महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

नाणे दरवाजा | नाना दरवाजा | लहान दरवाजा

By Discover Maharashtra Views: 4135 5 Min Read

नाणे दरवाजा | नाना दरवाजा | लहान दरवाजा

किल्ले रायगडाच्या चित्त दरवाजा शेजारून १४५० पायऱ्यांचा रस्ता ऊजवीकडे ठेऊन जो डांबरी रस्ता रायगडवाडी या गावाकडे जातो. त्याच्या पहिल्या वळणावर झाडाझुडपातुन एक छोटीशी पाऊलवाट रायगडाच्या कुशीत शिरते.
हाच तो शिवकालीन राजदिंडीचा मार्ग.नाणे दरवाजा.

शिवराय तसेच अनेक मानकऱ्यांच्या पालख्या सर्वोत्कृष्ट अभियंते असलेल्या हिरोजी इंदलकर निर्मित याच नाणे दरवाजातून येत जात असत.

पूर्वी असे समजले जायचे की नाना दरवाजा हा नाना फडणीसांशी संबंधित आहे.
इस १७९६ मध्ये नानांनी रायगडाची डागडुजी केली अन त्यामुळे हे नाव प्रचलित झाले असावे असे लोकांना वाटायचे.
पण हा एक गैरसमज होता.
इस १६७४ च्या मे मध्ये शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी इंग्रज वकील हेन्री ओकझेंडन रायगडावर याच वाटेने आला होता.
त्यावेळी त्याने त्याच्या रोजनिशित रायगडाच्या दोन दरवाजांचा उल्लेख केला असून या दरवाजास त्यावेळी लहान दरवाजा असे म्हणत असे त्याने सूचित केले आहे.

भाषेसोबत शब्दांचे स्वरूप बदलते,
त्यास अनुसरून लहाना-नान्हा-नाना अशाप्रकारे या दरवाजाचे नाव बदलत गेले असावे.
किल्ल्याच्या मुख्य दरवाजास महादरवाजा असे नाव दिल्यावर दुसऱ्या दरवाजास लहान दरवाजा असे म्हटले जायचे.
अर्थात हा तर्क गॅझेटियरकारांचा आहे.
पेशवे दफ्तरातील अनेक कागदपत्रात नाणे दरवाजा हाच उल्लेख आल्याने हा तर्क सत्य मानता येत नाही.

नाणे दरवाजाची बांधणी गोमुखी पध्दतीची असुन ते शिवस्थापत्यशास्त्रातील­ वैशिष्ट्य आहे.
शिवरायांनी अनेक गडांवरील दरवाजांची रचना याच प्रकारे बांधली आहे.
“गोमुखी” म्हणजे गाईच्या तोंडासारखी पिशवी,
जिच्यात साधक जप करताना जपमाळ ठेऊन तिच्यात मणी जपतो. त्यामुळे साधकाची जपगणना इतरांस कळत नाही. तद्वत गोमुखी दरवाजांचे स्थान, रचना, अन त्यातील रक्षक संख्या बाह्यदर्शनी कोणास कळत नाही.
त्याच प्रकारे आपण जोपर्यंत दरवाजाच्या एकदम जवळ पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला नाणे दरवाजा दिसत नाही.

नाणे दरवाजाला दोन कमानी आहेत.
दोन कमानीतील अंतर हे दहा फूट असून कमानींची उंची ही अनुक्रमे १२ अन १४ फूट आहे.
कदाचित त्या दोन कमानीमधील रिक्त भाग घुमटाकार छताने झाकला असावा. मात्र पूढे काळाच्या ओघात ते छत कोसळले असावे.
या दोन कमानींच्या दरम्यान सतरा पायऱ्या आहेत.
दरवाजाच्या दर्शनी बाजूस एक बुरुज आहे तो जवळपास २० फूट उंच आहे.
संकटसमयी त्या बुरुजावरील, उजव्या तटबंदीतील अन द्वाराच्या चर्येतील मावळे तीर, बर्कँदाजाच्या गोळया, दगड, ऊकळते तेल, जळते निखारे, आगीचे पलिते अन लाकडी ओंडके फेकत . तेथील जंग्या, ऊजवीकडील कोंडमारा करणारा डोंगरकडा, नागमोडी वळण हेनीट निरखुन काळजात कोरुन घ्यावे असेच आहे.
अगदी काळजाला स्पर्श करणारे, काळजात साठवून ठेवावे असेच आहे.

दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी दोन खोल्या तयार केल्या आहेत. त्यास देवड्या असे म्हणतात.
त्यातील डाव्या देवडीत एक शेंदुर फासलेले उठावदार हनुमान शिल्प आहे. ते शिल्प जवळच्याच माती अन मलब्याने ओहरुन गेलेल्या पाण्याच्या टाक्याजवळील असावे.
दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी आहेत. पण इस १८८३ पासून दरवाजे नष्ट झाले आहेत.
नाणे दरवाजाला पूर्वी टोकदार खिळे असलेले महाद्वार होते. जेणेकरून हत्ती किंवा तत्सम प्राण्यांच्या ताकदीने त्या दरवाजावर शत्रूला मारा करता येणार नाही.

काळ बदलला.
काळाच्या ओघात शिवभक्त महादरवाजाच्या प्रेमात पडले.
या नाणे दरवाजापासून लोकांची नजर सुद्धा फिरली.
घनदाट झाडीत, किर्रर्रर्र कडेकपाऱ्यात, आजही तो शिवभक्तांच्या अन सह्याद्रीप्रेमींच्या वाटेची आस लावून बसलाय.
जणू शुन्यातून बघतोय ते सगळं वैभव जे शिवछत्रपतींच्या काळात त्याला लाभलं असेल.

म्हणत असेल तो स्वतःलाच,

‘मावळ्यांनो,

हिरोजीनी मायबाप छत्रपतींच्या मार्गदर्शनाखाली मला या दुर्गम मार्गावर पालख्यांचा पहारेकरी म्हणून घडवले.
माँसाहेब, शिवराय अन शंभूराजे यांच्या पालख्या कित्येक वेळा माझ्या तटा-बुरुजांनी पहिल्या आहेत.
त्या भोयांच्या पायाचा आवाज आजही या घनदाट जंगलात घुमतो, त्यांचे श्वास आजही येथे उर भरतात.
नशीबवान आहे मी,
की शत्रूने रायगड जिंकेपर्यंत कधीच कोणताही गनीम माझ्या तटा-बुरुजांना सरळ भिडला नाही. कारण माझ्या समोर येण्याची कोण्या गनिमाची छाती झालीच नाही.

मी आजही वाट बघतोय,
चुकून कधीतरी वाट वाकडी करून माझ्याकडे येणाऱ्या एखाद्या शिवभक्ताची. माझ्याकडे येऊन तो मारुतीपुढे नतमस्तक होतो. माझ्याशी बोलतो, माझ्यासोबत गुज घालतो, माझ्या अंगाखांद्यावर खेळतो, माझ्या धन्याबद्दल मला विचारतो, तेव्हा मी कृतकृत्य होतो.

नाहीतर एरवी मी असाच पहुडलेला असतो, माझ्या धन्याच्या पराक्रमाच्या गोष्टी या झाडांना सांगत, या जंगलातील झुडपांना, जंगली श्वापदांपुढे माझी कैफियत मांडत..
रायगडवाडीच्या भयाण जंगलात, त्या पवनपुत्र मारुतीची सोबत करत…

सुदैवाने माझ्या धन्याच्या कोण्या एका वंशजाने या श्रीमान रायगडाचे वैभव रायगडाला परत देण्याचं पुण्याचं कार्य हाती घेतलंय.
तेव्हापासून माझी पण पुनर्बांधणी सुरू झालीय. तेव्हापासून तरी काही शिवभक्त माझी भेट घ्यायला येत आहेत.
माझ्या दगडांना, तट-बुरुजांना नवीन जीवन लाभेल या कल्पनेने मी हुरळून गेलोय.
मानसिक सुख नका का नसेना,
पण माझी भौगोलिक रचना तर पूर्वीसारखी झालेली लोकांना बघायला मिळेल एवढंच समाधान.
ते पाहून तरी लोकांच्या डोळ्यांसमोर पालखीत बसलेला माझा धनी येईल अशीच अपेक्षा.

आपलाच श्रीमद रायगडाचा पहारेकरी,

नाणे दरवाजा.’

नाणेदरवाजा, रायगड
अथांग रायगडावर मगरीसारखा दबा धरून बसलेले प्रवेशद्वार जे प्रत्यक्षात त्याच्या जबड्यात गेल्याशिवाय दृष्टीस पडत नाही, गनिमास त्याच्या मगरमिठीतून निसटणे म्हणजे अशक्यच … छत्रपती श्री शिवाजीमहाराज यांच्या रायगडावरील आगमनावेळी नाणे दरवाजा कसा दिसत असेल याचे हे दृश्य.
Credit – Gajanan Patil

माहिती साभार – सोनू बालगुडे पाटील

Leave a comment