महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,82,804

श्री कुकडेश्वर शिवमंदिर, पूर

By Discover Maharashtra Views: 6887 2 Min Read

श्री कुकडेश्वर शिवमंदिर, पूर –

महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका अशी ओळख असेलला पूणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका ऐतिहासिक व भौगोलिक दृष्ट्या संपन्न आहे. या तालुक्यात अनेक प्राचीन मंदिरे, लेणी, गडकोट व घाटवाटा आहेत. कुकडेश्वर नावाने ओळखले जाणारे असेच एक प्राचीन शिवालय जुन्नर तालुक्यात असून हे मंदिर अप्रतिम असे स्थापत्य व शिल्पंकलेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
कुकडेश्वर मंदिर जुन्नर शहरापासून २० किलोमीटर अंतरावरील पूर या गावी असून या ठिकाणी कुकडी नदीचा उगम होतो. कुकडेश्वर मंदिर देखील शिलाहार राजा झंझ यांनी गोदावरी पासून भीमा नद्यांच्या उगमा जवळ बांधलेल्या बारा शिवमंदिरापैकी एक आहे असं म्हटलं जातं. कुकडी नदीच्या उगमाजवळ वसलेलं हे शिवमंदिर कुकडेश्वर या नावाने ओळखले जाते.

मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमाभिमुख असून सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. संपूर्ण मंदिरावर सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिराच्या बाह्य भागावर देवकोष्ठकात श्री गणेश, भैरव, चामुंडा, सूर्यदेव व भगवान श्री विष्णूच्या वराह अवताराचे सुरेख शिल्पं आपले लक्ष वेधून घेतात. मंदिराचा सभामंडप चार स्तंभावर तोललेला असून सभामंडपातील देवकोष्ठकात श्री गणेश, शिवपार्वती, चामुंडा व इतर काही मूर्ती नजरेस पडतात. गर्भगृहाची द्वारशाखा देखील सुंदर अशा नक्षीकामाने सजलेली आहे. मंदिराच्या गर्भगृहात पितळी आच्छादन असेलेले सुंदर असे शिवलिंग आहे.

मंदिराचा कळस पडला असून त्याची डागडुजी करण्याचे काम चालू आहे. केवळ दगडात केलेले कोरीवकाम तसेच शाबूत ठेवून सिमेंटने कळस न बांधायचा ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे. मंदिर पुरातन असले तरी त्यावरील शिल्पे आजही सुस्थितीत आहेत. महाराष्ट्रातील असंख्य शिल्पं वैभवांपैकी एक असलेले कुकडेश्वर मंदिर एकदा तरी आवर्जून पाहायलाच हवे.

रोहन गाडेकर

Leave a comment