श्री हरिहर मंदिर, शेगाव, बुलढाणा

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 64
2 Min Read

श्री हरिहर मंदिर, शेगाव, बुलढाणा

श्री गजानन महाराज मंदिर संस्थान मुळे आज शेगाव प्रसिद्ध आहे. या शेगावची ओळख आधी शिवगाव म्हणून होती ती येथील शिव मंदिरा मुळे. याच मंदिरामुळे गावाचे शिवगाव असे नाव पडले होते. नंतर ते शेगाव झाले. या मंदिराला हरिहर मंदिर म्हणून ओळखले जाते. हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शिव. हे मंदिर खूप पुरातन होते. मंदिराच्या जुन्या फोटो आणि बांधकाम शैलीवरून हे मंदिर अंदाजे बाराव्या शतकातील असावे. या मंदिराचा आधीच तीन वेगवेगळ्या काळात जिर्णोध्दार झाला आहे, त्यामुळे मंदिराचे बांधकाम शैलीत फरक जाणवतो. नंतर शेगाव संस्थानने जुन्या शिवालयाचा जिर्णोध्दार करून त्या ठिकाणी उत्कृष्ठ कलाकुसरीचे संगमरवरी मंदिर बांधून श्री विष्णुमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. हे ठिकाण हरिहर मंदिर म्हणुन नावारूपास आले आहे.

गजानन महाराजांनी काही काळ महादेवाच्या मंदिरात वास्तव्य केले होते. येथील वास्तव्यात श्रींनी सुकलालची द्वाड गाय तसेच गोविंदबुवांच्या उनाड घोड्याला शांत केले. येथेच श्रींनी बंकटलालाला माळणीच्या घरातून झुणका भाकर आणायला सांगितली होती, तसेच पितांबराला नाल्यातून तुंबा भरून पाणी आणायला सांगितले होते. याच शिवमंदिराच्या सभामंडपात झालेल्या एका कीर्तन प्रसंगी गोविंदबुवा टाकळीकर यांना ‘श्री गजानन महाराज‘ यांनी हरदासाच्या किर्तनाचा उत्तरार्ध सांगितला, तो ऐकून गोविंदबुवांनी महाराजांची महती शेगांवकरांना ऐकवली. असे उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथात केलेले आहे.

मंदिर खूप सुंदर आहे. शांत व स्वच्छ परिसरामुळे मनाला प्रसन्नता जाणवते. गजानन महाराज मंदिराला भेट देत असाल तर थोड्याच अंतरावर असलेल्या या शिव मंदिराला पण अवश्य भेट द्यावी.

Vidarbha Darshan 

Written By: Vidarbha Darshan

Leave a Comment