महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,49,592

काका मला वाचवा आणि ध चा मा

By Discover Maharashtra Views: 2192 12 Min Read

काका मला वाचवा आणि ध चा मा –

“काका मला वाचवा” आणि “ध चा मा” हे शब्द कानी पडताच आपणास आठवण येते ती श्रीमंत नारायणराव पेशवे यांच्या खुनाची व या कटाचे खापर ज्यांच्यावर फोडण्यात आले त्या आनंदीबाई पेशवे यांची. श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा शनिवारवाड्यात गारद्यांच्या मदतीने खून करण्यात आला. पेशवे गादीचा सत्ता संघर्ष व भावबंद्की याचे पर्यावसान नारायणराव पेशवे यांची हत्या घडवून आणण्यात आली. सदर घटनेत आनंदीबाई पेशवे यांच्या माथी खापर फोडून स्वतःच्या सुटकेचा मार्ग या कटाचे मुख्य सूत्रधार रघुनाथ पेशवे यांनी योजला होता परंतु न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी कटाचे मुख्य सूत्रधार रघुनाथ पेशवे यांना देहदंडाची शिक्षा ठोठावली .

“ काका मला वाचवा “

थोरले माधवराव पेशव्यांच्या मृत्युनंतर छत्रपती रामराजे यांनी नारायणराव पेशवे यांना पेशवेपदाची वस्त्रे दिली . पेशवे गादीचा लोभ असणाऱ्या रघुनाथ पेशवे यांचा अपेक्षाभंग झाला. रघुनाथ पेशवे आपल्याविरुद्ध कट कारस्थान करत आहे असा समज नारायणराव पेशवे यांना झाल्याने त्यांनी रघुनाथ पेशवे यांना नजरकैदेत ठेवले. शनिवारवाड्यात गणेशोत्सव फार भक्तिभावाने साजरा केला जात असे. गणेशोत्सवाच्या या काळात नारायणराव पेशवे यांच्या हत्त्येचा कट रचला जाऊ लागला. गणेशोत्सवाच्या निमीत्ताने रघुनाथ पेशवे यांना कैदेतून काही काळासाठी मुक्त करण्यात आले. शनिवारवाड्याच्या पहाऱ्यावर असणाऱ्या गारद्यांची मदत या कामी घेण्याचे ठरवण्यात आले. तुळाजी पवार याने गारद्यांशी बोलणी केली . नारायणराव पेशवे यांनी तुळाजी पावरास यास सर्वांसमक्ष चाबकाचे फटके दिले होते त्यामुळे याचा सूड घेण्यासाठी तुळाजी पवार या कटात सामील झाला. ( १ ) रघुनाथ पेशवे यांच्या स्वहस्ताक्षरातील चिठ्ठी सुमेरसिंग गारदी व खरगसिंग गारदी यांना देण्यात आली. त्यातील मजकुरानुसार “ नारायण बल्लाळ पेशवे प्रधान यास धरावे. “ ( २ )

अनंत चतुर्थीच्या आदल्या दिवशी नारायणराव पेशवे देवदर्शन घेऊन पुण्यातील पर्वतीहून शनिवारवाड्यास येण्यास निघाले. नारायणराव पेशवे यांना शनिवारवाड्यावर त्यांच्याविरोधात कट रचल्याची कुणकुण लागली . चापाजी टिळेकर यांनी “ आपणास वाड्यात ठार मारण्याचा बेत केला आहे. सबब स्वारी पार्वतीस जावी. आणि वाड्यात बंदोबस्त करावा. नंतर स्वारी वाड्यात जावी.” असे सुचवले. ( ३ ) परंतु नारायणराव पेशवे यांनी याकडे दुर्लक्ष केले. दुपारच्या सुमारास नारायणराव पेशवे शनिवारवाड्यात दाखल झाले. नारायणराव पेशवे भोजन करून विडा घेऊन महालात झोपावयास गेले. तुळाजी पवार यास नारायण पेशवे यांना सदर कटाची बातमी कळली असल्याची खबर लागली. त्यामुळे त्याने उशीर न करता कट लवकर अमलात आणण्याकरता गारद्यास खबर दिली “ आता तुम्ही उशीर करू नका . तुमचा फितूर वाड्यास समजला आहे. अश्या वेळी संधी साधेल तरच कार्य शेवटास लागेल. नाही तर सारे अवघे फाशात पडाल”. ( ४ )

सुमेरसिंग गारदी आपल्या दोनहजार लोकांसह चालून आला. दिल्ली दरवाज्याने गारद्यांचा जमाव आत शिरला . यावेळी रामपंत ढेरे यांनी गारद्यांना याबाबत जाब विचरला असता तुळाजी पवार याने गारद्यांना रामपंत ढेरे यास ठार मारण्याची सूचना केली त्यानुसार गारदी रामपंत ढेरे यांच्यावर चालून गेले. रामपंत ढेरे हे जीव वाचविण्यासाठी गोशाळेत आश्रयासाठी शिरले व गाईच्या आड लपून बसले. परंतु गारद्यांनी गाईच्या आडोश्यास असलेल्या रामपंत ढेरे यांना ठार केले त्यावेळेस गाय देखील मारली गेली. गारदी दिवाणखाण्यात दाखल झालेले पाहताच आबाजीपंत यांनी दरवाजे बंद करू लागले तेव्हा गारद्यांनी त्यांना ठार केले. शनिवारवाड्यात धांदल उडाली होती त्यामुळे नारायणराव पेशवे झोपेतून उठले गारद्यांचा जमाव आपल्याच अंगावर येत आहे हे पाहून व त्यांचा अवतार पाहून नारायणराव पेशवे यांना त्यांच्या विरोधातील कटाची कल्पना आली व त्यांनी तडक त्यांच्या काकांकडे म्हणजे रघुनाथ पेशवे यांच्याकडे धाव घेतली.

नारायणराव पेशवे यांनी रघुनाथ पेशवे यांना मिठी मारली व त्यांच्याकडे स्वतःस वाचवण्याची विनवणी केली. “गारद्यांनी वाड्यामध्ये मोठी धूम करून मारामारी केली. म्हणून मी तुम्हापाशी आलो. तुम्ही हा फितूर केलात . ते गारदी आता समजावून वाटेस लावावे. तुम्हाला राज्य करणे असल्यास मला कैदेत ठेवून सुखाने राज्य करावे. “ ( ४ ) गारद्यांचा जमाव नारायणराव पेशवे यांच्या मागोमाग रघुनाथ पेशवे यांच्या निवासीखोलीत आला. रघुनाथ पेशवे यांनी गारदी सुमेरसिंग यास नारायण पेशवे यांच्या रक्षणार्थ समजवण्याचा प्रयत्न केला परंतु गारदी सुमेरसिंग याने रघुनाथ पेशवे यांना नारायणराव पेशवे यांना सोडण्यास अन्यथा दोघांनाही ठार मारण्याचे धमकावले सुमेरसिंग म्हणाला “ मी हे कृत्य येथपर्यंत केले, ते जर आता सोडिले तर माझा नाश मी आपल्या हाते केलासा होईल, आता तुम्ही याची आशा सोडा , आणि यापासून लवकर दूर व्हा , नाही तर दोघे मारले जाल “ त्यामुळे घाबरून रघुनाथ पेशवे यांनी नारायणराव पेशवे यांना गारद्यांच्या ताब्यात दिले. ( १ ) खरगसिंग , सुमेरसिंग व महमद् इसब हे गारदी तलवारी उपसून आले. तुळाजी पवाराने नारायणराव पेशवे यांना ओढत आणले व आता का पळतोस असे विचारले. नारायणराव पेशवे यांचा नोकर चापाजी टिळेकर “ अरे! लहान लेकरू ! यास मारू नका असे बोलत नारायणराव पेशवे यांच्या रक्षणार्थ नारायणराव पेशवे यांच्या अंगावर पडला परंतु गारद्यांनी त्यास ठार केले. नारायणराव पेशवे यांचा नोकर नारोपंत पाठक हादेखील नारायणराव पेशवे यांच्या रक्षणार्थ नारायणराव पेशवे यांच्या अंगावर पडला परंतु गारद्यांनी त्यास ठार केले. नारायणराव पेशवे यांची शुद्ध हरपली अश्या अवस्थेत नारायणराव पेशवे यांची निर्घुण हत्या केली. ( ४ )

३० ऑगस्ट १७७३ शके १६९५ विजयनाम संवत्सरे भाद्रपद शुद्ध त्रयोदशी सोमवारी दोन प्रहारचे समयास वाड्यात गर्दी करून सुमेरसिंग व खरगसिंग व महमद इसब व तुळाजी पवार यांणी नारायण साहेब यांजवर जखमा करून ठार मारिले. बालहत्या , ब्राम्हणहत्या, गोहत्या, स्त्रीहत्या सारेच झाले.

गारद्यांनी रघुनाथ पेशवे यांना सदरेस आणले. रघुनाथ पेशवे यांनी “वैऱ्याचे सुतक कशास पाळायचे” असे बोलत स्वतःच्या नावाने द्वाही फिरवली. त्यावेळी जासूद नारोजी नाईक यांनी रघुनाथ पेशवे यांना “ चांगले केले ! तुम्ही पेशव्यांच्या वंशात येऊन मोठी कीर्ती मिळवली, काय लौकिक केला.! असे सुनावले त्यावेळी त्यांनी गारद्यांना इशारा दिला व क्षणार्धात नारोजी नाईक यांचे मस्तक मारले गेले. ५ लाख रुपये व ३ किल्ले असा करार गारदी व रघुनाथ पेशवे यांच्यात करार झाला होता . त्यानुसार ५ लाख रुपये व किल्ल्यांच्या बदल्यात ३ लाख रुपये असे ८ लाख रुपये घेऊन गारदी शनिवारवाड्या बाहेर पडले. (५)

“ ध चा मा “

नारायण पेशवे यांच्या सदर खुनाच्या कटात आनंदीबाई यांचा सहभाग होता कि त्या पूर्णपणे निर्दोष होत्या कि काही प्रमाणात सहभाग होता हा एक गुंतागुंतीचा विषय आहे.

नारायण पेशवे यांच्या पत्नी गंगाबाई या गरोदर होत्या. गंगाबाई यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला. कोणाचेही ऐकत न्हवत्या त्या वेळेस आनंदीबाईनी गंगाबाई यांचा हात धरला व एकीकडे घेऊन गेल्या व एका खोलीमध्ये ठेवून बाहेरून कडी लावून घेतली. ( ४ )

रघुनाथ पेशवे यांच्या स्वहस्ताक्षरातील चिठ्ठी सुमेरसिंग गारदी व खरगसिंग गारदी यांना देण्यात आली. त्यातील मजकुरानुसार “ नारायण बल्लाळ पेशवे प्रधान यास धरावे. “ परंतु रघुनाथ पेशवे यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी गारद्यांचे सरदार सुमेरसिंग व खरकसिंग यांच्याकडून ती चिठ्ठी पाहण्याकरिता घेतली व त्या चिठ्ठीवर अक्षरे धरावे अशी होती ती मोडून आपल्या हाताने ” ध चा मा ” केला व त्या चिठ्ठीवर मारावे असे लिहिले”. पेशव्यांची बखर , शेडगावकर भोसले बखर , मराठ्यांची बखर व इतर साधनातून आनंदीबाई यांनी सदर चिठ्ठीत फेरफार केल्याचे आढळून येते.

नारायण पेशवे यांच्या कटातील प्रमुख तुळाजी पवार याने दिलेल्या जबानीनुसार “नारायण पेशवे यांना कैद करून रघुनाथ पेशवे यांना बंधमुक्त करण्याची गुप्त बैठक झाली त्या बैठकीत त्यात सामील असणाऱ्या १७ जणांची नावे त्याने दिली त्यात आनंदीबाई यांचे नाव दिसून येत नाही. (६)

नारायण पेशवे यांच्या कटातील प्रमुख महमद युसुफ यास पकडण्यात आले व त्यास मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली. त्याने दिलेल्या जबानीनुसार “ श्रीमंतास मारावे हे मत कोणाचे न्हवते. ऐनवेळेस सुमेरसिंगणे केले. “( ६ )

न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी दीड महिना या प्रकरणाचा कसून तपास केला व रघुनाथ पेशवे यांची भेट घेऊन “ हे अकर्म तुम्हीच केले करविले असून मी त्याचा पुरतेपणे शोध करून तुमच्याकडे आलो आहे. “ असे रघुनाथ पेशवे यांना सांगितले. रघुनाथ पेशवे यांनी नारायण पेशवे यांना धरण्याविषयी पत्र लिहिले हे मान्य केले. गारद्याना दिलेल्या आदेशाचा कागद न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांना सापडला. त्यातील मूळ लेख होता धरावे त्यात ध वर कोणी आणखी शाई टाकून मारावे असे केले होते . सदर कृत्य आनंदीबाईंचे असावे असे सर्वाना वाटले. रघुनाथ पेशवे यांनी नारायण पेशवे यांना धरण्याविषयी अपराध घडला या दोषास काय प्रायश्चित घ्यावे ? अशी विचारणा केली असता. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी “ यास देहान्त प्रायश्चित पाहिजे” असा निर्णय दिला. ( ३ )

नारायण पेशवे यांच्या आई गोपिकाबाई यांच्या भेटीस रघुनाथ पेशवे गेले असता अपराध कबुल करून प्रायश्चित घेतल्याशिवाय भेट नाकारली. ६ ऑगस्ट १७८३ रोजी नारायण पेशव्यांच्या हत्तेबद्दल रघुनाथ पेशवे यांनी प्रायश्चित घेतले. त्यातील नोंदीनुसार “ नारायणराव साहेब यांस धरावे असा तर निश्चय त्या प्रकरणातील राजकारण करणारासी केला.ते समयी त्यांनी विचारले. कि , न जाणो धरू जाता कलागत पडली. आणि त्यात कदाचित मारले गेले तर दोष ठेवू नये.असे त्यांनी सोडवून घेतले. आणि कर्मास प्रवतले.” ( ६ )

न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी नारायण पेशवे यांच्या हत्या संदर्भात आपले मत पुढीलप्रमाणे नोंदवले “ खुनाच्या कटात श्रीमंत सौ. आनंदीबाईसाहेब नाहीत . या राज्यात स्त्रीला अपराधाबद्दल शिक्षा नसल्याने कटातील मुत्सद्यांनी बाईसाहेबांवर खुनाचे खापर फोडून आपल्या माना धूर्तपणे सोडवून घेतल्या आहेत. ( ७ )(काका मला वाचवा)

आनंदीबाई पेशवे यांनी “ ध चा मा “ केला यास बखरी वगळता विश्वसनीय पुरावा नाही . नारायण पेशवे यांच्या कटातील प्रमुख आरोपी महमद युसुफ याच्या जबानीनुसार येन वेळी गारदी सुमेरसिंगणे हे कार्य केले. नारायण पेशवे यांना कैद केले असता मराठा सरदार व इतर प्रतिनिधी यांच्या मदतीने नारायण पेशवे हे कैदेतून सुटले असते व कैदेतून सुटका होताच कट रचणाऱ्या सूत्रधारांना कडक शिक्षा झाल्या असत्या असे सुरसिंग यास वाटणे स्वाभाविक होते. आपणास संदर्भ साधनातील वर्णनावरून तसे दिसून येते. त्यामुळे नारायण पेशवे यांची हत्या करण्यात आली. रघुनाथ पेशवे यांनी प्रायश्चित घेतले त्यातील नोंदीनुसार रघुनाथ पेशवे यांना ऐनवेळी नारायण पेशवे मारले जावू शकतात याची कल्पना होती. न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांनी आनंदीबाई यांना नारायण पेशवे यांच्या हत्ये संदर्भात दोषी ठरवले नाही .

आनंदीबाई पेशवे ह्यांचा हत्येतील कटात सहभाग नसला तरी त्या संपूर्ण निर्दोष ठरत नाहीत . आनंदीबाई यांना नारायण पेशवे यांना कैद करण्याची व रघुनाथ पेशवे यांना गादीवर बसविण्याची कटाची कल्पना होती हे नक्की.काका मला वाचवा.

श्री. नागेश सावंत

संदर्भ –

१ मराठ्यांची बखर :- ग्रांट डफ
२ शेडगावकर भोसले बखर
३ नारायण पेशव्यांची बखर ( ऐतहासिक बखरी खंड १ :-अविनाश सोवनी )
४ पेशव्यांची बखर
५ नारायण पेशव्यांच्या निधनाची हकीकत ( ऐतहासिक बखरी खंड १ )
६ इतिहास संग्रह :- दतात्रय बळवंत पारसनीस
७ श्रीमंत आनंदीबाई पेशवे : -प्रमोद ओक

Leave a comment