श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव

By Discover Maharashtra Views: 1295 11 Min Read

श्री संत गजानन महाराज संस्थान, शेगाव –

श्री गजानन महाराजांचे वास्तव्याने परम पावन झालेले श्री क्षेत्र शेगाव! रोज हजारो भक्त भारतातील कानाकोपऱ्यातून या क्षेत्री येतात व परम पावन समाधीचे दर्शन घेतात व सिद्ध स्थानी येऊन या अवलिया संताचरणी नतमस्तक होतात.

आपले अवतार कार्य पूर्ण होत आले आहे हे साधारणपणे १९०८ मध्ये श्री गजानन महाराजांना जाणवले. योगायोग असा की त्याच सुमारास श्रींचे भक्त श्री भास्कर पाटील ह्यांनी शेगाव मध्ये महाराजांचे भव्य मंदिर स्थापन करावे अशी ईच्छा महाराजांच्या अपरोक्ष त्यांच्या इतर भक्तगणांकडे व्यक्त केली आणि सर्वांनी ही विनंती मान्य केली. पण त्या वेळेस शेगावांतील पाटील आणि देशमुख घराण्यात दुफळी माजली होती. महाराजांचा जुना मठ माळी समाजातील माणसांच्या मालकीचा होता आणि माळी समाज देशमुखांच्या बाजुला होता. मात्र गावात पाटील घराण्याचे वर्चस्व होते. महाराजांना ही दुफळी पसंत नव्हती. म्हणून त्या दोघांपैकी कुणाचीच जागा मंदिर बांधन्यासाठी महाराजांनी स्विकारली नाही. त्यांना कुणाच्या मालकीची जागा नको होती. कालांतराने महाराजांनी “मी येथे राहिन” असे सांगून ज्या जागेचा निर्देश केला त्या ठिकाणी श्रींच्या मंदिराचे काम सुरु करायचे असे ठरले. ती जागा सरकारची असल्याने महाराजांच्या संकेतानुसार परमभक्त हरी कुकाजी पाटील ह्यांनी जागेच्या मागणीचा अर्ज सरकार दफ्तरी दाखल केला. बुलढाणा जिल्ह्याचे तत्कालीन सर्वाधिकारी (Deputy Commissioner) करी साहेब ह्यांनी नगर परिषदेच्या १९०१ ठरावानूसार एक एकर जागा मंदिरासाठी मंजुर केली. शिवाय एका वर्षात ही दिलेली जागा व्यवस्थितपणे विकसित केल्यास अजून एक एकर जागा देऊन तुमचा हेतू पुरविला जाईल, असा शेरा करी साहेबांनी मारला.

श्री क्षेत्र शेगाव मंदिर :

जागा मिळाल्यावर मंदिराचे बांधकाम करणे आवश्यक होते. श्रींचे भक्त हरी पाटील व बंकटलाल एकटयाने हे काम पूर्ण करु शकले असते. पण महाराजांना हे काम सर्व भक्तांद्वारे करवून घ्यायचे होते. म्हणून महाराजांच्या निर्देशानुसार १२ सप्टेंबर १९०९ रोजी शेगाव येथील नारायण कडताजी पाटील, ह्यांच्या अडत दुकानावर श्रींचे भक्त, गांवकरी व व्यापारी ह्यांची एक सभा बोलावली. त्यात प्रत्येक कापसाच्या गाडीवर ६ पै आणि बोऱ्यावर ३ पै धर्मादाय निधी आकारायचे ठरले. अशाप्रकारे बांधकामाची सोय झाली. श्रींनी निर्देश केलेल्या जागी हरी पाटलांनी एक शीला ठेवली आणि त्याच्या आजुबाजुला मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली. ही जागा शेगावातील सर्वे नं. ७०० (४३/४५/२) येथील जमीनीच्या मध्यभागी होती. मूळ मंदिराचे बांधकाम दगड, चुना आणि रेतीचे आहे.

भुयार :

आज मुख्य मंदिराच्या तळघरात जिथे हरि पाटलांनी शीला ठेवली होती तिथे श्री गजानन महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे. ह्या जागेला भुयार म्हणतात. भुयारात प्रवेश केल्यावर श्रींचे दर्शन घडते. भुयारात आतल्या बाजुनी आता संगमरवराच्या लादया बसविण्यात आल्या आहेत.

मंदिराचा बाहेरचा भाग :

१९०९ साली मंदिराच्या बांधकामाची सुरुवात झाली. काळया दगडांनी बांधलेल्या या मंदिराची लांबी ४८ फुट व रुंदी ४२ फुट असून शिखराचा भाग ५१ फूट उंच आहे. मंदिराच्या पूर्वीच्या दगडी भिंतीवर पौराणिक काळातील व्यक्तिरेखा कोरल्या होत्या. समाघी शताब्दी सोहळयाचे औचित्य साधून हा फोडलेला भाग आणि दगडी शिखराचा भाग २००९ मध्ये उतरवीण्यात आला आहे. उतरविलेल्या भिंती आणि शिखराची पूनर्रचना संकल्पानुसार अडगांवच्या मंदिराच्या जिर्णोध्दारासाठी करण्यात येणार आहे.

राम मंदिर :

श्रींचे दर्शन घेऊन भक्त भूयारातून तळमजल्यावर राम मंदिरात प्रवेश करतात. अशी रचना करण्या मागे एक विशिष्ट हेतू आहे. संताकडे गेल्यावर संत भक्तांना देवापर्यन्त पहोचण्याचा मार्ग दाखवितात. म्हणून महाराजांचे दर्शन घेऊन भूयारातून बाहेर पडल्यावर भक्त रामाच्या दर्शनासाठी जातात. याच राम मंदिरात महाराजांचे पालखीत ठेवन्यात येणारे चांदीचे दोन मुखवटे आहेत.

सभामंडप :

राम आणि हनुमान मंदिराला जोडणाऱ्या सभामंडपातील आतल्या भागात महिरपीच्या (कमान) वरच्या भागात महाराजांच्या पोथीतील विविध लीला चित्रबद्ध केल्या आहेत. या सभामंडपात सर्वत्र रेखीव कमानी आहेत. पूर्वीच्या दगडाच्या बांधकामावर रंग चढविल्याने त्या अधिक आकर्षक दिसतात.

समाधीग्रहण स्थळ व शयनगृह :

मुख्य मंदिराच्या आग्नेयेस महाराजांनी जेथे दिनांक ८ सप्टेंबर १९१० रोजी समाधी घेतली तेथे आज संगमरवरी पादुका आहेत. त्यापाठी विठ्ठलरुक्मिणीचे मंदिर असून त्या जागेला समाधीस्थळ म्हणतात. त्याला लागूनच महाराजांचे शयनगृह आहे. श्रींच्या वापरातील पलंग येथे ठेवला असून त्यावर त्यावर दोन बाजूला लोड आहे आणि मध्यभागी श्रींचा फोटो आहे. समाधीग्रहण स्थळाच्या डाव्या बाजूला श्रींनी त्या काळी प्रज्वलीत केलेली धूनी आजही धगधगत असून शेजारीच श्रींनी वापरलेले चिमटे येथे ठेवलेले आहेत. एक सेवक धूनी अखंड तेवत ठेवतो. शिवाय अनेक भक्त त्यात तूप,राळ,तूपाची वात, गांजा इत्यादी साहित्याची भर घालत असतात.

पाठशाळा :

मुख्य मंदिराच्या भोवती पटांगण आहे आणि त्याला चार बाजूंनी दगडी पाठशाळेने वेढलेले आहे. पाठशाळेला जागोजागी सुंदर कमानी आहेत. ह्याच पाठशाळेत आज विश्वस्त मंडळाची कचेरी, देणगी, आणि अभिषेक काउन्टर आणि सनई चौघडा वाजविण्याची जागा आहे.

समाधी ग्रहण स्थळाबाहेरचा परिसर :

समाधी ग्रहण स्थळाबाहेर पूर्व बाजूस एक विशाल औदुंबर वृक्ष व हनुमानाची अतिप्राचीन मूर्ती असणारे छोटे मंदिर आहे.

मुख्यप्रवेशद्वारा बाहेरचा परिसर :

मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजुला नागदेवता मंदिर आणि श्रींचे सेवक श्री बाळाभाऊ महाराज व श्री नारायण महाराज ह्यांच्या समाध्या आहेत.

पारायण मंडप :

समाघीग्रहण स्थळ आणि शयनगृहाच्या समोर पारायण मंडप आहे. ज्या भक्तांना महाराजांच्या ग्रंथाचे वाचन करायची इच्छा असते त्यांच्याकरीता ग्रंथ, आसन, निरांजन विझू नये म्हणून काचेचे कंदिल, उदबत्तीची घरे सुद्धा ठेवले आहेत. काही वेळेस भक्त आपले चष्मे न आणल्याने पारायण करु शकत नाहीत. ही अडचण लक्षात घेऊन संस्थानाने विविध नंबरच्या चष्म्यांची सोय तेथेच केलेली आहे. या मंडपात भक्तांना जप, ध्यान, चिंतन, मनन व पारायण करता येते.

प्रवेशद्वार :

पाठशाळेला लागूनच दोन प्रवेशद्वारे आहेत. उत्तरेकडे मंदिरात येण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार असून पश्चिमेला दुसरे प्रवेशद्वार आहे.स्वामी भक्त यांनी या मठात जाऊन स्वामींच्या या प्रासादिक पादुकांचे अवश्य दर्शन घ्यावे.

शेगावचा इतिहास :

प्राचिन काळी श्रृंगमुनींनी वसविल्यामुळे श्रृंगगाव हे नाव पडलेल्या या गावास पुढे शेगांव म्हणून ओळखले जाऊ लागले. येथील सुप्रसिध्द शिवमंदिरामुळे या गावास शिवगांव असेही म्हणत. या शिवगांवाचे पुढे शेगांव असे नामकरण झाले. शेगांव या गावाच्या जन्मकथेबद्दल विविध मते असली तरीही आज मात्र हे ओळखले जाते ते परब्रह्. मस्वरूप संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या पावन वास्तव्यामुळे. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव या खेडेगावात श्रींच्या पदस्पर्शाने तसेच त्यांच्या संजीवन वास्तव्यामुळे समृद्धीची गंगा, भावभक्तिची यमुना व ज्ञानरूपी सरस्वती सतत वाहत आहेत.

गजानन महाराज समाधी :

जेव्हा गजानन महाराजांनी त्यांच्या अवतार समाप्तीची वेळ येऊन ठेपली आहे असे ठरवले, त्यावेळी ते हरी पाटलासोबत पंढरीला गेले. असे म्हणाले जाते की त्यांचा मानस पंढरीलाच समाधी घेण्याचा होता परंतु विठ्ठलाच्या आज्ञेने त्यांनी शेगावलाच समाधी घेण्याचे ठरविले व ऋषिपंचमीचा पुण्यदिनही ठरविला. समाधी घेण्यापूर्वी महाराजांनी सांगितले,

मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका |

कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||

याव‍रून महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेमच दिसून येते. लाखोंच्या संख्येने लोक त्यांच्या समाधिप्रसंगी हजर होते. तत्पूर्वी महाराजांना सुवासिक द्रव्ये लावून अभ्यंग स्नान घालण्यात आले होते. अनेक सुवासिनींनी त्यांची पूजा करून मंगलारती ओवाळली होती. सर्वत्र सनईचे सूर ऐकू येत होते. सूर्याची पहिली किरणे जमिनीला स्पर्शिली आणि महाराजांनी ब्रह्मरंध्रातून त्यांचे प्राण अनंतात विलीन केले. देहाचे चलनवलन थांबले आणि भक्तगण एकदम शोकसागरात बुडाले. भक्तांना आकाश फाटल्यासारखे झाले, सर्वत्र दु:खाश्रूंचा पूर लोटला. त्यावेळी स्वतः श्री महाराजांनी त्यांच्या समाधीची वार्ता कित्येक भक्तांना स्वप्नात जाऊन कळविली.

त्याचवेळी डोणगावच्या गोविंद शास्त्रींनी निर्वाळा दिला की जोपर्यंत महाराजांचे सर्व भक्त दर्शन घेऊन जात नाही तोपर्यंत महाराज त्यांचे प्राण मस्तकी धारण करतील. महाराजांच्या समाधीचा सोहळा हा अवर्णनीय असा झाला. लाखोंच्या गणनेने भक्त समाधीच्या मिरवणुकीत भागीदार झाले. लोकांनी शृंगारित रथात ठेवलेल्या महाराजांच्या पुण्यमय देहावर अबीर, गुलाल, फुले, तुळशी आणि पैसे उधळले. संपूर्ण शेगावातून फिरुन पहाटे ती मंदिरात आली; तेथे महाराजांवर पुन्हा अभिषेक केला गेला. त्यांचा देह शास्त्रात सांगितल्यानुसार उत्तराभिमुख असा समाधीच्या जागी ठेवला. अखेरची आरती ओवाळली आणि मीठ, अर्गजा, अबीर ह्यांनी भरली. सर्व भक्तांनी एकच जयजयकार केला,

जय गजानना | ज्ञानांबरीच्या नारायणा |

अविनाशरुपा आनंदघना | परात्परा जगत्पते ||

आणि शिळा लावून समाधिची जागा बंद केली. त्यानंतर दासगणूंनी म्हंटले आहे की सार्वभौम राजाचाही त्यांच्यापुढे पाड नाही. त्यांचे विश्वप्रेम, बंधुत्व आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणे तसेच अतर्क्य असे चमत्कार करून त्यांना संकटातून सोडवून, त्यांच्या चुका त्यांच्या पदरात घालून अत्यंत प्रेमाने त्यांना मोक्षमार्गावर घेऊन जाण्याच्या लीला पहाताच सर्वच भक्त धन्यतेने नतमस्तक होतात. आज गजानन महाराज आपल्यात फक्त देहाने नाहीत, परंतु ते जगदाकार असल्याने ते नाहीत अशी जागाच अखिल ब्रह्मांडात नाही. म्हणूनच त्यांना

अनंतकोटी ब्रह्मांडनायाक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय!!!

असे प्रेमादराने संबोधले जाते. ज्या भक्तांना त्यांचे पुनीत चरणकमल लाभले ते खरोखरच धन्य होत. अशा सर्वच भक्तांच्या जीवननौका श्री महाराज भवसागराच्या पैलतीरी लावतील यात शंकाच नाही. अशा सदगुरुंविषयी परमपूज्य श्री कलावतीदेवी ह्यांनी स्वतः लिहिलेल्या ‘गुरुस्तुति’मध्ये सांगितले आहे,

अगा! निर्गुणा, निश्चला, सच्चिदानंदा | अगा! निर्मला, केवला आनंदकंदा || स्थिरचररुपी नटसी जगी या | नमस्कार माझा तुला गुरुराया ||१||

अगा! अलक्षा, अनामा, अरूपा | अगा! निर्विकारा, अद्वया, ज्ञानरुपा || कृपाकरोनी अक्षयपद दे दासा या | नमस्कार माझा तुला गुरुराया ||२||

सदगुरूच्या स्वरूपाचे खरे वर्णन ह्या ओळींमध्ये सामावलेले आहे, गजानन महाराजांना हे वर्णन किती चपखल बसते आहे हे तर सर्वांना विदितच आहे. त्यांनी अनेक लोकांना दु:ख, संकटे, रोग यांपासून मुक्त करून सन्मार्गाला लावले. ते एक परमहंस संन्यासी तसेच उच्च कोटीचे विदेही संत होते. आज शेगावात त्यांच्या दर्शनाला येणाऱ्या असंख्य भक्तजनांना पाहून ह्या गोष्टीची नक्कीच खात्री पटते. ०८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी त्यांनी शेगाव येथे समाधी घेतली आणि त्यांचे समस्त भक्तगण दु:खसागरात बुडाले तेव्हा सर्वांना आठवते ते महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे दिलेले वचन; ते समाधि घेण्यापूर्वी म्हणाले,

दु:ख न करावे यत्किंचित | आम्ही आहोत येथेच |

तुम्हा सांभाळण्यापरी सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||

देह त्यागून महाराज ब्रह्मीभूत झाल्याकारणाने ते आता जगदाकार झाले आहेत. त्यामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे.

vidarbha-darshan.blogspot.com

Leave a comment