महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,19,960

चावंड | Chavand Fort

By Discover Maharashtra Views: 4347 12 Min Read

चावंड | Chavand Fort

सातवाहन राजे म्हणजे महाराष्ट्रातील पहिले राजघराणे. इतिहासात खोलवर डोकावले असता आपल्याला दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहन राजांचा उल्लेख नाणेघाटाच्या लेण्यांमधील शिलालेखात आढळतो. सातवाहन राजसत्तेच्या काळात कोकण व देश यांना जोडणारा नाणेघाट जन्माला आला अन् त्याच्या संरक्षणासाठी कुकडी नदीच्या खोऱ्यात जिवधन, चावंड, हडसर, निमगिरी, शिवनेरी अशा बुलंद किल्यांची निर्मिती झाली. त्या काळी नाणेघाटा पासून काही अंतरावर जीर्णनगर म्हणजेच आजचे जुन्नर या गांवी बाजारपेठ वसली गेली. सातवाहन यांच्या सत्ताकाळात महाराष्ट्रात सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर गड किल्यांचे साज चढले व सारा सह्याद्री गडकोटांनी सजला. यातील एक किल्ला म्हणजे किल्ले चावंड उर्फ प्रसन्नगड(Chavand Fort). या गडाची अनेक नावे आहेत. चामुंड, चाऊंड, चावंड ही नावे चामुंडा या शब्दाचा अपभ्रंश आहेत.

चावंड हा चामुंडा नावाचा अपभ्रंश असल्याने गडावरील एकाच ठिकाणी असलेल्या सात पाण्याच्या टाक्यांचा संबंध सप्तमातृकांशी जोडला जातो. चुंड हे निजामशाही आमदानीतील नाव आहे तर प्रसन्नगड हे नाव शिवाजी महाराजांनी ठेवले. चावंड येथे जाण्यासाठी सर्वप्रथम मुंबई अथवा पुणे येथुन जुन्नर गाठावे. जुन्नरहून नाणेघाटला जाताना १५ कि.मी.वर चावंडवाडी हे चावंड किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. गडमाथा गाठण्यासाठी गावाच्या अलीकडेच असलेल्या प्रसन्नगड उपाहारगृहापासुन किल्ल्याची ठळक पायवाट आहे. गडावर जाताना या उपाहारगृहासमोर असलेल्या कुपनलीकेतुन पाणी भरून घ्यावे कारण गडावर जरी पाण्याच्या टाक्या असल्या तरी त्यातील पाणी वापरात नसल्याने पिण्यासाठी योग्य नाही. या वाटेने निघाल्यावर सर्वप्रथम वनखात्याने बांधलेला टेहळणी मनोरा व शेजारी पर्यटकांसाठी बांधलेला निवारा लागतो. येथुन किल्ल्यावर जाण्यासाठी वनखात्याने नव्याने पायऱ्या बांधलेल्या आहेत. या वाटेने साधारण ३०० पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला खडकात खोदलेल्या अरुंद लहान पायऱ्या लागतात. या पायऱ्यांना लोखंडी कठडे बसवले आहेत.

इंग्रजांनी १ मे १८१८ रोजी चावंडवर हल्ला करून येथील पायऱ्या उद्‌ध्वस्त केल्या. त्यासाठी जागोजाग सुरुंग लावल्याच्या खुणा आजही आपल्याला पायऱ्या चढताना दिसतात. साधारण १५ पायऱ्या चढून गेल्यावर कोणा दुर्गप्रेमीने एका खोबणीत आधारासाठी पुरलेली निकामी तोफ दिसते. पुर्वी या तोफेला दोर बांधून लोक वरखाली ये-जा करत असत. साधारण अर्धा फुट व्यास असलेली ही तोफ ३.५ फूट लांब असुन तिचा जमिनीवरील भाग साधारण दीड फुट आहे. यानंतर १० फुट लांबीच्या व दिड फुट ऊंचीच्या दमछाक करायला लावणा-या ५०-६० कोरीव व बांधीव पायऱ्या चढून गेल्यावर गडाची तटबंदी समोर येते. उभ्या कडय़ातील ही वाट चारी बाजूंनी ताशीव कडे असल्याने एका नाळेतून खोदुन काढली आहे. गडाचा हा प्रवेशमार्ग व हडसर,जीवधन गडाचा प्रवेशमार्ग यात असलेली समानता पहाता हे तीनही किल्ले सातवाहन कालखंडात एकाच राजवटीत बांधल्याचे जाणवते. गडाचा दरवाजा तटबंदीत पायऱ्यांच्या काटकोनात बांधलेला असुन वाटेच्या उजव्या बाजुस दरवाजाच्या रक्षणासाठी बुरूज बांधलेला आहे. त्यामुळे खालून वा पायऱ्या चढून वर आलो तरी गडाचा दरवाजा दिसत नाही.

गडाचा दरवाजा दक्षिणाभिमुख असुन कमकुवत झालेल्या या दरवाजाला लोखंडी खांबांचा आधार देण्यात आला आहे. दरवाजाची उजवी बाजू म्हणजे एक अखंड तासलेला कातळ असुन त्यावर एक तसेच दरवाजाच्या दगडी कमानीवर एक असे दोन गणपती कोरलेले आहेत. दरवाजाच्या वरील बाजुस मारगीरीसाठी असलेल्या जंग्या तसेच दरवाजा समोरील भागात लक्ष ठेवण्यासाठी झरोका दिसुन येतो. दरवाज्यावरील गणेशला वंदन करून किल्ल्यात प्रवेश केला असता काही पायऱ्या लागतात. या पायऱ्या चढुन आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो. पायऱ्याच्या डावीकडे तटबंदीकडे जाणारी वाट असुन उजव्या बाजुची वाट किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या गोलाकार टेकडीच्या दिशेने जाताना दिसते. चावंड किल्ला समुद्र सपाटीपासून ३५०० फूट उंचावर असुन ८५ एकर परिसरावर दक्षिणोत्तर पसरला आहे. किल्ल्यावर आजही सहा बुरुज शिल्लक असून किल्ल्याची तटबंदी बांधताना कातळात चर खोदून त्यावर तटबंदी बांधली आहे.

गडाच्या टेकडीकडे म्हणजेच बालेकिल्ल्याकडे जाताना वाटेत १०-१२ पायऱ्या चढल्यावर खुप मोठया प्रमाणात उध्वस्त अवशेष दिसुन येतात. या भागात प्रचंड प्रमाणात गवत वाढलेले असल्याने हे अवशेष नीटपणे पहाता येत नाहीत. येथे साधारण १५ ते २० वास्तुंचे चौथरे असुन त्यात गडाची सदर व वाड्याचे अवशेष दिसुन येतात. यातील काही वास्तूंच्या भिंती,जोते व दरवाजाची चौकट आजही शिल्लक आहे. वाटेच्या उजव्या बाजुला एका वास्तुच्या चौथऱ्याजवळ पायऱ्या असलेली पाण्याची जोडटाकी असुन तेथे पाणी भरण्यासाठी दगडी ढोणी दिसुन येतात. वाटेच्या डाव्या बाजुला असलेल्या एका वाडयाच्या आत एक दगडी शौचकुप असुन या वाडयाच्या खालील बाजुस अलिप्त असे दुसरे दगडी शौचकुप दिसुन येते. हे सर्व पाहुन सर्वप्रथम गडाच्या बालेकिल्ल्याकडे निघावे. गडाचे आकारमान व गडावर असणारी पाण्याची २९ टाकी पहाता गड नांदता असताना गडावर खुप मोठया प्रमाणात वस्ती असावी.

बालेकिल्ल्यावर गडदेवता चामुंडा देवीचे नव्याने बांधलेले लहानसे मंदीर असुन मंदिरसमोर लहानशी दगडी दीपमाळ आहे. मंदिरातील मुर्ती अलीकडील काळातील वाटते. या मंदिराच्या आवारात जुन्या कोरीव मंदिराचे अवशेष सर्वत्र विखुरलेले दिसतात. मंदिराच्या आवारात उभे राहिले असता माचीवरील सर्व अवशेष नजरेस पडतात व आपल्याला नक्की कुठेकुठे फिरायचे आहे याची कल्पना येते. येथुन दुरवर नजर फिरवली असता भटोबा, नवरा-नवरी सुळके, माणिकडोह व कुकडी जलाशय तसेच शिवनेरी, जिवधन निमगिरी, हडसर, सिंदोळा व जुन्नर तालुक्यात पसरलेल्या सह्याद्री रांगांचे दर्शन घडते. बालेकिल्ल्यावरून खाली उतरून मूळ वाटेवर आल्यावर डाव्या बाजुने बालेकिल्ल्याला प्रदक्षिणा मारायला सुरवात करावी. या वाटेवरून फिरताना कोणतेही अवशेष नसुन पाण्याची एकुण अठरा टाकी नजरेस पडतात. बालेकिल्ल्याची साधारण ८० टक्के प्रदक्षिणा पुर्ण झाल्यावर जेथुन सुरवात केली त्या वाटेच्या थोडेसे अलीकडेच एक खचत चाललेले भग्न शिवमंदीर व त्यासमोर असलेली पुष्कर्णी नजरेस पडते. या प्राचीन शिवमंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारपट्टिकेचा खालील भाग काही प्रमाणात शिल्लक असुन गर्भगृहासमोरच्या सभामंडपाची केवळ कमान कशीबशी तग धरून उभी आहे.कमानीखाली मंदिराच्या बांधकामातील कोरीव दगड पडलेला आहे. गर्भगृहाच्या मागील बाजुस एक कातळात खोदलेले जोडटाके असुन पुढील भागात असलेल्या बांधीव पुष्कर्णीला काही पायऱ्या व चौदा कोनाडे आहेत. यातील तीन चार कोनाड्यात भग्न मुर्ती असुन उर्वरीत कोनाडे रिकामे आहेत. मंदिरासमोर पुष्करणीच्या बाजुला एक भग्न नंदी आहे. हरिश्चंद्रगडावरील पुष्कर्णी व हि पुष्कर्णी काही प्रमाणात सारखीच आहे.

इ.स. ७५०च्या आसपास शिलाहार राजांनी हे मंदिर बांधले असावे. मंदिराची पूर्ण पडझड झाली असली तरी आजूबाजूस पडलेले अवशेष व दगडावरील नक्षीकाम आपल्याला काही काळ थांबवुन ठेवतात. शिवमंदिराकडून एक वाट उजवीकडे गडाच्या उतारावर जाताना दिसते. या वाटेवर दगडांचा गोलाकार रचलेला ढीग दिसुन येतो. साततळी खोदताना निघालेला दगड येथे बांधकामासाठी रचुन ठेवला असावा. या ढिगाच्या मागील बाजुस एका विस्तीर्ण खडकात गोलाकार रचनेत एकाला लागून एक अशी सात तळी इथे खोदलेली आहेत. या तळ्यात उतरण्यासाठी पश्चिम दिशेला पायऱ्या असुन या पायऱ्यांच्या शेवटी कातळातच एक दरवाजा कोरलेला आहे. या दरवाजाच्या कमानीत गणपती कोरला असुन कमानीच्या दोन्ही बाजुला लाकडी दरवाजा बसवण्यासाठी दगडी खाचा आहेत. गडाच्या या भागात बऱ्यापैकी तटबंदी असून तटबंदीच्या बाजूने फिरण्यास जागा आहे. येथे आजूबाजूच्या परिसरात ६-७ उद्‌ध्वस्त बांधकामे तशीच डोंगर उतारावर पाण्याची ५ टाकी दिसुन येतात. ज्या ठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे तिथे घडीव दगड रचून ठेवले आहेत. तळ्याच्या उजव्या बाजुला जिथे तटबंदी संपते तेथुन एक वाट तटबंदीखाली उतरताना दिसते. या ठिकाणी कातळात कोरलेल्या १५ पायऱ्या असुन त्याखालील भागात ४ कातळकोरीव गुहा आहेत. या पहारेकऱ्याच्या चौक्या अथवा दारूगोळ्याचे कोठार असावे असे वाटते. येथील गुहा सुस्थितीत असुन एका गुहेत दोन बाजुला ५ फूट खोलीचे दोन हौद आहेत.

गडावर रहाण्याची वेळ आल्यास या कोठारांमध्ये १५ ते २० जण राहू शकतात. गडाचा इतर भाग कड्यांनी व्यापला असुन या भागात खुप मोठया प्रमाणात रानगवत वाढल्याने ओसाड आहे. गडाच्या इतर काही भागात तुरळक तटबंदी दिसुन येते. पायथ्यापासुन संपुर्ण किल्ला फिरण्यास ५ तास लागतात. चावंड उर्फ प्रसन्नगडाला सातवाहन, बहामनी, निजामशाही, अदिलशाही, मुघल, मराठे व इंग्रज असा मोठा व प्राचीन इतिहास लाभलेला आहे. नाणेघाटातून येणाऱ्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी सातवाहन काळात या गडाची निर्मिती झाली. सन १४८५ मध्ये बहमनी साम्राज्याच्या अस्तानंतर निजामशाही स्थापन करणाऱ्या मलिक अहमदने उत्तर कोकण व पुणे प्रांतावर कब्जा मिळवला. मलिक अहमदपुढे काही किल्ले शरण गेले नव्हते ते किल्ले म्हणजे चावंड, लोहगड, तुंग, कोआरी, तिकोणा, कोंढाणा, पुरंदर, भोरप, जीवधन, मुरंजन, महोली आणि पाली. हे सर्व किल्ले त्याने आपल्या ताब्यात घेतले. १४८७ मध्ये निजामशहा मलिक अहमदने पुणे प्रांतातले जे किल्ले जिंकले त्यात चावंडचे नाव आहे. या किल्ल्यातही भरपूर लूट त्याच्या हाती आली. शिवनेरी जिंकल्यावर मलिक अहमदने जुंड किल्ल्याची व्यवस्था आपल्या एका सरदाराच्या हाती सोपवून लोहगडाकडे मोर्चा वळवला.

इ.स. १५६५ ते १५८८ दरम्यान मुर्तजा निजामशहाच्या कारकिर्दीत त्याचा वजीर खानेखानान मौलाना हसन तब्रिजी याला या किल्ल्यावर कैदखान्यात ठेवण्यात आले होते. पुढे चंगीजखानाच्या मध्यस्थीने त्याची सुटका करण्यात आली. मुर्तजा निजामशहाचा आणखी एक वजीर आसदखान हादेखील या किल्ल्यावर काही वर्ष कैदेत होता. आदिलशाहच्या सैन्याशी लढताना इब्राहीम निजामशाहच्या मस्तकात गोळी लागून तो ठार झाला. निजामशाही वजीर मिया मंजू याने अहमद नावाच्या मुलाला दौलताबादच्या कैदेतून सोडवून गादीवर बसवले. त्यावेळी त्यांने इब्राहीमचा अल्पवयीन मुलगा बहादूरशहा याला चावंडला बंदिवासात ठेवले. बहादूरशहा (इ.स. १५९४-१५९५) वर्षभर या किल्ल्यावर कैदेत होता. चांदबीबी ही बहादूरशाहची आत्या. मिया मंजूने बहादूरशाहवर असलेले चांदबीबीचे पालकत्व हिरावून घेतले. पुढे निजामशाही गादीवर तोतया आहे हे माहित झाल्यावर निजामशाही सरदार इख्लासखान याने चावंडच्या किल्लेदाराला बहादूरशहा याला आपल्या हवाली करण्यास हुकूम पाठवला पण किल्लेदाराने मिया मंजू याच्या हुकुमाशिवाय हे शक्य नसल्याचे कळवले. इख्लासखानाने तोतया बहादूरशहा निर्माण केला. मिया मंजूने अकबराचा राजपुत्र मुराद यास मदतीस बोलावले पण तो अहमदनगरच्याच किल्ल्यावर चालून आला. आता मिया मंजूला पश्चात्ताप झाला. त्याने अहमदनगरच्या संरक्षणासाठी सरदार अन्सारखान याला व राज्यप्रतिनिधी म्हणून चांदबीबीला नेमले. मिया मंजू आदिलशाह व कुतुबशहाकडे मदत मागण्यास गेला असता चांदबीबीने त्याचा हस्तक अन्सारखान याचा खून करवला आणि चावंडच्या अटकेतून बहादूरशाहची सुटका करत त्याला सुलतान म्हणून जाहीर केले.

१६३६ मध्ये निजामशाहीचा आदिलशाह आणि मोगलांपासून बचाव करण्यासाठी शहाजीराजांनी केलेल्या तहानुसार चावंड मोगलांना मिळाला. शिवकाळात चावंड किल्ल्याबद्दलचा उल्लेख पर्णालपर्वतग्रहणाख्यानम् या संस्कृत काव्यग्रंथात मिळतो. या काव्यग्रंथाचा कर्ता कवी जयराम पिंडे तंजावरच्या व्यंकोजीराजे भोसले यांना शिवाजी महाराजांनी मुघल आणि आदिलशाहीचे कोणकोणते किल्ले कसे जिंकले यांचे वर्णन करताना ग्रंथाच्या पहिल्या अध्यायातील ३७व्या श्लोकात चावंडचा उल्लेख करतो. तथैव चामुण्डगिरी हरिश्चंद्रस्तथैव च। महिषोष्यड्सरस्तावद गृहीतावतिसंगरात्।। ३७।। याचा अर्थ असा कि त्याचप्रमाणे चामुण्डगिरी (चावंड), हरिश्चंद्रगड, महिषगड (?) आणि हडसर हे (किल्ले) सुद्धा (शिवाजी महाराजांनी) निकराने लढून घेतले. मे १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी चामुंडगड जिंकला तेव्हा त्याचे नाव प्रसन्नगड ठेवले असावे. इ.स.१६९४ मध्ये औरंगजेब स्वराज्य जिंकण्यासाठी दक्षिणेत आला असता छत्रपती राजारामाच्या काळात त्याच्या फौजेने हा किल्ला जिंकला व सुरतसिंग गौंड याला किल्लेदार म्हणून नेमले पण तो तिथे येऊन पोहचण्यापुर्वीच मराठ्यांनी किल्ला परत जिंकून घेतला. त्यानंर गजिउद्दीन बहादुर याने हा किल्ला काबीज केला. पुढे पेशवेकाळात किल्ला मराठयांच्या ताब्यात आला. इ.स.१७८५-८६ मध्ये माधवराव पेशवे यांच्या कारकीर्दीत पेशव्यांचा कैदखाना या गडावरच असल्याचा उल्लेख येतो. २५ एप्रिल १८१८ मध्ये इंग्रजांनी जुन्नर ताब्यात घेऊन सैन्याची एक तुकडी चावंडला पाठवली. २ मे १८१८ मध्ये इंग्रजांनी चावंडच्या किल्लेदाराला किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला पण किल्लेदाराने नकार दिला. इंग्रजांनी किल्ल्यावर १०० तोफगोळ्यांचा भडीमार केल्याने किल्लेदाराला शरण जाणे भाग पडले. इंग्रजांनी किल्ला आपल्या ताब्यात घेतल्यावर किल्ल्याच्या वाटेवर सुरुंग लावून पायऱ्यांची तोडफोड केली.


माहिती साभार
सुरेश किसन निंबाळकर
सदर संकेतस्थळाचे सर्व हक्क राखिव असून येथे प्रकाशित झालेला कोणताही लेख अथवा छायाचित्र हे लेखकाच्या किंवा प्रकाशकाच्या परवानगीशिवाय वापरता येणार नाही याची नोंद घ्यावी. असे केलेले आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Leave a comment