महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,76,591

श्री हंगेश्वर शिवमंदिर, हंगा

By Discover Maharashtra Views: 1409 2 Min Read

श्री हंगेश्वर शिवमंदिर, हंगा –

अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात पारनेरच्या पूर्वेस ८ किलोमीटर अंतरावर हंगा नदीच्या तीरावर हंगा गाव वसलेले आहे. या ठिकाणी श्री हंगेश्वर महादेवाचे पुरातन मंदिर आहे. हंगा नदीच्या नावावरूनच गावाला हंगा तसेच महादेवाला हंगेश्वर हे नाव प्राप्त झाले असावे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ एक शिलालेख असून हे मंदिर शके १६१३ मध्ये गंधे बंधूंनी बांधले असा यात उल्लेख आहे. हे गाव शिंदे सरकारकडे होते व येथील गंधे मंडळी शिंद्यांच्या लष्करात होती.

हंगेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुख असून उंच चौथऱ्यावर बांधण्यात आले आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला काही पायर्‍या चढून जावे लागते. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर डाव्या हाताला ओवरी आहे, ती आजही सुस्थितीत आहे, त्यानंतर समोर मुख्य मंदिर आहे.

मुख्य मंदिराचे बांधकाम दगडी बांधणीचे असून अतिशय सुंदर आहे. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर शिलालेख असून तो आजही उत्तम स्थितीत आहे. या शिलालेखावरून मंदिराच्या बांधकामाची आपल्याला माहिती मिळते. मुख्य मंदिरासमोर असलेल्या नंदीमंडपात नंदी, गणपती, हनुमान, नागदेवता, गजशिल्प, वीरगळ व इतर देव-देवतांची मूर्ती विराजमान आहेत. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर चार पायात चार हत्ती पकडलेले चतुर्गज विजयी द्विपंखधारी शरभ व काही केवळ शरभ शिल्पं कोरण्यात आली आहेत.

मुख्य मंदिरात प्रवेश केल्यावर मोठा सभामंडप आहे. त्यामध्ये मध्यभागी कासव आहे. या मंडपाला एकही खांब नाही व छत घुमटाकार आहे. सभा मंडपासमोर मुख्य गाभारा असून, गाभार्‍यात शिवलिंग विराजमान आहे. श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी या मंदिरात तांदळापासून पिंडी तयार होतात असे ग्रामस्थ सांगतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे मोठी गर्दी होते तर तिसऱ्या सोमवारी यात्रा भरते.

मंदिराचे गुगल लोकेशन – https://maps.app.goo.gl/nELSx3iJH9uZhEfr8

©️ रोहन गाडेकर

Leave a comment