्हणतात. त्यांना याकामी राघोबाचा हुजऱ्या देसान व इतर चाकर यांनी राघोबाच्या सांगण्यावरून वश करून घेतले होते. मुधोजी भोसल्याकडून राघोबादादा व सखारामबापू यांना नारायणराव बेड्या घालणार असे कळल्यामुळे श्रीमंत नारायणरावांस मारण्याची मसलत कटवाल्यांनी फार जलदीने अमलांत आणली.

त्यादिवशी भर दुपारी तिसरे प्रहरी तुळाजी पवार, खरकसिंह, सुमेरसिंह व इतर गारदी नंग्या तलवारी घेऊन गणेश दरवाज्यातून शनिवारवाड्यात घुसले. त्याच दिवशी वाड्याचा खिडकी दरवाजा मोठा करण्याचे काम चालू झाले होते, त्यामुळे काही गारदी त्या खिंडारातून आत शिरले आणि नारायणरावांना शोधून त्यांच्या मागे लागले. गारदी मागे लागले कळल्यावर श्रीमंत नारायणराव घाबरे होऊन आपले काका रघुनाथरावांना मदतीसाठी हाक मारत, “काका मला वाचवा…” असे ओरडत शनिवारवाड्यातल्या दालना दालनातून सैरावैरा पळत होते आणि तेच त्यांचे अखेरचे शब्द ठरले.. गारदी सुमेरसिंगाने त्यांच्यावर तलवारीने अनेक वार करत त्यांचे प्राण घेतलेच. हि दुर्दैवी घटना घडली तो दिवस होता ‘विजयनाम संवत्सर, भाद्रपद शुद्ध १३, शके १६९५, सोमवार दि.३० ऑगस्ट १७७३..!!’ त्या दिवशी एका तरुण आणि उथळ, अवखळ स्वभावाच्या पेशव्यांचे त्यांच्याच महालात तुकडे तुकडे झाले. या हत्येच्या वेळेस झालेल्या कापाकापीत थोरल्या वाड्यात नारायणरावांसह इतर सहा ब्राम्हण असामी, एक हुजऱ्या चापाजी टिळेकर, दोन बायका, एक गाय इतकेही दुर्दैवाने ठार झाले.

या दुर्दैवी घटनेची नोंद शिवाजी बावजी हा मिरजेच्या पटवर्धनांच्या पदरचा वकील पुण्यात होता त्याने मिरजेला पाठवलेल्या पत्रात त्या दिवशी नक्की काय घडलं ह्याचं वर्णन करताना लिहिलं आहे की ‘दोन प्रहर तीन घटका वाजल्यावर दंगा झाला. सुमेरसिंग व महंमद इसफ यांचे सात आठशे गारदी होते. आंत शिरले. तसेच दरवाजावरील लोक मारिले. चोपाचोपी करीत आंत गेले तो यांजजवळ (पेशव्यांच्याजवळ) कोणी माणूस नव्हते. येक दोन पुर्ब्ये होते ते तेव्हाच पळाले.’

दि.१३ जुलै १७८३ च्या एका पत्रात केलेल्या कृतीबद्दल रघुनाथरावानी गोपिकाबाईंस लिहिले आहे की – “मी निखालस झालो त्यापक्षी लपवीत नाही. नारायणरावसाहेब यांस धरावे असा तर निश्चय, त्या प्रकरणीतील राजकारण करणारांसी केला. ते समयी त्यांनी विचारिले की, न जाणो, धरू जाता कलागत पडली आणि त्यांत कदाचित मारले गेले, तर दोष ठेऊ नये, असे त्यांनी सोडवून घेतले आणि कर्मास प्रवर्तले, ते समयी त्यांनी येऊन कमरेस सिठी घातली तेव्हा गलबल झाली. फुरसत पडू पावली नाही. दोहींकडे हात लावून निवारण करितो, इतक्यात घात करणारांनी आपले जीवाचे बचावास्तव हात टाकिला. तो प्रथमच पुरा बसला. त्याचा पुढील ग्रंथ तुम्हा सर्वांस समजलाच आहे. तेव्हा धरण्याचे संकल्पांत कलागती पडून मारला गेला तर दोष नाही” म्हणजे इतकं होऊनही राघोबादादा स्वतःचा दोष नाही चुकून मारला गेला अस म्हणतायत…!!
परभु समाजाचा छळ श्रीमंत नारायणरावांच्या खूनास अंशत: कारणीभूत होता. त्यांनी परभु लोकांकडून लिहून घेतलेला दस्तऐवज प्रथम जाळून टाकविला तेव्हाच श्रीमंत नारायणरावांचे प्रेत दहनास जाऊ दिले असे म्हणतात. त्यावेळी भवानराव प्रतिनिधीने सूत्र हाती घेऊन शहरात जागोजागी बंदोबस्ताच्या चौक्या उभारल्या.

त्याच रात्री सरदार त्र्यंबकमामा पेठयांनी तेलंगी ब्राम्हणांकरवी नारायणरावांच्या कलेवरचे तुकडे गोळा करून शनिवारवाड्याच्या मागच्या दरवाजाने – जांभळी / नाटकशाळेच्या दरवाज्याने बाहेर काढले त्यावेळी थकबाकीचे पैसे मागण्याकरता गारद्यांनी त्यांना अडवलं, त्यावेळी भवानराव प्रतिनिधीने स्वतः पैसे देण्याची हमी गारद्यांना दिली तेव्हा त्यांनी प्रेताचा मार्ग खुला केला. आणि नदीवर नेऊन नडगेमोडीच्या जवळ (आजच्या लकडीपुलाजवळ मुठा नदीच्या दक्षिण तीरावर पुलाच्या पूर्वेस) त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. मध्यरात्रीच्या सुमारास सगळी मंडळी निराश होऊन माघारी आली. पुढे सर्व उत्तरकार्यास मिळून रुपये ३६४२४ इतका खर्च आला.

श्रीमंत नारायणरावांच्या वधाचे गोपिकाबाईंना इतके अनावर दुःख झाले की, त्यानंतर पुढे त्या काही काळ मठात जोगीण बनून भिक्षेवर निर्वाह करू लागल्या. नारायणरावांवर त्यांचे अतिशय प्रेम होते. त्यांचे सिंहगडास लग्नही त्यांनीच लाविले. गंगापुरास नारायणराव तिच्याजवळ येऊन रहातही असत.
मराठ्यांचे तत्कालीन सत्ताकेंद्र असलेला शनिवारवाडा या राजकीय यादवीने झालेल्या खुनाच्या कलंकित घटनेमुळे रक्तरंजित झाला. नुकत्याच झालेल्या श्रीमंत माधवरावांच्या अकाली मृत्यूच्या धक्क्यातून सावरत असलेले मराठा साम्राज्य प्रत्यक्ष पेशव्यांच्या झालेल्या ह्या निर्घृण खुनामुळे प्रचंड हादरून गेले. या राजकिय कटामुळे आणि हत्येमुळे मराठा साम्राज्यात प्रचंड दुफळी माजली आणि ते यादवीच्या उंबरठ्यावर पोचले..
श्रीमंत नारायणरावांनी पोक्त विचाराने चांगली माणसं हाताशी धरून कारभार केला असता तर कदाचित मराठी राज्यात यादवी माजून साम्राज्य पोखरले गेले नसते. नारायणरावाच्या खुनानंतर मराठे मुत्सद्दी आणि सरदार यांच्यात फितुरी, विश्वासघात, वचनभंग, अप्पलपोटेपणा, अंगचोरपणा या सगळ्या राष्ट्रनाशाला कारणीभूत होणाऱ्या दुर्गुणांचा बेमुर्वत संचार सुरू झाला. आज श्रीमंत नारायणराव पेशव्यांचा २५३ वा स्मरण दिन..!! 🙏🏻

© स्वराज्यसेवक

संदर्भ :
१) पेशवे घराण्याचा इतिहास – प्रमोद ओक
२) राघोबा नारायणराव पेशव्यांचा खून – लेखक : डॉ.उदय कुलकर्णी – अनुवाद : विजय बापये
३) अधिकार-योग अथवा नानास राज्याधिकार मिळाल्याचा इतिहास – वासुदेव वामनशास्त्री खरे
४) इतिहास संग्रह : पुस्तक १ ले – दत्तात्रय बळवंत पारसनीस
५) मराठ्यांचा इतिहास : खंड ३ – अ.रा.कुलकर्णी, ग.ह.खरे
६) सखाराम बापुंचे चरित्र – यशवंत गोपाळ कानेटकर
७) इतिहासातील स्मृतिचित्रे – अरविंद ताटके
८) नागपुरकर भोसल्यांची बखर – लेखक – काशीराव राजेश्वर गुप्ते, संपादक – यादव माधव काळे

Leave a Comment