तहान देवता, पैठण

तहान देवता, पैठण

तहान देवता, पैठण –

पैठण (ता. पैठण जि. औरंगाबाद) येथील ज्ञानेश्वर उद्यानात (जे की आता पूर्णत: उद्ध्वस्त आहे) बाळासाहेब पाटील वस्तुसंग्रहालय आहे. या वस्तुसंग्रहालयाच्या अंगणात काही प्राचीन शिल्प अवशेष मांडून ठेवले आहेत. यात शेषशायी विष्णु, शिवपार्वती, सुरसुंदरी, कोरीव दगडी रांजण अशी शिल्पं आहेत. त्यातील हे एक शिल्प. प्रथमदर्शनी जलकुंभ घेतलेली सुरसुंदरी असावी असे वाटले. पण बारकाईने बघितल्यावर खालच्या आकृतीकडे लक्ष गेले.तहान देवता, पैठण.

पाण्यासाठी ओंजळ पसरलेली एक व्यक्ती आढळून येते. ती पाहताच शिल्पाचा अर्थच बदलून जातो. तहानलेल्यांना पाणी देण्याचा शांत भाव स्त्रीच्या चेहर्‍यावर झळकायला लागतो. तहानेची कासावीस पसरलेल्या ओंजळीमागच्या चेहर्‍यावर दिसायला लागते. या शिल्पाला नाव काय द्यावे? सुरसुंदरी शोभत नाही. जलदेवता म्हणावं तर त्याला वेगळा अर्थ आहे. शिल्पशास्त्रात याला वेगळे नाव नाही. मुळात हे शिल्प केवळ शास्त्र म्हणून किंवा सौंदर्य म्हणून निर्माण झालेलं वाटतच नाही. तहानेने व्याकुळलेला माणुस आणि त्याची तहान भागवणारी स्त्री असं हे शिल्प आहे. म्हणून मी याला “तहान देवता” असं नाव देतो.

जागते रहो चित्रपटात राज कपुर रात्रभर पाण्यासाठी वणवण भटकतो. पहाटे पहाटे त्याला तुळशीची पुजा करून पाणी घालणारी सुस्नात नर्गीस दिसते. तिच्यासमोर तो ओंजळ पसरतो आणि ती वरतुन पाण्याची धार ओतते. “जागो मोहन प्यारे” हे लताच्या आवाजातील गाणं पार्श्वभुमीवर वाजत रहातं. सलील चौधरीच्या या अवीट गाण्याचे सुर हे शिल्प पाहताना माझ्या मनात घुमत होते.

Pc – Travel Baba Voyage.

-श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here