राज्याभिषेक म्हणजे काय??

राज्याभिषेक म्हणजे काय ?

राज्याभिषेक म्हणजे काय??

राज्याभिषेक म्हणजे काय तर आपल्या रयतेला दिलेला ठाम विश्वास म्हणजे राज्याभिषेक.

आपला एक त्राता आहे, आपला एक रक्षणकर्ता आहे, आपलं एक तख्त आहे‘ याची गोरगरीब रयतेला चिरंजीव हमी देणारा तो सुवर्णक्षण म्हणजे राज्यभिषेक.

६ जून १६७४ रोजी झालेला तो शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे अखिल हिंदुस्थानच्या इतिहासातील सगळ्यात मोठा सोहळा.
इतिहासातील एक अजरामर असा दिवस.
परकीय सत्तांचे वरवंटे महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण हिंदुस्थानच्या छाताडावर थयथया नाचत असताना सतराव्या शतकात शिवनेरीवर जन्मलेला तो एक निखारा पुढील काही वर्षात विक्राळ रूप धारण करत जणू त्या परकीय यवनी सत्तांना त्याच्या अविरत तेजाने भस्मसात करतो अन कित्येक वर्षांचे असलेले गुलामगिरीचे जोखड भिरकावून देत अखिल मराठी मातीला जणू स्वाभिमानाचे, सार्वभौमत्व असलेले हक्काचे बत्तीस मण सुवर्ण सिंहासन उभे करत गोरगरीब रयतेला हक्काचे असे तख्त निर्माण करतो.
खरे तर ही घटना म्हणजे अवर्णनीय, अतुलनीय अशीच असावी.
ह्या घटनेची तुलना इतिहासातील किंवा वर्तनामनातील कोणत्याच घटनेशी होऊ शकत नाही ऐसी घटना होती ती.

शिवरायांच्या त्या राज्याभिषेकाच्या लक्षणीय घटनेमुळे परकीय सत्तेच्या दावणीला बांधली गेलेली ती मराठी अस्मिता जणू एकप्रकारे शहारली, थरारली, चवताळून उठली अन मावळ्यांमध्ये जागवल्या गेलेल्या याच अस्मितेच्या बळावर रायगडावर बत्तीस मणाचे सुवर्ण सिंहासन सिद्ध झाले. या या पृथ्वीवरून संपूर्ण म्लेंच्छांचा पाडाव करत अखिल हिंदूंसाठी त्यांच्या हक्काचे सार्वभौम सिंहासन उभे केले.

तस बघायला गेलं तर सतराव्या शतकात मोगल साम्राज्य म्हणजेच भारत सरकार असे समीकरण होते. अन तेच हिंदुस्थानी अन परकीय पण मान्य करत. यादवांच्या देवगिरीच्या साम्राज्यानंतर अखिल हिंदुस्थानात हिंदूंचे हक्काचे असे सिंहासन नव्हतेच. काबुल ते कंदहार पर्यंत पसरलेल्या बलाढ्य साम्राज्याचा सर्वेसर्वा तो कपटी औरंगजेब स्वतःला हिंदुस्थानचा बादशाह म्हणवून घेत असे. भारताच्या कानाकोपऱ्यात म्हणजे दक्षिणेतील केरळ अन युरोपियन लोकांच्या किनाऱ्यावर असलेल्या वसाहती सोडता अखिल हिंदुस्थानात स्वातंत्र्य म्हणता येईल असे एकही राज्य नव्हते.
काही राजपूत राज्ये व गोवळकोंडा अन विजापूर ही स्वतंत्र राज्ये होती पण ती मुघलांचीच मांडलिक म्हणून होती अन यवन होती.
राजपूत राज्ये खालावत चालली होती. जणू तेही मुघलांचे मांडलिकच होते. ना कोणता निर्णय घेण्याची मुभा ना स्वतः काही करण्याचं स्वातंत्र्य.
तसेच हिंदुस्थानातील अनेक हिंदू सरदार, उत्तरेतील राजपूत वगैरे त्यांचीच चाकरी करत त्यांच्याशी रोटी-बेटीचे व्यवहार करत सत्तेची तहान भागवण्यात मशगुल होते.

“पुरे हिंदोस्तान के आलमगिर होना चाहते है हम” अशी त्या औरंगजेबची इच्छा असताना त्याच्याच छाताडावर पाय रोवत महाराजांनी रायगडी बत्तीस मण सोनेरी सिंहासन साकारत त्याच्या कपटी महत्त्वकांक्षेला जबरदस्त हादरे दिले अन गोरगरीब रयतेचे पालनहार म्हणून शिवाजीराजे हे छत्रपती शिवाजी महाराज झाले.

राज्यभिषेक सोहळा कशासाठी??

खर तर शिवरायांनी १६७४ पर्यंत शत्रूंचे अनेक प्रदेश जिंकून घेतले होते. प्रजेसाठी त्यांचा अंमल होता. शत्रूवर वचक होती, सर्वजण सुखात नांदत होते, कायदा व सुव्यवस्था काटेकोरपणे पाळली जात होती, मग राज्यभिषेक करवून घेण्याची जरूर ती काय असावी??

आजवर स्वतःसाठी कोणतीच वैयक्तिक गोष्ट न करणाऱ्या माणसाला या राज्यभिषेकाची गरज ती का वाटली असावी?? ज्या माणसाने ना स्वतःसाठी कधी राजवाडा बांधला, ना कधी कोणती वास्तू उभी केली. मग राज्यभिषेक का??

ती एका व्यक्तीची महत्वकांक्षा होती का?? ती चंगळबाजी होती का?? तो पैशांची उधळपट्टी होती का??

तर नाही.

शिवरायांनी १६७४ पर्यंत स्वराज्याचा विस्तार खूप वाढवला होता तरीही तोपर्यंत शिवराय हे तांत्रिक दृष्ट्या मोगली मनसबदार होते. मोगलांची चाकरी बजावणारे मातब्बर मराठा सरदार तसेच विजापुरी बादशहा मोगलांना आदिलशहापेक्षा कमी लेखत. शिवरायांनी आपल्या कर्तबगारीने मनगटाच्या बळावर आपले जे स्थान निर्माण केले होते त्याला एक कायदेशीर स्वरूप देणे गरजेचे होते. राजेशाही स्थापन करण्याची जरूर होती. शिवरायांचा राज्यभिषेक झाला पाहिजे अशी सुप्त इच्छा प्रजेच्या सर्व वर्गात पसरली होती.

राज्यभिषेक एक कर्तव्य होतं. ती एक सार्वभौमत्वाची महापूजा होती. त्या सोहळ्याचा परिणाम वर्तमानातील अन भविष्यातील अनेक पिढ्यांवर होणार होता.
तो कोण्या एका व्यक्तीचा स्तुतीसोहळा नव्हता, ते होते सार्वभौमत्वाचे सामूहिक गौरवगाण.
या अगोदर असलेल्या सर्व हिंदू राज्यांच्या राजधान्यांवर स्वातंत्र्यासाठी प्रेरणा देणारी एक फुंकर या सोहळ्याने पडणार होती.
सिंधू नदीच्या उगमापासून ते कावेरी नदीच्या पैलतीरापावेतो म्हणजेच असेतु हिमाचल हा संपूर्ण देश स्वतंत्र, सार्वभौम अन बलशाली व्हावा हेच महाराजांनी बोलून दाखवले होते.

या सार्वजनिक भावनांना वाट करून देण्याचे काम थोर ब्राह्मण पंडित, वाराणशीचे विश्वेश्वर, वेदोनारायण गागाभट्ट यांनी केले.

या प्रसंगाबद्दल सभासद लिहतो-
“पुढे वेदमूर्ती गागाभट्ट म्हणून वाराणशीहुन राजियाची कीर्ती ऐकून दर्शनास एके. भट गोसावी यांच्या मते मुसलमान पातशहा तक्ती बसून छत्र धरून, पातशाही करितात, आणि शिवाजीराजे यांनीही चार पादशाही दबविल्या. आणि पाऊण लाख घोडा लष्कर असे असता त्यांस तख्त नाही. या करिता मऱ्हाठा राजा छत्रपती व्हावा असे चित्तांत आणिले. आणि ते राजीयांसही मानिले. अवघे मातब्बर लोक बोलावून आणून विचार करिता सर्वांचे मनास आलें तेव्हा भट गोसावी म्हणू लागले की तक्ती बसावें!”

तक्तासी हाचि गड करावा” असे म्हणत राजांनी संमती दर्शवली.

हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा।

आता शिवरायांचा राज्यभिषेक होणार ही बातमी वाऱ्यासारखी रयतेत पसरली. रयत आनंदाने बेभान झाली. सगळीकडे घरातील उत्सव असल्यासारखे वातावरण निर्माण झाले.
पण तत्कालीन काळात आतासारखी परिस्थिती नव्हती.
एखादा निर्णय व्हायच्या आधीच  मीडिया सगळ्या देशभरात त्याचा गाजावाजा करेल.
दुर्गम भागात असलेली रयत अजूनही या बातमी पासून बेमालूम होती.
याचवेळी घडलेली एक गंमत म्हणजे कॉस्म-दी-गार्द नावाचा एक पोर्तुगीज कोकणातून गोव्याकडे निघाला होता. त्याला प्रवासात राजांच्या राज्यभिषेकाची वार्ता समजली. तो विश्रांतीसाठी एका खेड्यात थांबला. खेड्यातील काही माणसांची गर्दी त्याच्या सभोवताली जमली. एक गोरा फिरंगी, वेगळा मनुष्य हेच त्यांचे कुतूहल असावे. तो गार्द मोडक्या-तोडक्या भाषेत त्या लोकांना म्हणाला की ‘तुमचा शिवाजीराजा सिंहासनावर बसणार आहे हे तुम्हाला माहिती आहे का?‘ त्या खेडुतांना ही बातमी प्रथमच समजत होती.
त्यांना त्या मोडक्या भाषेतील आपला राजा आता सिंहासनावर बसणार एवढं नक्कीच उमगलं. अन ती माणसं विलक्षण आनंदली. ही घटना म्हणजे मराठी मनाचा कानोसा घेणारी सुचकताच जणू. सर्वसामान्य गोरगरीब लोकांना सुद्धा राज्यभिषेकाचा तो आनंद जाणवला होता. यालाच आपण शिवरायांनी जागृत केलेला स्वाभिमान अन राष्ट्रभक्ती म्हणू शकतो.

राज्यभिषेकाचा मुहूर्त ठरला…
शालिवाहन शके १५९६, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, आनंदनाम संवत्सर म्हणजेच ६ जून १६७४ रोजी महाराज सिंहासनावर बसणार होते.

राज्यभिषेकाची तारीख ६ जूनच का??

शिवरायांचा राज्यभिषेक होणार ही खबर अखंड हिंदोस्तानात वाऱ्यासारखी पसरली.
आता ती औरंगजेब अन बाकीच्या शत्रुलाही मिळाली असणारच. त्यामुळे औरंगजेब राज्याभिषेक सोहळ्यात आडकाठी घालण्याचा नक्की प्रयत्न करणार हे महाराजांना ठाऊक होते.
६ जून ही तारीख निवडण्याचं कारण म्हणजे ७ जूनला आपल्याकडे मृग नक्षत्र चालू होतं.
रायगडावर रवरवत्या पावसाच्या सरी अशा कोसळतात की राज्यभिषेक रोखायला आलेला शत्रू गडाच्या जवळ येईल खरा पण परत काय जाईल…
सह्याद्रीच्या त्या दुर्गम घाटवाटा अन पावसाळ्यातील ते निसरडे रस्ते व डोंगरदऱ्या लांघणे म्हणजे शत्रूसाठी केवळ अशक्य गोष्ट.
त्यामुळे आपल्या रयतेला काही त्रास होऊ नये अन रयत आनंदाने या सोहळ्यात सहभागी व्हावी व शत्रूला सुद्धा या सोहळ्यात कोणते विघ्न आणता येऊ नये म्हणून जाणीवपूर्वक निवडलेली ती तारीख होती.

राज्यभिषेक सोहळ्याची तयारी..

राज्यभिषेक सोहळ्याची तयारी जवळपास वर्षभर आधीपासूनच सुरू झाली होती.
त्याच काळात निश्चलपुरी गोसावी म्हणून एक अध्यात्मयोगी सत्पुरुष रायगडी आले.
राज्यभिषेक सोहळ्याची तयारी अन त्यांच्या रायगडी असलेल्या काळात घडलेल्या घटना त्यांनी ‘राज्याभिषेक कल्पतरू’ या ग्रंथात लिहून ठेवल्या आहेत.

पावसाळा तोंडावर आलेला अन रायगड सजू लागला होता.
पाचाडच्या वाड्यात गर्दी वाढू लागली.
शिवराज्याभिषेक सोहळ्याची तयारी अगदी नियोजनबद्ध रीतीने सुरू होती.

राज्याभिषेक कशा पद्धतीने करायचा याबाबत राजसंस्कार सांगणारा एक संस्कृत ग्रंथ वेदोभास्कर गागाभट्ट यांनी लिहला होता तो म्हणजे ‘राजभिषेक प्रयोग‘. त्या ग्रंथात कोणता विधी कधी व कसा करायचा याबद्दलचा सगळा तपशील दिला आहे.

शिवरायांनी तख्तासाठी लागणारे बत्तीस मण सुवर्ण सिंहासन तयार करण्याचे काम पोलादपूरच्या रामजी दत्तो चित्रे या अत्यंत विश्वासू जामदाराकडे १६७३-१६७४ च्या दरम्यान सोपवले होते. जामदार म्हणजे सोने चांदी अन जडजवाहीर सांभाळणारा अधिकारी. त्या सिंहासनावर अत्यंत मौल्यवान अन अगणित नवरत्ने जडवून अनेक सांस्कृतिक शुभचिन्हे कोरायची होती.

६ मार्च १६७४ रोजी शिवराय चिपळूण येथे असलेल्या स्वराज्याच्या छावणीला भेट देऊन परत रायगडावर आले. दरम्यानच्या काळात हंबीरराव मोहिते याना हंबीरी देऊन रिक्त असलेले सरसेनापती हे पद त्यांना बहाल करण्यात आले.

१८ मार्च १६७४ रोजी शिवरायांच्या धर्मपत्नी काशीबाईसाहेब यांना स्वर्गवास झाला.

१९ मे १६७४ रोजी शिवरायांनी प्रतापगडाला भेट देऊन कुलस्वामिनी आई भवानीचे दर्शन घेतले. त्यावेळी राजांनी देवीला सोन्याचे छत्र अर्पण केले. त्या छत्राचे वजन ३ मण एवढे होते अन त्याची किंमत त्याकाळात ५६ हजार रुपये एवढी होती.

शिवाजी महाराज हे क्षत्रिय होते. दरम्यानच्या काळातील राजकीय घालमेलीमुळे क्षत्रियांनी पाळायचे संस्कार लुप्त झाले होते, त्यामुळे प्रथम उपनयनाचा संस्कार करण्याची आवश्यकता होती. भोसले हे सिसोदिया वंशातील क्षत्रिय आहेत हे सिद्ध केले.

मग ज्येष्ठ शु. चतुर्थीला, घाटी ५, आनंदनाम संवत्सर शके १५९६ म्हणजे २९ मे १६७४ रोजी राजांची समंत्रक मुंज झाली. त्यावेळी राजांचे वय होते ४४ वर्ष. त्यानंतर पुण्याहवाचन, होम हवन इत्यादी विधी झाले.

२९ मे रोजी प्रथम एक उंबराचे लाकूड कोरून, त्यात तूप घालून त्यायोगे त्यांचा पुनर्जन्मसंस्कार करण्यात आला अन त्यांना समारंभपूर्वक क्षत्रिय करण्यात आले.

त्यानंतर ३० मे रोजी ज्येष्ठ शु ६, शनिवारी महाराजांचा आपल्या पत्नी सोयराबाई यांच्याशी दुसऱ्यांदा विवाह समारंभ करण्यात आला.

त्यानंतर महाराजांचे सोन्या-नाण्याने तुलादान झाले. त्यावेळी राजांचे वजन १६००० होन झाले अन रक्कम ६० हजार पागोडा इतकी भरली. त्यात एक लक्ष होनांची भर घालून ते राज्यभिषेकादिवशी जमणा-या ब्राह्मणांना दान करावयाचे त्यांनी ठरवले.
हे सर्व विधी २९ अन ३० मे यादिवशी झाले.

त्यानंतर ३१ मे, ज्येष्ठ शु. सप्तमी, रविवारी महाराजांनी इंद्रियांच्या शांतीसाठी यज्ञ केला. त्या यज्ञासाठी उपस्थित ब्राह्मणांना सुवर्ण होन दक्षिणा म्हणून देण्यात आले.

१ जून, ज्येष्ठ शु. अष्टमी, म्हणजेच सोमवारी इंद्रिय शांतीच्या विधीचा राहिलेला भाग पूर्ण करण्यात आला.

२ जून, ज्येष्ठ शु. नवमी रोजी मंगळवारी कोणताच धार्मिक विधी किंवा पूजा केली नाही.

३ जून, ज्येष्ठ शुद्ध दशमी, बुधवारी इंद्रिय शांतीच्या विधीचे उत्तरपूजन करण्यात आले.

४ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध एकादशी चा पवित्र दिवस.
या दिवशी निऋतियाग: हा एक वेगळ्या प्रकारचा विधी करण्यात आला.

दिवस उजाडला होता ५ जून १६७४.

रायगड तर जणू हर्षाने उल्हसित झाला होता.
नगारखाना सजला होता, मनोरे फुलांनी सजले होते.
पाहुण्यालोकांसाठी राहुट्या, मंडप सजलेले.
नौबती झडत होत्या. गंगासागर तुडुंब भरलेला होता, कुशावर्तात सुद्धा भरपूर पाणी होते.
नगारखान्याचा तो भव्य असा दरवाजा अंबारीतून भगवा ध्वज असलेला हत्ती सहज आत जाऊ शकेल असा तो दरवाजा. भगवा डौलाने फडकत होता. रायगडाचा प्रत्येक चिरा अन बुरुज जणू आनंदाने नाचत होता. त्या सुवर्ण सोहळ्यासाठी आतुर झाला होता. महादरवाजपाशी मावळे उभे होते.
रायगड सगळे बघत होता, डोळे भरून, कडा न कडा, दगड, माती, झाडेझुडपे, हरखून गेली होती.
सगळ्यांच्या मनात स्वातंत्र्याचे हुंकार उठत होते. नगारखाना तर जणू स्वतःलाच विसरला असेल.
जणू राजांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला,
माझा धनी येणार, माझा राजा येणार.
ते बत्तीस मण मराठी दौलतीचे सोनेरी सिंहासन आपल्या धन्याच्या स्पर्शासाठी व्याकुळ झाले होते.राज्याभिषेक म्हणजे काय

त्यावेळी हेन्री ओक्सेंडन नावाचा इंग्रज वकील रायगडावर हजर होता.
त्यादिवशी निराजीपंतांनी त्याला सांगितले की उद्या सिंहासनारोहण होईल अन दरबार भरेल. त्यावेळी शिवाजी राजांना मुजरा करण्यास व नजराणा अर्पण करण्यास तुला जावयाला हवे.

अन ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा तो सुवर्णदिन उजाडला.
त्यावेळी रायगडावर काय लगबग असेल ती शब्दांत मांडताच येत नाही.

या सुवर्णक्षणाचे वर्णन करताना सभासद लिहतो-
तक्त सुवर्णाचे बत्तीस मणाचे सिद्ध करविले. नवरत्ने अमोलिक रत्ने तक्तास जडाव केली. सप्त महानदियाची उदके व थोर थोर नदीयांची उदके व समुद्राची तीर्थक्षेत्र नामांकित, तेथील तिर्थोदकें आणिली. सुवर्णाचे कलश अन तांबे केले. आठ कलश अन आठ तांबे यांनी अष्टप्रधानांनी राजियास अभिषेक करावा असा निश्चय करून सुदिन पाहून मुहूर्त पाहिला…
सिंहासनावर बसले. सिंहसनास अष्ट खांब जडीत केले. त्या पद्धतीप्रमाणे शास्त्रोक्त सर्वाही साहित्य सिद्ध केले. संपूर्ण खर्चाची संख्या एक क्रोड बेचाळीस लक्ष होन जालें. अष्टप्रधानास लक्ष लक्ष होन बक्षीस दर आसामीस त्याखेरीज एक हत्ती, एक घोडा, वस्त्रे, अलंकार असे देणे दिले. येणेप्रमाणे सिंहासनारूढ जालें. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.राज्याभिषेक म्हणजे काय

राज्यभिषेक सोहळ्याचे विधी ५ जून १६७४ रोजी म्हणजेच आदल्या रात्रीच सुरू झाले होते. ते विधी ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच ६ जून १६७४ च्या सकाळपर्यंत चालू होते.
आदल्या दिवशी म्हणजे ५ जूनला विविध कलशात सप्त नद्या अन सागरातून आणलेल्या पवित्र जलाची पूजा करण्यात आली. अन त्यानंतर बालेकिल्ल्याशेजारी असलेल्या तलावात त्यातील पाणी टाकण्यात आले त्यामुळे त्या तलावाला गंगासागर हे नाव प्राप्त झाले.
रात्री अग्निदेवतेची पूजा झाल्यानंतर राजांना दुसऱ्या खोलीत नेण्यात आले व तिथे त्यांना पवित्र जलाने स्नान घालण्यात आले. त्यानंतर त्यांना चंदनाची भुकटी अन सुगंधी तेलाने अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर महाराजांनी सफेद वस्त्रे परिधान केली व त्यांना पुन्हा एकदा पंचामृताने अभिषेक घालण्यात आला.
अन त्यानंतर पुन्हा चंदन मिश्रित कोमट पाण्याने अभिषेक करण्यात आला.
पंचामृताने तीनवेळा अभिषेक करण्यात आला.
त्यानंतर महाराज आपली वस्त्रे परिधान करून दरबारात आले.

त्याप्रमाणे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा दिवस उजाडता शनिवारी  ३ घटका रात्र उरली असता भल्या पहाटे हा राज्यभिषेकाचा पवित्र विधी सुरू झाला.

मुस्लिम कालगणनेनुसार १० रबीलवल, खमस सबैन आलफ हा दिवस होता.

त्यांच्या मस्तकावर छत्र धरण्यात आले. राजांनी उंची वस्त्रे व अलंकार धारण केले होते. कुलपुरोहित बाळभट्ट यांनी त्याप्रसंगी राजांकडून महत्वाची धार्मिक कृत्ये करवून घेतली. सभोवताली अष्टप्रधान यांनी आपापल्या चिन्हानी व्यक्त होऊन ते देखील आसनावर विराजमान झाले. आसमंतभागी कोशशालांचे अधिकारी व सेनाधिकारी वगैरे नियुक्त स्थळी उभे जाहले.

महाराज सिंहासनाला वाकून नमस्कार करून सिंहसनाकडे जाणाऱ्या पहिल्या पायरीवर पाय ठेवणार त्याच वेळी त्यांना त्यांच्या सोबत्यांची आठवण झाली.

पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यावर राजांचे हृदय हेलावले, राजांच्या डोळ्यात अश्रू भरून आले आणि चटकन आठवण आली “राजं उभा जलम शिवा काशीद म्हणून जगलो, पर मरताना शिवाजी राजा म्हणून मरील, यापेक्षा दुसरं भाग्य काय असणार तव्हा माज्यासाठी”. राजांच्या डाव्या डोळ्यातून अश्रू गळाले.

राजांनी दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला आणि आठवण आली ” राजे तुम्ही सुखरूप विशाळगडावर जावा आणि तिथं पोहचताच तोफांचे बार काढा. जोपर्यंत हे पाच तोफांची सलामी ऐकत नाही न राजे तोपर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे देह ठेवणार नाही राजे.” राजांच्या उजव्या डोळ्यातून अश्रू गळाला…

तिसऱ्या पायरीवर पाऊल ठेवल्याबरोबर आठवण आली “राजे आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या रायबाच. जगून वाचून माघारी आलोना राजे तर लेकराच लग्न करीन नाहीतर माय बाप समजून तुम्हीच लग्न लावून टाका.” राजे ढसाढसा रडू लागले.

राजांना जणू आपल्या धारातीर्थी पडलेल्या एकेका मावळ्यांच्या बलिदानाची आठवण त्यावेळी झाली.

राज्याभिषेक म्हणजे काय

अन सिंहसनाजवळ जाऊन सिंहासनाला पदस्पर्श न करता
महाराज सिंहासनावर विराजमान झाले.
महाराज सिंहासनावर विराजमान झाले.
महाराज सिंहासनावर विराजमान झाले.

तारीख ६ जून ला पहाटे ५ च्या सुमारास शिवराय सिंहासनावर आरूढ झाले. तेव्हा जमलेल्या सर्व लोकांनी त्यांना शिवराय हे नामाभिधान दिले.
त्यानंतर स्वराज्याचे पेशवे मोरोपंत यांनी राजांना मुजरा करून आठ हजार होन राजांच्या शिरावर ओतले. निळो पंत यांनी सात हजार होन अन आणखी दोघा पंतांनी पाच-पाच हजार होनांनी राजांना सुवर्णस्नान करवले. राहिलेल्या प्रधानांनी राजांना मुजरे केले व सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना रांगा करून ते उभे राहिले. राज्यरोहण व सुवर्णस्नानापूर्वी ५ जूनच्या उत्तररात्री गंगोदकाने स्नान करून राजांनी प्रत्येक ब्राह्मणाला १०० होन एवढी दक्षिणा दिली. याप्रसंगी दक्षिणेच्या रुपात शिवरायांनी दोन लक्ष होन वाटले.

सभासद म्हणतो-

पूर्वी जसे कर्तायुगात, त्रेतायुगात अन द्वापारी राजे झाले तसेच कलियुगात पुण्यश्लोक शिवाजीराजे सिंहासनावर बसले. म्हणजे त्या प्रसंगाची तुलना सभासद जणू पौराणिक काळातील प्रभू श्रीराम अन भगवान गोपाळ कृष्णाच्या काळातील त्या घटनांशी करतो.
यावरून हा प्रसंग किती मोठा अन महत्वाचा असेल हे आपल्या लक्षात येते.

छत्रपती शिवाजी महाराज की जय अन हर हर महादेव या गर्जनांनी गडाचा परिसर दुमदुमून गेला.
सगळीकडे आनंदीआनंद होता, मावळे हर्षात नाचत होते.

अष्टप्रधानांनी आठ तांबे अन कलश घेऊन राजांवर अभिषेक केला. त्या मंत्र्यांचा तपशील अन पदे अशी होती..

मोरोपंत त्र्यंबक पिंगळे–  पेशवे , मुख्य प्रधान, पंतप्रधान.
रामचंद्र बावडेकर(नारो नीळकंठ)– मुजुमदार, पंत अमात्य.
अण्णाजी दत्तो प्रभुनिकर– सुरनीस, पंत सचिव.
दत्ताजीपंत त्रिंबक वाकनीस– वाकनीस, मंत्री.
हंबीरराव मोहिते- सरनोबत, सेनापती.
जनार्दनपंत हणमंते(त्रिंबकजी सोनदेव)– डबीर, सुमंत.
निराजी रावजी- न्यायाधीश, न्यायाधीश.
रघुनाथपंत(रायाजीराव)- न्यायशास्त्री, पंडितराव.

राज्याभिषेक

ब्रिटिश वकील हेन्री ओक्सेंडन याने त्यावेळी केलेले वर्णन सुद्धा तितकेच रोचक आहे.

हेन्री लिहतो-

“मी ६ जूनला सकाळी ७-८ वाजता दरबारात गेलो.
राजा एका भव्य सिंहासनावर बसला होता. उत्तमोत्तम वस्त्रालंकार परिधान केलेले सरदार त्याच्यासमोर उभे होते. राजाचा मुलगा संभाजीराजा, पेशवा मोरोपंडित अन मोठा प्रतिष्ठित असा ब्राह्मण सिंहासनाच्या पायथ्याशी बैठकीवर बसले होते. इतर मंडळी अन सैन्याधिकारी मोठ्या आदराने उभे होते. मी काही अंतरावरून मुजरा केला. शिवाजी राजाला देण्यासाठी आम्ही हिऱ्याची अंगठी आणलेली. ती नारायण शेणवी याने वर धरली.
सिंहासनाच्या दोन्ही बाजूला, सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकार-निदर्शक व राजसत्तेची द्योतक चिन्हे मी पाहिली. उजव्या हाताला दोन मोठी, मोठ्या दाताच्या मत्स्याची सुवर्णाची शिरे होती.डाव्या हातास अनेक अश्वपुच्छे व एका मूल्यवान भाल्याच्या टोकावर, समपातळीत लोम्बणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती.
राजवाड्याच्या प्रवेशद्वारी आम्ही परत आलो, तो दोन लहान हत्ती दरवाजाच्या दोन्ही बाजूला झुलत होते.दोन देखणे(पांढरे) अश्व शृंगारलेल्या स्थितीत तेथे आणलेले दिसले.
गडाचा मार्ग इतका बिकट की हे प्राणी वर कोठून आणले असावेत याचा तर्कच आम्हास करवेना.”

राजाभिषेकानंतर महाराज सिंहासनावरून उतरले आणि हत्तीवरील अंबारीत बसले. राजांची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. तिथून महाराज रयतेस दर्शन देण्यासाठी बाहेर पडले आजूबाजूला सेनापती, अंगरक्षक होते. एका अंबारीत जरी पताका आणि दुसऱ्या अंबारीत भगवा ध्वज घेऊन त्या महाराजांच्या बाजूने निघाले. लोकांची घरे जणू दिवाळीचा सण असल्यासारखी सजवली होती. महाराजांना तिथे उपस्थित असलेल्या सुवासिनींनी ओवाळले आणि पुष्पवृष्टी झाली, दुर्वा, कुरमुरेंचा, लाह्या इत्यादींचा वर्षाव केला आणि रायगडावरील जगदीश्वराच्या मंदिराचे दर्शन घेतले.

राज्याभिषेक

शिवराय नुसते छत्रपती नाही झाले तर त्यांनी त्यावेळी अनेक नवीन पद्धती अंमलात आणल्या.
त्यांनी कागदोपत्री शिवराजभिषेक शक सुरू केले, महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा मराठी राजभाषा कोष सुरू केला, टांकसाळ सुरू करून स्वतःची नाणी चलनात आणली होन अन शिवराई ही नाणी पाडली.
एका नव्या युगाची जणू सुरुवात त्यादिवशी झाली होती.

त्या दिवशी महाराज छत्रपती झाले अन पोरक्या रयतेला त्यांचा वाली मिळाला. या अभागी धरणीला तिचा पती मिळाला. या हिंदवी स्वराज्याला त्याचा अभिषिक्त राजा मिळाला. काय दिवस असेल तो.
शिवराय छत्रपती होताच रायगडावर तोफेचे बार काढण्यात आले, शिंग वाजल गेलं.
त्यावेळी फक्त रायगडावरच तोफा डागल्या नाहीत तर एकाच वेळी स्वराज्यातील प्रत्येक गडावर तोफा डागल्या गेल्या.
आणि जणू त्या तोफांच्या कडकडाटाच्या आवाजाने औरंगजेबाचे कान बधिर झाले असतील, त्याच्या जुलमी महत्त्वाकांक्षेला असंख्य हादरे देणारा असा तो क्षण होता.
काय वाटलं असेल त्यावेळी जिजाऊ मासाहेबांना…
लहानपणी आपल्या मावळातील सवंगड्यांना सोबतीला मातीचे किल्ले बनवून मी रयतेचा राजा आहे असे सांगत स्वराज्याचा खेळ खेळणारा तो बाळ शिवाजी आज छत्रपती झाला.
जणू त्या राजांना म्हटल्या असतील की “माझ्या बाळाने माझं वचन पूर्ण केलं, माझा शिवबा राजा झाला.” अस म्हणत डोळ्यातून आनंदाची आसव ढाळू लागल्या.

अन शिवराय छत्रपती झाले ही खबर जेव्हा औरंगजेबाला समजली तेव्हा तोही उद्गारला-

‘या खुदा, अब तो हद हो गयी।
तू भी उस सिवा के साथ हो गया।
सिवा छत्रपती हो गया।’

ही घटना म्हणजे अखिल भारत वर्षाला चिरंतन काळासाठी प्रेरणा देणाऱ्या एका सोनेरी पर्वाची ती एक नांदी होती, जी सर्वसामान्य रयतेच्या मनामध्ये चिरंतन काळासाठी कोरली गेली.राज्याभिषेक म्हणजे काय तर आपल्या रयतेला दिलेला ठाम विश्वास म्हणजे राज्याभिषेक.

या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही……

संदर्भ-
१. सभासद बखर
२. रायगडाची जीवनकथा
३. शिवचरित्र-सेतू माधवराव पगडी
४. शिवचरित्र-बाबासाहेब पुरंदरे
५. जदुनाथ सरकार- Shivaji and His Time
६. शिवराजभिषेक प्रयोग

©️®️-सोनू बालगुडे पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here