महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 84,49,532

राजमाचीचा उदयसागर

By Discover Maharashtra Views: 1312 5 Min Read

राजमाचीचा उदयसागर –

राजस्थानच्या उदयपूरमध्ये मेवाडचे राणा उदयसिंह द्वितीय यांनी इ.स. १५६५ मध्ये बांधवलेला भलामोठा उदयसागर तलाव प्रसिद्ध आहे. आपल्या राजमाचीवरही उदयसागर नावाचा तितका नाही, पण गिरीदुर्गांवरील तलावांच्या मानाने विस्तीर्ण असा बांधीव तलाव आहे. माचीवरच्या उढेवाडीच्या पलिकडे राईच्या जरा खाली हा तलाव आणि त्याशेजारी महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. तलावात सर्वकाळ पाण्याचा साठा असतो. मंदिराच्या मागून येणारा झरा मंदिराच्या गर्भगृहाखालून वाहून गोमुखाद्वारे कुंडात पडतो व पुढे जमिनीखालून या तलावाला जाऊन मिळतो. सध्याच्या काळात गावकऱ्यांनी तलावाला तारेचे कंपाउंड घालून तलावातले पाणी पंपाच्या साहाय्याने वर गावात नेले आहे.(राजमाचीचा उदयसागर)

तलावाच्या पूर्वेकडील भिंतीत सुरुवातीलाच एक सुवाच्य, सुस्थितीत असलेला शिलालेख आहे. शिलालेख अत्यंत सुबक कोरलेला आहे. सहज वाचता येतो. मजकुराभोवती सुबक बॉर्डर कोरली आहे, पहिले अक्षर ‘।।श्री।।’ च्या दोन्ही बाजूस सुंदर फुले कोरलेली आहेत. शिलालेखाच्या दगडावरच्या दगडावर थोडेसे नक्षीकाम केलेले असून तो थोडा पुढे बसवलेला आहे त्यामुळे शिलालेखाचा दगड लांबून लक्षात येतो आणि शिलालेखाचेही ऊनपावसापासून काहीसे रक्षण होते. मात्र सुवाच्य असला तरी हा शिलालेख वाचने म्हणजे तितकेही सोपे नाही. कारण शिलालेख वाचायचा असला तर भिंतीवरून वाकून किंवा थेट पाण्यात जाऊनच वाचावे लागते. शिलालेख असा :

🌼।। श्री ।।🌼
।। श्रीशके १७१२ साधार ।।
।। णनाम संवस्तरे ।। वि ।।
।। द्यमान रामराव नारा ।।
।। यण देशमुख मामले ।।
।। दंडाराजपुरि ।। श्रु भं ।।

या शिलालेखावरून हा तलाव रामराव नारायण देशमुख, मामले दंडाराजपुरी यांनी शके १७१२ मध्ये बांधला असे म्हटले जाते. पण माझ्यामते, हा तलाव त्यापूर्वीही असावा. कारण माचीवर याखेरीज दुसरा मोठा पाण्याचा साठा नाही आणि शिलालेखातही तलाव नवीन बांधल्याचा उल्लेख नाही. रामराव देशमुखाने शके १७१२ म्हणजेच इ.स. १७९० च्या दरम्यान तलाव मोठा वगैरे करून बांध घालून त्यावर हा शिलालेख बसवला असावा.

शिलालेखातल्या या रामराव नारायण देशमुखाविषयी गावकऱ्यांकडून आख्यायिका ऐकायला मिळते. रामराव देशमुख हा कोकणातील सरदार होता. तो राजमाचीला आला. युद्धात त्याचे दोन्ही हात कापले गेले. म्हणून त्याला राजमाचीचे दोन्ही बालेकिल्ले व उढेवाडी गाव वतन म्हणून दिले गेले. मात्र या रामरावासंबंधीचा खरा इतिहास वेगळा आहे. हा इतिहास जाणून घेण्यात मला लोणावळ्याच्या दिपक पटेकर यांची मदत झाली. राजमाचीचे देशमुख मूळचे कोकणातलेच – दंडाराजपुरीचे. पेशव्यांचे ते नातलग. पेशवे म्हणजेच भट घराण्याची ही थोरली पाती. (पेशव्यांचे भटशिवाय देशमुख हेही आडनाव आहे.) इ.स. १७१३ मध्ये शाहू महाराजांनी राजमाची किल्ला कान्होजी आंग्रेंच्या अधीन केला. (आंग्रेंकडे किल्ला असताना त्यांच्या हुकूमानुसार रामराव देशमुखाने हा तलाव बांधला असाही अंदाज काही जण करतात. पण तसे नाही.) पुढे सन १७३० मध्ये आंग्र्यांनी राजमाची थोरल्या बाजीरावांकडे सुपूर्द केला. तेव्हा पेशव्यांनी आपल्या नात्यातील या देशमुख घराण्याला राजमाचीची सबनिशी दिली. म्हणजे शिलालेखातील हा रामराव देशमुख राजमाचीवर सबनीस पदावर होता. त्याच्यापुर्वी त्याचे वडील नारो त्र्यंबक देशमुख व त्याच्यानंतर त्याचा मुलगाही राजमाचीवर सबनीस होते. ह्यांचे वंशज आज राजमाचीकर हे आडनाव लावतात.

शिलालेखाच्या आकर्षणाने तलाव जेव्हा पाहिला, तेव्हा त्याचे ‘उदयसागर’ नाव बघून हे नाव ऐतिहासिक नाहीं हे लगेच जाणवले. आणि तसेच आहे. या तलावाला विशिष्ट असे ऐतिहासिक नाव नाही. उदयसागर हे नाव शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी दिलेले आहे. उढेवाडीचा संस्कृत अपभ्रंश म्हणून उदयसागर. गावकऱ्यांनी तेच नाव ठेवलं.

गोनीदांसारखाच बाबासाहेबांचाही राजमाचीवर फार जीव. उढेवाडीकरही या दोघांना फार मानतात. काही दशकांपूर्वीची गोष्ट. हा तलाव गाळाने गच्च भरला होता. तो उपसून काढून स्वच्छ करायची गरज होती. यासाठी मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता होती. तेंव्हा बाबासाहेब पुरंदऱ्यांनी गावकऱ्यांस धान्य व रोजंदारी पुरवून त्यांना तयार केले. त्यांनी आणि गोनीदांनी कित्येकदा राजमाचीच्या वाऱ्या केल्या. उन्हाळ्यात गावकऱ्यांना घेऊन तलाव स्वच्छ करायला प्रारंभ केला. किल्ला बघायला येणारे काही पर्यटकही कामास भिडायचे. गो.नी.दाण्डेकरांनीही तेव्हा पाट्या वाहिल्या. प्रचंड चिखल साचला होता. तो उपसून मोकळा केला. त्याचं खत एका चोंढ्यांत घालून तिथे भाजीपाला केला. असं खूप काम केलं. २००९ साली गोनीदा दुर्गप्रेमी मंडळाच्या वतीने राजमाचीवर पहिलं दुर्गसाहित्य संमेलन भरलं. संमेलनाचे अध्यक्ष होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. त्या सुमारासही बाबासाहेबांनी धान्य वगैरे देऊन राजमाचीकरांकडून तलावातून गाळ, चिखल वगैरे काढवून तलाव स्वच्छ करवून घेतला. वयाच्या नव्वदीतही बाबासाहेबांना राजमाचीची काळजी. दोन बालेकिल्ल्यांमधील भैरोबाच्या देवळात एका स्थानिक आजोबांनी मला ही माहिती दिली. त्यावेळेस त्यांनी गोनीदांचेही स्मरण केले.

असा हा तलाव. खूप सुंदर आहे. तलावाशेजारी जमिनीत अर्धा गाडला गेलेला चुन्याचा घाणा आहे. तलावात जीवसृष्टीदेखील आहे. त्यामुळे कोणी कचरा करू नये. तलावाच्या पलीकडच्या काठावरून नितळ पाण्यात श्रीवर्धन बालेकिल्ल्याचे प्रतिबिंब पडलेले दिसते. हे खूप सुंदर दृश्य आहे. तलावाचे पाणी असे नितळ ठेवण्यात कित्येक जणांनी घाम गाळले आहेंत हे वर दिलेले आहे. याची जाण ठेऊनच इथे भटकावे.

– प्रणव कुलकर्णी.

Leave a comment