महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

मोगली लढा स्वराज्याच्या पहिल्या राजधानीसाठी

By Discover Maharashtra Views: 3537 6 Min Read

मोगली लढा स्वराज्याच्या पहिल्या राजधानीसाठी

स्वराज्याची पहिली राजधानी. जवळ जवळ २५ वर्षे स्वराज्याची पहिली राजधानी असण्याचा मान राजगडास मिळाला. बिरमदेवाच्या डोंगरात शिवरायांनी १६४३-४४ मध्ये गडाचे बांधकाम चालू केले. त्यानंतर सर्व कारभार हा येथूनच चालू लागला. स्वराज्याचा वाढत विस्तार आणि शत्रूचे आक्रमण पाहता महाराजांनी राजधानी सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे ठरवले. इतिहासातील महत्त्वाचे सुवर्णक्षणांची नोंद याच किल्ल्यावर झाली.

छत्रपती संभाजीमहाराजांच्या हत्येनंतर औरंगजेबाने रायगड घेतला तेव्हा राजारामराजे रायगडावरून निघाले ते थेट जिंजी येथे पोहोचले. राजारामराजे जेव्हा महाराष्ट्रातून गेले त्यावेळी औरंगजेबाने मराठ्यांचे अनेक किल्ले जिंकून घेतले होते आणि इतर किल्ले, द्रव्य अथवा फौजेच्या बळावर तो झपाट्याने जिंकीत चालला होता महाराष्ट्राच्या अगदी उत्तरेकडे असलेले साल्हेर ते महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेला राजगड हे किल्ले त्याने जिंकुन घेतले.

मे – जुलै १६८९ या सुमारास – बादशहाला कळविण्यात आले की संभाजीचा धाकटा भाऊ राजाराम हा राजगडच्या किल्ल्यात असून हंबीरराव, प्रतापराव, व अंबोजी भोसले वगैरे मराठे सरदार हे त्याच्या बरोबर आहेत. हे ऐकताच बादशहाने राजा किशोर सिंग याला राजगड जिंकून घेण्यासाठी रवाना केले. त्याच्या बरोबर मीर इनायतुल्ला, मीर अन्दुस्समद, मिर्जा खर्जाजुल्ला इत्यादि पन्नास मनसबदार यांस पाठवण्यात आलें. त्यांना ताकीद करण्यात आली कि, अशी काही मसलत करा की राजाराम आणि त्याच्या बरोर असलेले सरदार जिवंत पकडले जावेत. हे न जमले तर त्यांना मारण्यांत यावें. पण कोणत्याहि परिस्थितीत त्यांनी निसटून नाऊं नये.

बादशाहच्या आज्ञेप्रमाणे राजा किशोर सिंग हा राजगडाजवळ आला. त्याने किल्ल्याला वेढा घातला. हा वेढा जवळ जवळ दीड एक महिन्यापर्यंत चालला. मराठे आणि मोगल हे एकमेकांवर तुटून पडले होते. किल्ला जिंकण्यासाठी दोन्ही बाजूनी शर्थीचे प्रयत्न होऊ लागले. किल्ल्यावरून मराठे मोगलांच्या छावणीवर तोफांचा मारा करीत होते. योगायोगाने एक दिवस मराठ्यांच्या दारूच्या कोठारांत आग लागली. दारूचा मोठा स्फोट होऊन किल्ल्याचे काही तट आसमंतात उडाले. किल्ल्याचे तट बुरुज ढासळले. काही दगड तर मोगलांच्या मोर्च्यात येऊन पडले. दारुगोळ्याच्या कोठारात झालेल्या या स्फोटामुळे दगडाखाली दबून सुमारे दोनशे मराठे ठार झाले.

रामचंद्र आणि शंकरजी यांच्या मदतीने याच वर्षात पुन्हा मराठ्यांनी राजगड मोगलांकडून जिंकून घेतला.

पुण्याच्या परिसरातून मोगल डिसेंबर १७०३ रोजी वेढ्याच्या कामाला सुरुवात केली . सतत दोन महिन्यांपर्यंत त्यांनी किल्ल्यावर तोफांचा भडिमार चालू ठेवला . ६ फेब्रुवारी १७०४ रोजी किल्ल्याचा पहिला दरवाजा त्यांनी हल्ला करून जिंकून घेतला. किल्ल्यावरील शिबंदीने किल्ल्याच्या बाले किल्ल्याचा आसरा घेतला . शिबंदीचे अधिकारी फिरंगोजी आणि हमानजी हे दोघेजण होते . त्यांनी त्यानंतरचे १० दिवस मोगल सैन्याला कडवा प्रतिकार चालू ठेवला. सरते शेवटी किल्लेदाराने मोगलांबरोबर तह केला , किल्ल्याच्या बुरुजावर बादशाही निशाण लावले आणि १६ फेब्रुवारीच्या रात्री किल्ल्यावरून तो पळून गेला.

मोगलांनी राजगड आणि तोरणा किल्ले जिंकल्याची हकीकत मासिरी आलमगिरीच्या लेखकाने पुढीलप्रमाणे दिली आहे :

पावसाळा जवळ आला होता आणि मार्गात असंख्य अडथळे होते. ते दूर सारून प्रवास करणे मोठे अवघड होते. राजगड किल्ला जिंकुन घ्यावा अशी बादशाहाची इच्छा होती म्हणून त्याने असे ठरविले की , पावसाळा पुणे ऊर्फ मुहियावाद येथे घालवावा. पावसाळा संपल्यावर राजगडाकडे कूच करणे सुलभ होईल असा अंदाज होता. बादशहाने जिल्हज महिन्याच्या अठरा तारखेस (२४ एप्रिल १७०३) मुहियाबाद पुणे या स्थळाकडे कूच केले तो पुण्याला जिल्हज महिन्याच्या पंचवीस तारखेस (१ मे १७०३) पोहोचला.

बादशहा पुण्यात सहा महिने आणि अठरा दिवस होता. अवर्षणामुळे धान्याचा दुष्काळ पडला . अनेक गरीब लोक त्यामुळे मृत्युमुखी पडले. अनेक दुबळी माणसे शोक करू लागली. चणे, गहू आणि तांदूळ फार कष्टाने मिळत. बादशाही लष्करातील धान्याचा बाजार (शहागंज) तर गोर गरिबांच्या आक्रोशांनी भरून गेला होता. पण एक वेळ काळ आपला बेत बदलेल पण बादशहा आपल्या निर्धारापासुन हटणार नाहीत.

१० नोव्हेंबर १७०३ रोजी मोगल सैन्य राजगड जिंकून घेण्यासाठी पुण्यातून बाहेर पडले. राजगडच्या अलीकडे चार कोसांवर एक डोंगराचा घाट आहे हा डोंगर म्हणजे गगनचुंबी आहे. त्या घाटाचा रस्ता नीट करण्यासाठी माणसे दोन महिन्यांपासून खपत होती. पण जमिनीवरच्या माणसांची दृष्टी आकाशापर्यंत (डोंगराच्या टोकापर्यंत) कशी पोहोचावी आणि आकाशातील प्राण्यांचे हात जमिनीपर्यंत कसे पोहोचावे? या वाटेवर भयंकर चढउतार होते. तो मार्ग आक्रमण्यास मोगल सैन्याला अपार कष्ट पडले. सात दिवसांत सैन्याने तो घाट ओलांडला. आणखी एक मजल मारून रजब महिन्याच्या तीस तारखेस (२८ नोव्हेंबर १७०३ रोजी) ते सैन्य राजगडच्या पायथ्याशी असलेल्या अरुंद मैदानात पोहोचले.

२ डिसेंबर १७०३ रोजी बादशहाने आज्ञा केली की हमीदुद्दीनखान बहादुर याच्या नेतृत्वाखाली आणि तोफखाना प्रमुख मीर आतिष तरबियतखान याच्या मार्गदर्शनाखाली किल्ला जिंकून घेण्याचं ठरवलं. पदमावती माचीच्या बाजूने ते दोघे सेनापती पुढे सरकले. किल्ल्याच्या लहान दरवाजापासून डोंगराच्या टोकापर्यंत दोन मजबूत तट बांधले होते. त्यांचा आकार सोंडेसारखा असल्यामुळे त्यांना सोंड म्हणत . महाराजांनी याप्रमाणे त्या तटांची रचना केली होती. या तटांच्या खाली भयंकर दऱ्या आहेत. तेथून माणसे जाणे अशक्य आहे. ते दोन्ही तट जेथे एक होतात त्या स्थळाच्या समोर दोघा सेनापतींनी एका टेकडीवर युद्धास आवश्यक असणारे सामान चढविले.

१६ फेब्रुवारी १७०४ किल्लेदारांनी आपल्या हातानी मोगलांचा झेंडा किल्ल्यावर चढविला आणि ते अपयश पत्करून निघून गेले. मोगलांच्या छावणीत विजयाचे चौधडे झडू लागले. बख्शी रुहुल्लाखान आणि हमीदुद्दीनखान -बहादुर व इतर सरदार हे त्याच दिवशी किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत शिरले आणि किल्ल्यांच्या विजयाचा जयघोष आकाशात शिरला.

हमीदुद्दीनखान बहादुर यास यापूर्वी साडेतीन हजारी मनसबदार करण्यात आले होते, आता त्याला नौबतीचा मान देण्यात आला. किल्ला जिंकून घेतल्याबद्दल तरबियतखान यास पाचशेची बढती देण्यात येऊन साडेतीन हजारी मन्सबदार करण्यात आले हजारी मन्सबदार होता. रुहुल्लाखान हा साडेतीन हजारी मनसबदार होता त्याला एक मूल्यवान असा रत्नजडित शिरपेच देण्यात आला. मोगलानी राजगडकिल्ला जिंकून त्या किल्ल्याचे नाव नबीशाहगड हे ठेवण्यात आले.

संदर्भ –

  • मोगल मराठा संघर्ष
  • औरंगजेबाचा इतिहास

लेखन आणि संकलन – मयुर खोपेकर

Leave a comment