शुढळेश्वर महादेव मंदिर, गुंडेगाव

शुढळेश्वर महादेव मंदिर, गुंडेगाव

शुढळेश्वर महादेव मंदिर, गुंडेगाव –

अहमदनगर जिल्ह्यात नगर शहराच्या दक्षिणेला ३० किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात साधारणत पाच हजार लोकवस्ती असणारे गुंडेगाव हे ऐतिहासिक गाव वसले आहे. गुंड ऋषींची तपोभूमी असल्याने गावाला गुंडेगाव नाव पडले असल्याचे ग्रामस्थ सांगतात. गावात प्रवेश केल्यानंतर अनेको ऐतिहासिक आणि पौराणिक खाणाखुणा आपल्याला जागोजागी आढळतात. गावात मरगळनाथरामेश्वर ही दोन यादवकालीन मंदिरे उभी असून गावापासून जवळच शुढळेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर उभे आहे. गावातून वाहणारी शुढळा नामक नदीच्या नावावरून येथील शिवलिंगाला शुढळेश्वर हे नाव प्रचलित झाले असावे.(शुढळेश्वर महादेव मंदिर, गुंडेगाव)

शुढळेश्वर महादेवाचे मंदिर पूर्वाभिमुख असून सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना दिसून येते. मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून रंगरंगोटी करून कळस व सभामंडप नव्याने बांधण्यात आला आहे. मंदिराचा सभामंडप चार स्तंभावर तोललेला असून यादवकालीन स्थापत्याचे वैशिष्ट्य असलेला उलटा नाग आपल्याला स्तंभावर दिसून येतो. अंतराळात नंदी तर गर्भगृहात दक्षिणोत्तर शिवलिंग विराजमान आहे. गर्भगृहात नागशिल्पं, श्री गणेश व एक झीज झालेली मूर्ती आपापल्या दिसते.

पुढे गुंडेगावला लागून असणाऱ्या कोथुळ गावाजवळ एक डोंगररांग चालू होते, याला काही लोक पंचटेकडी देखील म्हणतात, याच रांगेतील एका टेकडीवर खंडोबाचे पूरातन मंदिर आणि एका अज्ञात महापुरुषाची समाधी आहे. खंडोबाचे मंदिर यादवकालीन असून गेल्या काही वर्षात त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे. मंदिराच्या समोरच पेशव्यांच्या काळातले एक छोटेसे हनुमानाचे मंदिर आहे, बहुधा हे हनुमानाचे मंदिर देखील वाटत नाही तेथे कोण्या सिद्ध पुरुषाची समाधी असावी असे वाटते. या मंदिराजवळ दुर्मिळ अशी गद्धेगळ देखील नजरेस पडते. कधी गुंडेगावला जाण्याची संधी मिळाली तर या सर्व ठिकाणी अवश्य भेट दयावी. समाधान वाटावं असं हे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं व ऐतिहासिक पाऊलखुणा जपणार गावं आहे.

©️ रोहन गाडेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here