महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,75,190

सारीपाट खेळणारे शिव पार्वती

By Discover Maharashtra Views: 2744 2 Min Read

सारीपाट खेळणारे शिव पार्वती –

वेरूळला कैलास लेण्या शिवाय इतर लेण्यातही खुप शिल्पवैभव आहे. ते फारसं बघितलं जात नाही. आता २१ क्रमांकाच्या “रामेश्वर” नावाने ओळखल्या जाणार्‍या लेणीत हा सुंदर शिल्पपट आहे. याचा कालखंड कैलास लेण्याच्या आधीचा आहे. हेच शिल्प छोट्या आकारात बाजूचे सेवक वगळून परत केलास लेण्यातही आहे.

शिव पार्वती सारीपाट खेळत आहेत. शिवाची हार झाली असून तो पार्वतीला विनवणी करत आहे की अजून एक संधी दे, अजून एक डाव खेळू. शिवाचा उजवा वरचा हात तर्जनी उंचावलेला दिसतो आहे. या “एक” चा दूसरा अर्थ “तू जिंकलीस काय आणि मी जिंकलो काय आपण एकच तर आहोत” अशी मखलाशी पण आहे.

शिवाच्या उजव्या खालच्या हातात फासे आहेत. डावा एक हात मांडीवर रोवला असून डाव्या वरच्या हाताने पार्वतीचा पदर पकडला आहे. शिव झुकलेला आहे जरासा पार्वतीच्या दिशेने.

याच्या उलट जिंकलेली पार्वती निवांत डावा हात बाजूच्या गिरदीवर रोवून जरा मागे रेलली आहे. उजवा हात चेहर्‍याच्या दिशेने “आँ असं कसं? मी जिंकले आता माझी अट पूर्ण करा” अशा मुद्रेत आहे. तिची दासी लडिवाळपणे तिच्या वेणीशी खेळत आहे. दूसरी दासी पंख्याने वारा घालत आहे. एका बाजूला एक सेवक त्रिशुळ सांभाळत उभा निवांत आहे. दूसर्‍या बाजूचा सेवक हातावर हात ठेवून गदा जमिनीवर टेकवून उभा आहे. मध्यभागी बसलेला डावाकडे पहात “असं कसं घडलं? देवाधिदेव महादेव कसे हारले” या आचंब्यात आहे.

या शिल्पाचा सगळ्यात सुंदर लोभसपणा म्हणजे संपूर्ण मानवी भावभावना दर्शवणारे दैवतांचे शिल्प आहे. अन्यथा देवी दैवता त्यांची शस्त्रे आणि वाहने आणि दागिने आभुषणे यांनीच जखडलेले असतात.

याच शिल्पाच्या खाली शिवाचे वाहन नंदी मध्यभागी दाखवला असून सगळे गण त्याची थट्टा मस्करी करत आहेत आणि तोही मस्त आनंद घेत डूलत आहे असे दाखवले आहे.  (तो फोटो नाही घेता आला)

दैवताचे लोभस मानवीपण दाखवणार्‍या या कलाकाराला  साक्षात दंडवत. ( छायाचित्र सौजन्य Travel Baba)

– श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

Leave a comment