मराठा साम्राज्याचे सेनापती श्रीमंत परशुरामभाऊ रामचंद्रपंत पटवर्धन तासगांवकर

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 3
6 Min Read

मराठा साम्राज्याचे सेनापती श्रीमंत परशुरामभाऊ रामचंद्रपंत पटवर्धन तासगांवकर –

मराठ्यांच्या इतिहासातील अठरावे शतक म्हणजे पराक्रम, स्वराज्यविस्तार, राजकीय संघर्ष आणि रणधुरंधरांच्या कर्तृत्वाने भारलेला एक विलक्षण कालखंड. या कालखंडाने महाराष्ट्राला अनेक शूरवीर दिले; परंतु ज्यांनी आपल्या तलवारीच्या बळावर, रणकौशल्याच्या जोरावर आणि स्वामिनिष्ठेच्या बळावर मराठा सामर्थ्याची पताका दूरवर नेली, त्यांमध्ये सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन यांचे स्थान अत्यंत मानाचे आहे. पटवर्धन घराण्याला लाभलेली शौर्याची परंपरा परशुरामभाऊंनी आपल्या कर्तृत्वाने अधिक उजळवली. त्यांचे वडील रामचंद्र हरि पटवर्धन हे पेशव्यांच्या सेवेतले पराक्रमी सरदार होते. बालपणापासूनच घराण्यातील शौर्यपरंपरेचे संस्कार त्यांच्या मनावर झाले. घोडेस्वारी, शस्त्रविद्या, युद्धनीती आणि राजकारण यांचे धडे घेत त्यांनी वयाच्या १६ व्या वर्षी रणभूमीची वाट धरली.

रणांगण हेच त्यांचे खरे कार्यक्षेत्र होते. संकटसमयी डगमगून न जाता परिस्थितीचे अचूक आकलन करणे, योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि सैन्याला आत्मविश्वासाने नेतृत्व देणे, ही त्यांच्या सेनानीपदाची वैशिष्ट्ये होती. निजाम, हैदरअली, टिपू सुलतान, इंग्रज, कर्नाटकातील नवाब व पुंड पाळेगार यांच्याशी झालेल्या संघर्षांच्या काळात मराठा सैन्याच्या विविध मोहिमांमध्ये त्यांनी पराक्रम गाजविला. दक्षिण भारतातील मोहिमा हा त्यांच्या लष्करी कारकिर्दीचा महत्त्वाचा अध्याय आहे. सावनूर, सुरापूर, श्रीरंगपट्टण, रट्टेहळ्ळी, धारवाड, नरगुंद आणि कर्नाटकातील इतर मोहिमांमध्ये त्यांनी दाखविलेल्या धैर्यामुळे पटवर्धन घराण्याचे नाव मराठा साम्राज्याच्या लष्करी इतिहासात अधिक ठळक झाले. रणभूमीवरील त्यांची धडाडी आणि सैन्याचे प्रभावी नेतृत्व यामुळे त्यांची गणना पेशवाईतील प्रमुख सेनानींमध्ये होऊ लागली.

परशुरामभाऊंच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे इ.स. १७९५ मधील खर्ड्याची लढाई. निजामाविरुद्धच्या या संघर्षात मराठा सरदारांनी एकत्रितपणे उभे केलेले सामर्थ्य निर्णायक ठरले. या मोहिमेत सुमारे चौऱ्यांशी सरदार व सव्वा लाख मराठा सैन्य हजर असून, परशुरामभाऊंनी या विराट लष्कराचे सेनापतीत्व स्विकारून, निजामाचा पराभव केला. या मोहिमेशी पटवर्धन घराण्याचा असलेला संबंध त्यांच्या लष्करी कर्तृत्वाची आणि मराठा राजकारणातील स्थानाची प्रचिती देतो. मात्र परशुरामभाऊंचे व्यक्तिमत्त्व केवळ तलवारीपुरते मर्यादित नव्हते. ते मराठी राज्याशी निष्ठावान असलेले सरदार होते. पेशवाईच्या उत्तरार्धातील गुंतागुंतीचे राजकारण, सरदारांमधील अंतर्गत संघर्ष आणि सत्तासमीकरणांतील बदल यांचा त्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला. या सर्व उलथापालथीतही कर्तव्य आणि स्वामिनिष्ठा यांना त्यांनी महत्त्व दिले.

तासगांव आणि परशुरामभाऊ

परशुरामभाऊंच्या कर्तृत्वाचा एक महत्त्वाचा अध्याय तासगांवच्या इतिहासाशी जोडलेला आहे. त्यांच्या कार्यकाळात तासगांवला प्राप्त झालेले राजकीय, सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आजही या नगरीच्या ऐतिहासिक ओळखीचा अविभाज्य भाग आहे. तासगांवातील वास्तू, धार्मिक परंपरा आणि पटवर्धन घराण्याशी निगडित ऐतिहासिक वारसा पाहिला, की त्या काळातील वैभवाची आणि सांस्कृतिक जडणघडणीची जाणीव होते. श्रीसिद्धिविनायक गणपतीची परंपरा आणि ऐतिहासिक रथोत्सव हा या वारशातील विशेष उल्लेखनीय भाग आहे. त्यामुळे तासगांवचा इतिहास आणि परशुरामभाऊंचे कर्तृत्व हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाही.

परशुरामभाऊंच्या आयुष्याचा शेवटही रणभूमीवरच झाला. १७ सप्टेंबर १७९९ रोजी करवीरकरांशी झालेल्या पट्टणकुडी संघर्षात त्यांचा अंत झाला.
पट्टणकुडी लढाईविषयी ‘दक्षिण मराठा देशातील राज्यांची आठवण’ या आपल्या इंग्रजी ग्रंथात ‘कॅप्टन एडवर्ड डब्लू वेस्ट’ सांगतात, “१७९९ मध्ये टिपूसोबत झालेल्या युद्धात इंग्रजांना सहकार्य करण्यासाठी नेमलेल्या तुकडीचे नेतृत्व परशुरामभाऊ यांच्या मुलाला, (रामचंद्र) आप्पासाहेबांना द्यावे. अशी शिफारस करून त्यांनी परशुरामभाऊ यांच्याशी सलोखा घडवून आणण्याचा मार्ग मोकळा केला. सलोख्यानंतर, आपला दंड माफ करण्याच्या आणि कर्नाटकातील काही जागा जहागिरीत देण्याच्या अटीवर परशुरामभाऊ यांनी स्वतः त्या तुकडीचे नेतृत्व करण्याची तयारी दर्शवली. त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक इंग्रज तुकडी तयार ठेवण्यात आली होती, परंतु बाजीराव यांच्या कारस्थानांमुळे आणि दुपट्टीपणामुळे या प्रसंगी कोणतीही मराठा तुकडी पुण्यातून निघाली नाही. टिपूविरुद्ध पाठवण्यात येणारे सैन्य नंतर कोल्हापूरच्या राजाविरुद्ध पाठवण्याचा आदेश देण्यात आला. हा राजा काही काळापासून नाना फडणीस यांच्या चिथावणीवरून पटवर्धन आणि कर्नाटकातील पेशव्यांचे सरसुभेदार धोंडोपंत गोखला यांच्याविरुद्ध सक्रियपणे लढत होता. पटवर्धनांचे मोठे नुकसान झाले होते, कारण तासगांव लुटले गेले होते आणि परशुरामभाऊ यांचा राहाता वाडा पूर्णपणे जाळून टाकण्यात आला होता. याशिवाय, पटवर्धनांच्या ताब्यात दहा वर्षे असलेला भूदरगड किल्ला कोल्हापूरने परत मिळवला होता. या जखमांमुळे संतप्त झालेल्या परशुरामभाऊ यांनी तयार होत असलेल्या कुमकेची वाट पाहिली नाही.

दसऱ्याला संपूर्ण सैन्य एकत्र येईपर्यंत केवळ कोल्हापूरच्या राजावर नजर ठेवून त्याला शक्य तितके रोखून धरण्याचा आदेश असूनही, त्यांनी संपूर्ण पावसाळा रणांगणावर राहून घटप्रभा आणि मलप्रभा यांच्यामधील मुलुख परत मिळवला. सप्टेंबर १७९९ मध्ये, निपाणीजवळील पट्टणकुडी या गावात, सातारच्या राजाचा भाऊ चतुरसिंग याच्या मदतीने आलेल्या कोल्हापूरच्या राजाशी त्याची गाठ पडली. याचा परिणाम कोल्हापूरच्या पक्षाचा संपूर्ण विजय झाला आणि परशुरामभाऊ आपल्या सैन्याला एकत्र करत असताना प्राणघातक जखमी झाले. सर्वसाधारणपणे असे मानले जाते की, विश्वासराव, जो राजाचा भाऊ होता.कुख्यात ‘राव घाटगे’ याने त्या जखमी सरदाराला आपल्या घोड्यावर बसवून कोल्हापूरच्या राजासमोर नेले आणि राजाच्या आदेशानुसार त्याचे तुकडे करण्यात आले. तथापि, कोल्हापूरमध्ये या घटनेचा नेहमीच ठामपणे इन्कार केला गेला; आणि माणुसकीच्या दृष्टीने विचार करता, ही घटना असत्य असावी अशीच आशा वाटते. धारातीर्थी पडलेल्या त्या पटवर्धन सरदाराचे अंत्यसंस्कार कोल्हापूरच्या एका सरदाराने(मिरजकर पटवर्धन वकील नारो हरि करंदीकर) त्याच ठिकाणी केले आणि मराठा साम्राज्यातील एका महान सेनापतीची राख जिथे विसावली आहे, त्या जागेवर आजही एक साधासा समाधी-स्मृतीस्तंभ उभा आहे.”

आयुष्यभर ज्या रणभूमीला त्यांनी आपले कर्मक्षेत्र मानले, त्याच रणभूमीवर त्यांच्या जीवनाची अखेर झाली.
त्यांच्या तलवारीने अनेक रणांगणे पाहिली; त्यांच्या नेतृत्वाने अनेक मोहिमा गाजवल्या आणि त्यांच्या कर्तृत्वाने पटवर्धन घराण्याचा लौकिक अधिक दृढ झाला. म्हणूनच सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन हे मराठा इतिहासातील केवळ एक नाव नाही, तर शौर्य, स्वामिनिष्ठा आणि रणकौशल्याची एक तेजस्वी परंपरा आहे. इतिहासाच्या प्रदीर्घ प्रवाहात अनेक राजे आले आणि गेले; अनेक लढाया झाल्या आणि विस्मृतीत गेल्या. पण काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांच्या कर्तृत्वाची छाप काळाच्या ओघातही पुसली जात नाही. परशुरामभाऊ पटवर्धन हे त्यापैकीच एक.

महेश कदम, सांगली.
(लेखक- सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन चरित्रग्रंथ)

Leave a Comment