!!..१० ऑगस्ट १७६३ – राक्षसभुवनची लढाई..!!
“श्रावण शुद्ध १, शके १६८५, छ.३०, मोहरम, दि.१० ऑगस्ट १७६३ रोजी दस्तुरखुद्द श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या नेतृत्वाखाली मराठे आणि निजाम ह्यांच्यात बीडजवळच्या राक्षसभुवन येथे जबरदस्त लढाई झाली, त्यात निजामाचा सपशेल पराभव होऊन मराठयांचा दणदणीत विजय झाला..!!”
सन १७६३ च्या प्रारंभी महाराष्ट्रात मराठ्यांवर एक बाका प्रसंग ओढवला. बहुतेक मराठे सरदार २०/२५ हजार फौजेनिशी निजामास जाऊन मिळाले होते. इकडे पुणे दरबारांत रघुनाथरावांनी अकल्पित राजनीती खेळायला सुरुवात केली. श्रीमंत माधवराव पेशवे त्यांच्या नजरकैदेत होते त्यामुळे त्यांचा पक्ष असा नीट राहिला नाही. निजामाचे सावट मात्र राज्यावर उभे राहिले. त्यात निजामाकडे पायदळ, तोफखाना भरपूर. तेव्हा यावेळी त्याच्याशी समोरासमोर युद्ध करणे ठीक नाही, असे खाश्या मंडळीचे पुण्याच्या दरबारात ठरून गनिमी कावाच अंगीकारावा असे सर्वानुमते ठरले. पण खासा निजाम अंगावर येतो म्हटल्यावर दादासाहेबांनी श्रीमंतास मुक्त केले. त्यावेळी मल्हारराव होळकर चांदवडला होते. त्यास आणावयास विठ्ठल शिवदेव, सखारामबापूंसह स्वतः श्रीमंत माधवराव पेशवे गेले आणि मल्हाररावांसह सर्व मंडळी ससैन्य पुण्यास आली.
खलबतं सुरू झाली. निजामाचे यश आपसांतल्या फुटीवर अवलंबून आहे, ही गोष्ट सर्वांच्या निदर्शनास आली. तेव्हा ही फूट भरून काढण्याचे काम सर्वानुमते मल्हाररावांकडे दिले गेले. मल्हारबांनी जानोजी भोसले, भवानराव प्रतिनिधी, पीराजी नाईक निंबाळकर यांच्या समजुती सामदामादी चतुर्विध उपायांनी घालून फुटलेले सरदार माघारी फिरवले. सर्व मराठी दल एकत्रित केले. दि.९ ऑगस्ट १७६३ च्या रात्री सर्व सैन्य माजलगाव मुक्कामी असता त्यांना निजामाचे मुख्य लष्कर राक्षसभुवन येथे आहे असं कळलं, तेव्हा मराठी फौजा रात्रीच दबा धरून निजामासमोर आल्या.
आधी ठरल्याप्रमाणे जानोजी भोसल्यानी निजामाची साथ सोडली होती. १० ऑगस्टच्या दिवशी सकाळी मराठा सैन्य राक्षसभुवनपासून नऊ किलोमीटरवर अंतरावरच्या धोंडराईहून निघालं. निजामानं याआधीच तोफांसह नदी ओलांडली होती. विठ्ठलसुंदर, राजा विनायकदास, कंधारचा राजा आणि मुरादखान दहा ते पंधरा हजार सैन्यासह नदी ओलांडण्यासाठी अलीकडे थांबले होते. त्याचवेळी मराठ्यांच्या फौजेने निजामाच्या फौजेवर अचानक हल्ला केला.
श्रावण शुद्ध १, दि.१० ऑगस्ट १७६३ रोजी सकाळी दीड प्रहरास मुख्य लढाईस तोंड लागले. खुद्द निजाम गोदावरीच्या उत्तर तीरावर काही तोफा, बाजारबुणगे व निम्म्या फौजेनिशी गेला होता पण त्याचा दिवाण विठ्ठलसुंदर परशुरामी आणि बहुतेक सरदार ७/८ हजार फौजेनिशी व ४/५ हजार गारदी फौज व काही तोफा दक्षिण तीरावरच होत्या. तेव्हा आबा पुरंदरे व हुजूरपागेचे सरदार आघाडीस होते. त्यांजवर निजामाच्या फौजेने तोफा डागायला सुरू केल्या. तो त्यांच्या लष्करांत दारूखान्यास आग लागली. यामुळे घोटाळा झाला. त्या संधीत पुरंदरे व विंचूरकर यांनी वेगाने हल्ला करून शत्रूच्या आघाडीवरचा मोर्चा उधळून त्यांनी आत प्रवेश केला. मागून खुद्द दादासाहेबही हत्तीवर बसून सैन्याची एक टोळी घेऊन मारामारी करीत आत शिरले. आता मोठ्या निकराने युद्ध सुरू झाले.
त्यात मराठ्यांची सरशी होण्याचा रंग दिसू लागला. इतक्यांत निजामाचा दिवाण विठ्ठलसुंदर परशुरामी याने आपल्या फौजेतील निवडक लोकांनिशी आवेशाने मराठयांवर सतत हल्ले करून पुरंदरे व विंचूरकर यांस माघारी फिरवले. त्यामुळे ऐन निजामाच्या फौजेत मध्यभागी सापडलेल्या दादासाहेबांच्या हत्तीला निजामाच्या सैन्याने वेढून टाकले आणि चोहोकडून हल्ला चढवला. रघुनाथरावाचे स्वीय सेवक महादजी करंदीकर याने त्या प्रसंगाचा तपशील असा लिहून ठेवला आहे की, ‘तेथे लढाई जाहली ते समयी मोगलांचे फौजेने दादासाहेब यांचा हत्ती वेढला. खवासखान्यात देवजी नारायण सावरकर होते त्यास गोळी लागून ठार झाले. हे पाहून दादासाहेब याणी हत्ती पुढे चालविला. त्यासमयी माधवरावसाहेब याणी हुजुरात घेवून दादासाहेबाचा हत्ती वेढला होता तो सोडविला.’
त्याप्रसंगी दादासाहेबांनी बहुत पराक्रम करून काही वेळ आपला बचाव केला. परंतु ते हत्तीसकट शत्रूच्या हाती लागण्याचा अजमास दिसू लागला. आणीबाणीची वेळा पाहून श्रीमंतांनी स्वतः हुजुरातीची फौज आणि मल्हारराव होळकरांनी त्यांस कुमक पाठवून दादासाहेबांस शत्रूच्या परिघातून सोडवून माघारा आणले. नंतर सर्वच सरदारांनी सैन्याच्या निरनिराळ्या टोळ्या करून शत्रूवर एकाच वेळी चोहोकडून हल्ल्यावर हल्ले चढविले.
लढाई होत असतानाच एकदम अंधारून आले, पर्जन्य सुरु झाले. लढाईच्या ऐन धुमश्चक्रीत निजामाचा दिवाण विठ्ठलसुंदर परशुरामी हा त्यांच्याच पक्षातील कोणाची गोळी लागून ठार झाला. त्याचा पुतण्या विनायकदास व खंदारकर राजा गोपाळसिंग हेही या लढाईत ठार झाले, औरंगाबादचा सुभेदार मुरादखान, एलिचपुरचा अजमलखान यासह निजामाचे १५ सरदार कैद झाले. पलीकडच्या तीरावर असलेला निजाम छ.३०, मोहरमी पहाटेचे प्रहरास जनाना पुढे पाठवून मागाहून स्वत:पण डेरेदांडे, बाजार बुणगे तसेच मागे टाकून २०० राऊतांनीशी औरंगाबादकडे गेला. मराठ्यांस १५ हत्ती, २५ तोफा व इतर जनावरे लुटीत मिळाली. इस्माईल खान, शहाजी सुपेकर, सदाशिव रामचंद्र वगैरे निजामास मिळालेले सरदार परस्परे पळून गेले. एकूणच मराठ्यांस या लढाईत अपूर्व असे यश मिळाले.
११ ऑगस्टच्या पत्रात खुद्द माधवराव पेशव्यांनी गोपिकाबाईना पाठवलेल्या पत्रात तपशिलानं लिहिलं –
‘विठ्ठल सुंदर वगैरे सात आठ हजार फौज व चार-पाच हजार गारदी गंगेअलीकडे राक्षसभुवनावर होते. निजामअलीखान बाजार बुणगे घेऊन गंगेपार उतरून गेले, तो यांची आमची गांठ पडली. मोठी लढाई झाली. श्रीकृपेने विठ्ठलसुंदर, विनायकदास, खंदारकर गोपाळसिंग अगदी ठार झाले. या खेरीज मुरादखान, पिंगळे, पाटणकर, बाबूराव जंगी वगैरे सरदार पाडाव आले. यश मोठे आले. निजामअलीखान पळून औरंगाबादेस गेला. त्याचे पारपत्यास जाण्याचा विचार होत आहे. भोसले आदि करून इकडील सरदार गेलेले आले. लवकरच येऊन भेटतील.’
तर त्याच दिवशी रघुनाथराव दादांनीही गोपिकाबाईना पाठवलेल्या पत्रात म्हटलय – ‘नबाब राक्षसभुवनाजवळ गंगा उतरत होता इतक्यात गांठ घालून काही काम होईल यास्तव जलद येऊन लढाई केली. वडिलांचे आशीर्वादे यश आले. विठ्ठलसुंदर व विनायकदास वगैरे कुल सरदार मारले गेले. अकस्मात् नबाब मात्र पलीकडे राहिले होते ते ही अर्धा रात्र बुणगे व डेरे टाकून पळून शहरास गेले. गंगेने नबाबाची मोठी कुमक केली.’
पेशवे दप्तरी या घटनेची नोंद अशी – ‘मोहरम २९ छ मजकुरी निजामउल्लीची लढाई जाहली. विठ्ठल सुंदर याचे शीर कापून आणिले. ह्या दिवशी पेशव्यांची छावणी मौजे धोंडराई तर्फ परगणा बीड येथे होती.’
पुढे १४ ऑगस्टला माधवरावांनी मातोश्री गोपिकाबाईसाहेबांना लिहिलेल्या पत्रात निजामाची वाताहात सांगताना म्हटलंय –
‘लढाई झाल्यावर मोगल पलीकडे होता तो कायम राहून तोफांची व बाणांची मारगिरी करील असे वाटले होते. परंतु लढाई झाली त्याच दिवशी रात्री कूच करून शहरास गेला. दहा तोफा व दारू व डेरे, दांडे तशाच राहिले. पूर्वी दोन तीन लढाया झाल्या (पालखेड, भोपाळ, सिंदखेड, उदगीर) परंतु मोगलास या तऱ्हेची जरब कधीच बसली नव्हती. विठ्ठलपंतासारखा कारभारी, मर्द मोगलास मिळणे नाही व त्याची अशी गत झाल्यावर ते बहुत (नवाब) घाबरे होऊन पळाले. तोफा त्याजकडील अलीकडच्या व पलीकडील मिळून कमपेश वीसपर्यंत राहिल्या व त्याजकडील घोडी, उंट, बैल वगैरे लूट लष्करात बहुत आली. वडिलांचे पुण्यप्रभावकरून या प्रमाणे वर्तमान झाले..’
मागाहून निजामाचे पत्र आले, ‘…मी काही तुमचे केले नाही, विठ्ठलसुंदरांनी तुम्हास दावा बांधला होता तो त्याचा सूड तुम्ही घेतला, तुमची लूट आणली आहे ती पाठवून देतो, भाऊसाहेबांचा करार आहे त्याप्रमाणे चालावे..!!’ हे पत्र आल्यावर पेशव्यांनी विठ्ठलसुंदर व विनायकदासाचे शीर पालखीत घालून थेट निजामाकडे पाठवले. या लढाईत श्रीमंत माधवराव पेशव्यांनी गाजवलेल्या पराक्रमाबद्दल स्वतः राघोबादादा कौतुक करताना गोपिकाबाईंना लिहिलेल्या १४ ऑगस्ट १७६३ च्या पत्रात म्हणतात – “चिरंजीव रायांनी यंदा मेहनतीत व शिपाईगिरीत कमी केली नाही. आम्हापेक्षा अधिक झाले. इतके दिवस त्यांनी लढाई देखिली न्हवती, ही पहिली लढाई पाहिली. ह्यात सर्वप्रकारे तरतूद अधिक केली. त्यांचा पुढे कर्तेपणाचा भरवसा आम्हास आला..!!”
राक्षसभुवन येथे मराठे व निजाम ह्यात मोठी लढाई होऊन निजामाचा सपशेल पराभव झाला. पण तत्पूर्वी पेशवे औरंगाबाद पावेतो, तर निजाम पुणे – सिंहगडापर्यंत जाळपोळ करीत पोचला होता. यावेळी सुरक्षिततेसाठी पेशव्यांपैकी गोपिकाबाई, नारायणराव व इतर मंडळी ही पोथ्या, पुस्तके, पर्वतीच्या सोन्याच्या मूर्ती, कागदपत्र व इतर संपत्तीसह सिंहगडावर गेली होती. यावेळी निजाम केवळ पुणे जाळूनच थांबला नाही, तर त्याने पर्वतीच्या मूर्ती फोडल्या, सिंहगडची माची लुटली, ५ कोटी रुपयांची संपत्ती, पोथ्या, पुस्तके, कागदपत्र इ.सह हस्तगत केली.
निजाम व पेशवे यांच्यात सखारामबापू बोकील, गंगोबातात्या चंद्रचूड आणि कृष्णराव बल्लाळ काळे यांच्यामार्फत २५ सप्टेंबर १७६३ या दिवशी तह होऊन उदगीरच्या लढाईतील ६० लाख आणि नवा २२ लाख असा एकूण ८२ लाखांचा अगदी नगरपासून जवळपास नागपूरपर्यंतचा मुलुख निजामाकडून मराठ्यांना मिळाला. ह्यात गोदावरीपासून ते औरंगाबाद वगैरे पर्यंतचे महाल पेशव्यांचे बाकीचे भोसले, होळकर, विठ्ठल शिवदेव, नारोशंकर ह्यांस मिळाले.
राक्षसभुवनच्या या लढाईने निजामाचे तर इतके कंबरडे मोडले की त्याने पुढची ३२ वर्ष मराठ्यांविरुद्ध लढण्यासाठी एकदाही डोकं वर काढलं नाही, तसेच दक्षिणप्रांती आणि हिंदुस्थानातही सगळीकडे मराठ्यांची जरब बसली. या विजयाच्या दूरगामी परिणामांवर दि.१६ ऑगस्टच्या एका मराठी पत्रात भाष्य केलं आहे, त्यात म्हटलं आहे की – ‘मोंगलास शिकस्त केला, येणेकरून दक्षिण प्रांती व हिंदुस्थानात वगैरे मुलकात कीर्ति विस्तार जाला. शत्रूवर गालब जाली.’
© स्वराज्यसेवक
१) मराठी रियासत : छत्रपती रामराजा व निग्राहक माधवराव [१७६१-१७७२] – गोविंद सखाराम सरदेसाई
२) नागपूर प्रांताचा इतिहास – यादव माधव काळे
३) पेशवे घराण्याचा इतिहास – प्रमोद ओक
४) ऐतिहासिक लेखसंग्रह : भाग २ – वासुदेव वामनशास्त्री खरे
५) माधवराव पेशवा : विजय आणि व्यथा – डॉ.उदय कुलकर्णी (अनुवाद – विजय बापये
६) होळकरशाहीचा इतिहास- संपादक – वा. वा. ठाकूर, डॉ. देवीदास पोटे
७) महाराष्ट्राचा पत्ररूप इतिहास – संपादक – द. वि. आपटे, रा.वि.ओतूरकर
८) सिंहगड – गणेश हरी खरे
९) शिवशाहीचा लेखनालंकार – आ.वा.जोशी, आबा चांदोरकर
१०) सखारामबापू यांचे चरित्र – यशवंत गोपाळ कानेटकर
