करवीरकर छत्रपती दुसरे संभाजी महाराज आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई यांचा ज्योतिबा डोंगरावरील मुरलीधर तलाव येथील धर्मकार्याचा शिलालेख !
ज्योतिबा डोंगरावरील मुरलीधर तलाव येथील धर्मकार्याचा शिलालेख कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथील श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिराच्या खालील बाजूस यमाई देवी मंदिराच्या बाजूला मुरलीधर तलावाच्या दक्षिणेच्या द्वाराच्या डाव्या बाजुस कोरलेला आहे. सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून नऊ ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. लेखाची शिळा अनेक वर्षे उघड्यावर असल्याने त्यावर वातावरणाचा परिणाम झाला असून लेखातील अक्षरे झिजून पुसट झाली आहेत तर काही अक्षरे तुटली आहेत. शिलालेखाचा छाप घेतला असता त्यावरील मजकूर स्पष्टपणे सहज वाचता येतो.
=============
वाडी रत्नागिरी तलाव नवे वाचन :-
१.”श्रीगणेशाय नमः वाडी रत्नागिरी क्षेत्रे तेथे श्रीदेव रव
२.ळ नाथ सुप्रसनु होऊनी तेथे तळ्यास काम लाविले.|
३.श्रीदेवी येमाईच्या वनात तळ्यास काम लाविले। मनो ४.परलोकोपकारार्थी जीवन काम बांधिविले। स्वस्ति
५.श्री राज्यभिषेक शके १६६५ काळयुक्त नाम संव
६.त्सरे, कार्तिक शुद्ध त्रितीया स्थिरवासरे भोसले
७ कुलवंतास श्री राजा शंभू छत्रपती यांची धर्मपत्नी स
८.कल सौभाग्यवती वज्रचुडेमंडित उभयकुलवर्धिनी
९.जिजाबाई च्या हातून श्रीने तळे बांधविले असे || सुप्रसन्न।”
अर्थ:-
वाडी रत्नागिरी या पवित्र क्षेत्रात श्री रवळनाथ देव प्रसन्न व्हावा म्हणून तळे बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. तसेच श्रीदेवी येमाईच्या वनातील तळ्याचेही काम करण्यात आले. हे जलकार्य केवळ तत्कालीन लोकांच्या उपयोगासाठी नव्हे, तर परलोकातील पुण्यप्राप्ती आणि सर्वसामान्यांच्या उपकारासाठी करण्यात आले होते.
शालिवाहन शक १६६५, कालयुक्त नाम संवत्सरे, कार्तिक शुद्ध तृतीया, रविवार, म्हणजेच ९ ऑक्टोबर १७४३ रोजी, भोसले कुलवंतांस श्री राजा शंभू छत्रपती यांच्या धर्मपत्नी सकल सौभाग्यवती, वज्रचूडेमंडित, उभयकुलवर्धिनी जिजाबाई यांच्या हस्ते श्री रवळनाथाच्या क्षेत्रात तळे बांधण्यात आले. हे कार्य लोकांच्या उपयोगासाठी तसेच परलोकोपकारार्थ करण्यात आले होते.
===================
शिलालेखाचे ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्व:-
वाडी रत्नागिरी येथील हा शिलालेख मराठा कालखंडातील जलव्यवस्था, धार्मिक श्रद्धा, राजघराण्यातील स्त्रियांचे सामाजिक योगदान आणि लोककल्याणकारी कार्य यांचा महत्त्वपूर्ण प्राथमिक पुरावा आहे. लेखातील दिनांका नुसार हे कार्य शालिवाहन शक १६६५, काळ युक्त नाम संवत्सर, कार्तिक शुद्ध तृतीया, रविवार, ९ ऑक्टोबर १७४३ रोजी झाले.
या लेखातून वाडी रत्नागिरी क्षेत्रातील श्री रवळनाथ आणि श्रीदेवी येमाई या स्थानिक धार्मिक परंपरांची माहिती मिळते. देवता प्रसन्न व्हावी आणि लोकांच्या उपयोगासाठी जलसाठा निर्माण व्हावा या हेतूने तळे बांधण्यात आले असल्याचे लेखातून दिसते. त्यामुळे तत्कालीन ग्रामीण समाजाच्या पाणीपुरवठा आणि जलसंधारणाच्या गरजांची प्रत्यक्ष साक्ष या लेखातून मिळते.
या शिलालेखाचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जिजाबाईंच्या माध्यमातून झालेल्या जलकार्याची नोंद. त्या भोसले कुलातील श्री राजा शंभू छत्रपती यांच्या धर्मपत्नी म्हणून लेखात गौरविल्या आहेत. “सकल सौभाग्यवती”, “वज्रचूडेमंडित” आणि “उभयकुलवर्धिनी” अशा विशेषणांमधून त्यांचा सामाजिक व कौटुंबिक दर्जा स्पष्ट होतो. यावरून मराठा राजघराण्यातील स्त्रिया केवळ कौटुंबिक भूमिकेत मर्यादित नसून धार्मिक, सामाजिक आणि लोककल्याणकारी बांधकामांत सक्रिय सहभागी होत होत्या, हे दिसून येते.
“परलोकोपकारार्थी” या उल्लेखातून या जलकार्यामागील धार्मिक पुण्यसंकल्पना स्पष्ट होते. म्हणजेच तळे बांधणे हे इहलोकातील लोकांच्या उपयोगाचे तसेच परलोकातील पुण्यप्राप्तीचे कार्य मानले जात होते. त्यामुळे तत्कालीन समाजातील दानधर्म, पुण्यसंकल्पना आणि सार्वजनिक उपयोगाच्या वास्तू यांचा परस्परसंबंध समजतो.
लेखात शके, संवत्सर, तिथी आणि वार यांची नोंद असल्यामुळे त्याचे निश्चित काल-निर्धारण करता येते. त्यामुळे हा शिलालेख सन १७४३ मधील मराठा कालखंडातील सामाजिक व धार्मिक इतिहासाचा दिनांकित प्राथमिक स्रोत ठरतो.
एकूणच, वाडी रत्नागिरीचा हा लेख मराठा कालखंडातील जलसंधारणाची परंपरा, स्थानिक देवस्थानांची धार्मिक प्रतिष्ठा, राजघराण्यातील स्त्रियांचा लोककल्याणातील सहभाग, दानधर्माची संकल्पना आणि तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक जीवन यांचा एकत्रित पुरावा देणारा महत्त्वपूर्ण शिलालेख आहे. विशेषतः जिजाबाईंच्या हस्ते तळे बांधण्यात आल्याची नोंद हा या लेखाचा अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक पैलू आहे.
==============
गावाचे नाव :- मु. पो.वाडी रत्नागिरी यमाई देवी मंदिर ता.पन्हाळा, जिल्हा- कोल्हापूर
जी.पी.एस.-N-१६.७९९१७८,E..७४.१७८०४७.
शिलालेखाचे स्थान :- श्री क्षेत्र ज्योतिबा मंदिराच्या खालील भागात यमाई देवी मंदिराच्या बाजूला असलेल्या तळ्याच्या दक्षिण प्रवेशद्वारा जवळ भिंतीवर कोरला आहे.
अक्षरपद्धती :- कोरीव
स्वरूपाचा लेख आहे ..
लिपी व भाषा :- देवनागरी लिपी, मराठी- भाषा
प्रयोजन :- लोक कल्याणासाठी बारव बांधून पूर्ण केल्याची स्मृती जपणे.
मिती / वर्ष :-शालिवाहन शक १६६५ काळ युक्त (रुधीरौद्रगारी पाहिजे) नाम संवत्सरे कार्तिक शुद्ध तृतीया
काळ वर्ष : अठरावे शतक – ९ ऑक्टोबर १७४३ रविवार
राजा /कारकीर्द:. छत्रपती संभाजी राजे दुसरे (करवीर)
ग्राम नाम:- वाडी रत्नागिरी
देवता नामः श्री गणेश,श्री देव रवळनाथ, श्री यमाई
व्यक्तीनामः राजेश्री यशवंत राव लगड
शिलालेखाचे संशोधक : श्री. मु . गो. गुळवणी
शिलालेखाचे पूर्नवाचक :- श्री. अनिल किसन दुधाणे.
संक्षेप :- त्रितीया- तृतीया-
संदर्भ:- IEVI- २८९. करवीर रियासत, . गो. गुळवणी -ज्योतिबा , जिजाबाई कालीन कागदपत्रे,
====================
©माहिती व संकलन : श्री अनिल किसन दुधाणे.
टीप: सदर शिलालेख संशोधन कार्यात, चैतन्य अष्टेकर, मेघराज बुने, आशिष कुलकर्णी, डॉ. शैलेंद्र भांडारे, श्री वैभव राजे भोसले तसेच पत्रकार सागर यांचे सहकार्य लाभले.
