मल्हारगड | Malhargad Fort Pune

मल्हारगड | Malhargad Fort Pune

मल्हारगड | Malhargad Fort Pune –

गड, किल्ले, दुर्ग यांच्या निर्मितीला सुरुवात होऊन शेकडो वर्ष लोटली. या इतक्या वर्षात कित्येक दुर्ग निर्माण झाले तर कित्येक नामशेष झाले असतील. पहिला दुर्ग कोणी व केव्हा निर्माण केला हे काळाच्या ओघात कळण्यास मार्ग नाही. पण मल्हारगड हा शेवटचा किल्ला पेशव्यांनी निर्माण करून घेतला हे इतिहासात नमूद आहे. याच मल्हारगडाची(Malhargad Fort) ही सैर…

मल्हारगडाच्या निर्मितीनंतर मात्र आपल्या महाराष्ट्रातील दुर्गनिर्मिती पूर्णपणे थांबली. कारण गड, किल्ल्यांचे राज्य जाऊन जमिनीवरील राज्यं अस्तित्वात आली. इंग्रजांनी तर महाराष्ट्रातील सारेच गड, किल्ले उद्ध्वस्त करून होत्याचं नव्हतं केले. काहीतर नामशेषच झाले. पण जे काही गड, किल्ले आज अस्तित्वात आहेत त्यात महाराष्ट्रातील शेवटचा निर्मित झालेला किल्ला मल्हारगड उर्फ सोनेरीचा किल्ला पाहण्याजोगा आहे.

मल्हारगड तसा छोटेखानी गड आहे. एका दिवसात पाहून होण्याजोगा आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या रविवारी मी, नयन शिंदे, मनोज सातपुते, व आमचे दुर्गप्रेमी ७० वर्षाचे मित्र दिनानाथ कोलवणकारकाका, असे आम्ही चारजण मल्हारगड पाहण्यास निघालो. दादरहून पहाटेच्या इंद्रायणी एक्स्प्रेसने सकाळी सव्वा नऊ वाजता आम्ही पुण्याला पोहोचलो. पुण्याहून सिटी बसने स्वारगेटला आलो. पुन्हा स्वारगेट ते सासवड असा बस प्रवास करून सासवडला आलो. सासवडहून टमटम रिक्षा पकडून काळेवाडीला येऊन पोहचलो. तेव्हा दुपारचे बारा वाजायला आले होते. काळेवाडीपासून मल्हारगड हे अंतर ३ कि.मी एवढे आहे. गडाकडे जाणारी वाट छोटी, पण पक्की डांबरी सडकेची आहे. या मार्गाच्या दोन्ही हाताला सर्वत्र टॉमेटोचे मळेच्या मळे पाहण्यास मिळाले. लालभडक टॉमेटो पाहून मनाचा मोह आवरणे कठीण गेले. दोन्ही हातांनी पिकलेले टॉमेटो मनमुराद तोडून मजेत खात खात मार्गक्रमण करत होतो. दुरूनच मल्हारगडाचे दर्शन होऊ लागले होते. रस्ता तसा निर्मनुष्य होता. दूपर्यंत पसरलेले ते हिरवे हिरवे मळे पाहत पाऊण तासाची पायपीट करत एकदाचे आम्ही मल्हारगडाच्या पायथ्याशी येऊन पोहचलो.

गडावर थेट जण्यासाठी गाडी वाहनांसाठी कच्ची सडक केलेली आहे, पण आम्ही गडाच्या नसर्गिक वाटेनेच गडाकडे निघालो. गड तसा जास्त उंच नव्हता, नजरेच्या टप्प्यातच होता. कडाक्याच्या थंडीचे दिवस असुनही अंगातून घामाच्या धारा निघू लागल्या होत्या. सूर्यनारायण माथ्यावर ताळपत होते. उन चांगलेच तापलेले होते. गडपण तापला होता. १५ ते २० मिनिटांतच आम्ही गडावर येऊन पोहोचलो. गडाच्या तटबंदीच्या सावलीत थोडा विश्राम करून थोडी न्याहारी करून गड पाहण्यास निघालो. उजव्या हाताला असणारा बुरूज आम्हाला वर येण्यास खुणावत होता. या बुरुजाच्या डाव्या हाताची तटबंदी साफ कोसळून पडली होती. याच वाटेने आम्ही गड प्रवेश केला. गड चढण्यास अतिशय सोपा आहे. गड तसा छोटा असून त्रिकोणी आकाराचा आहे, पण छोटा असुनही गडाला बालेकिल्ला आहे.

प्रथम आम्ही तटबंदी पाहण्यास निघालो. तटबंदीला अनेक ठिकाणी जवळजवळ अंतरावर जंग्या निर्माण केलेल्या आहेत. गडाच्या पश्चिम दिशेला एक चोरदरवाजा पाहण्यास मिळतो. गडाचं खरं वैभव म्हणजे हे भव्यदिव्य दरवाजे होय आणि ते सर्व आजही शाबूत आहेत. येथे तटबंदीची उंची १४ ते १५ फूट आहे. संपूर्ण किल्ला पाऊण कि.मी.च्या घे-यात बसवलेला आहे. या गडाचा मुख्य दरवाजा भव्य आहे. हा दरवाजा पश्चिम दिशेस कड्याच्या टोकावर आहे. चोरदरवाजा व महा दरवाजा समांतर दिशेस समांतर तटबंदीवर आहे. या उत्तर दिशेच्या टोकावरील दरवाज्याच्या वरचा बुरूज मात्र भव्य व देखणा आहे. बुरुजाच्या पोटात आतल्या बाजूला आकर्षक देवड्या पाहण्यास मिळतात. या बुरुजाच्या समोरच किल्ल्यामध्ये वाड्याचा उद्ध्वस्त चौथरा जोता पाहण्यास मिळतो. शेजारीच गोलाकार आकाराची सुंदर चिरेबंदी विहीर पाहण्यास मिळते. या गडावर अशा दोन विहिरी आहेत, पण विहिरीत टिपभरपण पाणी नव्हतं. आज या गडावर पाण्याची व्यवस्था नाही. ठिकठिकाणी तटबंदी ढासळलेली आहे. बुरुजपण ढासळू पाहत आहेत. गड फारच छोटा असल्यामुळे तटबंदी फेरी आटोपून आम्ही बालेकिल्ल्यात प्रवेश केला. बालेकिल्ल्यालाही भव्य दरवाजा आहे. हा दगडी कमानीचा दरवाजा ओलांडून आम्ही आत प्रवेश केला.

या गडावर चांगल्या अवस्थेतील असणा-या वास्तू म्हणजे गडावरची दोन मंदिरं. मंदिरं छोटी आहेत, पण सुबक आहेत. एक मंदिर महादेवाचे व दुसरे मल्हारी मरतडाचे आहे. खंडोबा देवाच्या नावावरूनच या गडाला मल्हारगड हे नाव पडले आहे. महादेव मंदिरातील शिवलिंग सुबक व देखणे आहे. मंदिराच्या समोरच कोण्या वीराची समाधी आहे. खंडोबाच्या मंदिरात खंडोबाची अश्वारूढ असणारी मूर्ती आहे. सोबत म्हाळसाबाई व इतर मूर्ती पाहण्यास मिळतात. बालेकिल्ल्यातही वाड्यांचे बरेच जोते पाहण्यास मिळतात. बालेकिल्ल्यालाही ७ ते ८ फुट उंचीची तटबंदी आहे. जवळच पाण्याचा छोटा तलाव आहे. पण पाण्याअभावी तो ही सुकून गेलेला आहे. तसा गड फारच छोटा असल्यामुळे पाहण्यास जास्त वेळ लागत नाही. शिवप्रेमी व गडप्रेमी तसेच हौशी गिर्यारोहकांनी हा गड एकवेळ येऊन पाहायलाच हवा. दुपारचे दोन वाजले होते. गड उतरण्याआधी थोडावेळ वा-यावर सावलीत बसून सभोवतालचे सुंदर निसर्गदर्शन बघण्यात आम्ही गुंग झालो.

मल्हारगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची ११०० मीटर आहे. जवळचं ठिकाण सोनेरी गाव. दिवेगाव किंवा काळेवाडीहून ३ कि.मी. अंतरावर हा गड वसलेला आहे. पुण्याच्या दक्षिणेस पूर्व- पश्चिम अशी एक डोंगर रांग पसरलेली आहे. या रांगेला भुलेश्वर डोंगर रांग असंही म्हणतात. पुण्याहून सासवडकडे जातांना दिवे घाटावर नजर ठेवण्यासाठी घाटाच्या पूर्वेस हा किल्ला १७५७ ते १७६० या काळात माधवराव कृष्णा पानसे व भिमराव यशवंत पानसे यांनी बांधला. सरदार पानसे हे पेशवाईत तोफखान्याचे प्रमुख होते. त्यांचं कायम वस्तीस्थान दिवे घाटातील प्राचीन सोनपूरी उर्फ सोनेरी या गावात होते. आजही सोनेरी गावात सरदार पानसेंचा सहा बुरूज असलेला बळकट तटबंदीचा भक्कम गढीसारखा त्यांचा राहता वाडा पाहण्यास मिळतो. हा गढीजोगा वाडा म्हणजे छोटा भुईकोट किल्लाच आहे. मल्हार गडाशिवाय सोनेरी गावास शोभा नाही व सोनेरी गावाशिवाय मल्हारगड अपूरा आहे. मल्हारगडावर पेशव्यांचा तोफा बनवण्याचा कारखाना होता पण आजघडीला या गडावर एकही तोफ पाहण्यास मिळत नाही.

पेशवाईच्या अस्तानंतर स्वातंत्र्य सेनानी उमाजी नाईक यांनी इंग्रजांविरूद्ध बंड पुकारून काहीकाळ या गडावर वास्तव्य केलं होतं. त्यांच्याचप्रमाणे आद्य क्रातिकारी वासुदेव बळवंत फडके यांनीही इंग्रजांविरूद्ध बंड पुकारून या गडावर आसरा घेतला होता, पण फंदफितूरीच्या शापामुळे इंग्रजांनी अचानक मल्हारगडावर हल्ला करून वासुदेव बळवंत फडक्यांचे अनेक साथीदार ठार केले. त्यावेळी फडके निसटण्यात यशस्वी झाले. याव्यतिरिक्त या गडावर लढाई अशी झालीच नाही. कारण हा गड लढण्यासाठी व संरक्षणासाठी बांधलेला नसून टेहळणीसाठी व तोफांचा कारखाना काढण्यासाठी या गडाची निर्मिती केलेली होती. तर मित्रांनो, मल्हारगडासोबत सोनेरी गाव पाहण्यास विसरू नका.

शब्दांकन :
श्री दयानंद म. पिंगळे

धन्यवाद.
इतिहासाचे साक्षीदार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here