अंजली मूद्रेतील हनुमान आणि गरूड

अंजली मूद्रेतील हनुमान आणि गरूड

अंजली मूद्रेतील हनुमान आणि गरूड –

आपल्याकडे हनुमानाची मूर्ती म्हणजे शेंदूर फासलेला दगड. अगदी देखणी कोरीव मूर्ती कुठे दिसत नाही. द्रोणागिरी पर्वत हाती घेवून उडणारा पवनपुत्र अशी मूर्ती मंदिरात आढळून येते. पण ही मूर्ती हात जोडलेली म्हणजेच अंजली मुद्रेतील आहे. या हनुमानाच्या अंगावर बारीक अशी वस्त्रे प्रावरणे आणि आभुषणे कोरली आहेत. त्याची गती दाखविण्यासाठी कोपरावरून मागे सोडलेले वस्त्राचे गोंडे जमिनीला समांतर असे उडताना दाखवले आहेत. कानातले कुंडलेही छान आहेत.(हनुमान आणि गरूड)

बाजूची मूर्ती गरूडाची आहे. हा गरुडही अंजली मूद्रेत आहे. त्याचे बाकदार नाक उठून दिसते.एरवी भेदक दिसणारे त्याचे नेत्र शांत दिसत आहेत. पंख पसरलेले रेखीव असे कोरले आहेत. खाली त्याच्या वस्त्राची टोकं कोरलेली आहेत. हे वस्त्रही कलाकुसरयुक्त आहे कारण गरूड विष्णुचे म्हणजेच ऐश्वर्यसंपन्न देवतेचे वाहन आहे. याचा मुकूटही देखणा आहे.

या दोन्ही मूर्ती शेंदूरवादा येथील विठ्ठल मंदिरात विठ्ठल मूर्तीच्या डाव्या उजव्या बाजूस ठेवलेल्या आहेत. विठ्ठल देवता वैष्णव देवता आहे. स्वाभाविकच गरूड तिथे असणं समजू शकतो. विठ्ठलाला विष्णुचा ९ वा अवतार मानलं जातं. पण हनुमानाची मूर्ती इथे का? याचं कोडं उलगडत नाही.  (यावर राहूल देशपांडे या मित्राने केलेला खुलासा समर्पक व समाधानकारच आहै. .. दास मारुती हा कायम भागवत पंथात आराध्य देवतेसमोर उभे असण्याचा उल्लेख आहे.”गरुड हनुमंत पुढे उभे राहती…” हे वाक्य आहेच आरती मध्ये.)

मध्वमुनीश्वरांच्या काळापासूनचे (इ.स. १६६०) हे विठ्ठल मंदिर आहे. तेंव्हा या मूर्तीही ३६० वर्षांपासूनच्या आहेत. खाम नदीच्या काठी औरंगाबादपासून अगदी जवळ ३० किमी. अंतरावर गंगापूर तालूक्यात हे गांव आहे.

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here