रायगडावरील शरभ शिल्प

रायगडावरील शरभ शिल्प

रायगडावरील शरभ शिल्प –

किल्ले रायगडाने कित्येक राजवटी याची देही याची डोळा पाहिल्या न्हवे तर अनुभविल्या आहेत. या गडाची सर्वगुण संप्पन्नता ही केवळ इतिहास काळातच न्हवे तर सद्य शतकातील इतिहास अभ्यासकांस मेजवानी ठरते. गडावरील बांधकाम, गडावरील भुगोल, गडाचा इतिहास, ऐतिहासिक महत्त्व, जलसाठे, हिंदवी स्वराज्याच्या अस्मितेचे ठीकाण म्हणून या गडाचा अभ्यास अजुनही अपुराच भासतो. गडावरील इतर कलाकुसर पहाता लक्षणीय आहे. तसेच गडावरील सर्वच शिल्पकले पैकी वेशेष लक्ष वेधक ठरते ते रायगडावरील शरभ शिल्प.

रायगडावरील शरभ शिल्प आभ्यासण्याआधी शरभ शिल्पाबद्दल सर्वसाधारण माहिती जाणुया. गड, मंदिरे, विहिरी, वाडे इत्यादी जुन्या इमारतींच्या भिंतीवर आढळणारे व्याघ्रसदृश काल्पनिक प्राण्याचे शिल्प म्हणजे शरभ . या शरभ प्राण्याबद्दल हिंदुधर्म ग्रंथात काही कथा वाचनास मिळतात. भगवान शिवशंकराने धारण केलेले काल्पनिक पशुचे रुप म्हणजे शरभ. हिरण्यकश्यपु चे विदारण केल्यावर नरसिंह उतला मातला. त्यापासुन मुक्ती मिळवण्यासाठी लोकांनी भगवान शंकराची उपासना केली. आखेर नरसिंहाचा धारण अवतार संपविण्यासाठी शंकराने प्राणी, पक्षी व मानव यांचे एकत्रित आसे अधिक शक्तिशाली रुप धारण केले तेच हे शरभ रुप. डॉ. ग. ह. खरे आपल्या मुर्तिविज्ञान या ग्रंथात देखील ही माहिती देतात. ते सांगतात शंकराने दोन तोंडे, आठ पाय, दोन पंख, लांब शेपुट आसलेल्या शरभाचे रुप धारण केले व नरसिंह अवतार संपविला. नंतर त्याचे कातडे आंगावर पांघरुन , डोके मस्तकावर धारण केले. अशा प्रकारच्या प्राण्याची शिल्पे महाराष्ट्रात आढळत नसली तरीही महाराष्ट्रात कित्येक ऐतिहासिक ठीकाणी चार पाय, तीक्ष्ण नख्या आसणारा, लांब शेपटीचा, पंख आसलेला कींवा नसलेला अक्राळ विक्राळ प्राणी शिल्प कृतीत आढळतो म्हणजे तो शरभ असावा. सत्य परिस्थिती पहाता हत्ती किंवा सिंह यांपेक्षा शक्तिशाली, पंख आसणारा आसा कोणताही प्राणी अस्तित्वात आसल्याचे उल्लेख नाहीत. हा केवळ काल्पनिक प्राणी आहे. मात्र महाकवी कालीदासाच्या ‘मेघदुत’ या महाकाव्यात शरभाचा उल्लेख आहे.

हिंदु धर्म शास्रातील १०८ उपनिषदांपैकी ‘शरभोपनिषद’ हे देखील एक उपनिषद आहे. म्हणजेच हिंदुधर्म शास्त्रात शरभ संकल्पना अस्तित्वात आहे. मात्र त्याच बरोबर कित्येक परकिय तसेच परधर्मीय ऐतिहासिक स्थळांवर शरभाकृती पहायला मिळतात. हत्ती हे अतिशय बुद्धिमान व सामर्थ्यशाली प्राणी म्हणून ओळखले जातात. याच हत्ती प्रमाणे सामर्थ्यवान व हुशार शत्रूला पराजीत करण्याची ताकद बाळगणारे राज्यकर्ते स्वतःला शरभ (अती शक्तिशाली) दर्शवत, स्वताचे व राज्याचा शक्तिचे प्रदर्शन करण्याचे शरभ शिल्प हे एक उत्तम साधन समजत असावे. म्हणुनच शरभ शिल्प गड, किल्ले, मंदिरे तसेच इतर पुरातन वास्तूंच्या दर्शनी भागावर लावले जात असावे.

आपल्या सभोवतालच्या किल्ले रायगड बरोबर मुरुड मधिल जंजिरा किल्याच्या प्रवेश द्वारावर, हरिश्चंद्र गडाच्या वाटेवर तोलार खिंडत, राजगड, अवचितगड, पनवेल जवळील कर्नाळा कील्ला, सुधागड, तळगड, शिवजन्म भुमी शिवनेरी अशा कित्येक ठीकाणी हे शिल्प पहावयास मिळते.

इतिहास अभ्यासक श्री. महेश तेंडुलकर सर आपल्या गड मंदिरावरील द्वारशिल्पं या पुस्तकात, त्यांच्या अभ्यासण्यातले शरभाचे तब्बल २९ प्रकार सांगतात. हे प्रकार शिल्पाच्या विशेष ठेवणी वरुन केले आहे. जसे पंख आसणारा किंवा पंख नसणारा, जित कींवा जेता शरभ, गजभक्षक कींवा गजसह, खड्गधारी कींवा बाल शरभासहीत केवल शरभ आशाप्रकारे ते वर्गीकरण पहावयास मिळते.
किल्ले रायगड निहाळत असताना, गडाच्या भिंतीवर विराजमान झालेली शरभ शिल्प लक्ष वेधुन घेतात. रायगडावर एक दोन न्हवे तर तब्बल सात शरभ शिल्प पहावयास मिळतात. रायगडाच्या अतिभव्य महाद्वारात उभे राहिले असता आपल्या उजव्या व डाव्या दोन्हीही अंगाला दोन शरभ शिल्प सुस्थितीत पहावयास मिळतात.

१) आपल्या उजव्या हाताला महादरवाजावर आसलेेल्या शरभ शिल्पामद्धे, शरभ आपल्या उजव्या पायाने हत्तीला दाबत आहे. हा गजजेता शरभ प्रकारातील शिल्प आहे. या शिल्पातील शरभाचे निट अवलोकन केल्यास शरभास शिंगे आहेत आसे जाणवते. (शिंगे आसलेला शरभ माझ्या निदर्शनास पहिल्यांदा आला आहे) काहिंच्या मते ते शरभाचे कान आहेत मात्र त्या शरभार कान व शिंगे हे निरनिराळे अवयव स्पष्ट नजरेस पडतात.(चित्र १)

रायगडावरील शरभ शिल्प

२) आपल्या डाव्या हाताला महादरवाजा वर आसलेल्या शरभ शिल्पात शरभ एका हत्ति सोबत उभा आहे. हत्ती नक्षिदार चौथऱ्यावर उभा आहे. हा गजसहित शरभ प्रकारातील शिल्प आहे. (चित्र २)

रायगडावरील शरभ शिल्प

३) रायगड चढुन वर गेल्यावर नगारखान्याच्या समोर उभे राहुन वर नजर टाकली तर लक्षात येते की, नगारखान्याच्या समोरील दर्शनी भागावर दोन शरभ शिल्प आहेत. दोन्हीही शरभांचे निट अवलोकन केले तर लक्षात येईल शरभांच्या अंगावर अलंकार व नक्षिकाम पहायला मिळते. ह्या शरभ शिल्पकाराने ह्या शरभाच्या माध्यमातून राज्याच्या सामर्थ्यासोबत राज्यातील ऐश्वर्य व संप्पन्नता दाखविण्याचा प्रयत्न केला असावा. आपल्या उजव्या हाताला वर पाहिले आसता जो शरभ दिसतो. त्या अतिशक्तिशाली शरभाने आपल्या चारही पायात एक एक व शेपटीवर एक आसे एकुण पाच हत्ती रोखुन धरले आहेत. हा शरभ पंचगज विजयी शरभ प्रकारातील आहे.(चित्र ३)

रायगडावरील शरभ शिल्प

४) आपल्या डाव्या हाताला वर पाहिले आसता जो शरभ दिसतो या शरभाने आपल्या पुढच्या उजव्या पायात एक व शेपटी वर एक आसे एकुण दोन हत्ती पकडले आहेत. हा शरभ द्विगज विजयी शरभ प्रकारातील आहे.(चित्र ४)

रायगडावरील शरभ शिल्प

५) नगारखान्याखालुन राज सिंहासनाकडे चालत जाताना, नगारखान्याकडे वळुन पाहिले.(सिंहासन चौथर्याकडे पाठमोरे उभे राहुन) आणखी दोन भग्न अवस्थेत शरभ शिल्प नजरेस पडतात. हे दोन्हीही शरभ शिल्प एकसारखेच दिसतात. या शरभांनी आपल्या पुढच्या उजव्या पायाखाली गंडभेरुंड दाबले आसुन गंडभैरुडाच्या पायांत दोन हत्ती आहेत. (गंडभेरुंड – एक धड, दोन डोकी, दोन पंख आसणारा प्रसंगी पक्षी कींवा अर्धमानव देहधारी पौराणिक पक्षी म्हणजे गंडभेरुंड होय. (चित्र ७)

रायगडावरील शरभ शिल्प

६) गंडभेरुंडाचे प्राचिनत्व ४००० वर्ष पुर्विपासुन आढळते. हिंदु धर्म ग्रंथातही याचे उल्लेख अढळुन येतात. एकंदरीत द्वीमुखी गरुड समजुया. ) हे गंडभेरुंड सहजासहजी नजरेत येत नाहीत. बारकाईने निरीक्षण करावे लागते. या शरभाने या व्यतिरिक्त एक हत्ती आपल्या शेपटीवर उचलुन धरला आहे. तीन हत्ती व एक गंडभैरुड यांना थोपवणारा म्हणजेच हा त्रिगज तथा गंडभेरुंड विजयी शरभ प्रकारातील आहे. (चित्र ५)

रायगडावरील शरभ शिल्प

कुणा एका उपद्रवीचे हात या शरभ शिल्पांना लागुन काळाचा घण या शिल्पांवर चालविला गेला. त्यामुळे या शिल्पांची आशी दुरावस्था झाली आसावी. या शिल्पांतील शरभांची डोकी फोडण्यात आली आहेत. नगारखान्याच्या आतील व बाहेरील शरभ व रायगडाच्या महाद्वारावरील शरभ पहाता, महाद्वारावरील शरभांची शारीरिक ठेवण, कलाकृती व नगारखान्यावरील शरभांची बनावट भिन्न आहे. त्यामुळे या दोन्हीही ठीकाणचे शरभ शिल्प निरनिराळ्या कालखंडात बनविले गेले असावेत.

७) रायगड भ्रमंती ही आजकाल इतिहास जिज्ञासे पोटी, शिवचरण स्पर्श पुण्यप्राप्ती करीता, छायाचित्रीकरण अशा निरनिराळ्या अनुशंघाने केली जाते. त्यापैकीच राजसिंहासनापासुन ते जगदिश्वर मंदिरा समोरील शिवसमाधी पर्यंत रायगड भ्रमंती म्हणजे संपुर्ण रायगड न्हवे. रायगडावरील कित्येक खळगे, ठिकाणे, ऐतिहासिक पुरावे त्यांमागे लपलेला इतिहास शोधण्यासाठी आपली वाट पहात आसावेत. हुजुर बाजाराकडुन जाऊन जगदिश्वर मंदिराला वळसा घालुन भवानी कड्याकडे जाताना. आपल्या डाव्या हाताला जगदिश्वर मंदिराची भिंत निट निहाळली तर आणखी एक शरभ शिल्प नजरेत भरते. रायगड भ्रमंती सिंहासना पासुन ते शिवसमाधी पर्यंत समजली जात असल्यामुळे या आडवाटेला कोणी शक्यतो जात नाही व गेल्यास शोधक नजरेने पहात नाहीत. त्यामुळेच हे शिल्प दुर्लक्षित राहिले असावे.

जगदिश्वर मंदिराच्या भिंतीवरील शरभ शिल्प पहाता हे शरभ शिल्प कुणा दुसऱ्या ठीकाणावरुन येथे आणुन लावले आसल्यासारखे वाटते. जगदिश्वर मंदिराबाहेरील धर्मशाळेच्या ओवऱ्यांच्या मागे हे शिल्प आहे. रायगड बांधणी, तेथील रचना, कलाकुसर सर्व पहाता रायगडाचे बांधकाम अती रेखीव व कुशलतेने केले आहे हे लक्षात येते. मात्र हे शरभ शिल्प समोर उभे राहुन पाहिले तर थोडेसे तिरके म्हणजे ९० अंशाचा कोन सोडुन लावले आहे. ( कदाचित मंदिराच्या कींवा ओवऱ्यांच्या डागडुजीच्या वेळी कींवा घाईगडबडीत) ज्या वास्तू कलाकाराने हा रायगड बनविला त्याला हे शिल्प लावताना काटकोन साधता आला नसेल का ? त्यामुळेच हे शिल्प नंतर कधीतरी लावले असावे आसे वाटते. शरभ शिल्प हे शक्यतो प्रमुख दर्शनी भागात लावले जाते. मग हे शिल्प येथे आडवाटेला कसे आले हे ऐक गुढ आहे. हे शरभ शिल्प पाहिता विशेष आशी कोणतेही गुण हा शरभात दाखविले नसुन हा शरभ केवळ उभा आहे. याला पंख नाहीत मात्र हा झेप घेण्याच्या तैयारीत भासतो. म्हणुनच पंखविहीन केवल शरभ या प्रकारातील हे शरभ शिल्प आहे. (चित्र ६)

आशाप्रकारे महादरवाजा वरील दोन (गजजेता शरभ व गजसहित शरभ ), नगारखान्याच्या समोरील दोन ( पंचगज विजयी शरभ व द्विगज विजयी शरभ), नगारखान्यावर शिव सिंहासना समोरील सारखेच बनावटीचे दोन त्रिगज तथा गंडभैरुड विजयी शरभ अशाप्रकारे सहा व जगदिश्वर मंदिराच्या भिंती बाजुचे सातवे पंखविहीन केवल शरभ आसे एकूणच सात शरभ शिल्प रायगडावर पहायला मिळतात. किल्ले रायगड वरील ही शिल्पसंपदा अभ्यासुन आपल्या नजरेच्या कोनात साठविण्यासाठी शिवतीर्थ बा-रायगडास भेट देऊया.

आपलाच,
अनिकेत अशोक पाटील
मुरुड जंजिरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here