महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,83,079

राजगड | Rajgad Fort

By Discover Maharashtra Views: 4722 23 Min Read

राजगड | Rajgad Fort

राजगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैर्ऋत्येला ४८ कि.मी. अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील भोर गावाच्या बायव्येला २४ कि.मी. अंतरावर नीरा-वेळवंडी- कानंदी आणि गुंजवणी या नद्यांच्या खोऱ्यांच्या बेचक्यात मुरुंबदेव डोंगरावर हा किल्ला आहे. राजगड दुर्गम असून त्याचा बालेकिल्ला बराच मोठा आहे. शिवाय राजगडाकडे कोणत्याही बाजूने येताना एखादी टेकडी किंवा नदी ओलांडावीच लागते. एवढी सुरक्षितता होती म्हणून आपले राजकीय केंद्र म्हणून शिवाजी महाराजांनी राजगडाची निवड केली. राजगडाला तीन माच्या व एक बालेकिल्ला आहे.

राजगडचा बालेकिल्ला खूप उंच असून त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३९४ मीटर आहे. प्रभुणा दुर्गमं दुर्गं प्रभु दुर्गेण दुर्गम:।अदुर्गमत्वा दुभयोर्विद्विषन्नेव दुर्गम:॥ कवींद्र परमानंद यानी ’शिवभारत’ या ग्रंथातील वरील श्लोकामधे ’दुर्ग’ या शब्दाचे वर्णन केले आहे. “आक्रमणाय दुर्गम:,गमनाय दुर्गम: इति दुर्ग:” अशी आहे ’दुर्ग’ या शब्दाची व्याख्या. दुर्गांचा प्रथम उल्लेख सापडतो तो ऋग्वेदामध्ये. तटबंदी असलेल्या शहरांचे ’पुर’ असे उल्लेख ऋग्वेदातील ऋचांमध्ये सापडतात. महाभारत आणि रामायण या प्राचीन ग्रंथांमधे खासकरुन महाभारताच्या ’शांतिपर्वामधे’ दुर्गांचे स्पष्ट उल्लेख आणि वर्णने आहेत. कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथामधे तर दोन प्रकरणे तर दुर्ग या विषयावर आहेत. तट, बुरुज, खंदकांचे बांधकाम इ. दुर्गवास्तु बांधणीविषयक अनेक बाबींचा सांगोपांग उहापोह त्यामधे केला आहे. महाराष्ट्रातील पैठण येथील सातवाहन हे सर्वात आद्य ज्ञात राजघराणे.

नाणेघाट, जीवधन ,चावंड, हडसर अशा सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगांमधील दुर्गांच्या अनेक श्रेणी सातवाहन कुळातील सम्राटांनी निर्माण केल्या. पुढे महाराष्ट्रावर अभीर, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, यादव इ. अनेक राजवटींचे राज्य आले. त्यांनीदेखील महाराष्ट्राच्या दुर्गसंपदेमध्ये भर घातली. पुढे इस्लामी परचक्र महाराष्ट्रावर आल्यावर बहमनी कालामधे देशमुख-देशपांडे ही स्थानिक सत्ताकेंद्रे उदयास येऊ लागली. पंचक्रोशीचे प्रशासकीय कार्य आणि बाह्य आक्रमणांपासून संरक्षण यासाठी या अधिकाऱ्यानी लहान भुईकोटांची स्थापना केली. मात्र या सर्व राजवटींमधे दुर्गांचा वापर केवळ जकात गोळा करणे,घाटवाटांवर देखरेख करणे अशी मर्यादीत भूमिका हे दुर्ग निभावत होते. भारतामधे “दुर्गकेंद्रित राज्यपद्धतीचा” उगम,विकास आणि उत्कर्षाचा कालखंड म्हणजे निर्विवादपणे छ्त्रपती शिवरायांचा कालखंड ! ’एषां हि बाहुगुण्येन गिरिदुर्गो विशिष्यते’ या कौटिल्याच्या विधानाप्रमाणे शिवछत्रपतींनी आपल्या मावळातील जहागिरीच्या भूगोलाची मानसिकता अचूक जाणुन घेत गतिमान हालचाली केल्या.

अनेक ओसाड, दुर्लक्षित डोंगरांवर ठाणी घालून आणि आपल्या उभरत्या राज्यासाठी सह्यपर्वताच्या दुर्गमपणाचा नेमका वापर स्वराज्य संरक्षण आणि विस्तारासाठी केला. या सर्व हालचालीमध्ये शिवरायांची नजर मावळातील कोणे एके काळापासुन उभ्या असलेल्या डोंगरावर पडली अन त्या पुराणपुरुषाच रुपांतर दुर्गपुरुषात झाल. तोच तो इतिहासाच्या पानापानांनी गौरवलेला गडांचा राजा आणि राजांचा गड- किल्ले राजगड ! ब्रम्हर्षी ऋषींच्या वास्तव्याच्या खुणा मिरवणारा हा डोंगर “बिरमदेवाचा डोंगर” ह्या नावाने मावळाला माहीत होता. यादव आणि बहमनी पुढे आदिलशाही-निजामशाही कालखंडामधे एक दुर्लक्षित ठाण एवढेच ’बिरमदेवगडाला’ मह्त्व होत. शिवरायांनी त्याचे तीन नद्यांनी वेढलेले लष्करी मह्त्वपुर्ण स्थान,तीन दिशांना असलेला विस्तार अचूक जाणून घेत त्याला तटबंदीचा साज चढवून डोंगरावर उभारलेल्या जगातील एका सर्वोत्क्रुष्ट राजधानीत रुपांतर केलं. राजगड हा एक आदर्श डोंगरी किल्ला आहे. घेरा-मेट-माची-बालेकिल्ला ही आदर्श डोंगरी किल्ल्याबाबतीत आढळणारी सर्व वैशिष्ट्ये राजगडासंदर्भात आढळतात. घेरा म्हणजे गडाच्या पायथ्याला असलेली गावे व मुलुख.

राजगडचा घेरा तब्बल बारा कोसांचा म्हणजेच जवळ्जव्ळ २० किमी एवढा प्रचंड आहे. तो सर्व डोंगरानी आणि दाट अरण्यांनी युक्त असल्याने राजगडला पुर्णपणे वेढणे अतिशय कठीण होते. यातच त्याची खरी दुर्गमता दिसुन येते. या घेऱ्यामधे गुंजवणे, दादवडी, वाजेघर, मळे, भुतोंडे आणि पालखुर्द ही गावे येतात. पायथ्यापासुन गडाचा डोंगर चढायला सुरुवात केली कि मधल्या सपाटीवर ह्या चढणीच्या वाटांवर नजर ठेवणारी छोटी तपासणी केंद्रे म्हणजे मेट. त्यावर रामोशी,बेरड अशा लोकांची वस्ती असे. हा गड संरक्षणाचा दुसरा टप्पा. ह्यामुळे शत्रुसैन्य आडवाटांवरुन गडाला सहजपणे बिलगू शकत नसे. वाजेघर गावातून राजगड चढताना भिकुल्यांचे प्रसिद्ध मेट लागते. राजगडची इतर मेटे काळाच्या ओघात नाहिशी होण्याच्या मार्गावर आहेत. राजगड बिरमडोंगरी।,तीन माच्या तीन द्वारी॥ दोन तपे कारोभारी। जयावरी राहिले॥ ही ओवी राजगडच्या रचनेचे सार्थ वर्णन करते. माची म्हणजे गडाचा दोन तृतियांश डोंगर चढल्यावर तटबंदीने वेढलेली सपाट जागा. येथून प्रत्यक्ष गडाला सुरुवात होते. राजगडाला काहिशी ईशान्येकडची पद्मावती माची,पूर्वेकडची सुवेळा माची आणि पश्चिमेकडील संजीवनी माची. या तीनही माच्यांचे वास्तुशास्त्र लष्करी तसेच प्रशासकिय बाबतीत अद्वितीय आहे.

राजगड किल्ला इसवी सनाच्या पहिल्या शतकातला आहे. या डोंगराला किल्ल्याचे स्वरुप गौतमीपुत्र सातकर्णी याने दिले. बहुधा सन १६४५ मध्ये शिवाजीने महाराज हा किल्ला ताब्यात घेऊन त्यावर बांधकाम केले व त्याचे नाव राजगड ठेवले. मराठेशाहीची २६ वर्षे राजधानी याव्यतिरिक्त सदर किल्ल्यावर राजारामाचा जन्म व सईबाईंचे निधन या महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. राजगड हे शिवाजी महाराजांचे पहिले प्रमुख राजकीय केंद्र असून, हा बुलंद, बेलाग आणि बळकट राजगड आजही आपल्याला हिंदावी स्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. नंतर राज्यकारभारासाठी गडावरची जागा अपुरी पडू लागल्याने राजांनी राजधानी त्यामानाने ऐसपैस आणि दुर्गम अशा रायगडावर नेली.

१)’राजगड आणि तोरणा हे दोन्ही किल्ले उभ्या स्वरूपाचे असून अशा ठिकाणी वसले आहेत की मावळयांचे नेते शिवाजी भेासले यांना राज्यविस्तारासाठी या किल्ल्यांचा भरपूर उपयोग झाला.’ -जेम्स डग्लस(बुक ऑफ बॉम्बे)
२) साकी मुस्तैदखान त्याच्या मासिरे आलिमगिरे नावाच्या ग्रंथात म्हणतो- ‘राजगड हा अतिशय उंच. त्याची उंची पाहता सर्व किल्ल्यात तो श्रेष्ठ होय असे म्हणता येईल. त्याचा घेर १२ कोसांचा आहे. त्याच्या मजबूतीची तर कल्पनाही करवत नव्हती. डोंगराच्या दऱ्याखोऱ्यातून आणि घनघोर अरण्यातून वाऱ्याशिवाय दुसरे काही फिरकू शकत नाही. येथे पावसालाच फक्त वाट मिळू शकते. इतर कोणीही त्यातून जाऊ शकत नाही.’
३) महेमद हाशीम खालीखान हा ‘मुन्तखबुललुबाब-ए-महेमदॉशाही ‘ नामक ग्रंथामध्ये म्हणतो,’राजगड किल्ल्याचे मी कसे वर्णन करु?काय त्या किल्ल्याची उंची, काय त्याचा विस्तार! जणू काही आकाशच पसरले होते. त्याचे टोक पाहून छाती दडपे. त्याच्या भाराने पृथ्वी धारण करणारा पाताळातील वृषभ ओरडत असावा. त्या भागात सापांचा सुळसुळाट होता. जिकडे तिकडे निरनिराळ्या प्रकारचे हिंस पशू दिसत. त्यामुळे सगळे त्रस्त होऊन गेले.

सातवाहनपूर्व म्हणजे साधारण २००० वर्षा पूर्वीपासून हा डोंगर प्रसिद्ध आहे, असे इतिहासातून अस्पष्ट येणाऱ्या उल्लेखांवरून वाटते. ब्रम्हर्षी ऋषींचे येथे असणारे वास्तव्य व त्यांच्या नावे येथे स्थापन झालेले श्री ब्रम्हर्षी देवस्थान यावरून डोंगर फार पुरातन काळापासून ज्ञात असावा. राजगडाचे पूर्वीचे नाव होते मुरंबदेव. हा किल्ला बहमनी राजवटीमध्ये याच नावाने ओळखला जात असे. अर्थात त्यावेळी गडाचे स्वरूप फार काही भव्य दिव्य असे नव्हते. इसवी सन १४९० च्या सुमारास अहमदनगरच्या निजामशाहीचा संस्थापक अहमद बहिरी याने वालेघाट आणि तळ कोकणातील अनेक किल्ले जिंकून पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव निर्माण केला आणि याच वेळी त्याने मुरुंबदेव किल्ला हस्तगत केला. मुरुंबदेवाचे गडकरी बिनाशर्त शरण आल्यामुळे अहमद बहिरीला किल्ला जिंकण्यास विशेष प्रयास करावे लागले नाही. पुढे किल्ल्यावर निजामशाहीची सत्ता प्रस्थापित झाल्यावर १२५ वर्षे किल्ल्यावर कोणाचाही हल्ला झाला नाही. इसवी सन १६२५ च्या सुमारास मुरुंबदेव किल्ला, निजामशाहीकडून आदिलशाहीकडे आला.

निजामशहाच्या वतीने बाजी हैबतराव शिळीमकर व त्याचे वडील रुद्राजी नाईक या किल्ल्याची व्यवस्था पाहत होते. मलिक अंबरच्या आदेशानुसार बाजी हैबतरावाने मुरुंबदेवाचा ताबा आदिलशाही सरदार हैबतखानाकडे दिला.१६३० च्या सुमारास हा किल्ला आदिलशहाकडून परत निजामशाहीत दाखल झाला. शहाजीराजांचा अधिकारी सोनाजी या किल्ल्याचा कारभार पाहू लागला. विजापूर आदिलशाही सैन्याच्या एका तुकडीने किल्ल्यावर हल्ला केला. त्यात सोनाजी जखमी झाला. म्हणून बालाजी नाईक शिळीमकर आपल्या तुकडीसह मुरुमदेवाच्या रक्षणार्थ धावून गेला. तेव्हा बालाजी नाईक जखमी झाला. या कामगिरीबद्दल शहाजीराजांनी बाळाजी नाईक शिळीमकरांचा नंतर सन्मानही केला.
शिवाजी महाराजांनी मुरुंबदेवाचा किल्ला कधी घेतला याचा लिखित पुरावा आज मात्र उपलब्ध नाही. शिवचरित्र साहित्य खंडाच्या दहाव्या खंडात प्रसिद्ध झालले एक वृत्त सांगते की, ‘शिवाजीने शहामृग नावाचा पर्वत ताब्यात घेऊन त्यावर इमारत बांधली.’ सभासद बखर म्हणते की, ‘मुराबाद म्हणोन डोंगर होता त्यास वसविले. त्याचे नाव राजगड म्हणोन ठेविले. त्या गडाच्या चार माच्या वसविल्या. बखरकार सभासदाने बालेकिल्ल्याला सुद्धा एक माची म्हणून गणले आहे. मात्र शिवाजीराजांनी तोरण्यापाठोपाठ हा डॊंगर जिंकून घेतला हे नक्की. डॊंगरावर किल्ला बांधण्याचे काम महाराजांनी मोठा झपाट्याने केले. त्या डोंगरास तीन सोंडा किंवा माच्या होत्या त्यांसही तटबंदी केली.

मुख्य किल्ल्यास राजगड नाव ठेवून एक इमारत उभी केली. तीन माच्यांना सुवेळा, संजीवनी आणि पद्मावती ही नावे दिली. शिरवळ नजीक खेडबारे नावाचा गाव होता तेथे रान फार होते त्या ठिकाणी आंब्याची झाडे लावून पेठ वसविली व तिचे नाव शिवापूर असे ठेवले. इसवी सन १६६० मध्ये औरंगजेबाच्या आज्ञेनुसार शाहिस्तेखानाने शिवाजी महाराजांच्या प्रदेशावर स्वारी केली. फारसी साधनांमधून अशी माहिती मिळते की शाहिस्तेखानाने राजगडाकडे फौज पाठविलेली होती ह्या फौजेने राजगडाच्या जवळपासची काही खेडी जाळून उद्ध्वस्त केली परंतु प्रत्यक्ष राजगड किल्ला जिकंण्याचा प्रयत्न मात्र केला नाही. ६ एप्रिल १६६३ रोजी शाहिस्तेखानावर छापा घालून शिवाजी महाराज राजगडावर परतले. सन १६६५ मध्ये मिर्झाराजा जयसिंग याने शिवाजीच्या प्रदेशावर स्वारी केली. दाऊदखान आणि रायसिंग या दोन सरदारांना त्याने या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी पाठविले.

३० एप्रिल १६६५ रोजी मोगल सैन्याने राजगडावर चाल केली. परंतु मराठ्यांनी किल्ल्यावरून विलक्षण मारा केल्यामुळे मॊगलांना माघार घ्यावी लागली. शिवाजी महाराजांनी जयसिंगा बरोबर तह करताना २३ किल्ले देण्याचे मान्य केले व स्वतःकडे १२ किल्ले ठेवले. या १२ किल्ल्यांमध्ये राजगड, तोरणा, लिंगाणा, रायगड यांचा समावेश होतो. सभासद बखरीतील उल्लेख खालील प्रमाणे आहे सत्तावीस किल्ले तांब्रास दिले. निशाणे चढविली. वरकड राजगड व कोट मोरोपंत पेशवे, निलोपंत मुजुमदार व नेताजी पालकर सरनोबत असे मातुश्रींच्या हवाली केले व आपणही दिल्लीस जावे, बादशाहाची भेट घ्यावी असा करार केला. शिवाजी महाराज आग्ऱ्याहून निसटून निवडक लोकांनिशी १२ सप्टेंबर १६६६ ला राजगडाला सुखरूप पोचले. २४ फेब्रुवारी १६७० रोजी राजगडावर राजारामाचा जन्म झाला. सिंहगड किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसुरे यास राजगडावरूनच १६७० मध्ये पाठविले. सन १६७१-१६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी रायगड हे स्थान राजधानीसाठी निश्चित केले आणि राजधानी राजगडावरून रायगडाकडे हलविली.

३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचे निधन झाल्यावर मराठी राज्यावर औरंगजेबाच्या स्वारीचे संकट कोसळले. ११ मार्च १६८९ रोजी औरंगजेबाने संभाजी महाराजांना ठार मारले यानंतर मोगलानी मराठांचे अनेक गड जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. किशोरसिंह हाडा या मोगल सरदाराने जून १६८९ मध्ये राजगड जिंकून घेतला. औरंगजेबाने अबुल खैरखान याला राजगडाचा अधिकारी म्हणून नेमले. मात्र संभाजी महाराजांना पकडल्याची वार्ता पसरली नव्हती त्यामुळे मराठांची फौज राजगडाभोवती गोळा झाली आणि आपल्या बळावर राजगड पुन्हा जिंकून घेतला. जानेवारी १६९४ मधील एका पत्रात शंकराजी नारायण सचिव याने ‘कानद खोऱ्यातील देशमुखांनी राजगडाच्या परिसरातील प्रदेशाचे मोगलांच्या हल्ल्यापासून संरक्षण केल्याबद्दल त्यांची इनामे त्यांचकडे चालवावीत ‘ असा आदेश दिला होता. पुढे ११ नोव्हेंबर १७०३ मध्ये स्वतः औरंगजेब जातीनिशी हा किल्ला जिंकण्यासाठी पुण्याहून निघाला.

औरंगजेबाचा हा प्रवास मात्र सुखकर झाला नाही. राजगडाच्या अलीकडे चार कोस घाटातला रस्ता आहे. रस्ता केवळ दुर्गम होता औरंगजेबाने एक महिना आधी काही हजार गवंडी, बेलदार आणि कामदार यांना रस्ता नीट करण्याच्या कामावर पाठविले. पण रस्ता काही नीट झाला नव्हता त्यामुळे बरेचशे सामान आहे तिथे टाकून जावे लागले. २ डिसेंबर १७०३ रोजी औरंगजेब राजगडाजवळ पोहचला. किल्ल्यास मोर्चे लावले. किल्ल्याचा बुरुज तीस गज उंच; त्याच उंचीचे दमदमे तयार करून त्यावर तोफा चढविल्या व बुरुजावर तोफांचा भडिमार करु लागले. तरबियतखान आणि हमीबुद्दीनखान याने पद्मावतीच्या बाजूने मोर्चे लावले. पुढे दोन महिने झाले तरी किल्ला काही हातात येत नव्हता. शेवटी ४ फेब्रुवारी १७०३ रोजी राजगड औरंगजेबाच्या हातात पडला. इरादतखान याला औरंगजेबाने किल्लेदार नेमले आणि किल्ल्याचे नाव ‘नाबिशहागड’असे ठेवले.

२९ मे १७०७ रोजी गुणाजी सावंत याने पंताजी शिवदेवासह राजगडावर स्वारी करून तो किल्ला जिंकून घेतला आणि पुन्हा किल्ला मराठयांच्या स्वाधीन झाला. पुढे शाहूच्या ताब्यात किल्ला आल्यावर १७०९ मध्ये शाहूने सुवेळा माचीस ३०० रुपये व संजीवनी माचीस १०० रुपये अशी व्यवस्था लावून दिली. पेशवेकाळात राजगड हा सचिवांच्या ताब्यात होता. पेशवाईमध्ये आर्थिक परिस्थिती वांरवार बिघडत असल्याने किल्ल्यावर शिबंदीचे पगारही वेळेवर होत नसत. अशाच परिस्थितीमध्ये राजगडावरील सेवकांचे पगार एक वर्षभर थकले होते – राजवाडे खंड १२. यानंतर राजगड भोर संस्थानाच्या ताब्यात गेला. त्याची व्यवस्था पाहण्यासाठी सहा अधिकारी नेमले. सुवेळा माचीसाठी सरनोबत शिळीमकर, पद्मावती माचीसाठी सरनोबत-पवार घराण्यातील, संजीवनी माचीसाठी सरनोबत- खोपडे घराण्यातील होते. याशिवाय नाईक व सरनाईक हे अधिकारीसुद्धा असत. किल्ल्यावर जाण्यासाठी तीन वाटा आहेत. १.गुंजवणे गावातून चोरदरवाजा मार्गे २.पाली गावातून पाली दरवाजा मार्गे ३. वाजेघर मार्गे.

गडावरील पाहण्याची ठिकाणे १.सुवेळा माची-पद्मावती तळ्याच्या बाजूने वर गेले की रामेश्वर मंदिर आणि पद्मावती मंदिर आहे. इथून थोडे वर आले की एक तिठा आहे. त्यातील एक रस्ता सरळ बालेकिल्ल्याकडे, एक डावीकडून सुवेळा माचीकडे आणि तिसरा उजवीकडे संजीवनी माचीला जातो. चिलखती बुरूज, तशीच चिलखती तटबंदी ही गडाच्या दोन्ही माच्यांची वैशिष्ट्ये आहेत. थोडा उजवीकडे पाली दरवाजा आहे. गडावर यायला ही तुलनेने सोपी वाट आहे. बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी बालेकिल्ल्यालाच वळसा घालून एका ठिकाणी थोडीशी अवघड आणि उभी चढण चढावी लागते. बालेकिल्ल्याचा महादरवाजा अजूनही दणकट आहे. वर चंद्रतळे आहे; एक ब्रम्हर्षी मंदिर आहे.

२.पद्मावती तलाव–गुप्तदरवाज्याकडून पद्मावती माचीवर आल्यावर समोरच सुबक बांधणीचा विस्तीर्ण असा तलाव आढळतो. तलावाच्या भिंती आजही शाबूत आहेत. तलावात जाण्यासाठी त्याच्या भिंतीतच एक कमान तयार केलेली आहे. तलावात सध्या गाळ मोठा प्रमाणात साचला आहे. पद्मावती देवीच्या मंदिरा समोरच पूर्वाभिमुख असे रामेश्र्वर मंदिर आहे. मंदिरातील शिवलिंग शिवाजीकालीन आहे. मंदिरात असणारी मारुतीची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे.

३.राजवाडा— रामेश्र्वर मंदिरापासून पायऱ्यांनी वर जातांना उजवीकडे राजवाड्याचे काही अवशेष दिसतात. या राजवाड्यामध्ये एक तलाव आहे. राजवाड्यापासून थोडे पुढे गेल्यावर अंबारखाना लागतो. त्याच्या थोडे पुढे सदर आहे. सदरेच्या समोर दारोचे कोठार आहे. सदर ही गडावरची सर्वात महत्त्वाची अशी वास्तू आहे. पूर्वी या सदरेत ओटीच्या कडेस मधल्या खणात एक जुना गालिचा व त्यावर लोड ठेवलेला असे. अनेक इतिहास तज्ज्ञांचे असे मत आहे की ही सदर नसून तटसरनौबताचे घर आहे.

४.पाली दरवाजा —पाली दरवाज्याचा मार्ग पाली गावातून येतो. हा मार्ग फार प्रशस्त असून चढण्यासाठी पायऱ्या खोदल्या आहेत. पाली दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार भरपूर उंचीचे आणि रुंदीचे आहे, यातून हत्तीसुद्धा अंबारीसह आत येऊ शकतो. हे प्रवेशद्वार ओलांडून २०० मी. पुढे गेल्यावर भरभक्कम बांधणीचे दुसरे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराचे संरक्षण चांगल्या बुलंद अशा बुरुजांनी केलेले आहे. या दरवाजाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवाजाच्या वर आणि बुरुजावर परकोट बांधलेले आहेत. या परकोंटाना गोल आकाराचे झरोके ठेवलेले आढळतात. अशा झरोक्यांना ‘फलिका’ असे म्हणतात. या फलिकांचा उपयोग तोफा डागण्यासाठी होत असे. दरवाजातून आत शिरल्यावर दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवडा आहेत. या दरवाजाने गडावर आल्यावर आपण पद्मावती माचीवर पोहचतो.

५.गुंजवणे दरवाजा—गुंजवणे दरवाजा म्हणजे एकामागे एक असलेल्या तीन प्रवेशद्वारांची एक मालिका आहे. पहिला दरवाजा अत्यंत साध्या बांधणीचा आहे. मात्र दरवाज्याला दोन्ही बाजूस भरभक्कम बुरूज आहेत. गुंजवणे दरवाज्याच्या दुसऱ्या प्रवेशद्वाराला वैशिष्टपूर्ण कमान आहे.या दरवाज्याच्या शेवटी व गणेशपट्टीच्या खाली दोन्हीकडे दोन उपडे घट घेतलेल्या व एका कमलकलिकेसमोर असलेल्या सोंडा आहेत. सांप्रत या शिल्पावरून श्री किंवा गजशिल्प तयार झाले असावे असे अनुमान निघते. या सर्व गोष्टींवरून असे अनुमान निघते की, हे प्रवेशद्वार शिवाजीपूर्व काळी बांधलेले असावे. या प्रवेशद्वारातून आत आल्यावर दोन्ही बाजूस पद्मावती माची लागते. राजगडाला एकूण ३ माच्या आहेत. यापैंकी सर्वात प्रशस्त अशी माची म्हणजे पद्मावती माची. पद्मावती माची केवळ एक लष्करी केंद्र नसून निवासाचे ठिकाणही होते. माचीवर बांधकामाचे अनेक अवशेष सापडतात. पद्मावती देवीचे मंदिर, सईबाईंची समाधी, हवालदारांचा वाडा, रत्नशाळा, सदर, पद्मावती तलाव, गुप्त दरवाजा, पाली दरवाजा, गुंजवणे दरवाजा, दारुगोळ्याची कोठारे या वास्तू आजही शिल्लक आहेत. याशिवाय पद्मावती माचीवर ब्राम्हणवर्गाची आणि अष्टप्रधान मंडळाची काही घरे आहेत.

५.पद्मावती मंदिर— २००२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आहे. शिवाजीराजांनी किल्ले मुरुंबदेवाचे राजगड म्हणून नामकरण केल्यावर येथे असलेल्या जागेवर पद्मावती देवीचे मंदिर बांधले, असा उल्लेख आढळतो. सध्या मंदिरात आपल्याला तीन मुर्ती दिसतात. मुख्य पूजेची मूर्ती भोरच्या पंत सचिवांनी स्थापन केली आहे. तिच्या उजव्या बाजूला लहान मूर्ती शिवाजीमहाराजांनी स्थापित केलेली आहे. या दोन मूर्तीच्या मध्ये शेंदूर फासलेला तांदळा म्हणजे पद्मावती देवीची मूर्ती आहे. या मंदिरात सध्या २० ते ३० जणांना राहता येते. मंदिराच्या बाजूसच पाण्याचे टाके आहे. यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. मंदिराच्या समोरच सईबांईची समाधी आहे.

६.संजीवनी माची—सुवेळा माचीच्या बांधणीनंतर शिवाजीमहाराजांनी या माचीचे बांधकाम करण्यास सुरवात केली. माचीची एकूण लांबी अडीच कि.मी. आहे. ही माची सुद्धा ३ टप्प्यांमध्ये बांधलेली आहे. संजीवनी माचीवरील घरांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेत. माचीच्या प्रत्येक टप्प्यास चिलखती बुरुज आहेत. पहिला टप्पा खाली उतरून उत्तरेकडे वळून तटालागत थोडे मागे चालत गेल्यावर तीन तिहेरी बांधणीचे बुरूज लागतात. या तिन्ही बुरुजांवर शिवाजीच्या काळात प्रचंड मोठा तोफा असाव्यात. या माचीवर अनेक पाण्याची टाकी आहेत. या माचीला एकूण १९ बुरूज आहेत. माचीला भुयारी परकोटाची योजना केलेली आहे. या भुयारातून बाहेरील तटबंदीकडे येण्यासाठी दिंडांची व्यवस्था केलेली आहे. संजीवनी माचीवर आळू दरवाजानेसुद्धा येता येते. आळू दरवाज्यापासून राजगडाची वैशिष्ट्य असलेली चिलखती तटबंदी दुतर्फा चालू होते. दोन्ही तटांमधील अंतर अर्धा-पाऊण मीटर असून खोली सुमारे ६ ते ७ मीटर आहे. या भागात बुरुजांच्या चिलखतात उतरण्यासाठी पायऱ्यांच्या दिंडा आहेत. तसेच नाळेतून वर येण्यासाठी दगडी सोपान आहेत. माचीवर तटबंदीमध्ये काही जागी प्रातर्विधीची ठिकाणे आढळतात. दुहेरी तटबंदीच्या शेवटी बलाढ्य बुरुज आहेच यांचा उपयोग दूरवर नजर ठेवण्यासाठी होत असे.

७.—आळू दरवाजा : संजीवनी माचीवर येण्यासाठी या दरवाजाचा उपयोग होत असे. तोरण्यावरून राजगडावर येण्याचा एकमेव मार्ग या दरवाज्यातून जात असे. आळू दरवाजा सद्यास्थितीला बऱ्यापैकी ढासळलेल्या अवस्थेत आहे. या दरवाज्यावरील शिल्पात. वाघाने एक सांबार उताणे पाडले आहे असे दाखवले आहे.

८.सुवेळा माची—मुरुंबदेवाचा किल्ला ताब्यात आल्यानंतर शिवाजी महाराजांनी किल्ल्याच्या पूर्वेकडील डोंगररांगेला भरभक्कम तटबंदी बांधली, आणि माचीला सुवेळा माची असे नाव ठेवले. पूर्वेकडे ही माची असल्यामुळे या माचीचे नाव सुवेळा असे ठेवले. सुवेळा माची ही संजीवनीएवढी लांब नाही, मात्र या माचीचे सुद्धा ३ टप्पे आहेत. पूर्वेकडे ही माची चिंचोळी होत गेलेली आहे. माचीच्या प्रारंभी टेकडीसारखा भाग आहे याला डुबा असे म्हणतात. या डुब्याच्या डावीकडून रानातून जाणाऱ्या वाटेने गेल्यावर शिबंदी घरटी दिसतात. तेथे डाव्या हातास एक दक्षिणमुखी वीर मारुती व त्याच्या जवळ पाण्याचे टाक आहे. येथे असणारे चौथरे येसाजी केक, तानाजी मालसुरे व शिलींबकर या सरदारांची होती. येथून सरळ जाणारी वाट सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्पयावर जाते तर डावीकडे जाणारी वाट काळेश्र्वरी बुरुजाच्या परिसरात घेऊन जाते. आपण माचीच्या दिशेने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक सदर लागते. येथून पुढे तटबंदीच्या खरा भाग सुरू होतो. येथील तटबंदी दोन टप्प्यांत विभागली असून प्रत्येक टप्प्याच्या शेवटी चिलखती बुरुज आहे.

दुसऱ्या टप्प्यात गेल्यावर तटबंदीच्या दोन्ही बाजूस आतील अंगास भुयारी चिलखती परकोटाची रचना केली आहे. दुसऱ्या टप्प्याकडे जातांना एक उंच खडक लागतो आणि या खडकात ३ मीटर व्यासाचे एक छिद्र आढळते या खडकालाच नेट किंवा ‘हत्तीप्रस्तर’ असे म्हणतात. या हत्तीप्रस्तराच्या अलीकडे तटातील गणपती आढळतो व तेथूनच पुढे तटातून खाली जाण्यासाठी गुप्त दरवाजा आहे. या दरवाजाला मढे दरवाजा असे म्हणतात. हत्ती प्रस्तराच्या पुढील भागातसुद्धा एक असाच गुप्त दरवाजा आहे. सुवेळामाचीच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात खालच्या भागात वाघजाईचे शिल्प आहे. ९.काळेश्र्वरी बुरूज आणि परिसर—सुवेळा माचीच्या दुसऱ्या टप्प्याकडे जाणाऱ्या वाटेच्या उजवीकडे वळल्यावर आपल्याला पाण्याची काही टाकी दिसतात. पुढे रामेश्र्वर मंदिराचे काही अवशेष आहेत.या रामेश्र्वर मंदिरात शिवलिंग, भग्र नंदी, एक यक्षमूर्ती अशी शिल्पे आढळतात. या रामेश्र्वर मंदिराच्या वरील बाजूस शिलाखंडावर गणेशाची प्रतिमा, पार्वती, शिवलिंग अशी शिल्पे आहेत. येथून थोडेसे पुढे गेल्यावर काळेश्र्वरी बुरुज आहे. येथेच तटात एक गुप्त दरवाजा देखील आढळतो. १०.बालेकिल्ला—राजगडाच्या सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. या बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता कठीण आणि अरुंद आहे. चढण संपल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा लागतो. यालाच महादरवाजा असे ही म्हणतात. आजही दरवाजा चांगल्या स्थितीत आहे. प्रवेशद्वाराची उंची ६ मीटर असून प्रवेशद्वारावर कमळ, स्वस्तिक ही शुभचिन्ह कोरलेली आहेत. बालेकिल्ल्याला साधारण १.५ मीटर उंचीची तटबंदी बांधलेली असून विशिष्ट अंतरावर बुरूजही ठेवलेले आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर आहे. येथून पुढे गेल्यावर चंद्रतळे लागते. तळ्याच्या समोरच उत्तर बुरूज आहे. येथून पद्मावती माची आणि इतर सर्व परिसर दिसतो. बुरुजाच्या खालून एक पायवाट बालेकिल्ल्यावर येते आता मात्र ही वाट एक मोठा शिलाखंड टाकून बंद केलेली आहे. ही वाट ज्या बुरुजावरून वर येते त्या बुरुजाला उत्तर बुरुज असे म्हणतात.येथून संपूर्ण राजगडाचा घेरा आपल्या लक्षात येतो.या उत्तर बुरुजाच्या बाजूला ब्रम्हर्षी ऋषींचे मंदिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्यावर काही भग्र अवस्थेतील इमारती चौथरे, वाड्यांचे अवशेष आढळतात.

गडावरून तोरणा, प्रतापगड, रायगड, लिगांणा, सिंहगड, पुरंदर, वज्रगड, मल्हारगड, रोहीडा, रायरेश्र्वर आणि लोहगड, विसापूर हे किल्ले दिसतात. गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. १.गुप्त दरवाज्याने राजगड : पुणे – राजगड अशी एस.टी पकडून आपल्याला वाजेघर या गावी उतरता येते.बाबुदा झापापासून एक तासाच्या अंतरावर रेलिंग आहेत. त्यांच्या साह्याने अत्यंत कमी वेळात राजगडावर जाता येते. या वाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात. २.पाली दरवाज्याने राजगड : पुणे-वेल्हे एस.टी.ने वेल्हे मार्गे पाबे या गावी उतरुन कानद नदी पार करून पाली दरवाजा गाठावा.ही वाट पायऱ्याची असून सर्वात सोपी आहे. या वाटेने गडावर जाण्यास ३ तास लागतात. ३.गुंजवणे दरवाज्याने राजगङ : पुणे-वेल्हे या हमरस्त्यावरील मार्गासनी या गावी उतरावे आणि तिथून साखरमार्गे गुंजवणे या गावात जाता येते. ही वाट अवघड आहे.या वाटेवरून गड गाठण्यास अडीच तास लागतात. माहितगाराशिवाय या वाटेचा उपयोग करू नये. ४.आळू दरवाज्याने राजगड : भुतोंडे मार्गे आळु दरवाज्याने राजगड गाठता येतो.शिवथर घळीतून ही अळू दरवाज्याने राजगड गाठता येतो. ५.गुप्त दरवाजामार्गे सुवेळामाची : गुंजवणे गावातून एक वाट जंगलातून गुप्तदरवाजेमार्गे सुवेळा माचीवर येते. राजगड किल्ला संपूर्ण पाहण्यासाठी साधारण २ दिवस लागतात.

माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a comment