महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,83,311

पेडगावचा भुईकोट | धर्मवीरगड

By Discover Maharashtra Views: 1530 2 Min Read

पेडगावचा भुईकोट | धर्मवीरगड –

१६८९ मध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना संगमेश्वर येथे पकडल्यानंतर ज्या बहादुरगडावर नेऊन औरंगजेब समोर हजर करण्यात आले, तो म्हणजे दौंड जवळच्या पेडगाव येथील भीमा नदीच्या तीरावर वसलेला ‘पेडगावचा भुईकोट’. इ. स. सन १३व्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम झाल्याची माहिती येथील फलकावर देण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा वेरूळचे बाबाजीराजे भोसले हे दौंड जवळच्या देऊळगाव राजे येथे वास्तव्यास असताना त्यांच्याकडे हा भुईकोट मोकास (देखभालीसाठी) होता. १६७२-७३ च्या सुमारास औरंगजेबचा दूधभाऊ बहादुरखान कोकलताश याने या किल्ल्याची डागडुजी करून काही नवीन वास्तू उभारल्या व किल्ल्याला स्वतःचे नाव दिले.

फेब्रु १६८९ मध्ये, औरंगजेबच्या मागण्या नाकारल्यानंतर याच किल्ल्यात शंभूराजे व कवी कलश यांना कैदेत ठेऊन, अत्यंत क्रूरपणे छळ करत त्यांचे डोळे काढण्यात आले.. २००८ मध्ये युवकमित्र बंडातात्या कराडकर यांच्या पुढाकाराने या किल्ल्याचे ‘धर्मवीरगड’ असे नामांतर करण्यात आले. किल्ला ११० एकर मध्ये पसरलेला असून, काही ठिकाणी आपल्याला शाबूत असलेली तटबंदी पहायला मिळते.

किल्ल्यातील बहुतांश वास्तू उध्वस्त अवस्थेत आहेत. ‘शिवदुर्ग संवर्धन’ ही संस्था या किल्ल्यातील वास्तूंचे जतन व संवर्धनाचे कार्य खूप चांगल्या प्रकारे करत आहे. पडझड झालेला व एकेकाळी मातीच्या ढिगार्याखाली बुजलेला ‘हमामखाणा’ आज आपण आतमधून पाहू शकतो, ते या संस्थेच्या कार्यामुळे.

किल्ल्यामध्ये शौर्य स्तंभ, हमामखाणा, हत्ती मोट, राजदरबार, वेशी, तटबंदी तसेच पाच प्राचीन मंदिरे पहायला मिळतात. हा किल्ला भीमा नदीकाठी असल्याने, नदीचं पाणी गडामध्ये फिरवण्यासाठी वापरण्यात आलेल्या त्याकाळातील जलवाहिन्यांचे अवशेष आजही पहायला मिळतात. त्यावरून तेव्हाच्या अचूक जलव्यवस्थापनाचा अंदाज येतो.

प्राचीन मंदिरांपैकी लक्षमी-नारायण मंदिर सुस्थितीत आहे. या संपूर्ण मंदिरावर उत्कृष्ट शिल्पकला पहायला मिळते. बाहेरील भिंतींवर देव, देवी, विविध प्राणी, योगी, सुरसुंदरी, नर्तक-नर्तकी, यांच्या अत्यंत सुंदर व सुबक मुर्त्या पहायला मिळतात. मंदिराच्या आतील भिंती व स्तंभ देखील अतिउत्तम आणि सूक्ष्म नक्षीकाम दर्शवितात. मंदिरातील सभामंडपाला तीन प्रवेशद्वार असून येथील खांबांवर तसेच गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर असलेले कोरीवकाम केवळ अवर्णनीय. ते पहातच रहावे असे आहे. तेथून नजर हटत नाही..!

प्रत्येकाने एकदातरी अवश्य भेट द्यावी असे हे ठिकाण – ‘धर्मवीरगड’ !!

Ajinkya Thakare 

Leave a comment