महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 86,34,672

ऐतिहासिक गढी दावडी

By Discover Maharashtra Views: 1977 10 Min Read

ऐतिहासिक गढी दावडी (ता.खेड जि.पुणे) –

निमगावचा वाडा पाहून झाल्यावर किती वाजले म्हणून पाहिले तर अकरा वाजले होते. मोहरे सर म्हणाले,” बोला, आता कुठे जायचे?” मी म्हणालो,” चलो, दावडी.” सरांनी त्यांच्या परिचयातील एका व्यक्तीस आम्ही दावाडीस येत आहोत हे चलभाषवरुन कळविले. त्यांनी दुचाकी सुरू केल्यावर मी त्यांच्या मागे बैठक मारली. दुचाकी हळूहळू वेग घेऊ लागल्यावर मी पुन्हा एकदा मागे वळून निमगावच्या ऐतिहासिक ठेव्याकडे पाहिले कारण पुन्हा ही वास्तू पाहण्याचा योग माझ्या आयुष्यात येईलच याची मला शाश्वती नाही. निमगावच्या कमानीतून बाहेर पडलो व दावडीच्या रस्त्याला लागलो. तीनचार किलोमीटर अंतर गेल्यावर दावडी गावच्या ओढ्यावरील निर्माणाधिन दगडी साकव(पुल) ओलांडला तोच रस्त्याच्या दोन्ही बाजूस असलेले पुरातन भव्य वटवृक्ष, त्यांनी प्रत्यक्ष पाहिलेला ऐतिहासिक सुवर्णकाळ सांगण्यास उत्सुक असल्याचे भासले. गावची सुरक्षा चोखपणे पार पाडणारी पुरातन तटबंदी काही ठिकाणी लुप्त झाली असली तर गावचे पूर्वाभिमुखी मुख्य प्रवेशद्वार भक्कमपणे उभे आहे. ऐतिहासिक गढी दावडी दोन्ही बाजूस असलेले वीट बांधकातील डेरेदार बुरूज, त्यांच्या दरम्यान घडिव दगडी बांधकामातील विशाल नक्षीदार सागवानी दरवाजा, त्याच्या माथ्यावर असलेल्या बांधकामात लोखंडी स्तंभावर फडकणारा मराठा साम्राज्याचा जरीपटका, अप्रतिम व गौरवशाली दृश्य. ‘श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड प्रवेशद्वार’ हे नाव वाचताना मन अठराव्या शतकातील ऐतिहासिक घटनांमधे जाते. दरवाजा इतका भव्य आहे की, यातून मालवाहक चारचाकी वाहन सहजतेने आत – बाहेर होत असते.(ऐतिहासिक गढी दावडी)

दरवाजाच्या आतील दोन्ही बाजूस सुरक्षा रक्षकांच्या देवड्या असून वरील ध्वजस्तंभाकडे जाण्यासाठी तटबंदीच्या आतील बाजूने दगडी पायऱ्या आहेत. दरवाजा माथ्यावर आज इमारत नाही मात्र रचना पाहताच लक्षात येते की कधीकाळी येथे नगारखाना असला पाहिजे. श्रीमंत गायकवाड यांच्या गौरवशाली भूमीत पाऊल ठेवताना कानात ‘हर हर महादेव’ची गर्जना ऐकू येते. समोरच काही अंतरावर ‘ श्रीमंत दमाजी गायकवाड’ यांची तत्कालीन भव्य गढी आहे. गढीच्या आजूबाजूच्या मोकळ्या जागेवर महाराष्ट्रातील एका अग्रगण्य शैक्षणिक संस्थेचे ज्ञानदानाचे संकुल आहे. श्रीमंत दमाजी गायकवाड गढीचे पूर्वाभिमुख एकमेव विशाल दुमजली प्रवेशद्वार दगड – वीट बांधकामात आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूस असलेले शरभ शिल्प आकर्षक आहे. दोनतीन पायऱ्या चढून गेल्यावर आत प्रवेश होतो. दोन्ही बाजूस असलेल्या देवड्या ओलांडून गेल्यावर ही गढी मध्यम व चौकोनी आकाराची असल्याची जाणीव होते. आतील बाजूने मातीच्या भेंड्याची तटबंदी दिसून येते, मात्र बाहेरील सर्व बाजूंनी दगडी बांधकाम आहे. चारही कोपऱ्यावर असलेले भव्य दगडी बुरूज, आतील बाजूने मातीचेच असल्याचे दृष्टिपथास येते. आतील भागात कोणतीही इमारत आजमितीस नाही, मात्र जमिनीच्या भूभागात असलेल्या  भुयारात उतरण्यासाठी दक्षिणोत्तर पायऱ्या आहेत. स्थानिकांच्या म्हणण्याप्रमाणे जमिनीखाली काही दालणे असून तेथून निमगावपर्यंत जाणारा भुयारी मार्ग देखील आहे.

ही गढी पाहून बाहेर आल्यावर गढीच्या डाव्या बाजूस असलेल्या पूर्वाभिमुखी दुमजली सागवानी बांधकामातील ‘ सरकार कचेरी वाडा’ पाहण्यासाठी गेलो. पूर्वेकडील मुख्य दरवाजा बंद असल्याने दक्षिणेस असलेल्या दरवाजाने प्रवेश करावा लागतो. हा सरकार कचेरी वाडा रावश्री सरदार पिलाजी बीन झुंगोजी गायकवाड, समशेर बहादूर, मुकादम ठाणे, दावडी यांनी इ.स.१७२९ – ३० मधे बांधला असून इ.स.१९२२ मधे महाराजा सयाजीराव गायकवाड (तृ.) सेना खासखेल, समशेर बहादूर यांनी जीर्णोद्धार केला आहे. वाड्यात सागवानी लाकडावर अप्रतिम कलाकुसर केलेली आहे. पुढील भागात जमिनीत पाण्याचे टाके असून बाग बगीचा देखील आहे. हा वाडा पाहून झाल्यावर, आम्ही बाहेर आलो,तेव्हा तेथे मोहरे सरांनी निमगाव येथून चलभाषवर संपर्क केलेले शिक्षक नेते श्री.रमेश होरे हे आले होते. सरांचा परिचय झाला व आम्ही दोन्हीही वाडे पाहिले असल्याची माहिती त्यांना दिली. होरे सरांनी पुढील माहिती व ठिकाणे स्वतः आम्हाला दाखविण्याची जबाबदारी घेतली. सरकार कचेरी वाड्याच्या पुढील एका कोपऱ्यात जमिनीतील दगडी बांधकाम असलेले पाण्याचे टाके आहे.

दोन्हीही वाड्यात पाण्याची विहीर किंवा आड नाहीत मग तेथील निवासी व्यक्तींच्या पाण्याची काय योजना असावी असा नैसर्गिक प्रश्न मनात होताच. या टाक्यात जे पाणी आहे ते गावापासून सुमारे एक दिड किलोमीटर अंतरावर असलेल्या तळ्यातून खापरी वाहिकेतून किंवा अन्य पर्यायाने आणलेले आहे. या टाक्याच्या जवळच उत्तरेस तत्कालीन पाणी वितरण सुरू किंवा बंद करण्याची व्यवस्था आढळून येते. तेथून पुन्हा गावातील लोकवस्तीतून उत्तरेस गेल्यावर गावाची तटबंदी आढळून येते व या ठिकाणी गाव प्रवेश करण्याचा ‘ श्री.प्रतापसिह गायकवाड महाराज’ नावाचा दुसरा दिंडी दरवाजा आहे. या दरवाजातून बाहेर आल्यावर आपण गावाच्या बाहेरील बाजूच्या रस्त्यावर येतो.

रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला पुरातन विहीर आहे तर, समोर आधुनिकीकरण केलेले श्री महालक्ष्मीचे भव्य मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागील बाजूस गावचा ओढा व मंदिर यांच्या दरम्यान जवळपास पाऊन एकर क्षेत्रफळ असलेली कलात्मक दगडी बांधकामातील चौकोनी आकाराची पुष्करणी आहे. या पुष्करणीच्या दक्षिण बाजूला पायऱ्यांची सोय तर उत्तर बाजूला मोटेचा हौदा दिसून येतो. पुष्करणीच्या दगडी कठडा बराच रुंद असल्याने चोहोबाजूने सहज फेर फटका होऊ शकतो मात्र पूर्वेकडील बांधकाम कालौघात क्षतिग्रस्थ झालेले आहे. या पुष्करणीतील पाणी गावच्या तटबंदी लगत असलेल्या खंदकात सोडण्याची इतिहासकालीन सोय असल्याचे दिसून येते. गावा सभोवती असलेली तटबंदीचे काही अवशेषच शिल्लक राहिले आहेत, तर खंदकाची परिस्थिती काय असणार! एक मात्र नक्की गावाच्या पाठीमागील बाजूस म्हणजेच पश्चिमेस भव्य तटबंदी व खोल खंदक आपले वैभवशाली अस्तित्व राखून आहे. गाव परिसरात ऐतिहासिक घटनेची साक्ष देणाऱ्या मूक शिल्पांचे भाग दिसतात पण ते अव्यक्तच राहतात. सुमारे तासाभरात सर्व पाहून झाले. परतीच्या वाटेवर असतानाच एका अग्रगण्य दैनिकाचे स्थानिक पत्रकार श्री.सदाशिव आमराळे यांची अल्प मुलाखत झाली. व्यस्त असताना देखील आमच्यासाठी त्यांनी वेळ दिला.श्री.होरे व श्री.आमराळे यांचा निरोप घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो.

श्रीमंत दमाजी गायकवाड यांच्या भूमीतील वास्तू दर्शनाने आम्ही भूगोल पाहिला पण याच भूगोलामुळे श्रीमंत गायकवाड घराण्याचा दैदिप्यमान शौर्याचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. श्रीमंत गायकवाड घराणे हे मुळचे पुणे शहराच्या लगतच असलेल्या मुळशी तालुक्यातील भरे या गावचे. या घराण्यातील ज्ञात असणारा मुळ पुरुष नंदाजीराव गायकवाड हे भरे गावात उत्तम शेती करून राहत होते. शेतीवाडी करून आनंदाने राहणाऱ्या नंदाजीराव यांच्या नातवाचे म्हणजेच दमाजींचे मुलूखगिरी करून क्षत्रिय धर्माचे पालन करण्याचे विचार होते. पुढे दमाजी हे तळेगाव दाभाडे येथील सेनापति त्र्यंबकराव दाभाडे यांच्या सैन्यात शिपाईगिरी करु लागले. दमाजी हे अंगच्या शौर्यधैर्यादि गुणांमुळे लवकरच नावलौकिकास आले. त्यांचे पराक्रम, शौर्य व कर्तृत्व पाहून छत्रपति शाहुमहाराजांनी समशेरबहाद्दर हा किताब त्यांना दिला व स्वराज्याच्या दुय्यम सेनापति म्हणून अधिकार बहाल केला. मात्र असा पराक्रमी शूरवीर लवकरच निधन पावला.

दमाजीच्या निधनामुळे गायकवाड घराण्याला छत्रपतींनी दिलेला अधिकार आता कोणाला मिळणार हा प्रश्न होता, मात्र दमाजींच्या भावाचा मुलगा पिलाजी हा देखील त्यांच्यासारखाच बुद्धिमान, हिम्मतदार होता. छत्रपतींनी दमाजींचे सर्व अधिकार पिलाजीस दिले. पिलाजी गायकवाडांनी खानदेशातील नवापूर येथे काही काळ वास्तव्य केले, मात्र लवकरच त्यांनी स्वतः सोनगड येथे किल्ला बांधून राहण्यास सुरूवात केली. इ.स. १७२४ मधे गुजरातच्या नायब सुभेदार हमीदखान यांस पिलाजींनी सैन्य मदत केली व त्याच्या बदल्यात महीनदीच्या पूर्वेकडील मुलूखात चौथाई घेण्याचा हक्क मिळविला. पेशवा बाजीराव बाळाजी भट व सेनापति त्र्यंबकराव दाभाडे यांच्या सैन्याचा इ.स.१७३१ मधे रणसंग्राम डभई येथे झाला, तेव्हा दाभाडेंच्या बाजूने लढताना पिलाजींचा एक मुलगा कामी आला तर स्वतः पिलाजी जखमी झाले. या युद्धात सेनापति त्र्यंबकराव दाभाडे यांना वीरमरण आले. पुढे छ.शाहुमहाराजांनी उमाबाईसाहेब यांचे सांत्वन केले व यशवंतराव दाभाडे ह्यांस सेनापतींची वस्त्रे व अधिकार दिले. त्याचवेळी सेनापति यशवंतराव यांचे मुतालिकपदी पिलाजींस कायम ठेवून, सेना खासखेल हा आणखी दुसरा किताब दिला. गुजरात प्रांतावर मराठ्यांच्या वतीने दाभाडे व गायकवाड यांच्या पूर्ण अमल बसला पण हे जोधपूरच्या अभयसिंगास रुचले नाही. तो यांच्याशी समोरासमोर लढण्यात कमी असल्याने त्याने विश्वासघात करून पिलाजींचा खून केला.

पिलाजींच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा दमाजी ( द्वि.) हा कारभारी झाला. आपल्या वडिलांचा कपटाने खून करणाऱ्या अभयसिंगाचा प्रतिशोध घेण्यासाठी दमाजीने बडोदा किल्ल्यात राहणाऱ्या अभयसिंगावर हल्ला केला. दोन्ही सैन्यात घनघोर रणसंग्राम झाला व शेवटी दमाजी सैन्याला बडोदा किल्ल्याचा ताबा मिळाला मात्र अभयसिंग जीव वाचवून पलायन करण्यात यशस्वी झाला. दमाजींच्या सैन्याने अभयसिंगास जोधपूर गाठता नाकीनऊ आणले. या वेळापासून गायकवाड घराण्याकडे बडोदा हे राजधानीचे शहर म्हणून कायमच राहिले. इ.स.१७४४ मधे दमाजी साता-यास छत्रपतींच्या भेटीसाठी गेले होते.

इ.स.१७४९ मधे छत्रपति शाहुमहाराज कैलासवासी झाल्यावर सातारची गादी प्राप्त करण्याचा प्रयत्न महाराणी ताराराणीसाहेब यांनी सुरू केला. तिने अनेक युक्त्या लढवून दमाजीस आपल्या पक्षात ओढून घेतले. पुढे पेशवा नानासाहेब ( बाळाजी बाजीराव) यांनी दमाजीस १७५२ मधे कैद केले. दोन वर्षे कैदेत राहिल्यावर पेशव्यास रोख रक्कम भरुन व एकनिष्ठ राहण्याचे वचन देऊन दमाजींने आपली मुक्तता करून घेतली. इ.स.१७५५ मधे राघोबादादाबरोबर ते अहमदाबाद मोहिमेवर गेले व यश संपादिले.

१४ जानेवारी १७६१ ला मराठ्यांचा व अहमदशाह अब्दाली यांच्यात पानिपत येथे रणसंग्राम झाला तेव्हा दमाजी गायकवाड हे मराठा सैन्यात रणांगणावर होते. पानिपतहून परतल्यावर दमाजींनी ब-याच मोहिमा करून मुलूख जिंकला तर १७६३ साली निजामाशी झालेल्या तादुंळजाच्या युद्धात तरवार गाजवली. सतत ३५ वर्षे दमाजींनी तरवार गाजवून गुजरात मधे गायकवाड घराण्याचा कळस चढविला. अशा या पराक्रमी नरवीराने १७६८ रोजी आपला देह ठेवला.

अशा या श्रीमंत सरदार दामजींच्या ऐतिहासिक गढी दावडी गावास भेट देण्याचा योग मोहरे सरांच्यामुळे आला. आता लवकरच भेटू पुढील मोहिमेत.

संदर्भ –

१)क्षत्रिय घराण्यांचा इतिहास भाग १ – सीताराम रघुनाथ तारकुंडे (१९२८)

२) मराठी रियासत – गो.स.सरदेसाई.

विनंती – मी लिहलेली खालील पुस्तके अवश्य वाचावी.
१) ऐतिहासिक भोर ः एक दृष्टीक्षेप ( ऐतिहासिक )
२) पासोडी ( ललित लेखसंग्रह)
३) आगामी – आडवाटेचा वारसा
( ऐतिहासिक पर्यटन संदर्भग्रंथ )

© सुरेश नारायण शिंदे, भोर

Leave a comment