महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड भाग २

By Discover Maharashtra Views: 2726 8 Min Read

शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड भाग २

मोमीनखान हा १७४३ त (फेब्रुवारी) मेला. तो जिवंत होता तोपर्यंत दमाजीनें गुजराथेंतील व काठेवाडांतील आपले सर्व हक्क बिनहरकत वसूल केले. मोमीनच्या मरणानंतर अबदुल अझीझ याची नेमणूक झाली; पण तो औरंगाबादेहून गुजराथेंत येत असतां, मार्गांतच दमाजीनें अंकलेश्वर येथें त्यावर हल्ला करून त्याची सर्व फौज कापून काढली. यानंतर फकीरूद्दौला यास दिल्लीहून गुजराथेंत पाठविण्यांत आलें (१७४४). यावेळीं दमाजी साता-यास गेला होता; तथापि त्याचा सरदार रंगाजी यानें फकीरूद्दौल्यास विरोध करून गुजराथचा कारभार आपल्या हातीं घेऊं दिला नाहीं.

दमाजीस खंडेराव नांवाचा एक भाऊ होता. दमाजी गुजराथेंत नसल्यामुळें त्याला कारभारांत ढवळाढवळ करण्यास संधि मिळाली. त्यानें रंगाजीस अहमदाबादेहून काढून तेथें दुस-या माणसाची नेमणूक करून फकीरूद्दौला यासहि कांहीं मदत दिली. परंतु रंगाजीस ही बातमी लागतांच तो लागलीच परत आला; व त्यानें खंडेराव व फकीरूद्दौला यांचा संबंध तोडून खंडेरावास संतुष्ट राखण्यासाठीं, त्यास बुरसत (बोरसादचा) किल्ला व नडियाद जिल्हा दिला व बडोदें येथें त्याला आपला प्रतिनिधि म्हणून नेमलें. १७४४ त दमाजी गायकवाड सात-यास आला होता. या वर्षी रघूजी भोंसलें व बाळाजी बाजीराव यांच्यामध्यें शाहूच्या मध्यस्थीनें जी तडजोड झाली, तींत असें ठरलें होतें कीं, दमाजीनें माळव्यांतून कांहीं दिवसांपूर्वी जी खंडणीची रक्कम वसूल केली, तिचा हिशोब त्यानें पेशव्यांस द्यावा. शाहूनें आपल्या मरणापूर्वी दमाजी गायकवाडास साता-यास हजर होण्याविषयीं हुकूम पाठविला होता; परंतु त्यावेळीं तो गेला नाहीं. (१७४८).

दमाजी हा ताराबाईस पेशव्यांच्याविरूध्द मदत करण्याकरितां १५००० सैन्य घेऊन साता-याकडे आला व त्यानें पेशव्यांच्या पक्षाच्या मंडळीचा नींब येथें पराभव केला (१७५१). परंतु ही बातमी नानासाहेबांनां लागतांच ते मोठमोठ्या मजला करीत दक्षिणेकडून साता-यास आले. पेशव्यांशीं बोलणें लावून तडजोड करून घेण्यासाठीं दमाजीनें खटपट चालविली पण ती सफळ झाली नाहीं. अखेर दमाजीवर पेशव्यांनीं अचानक हल्ला करून त्यास पकडून बंदोबस्तानें पुण्यास आणून ठेविलें व त्याच्या कुटुंबास कैदेंत ठेविलें.

भडोचच्या वसुलचा व जकातीचा हिस्सा गायकवाडास नक्की केंव्हा प्राप्त झाला हें कळत नाहीं. इ. स. १७४७ सालीं सुरतच्या अधिकारासंबंधीं मुसुलमानी निरनिराळ्या पक्षांत तंटे उपस्थित होऊन त्यांपैकीं सय्यद अचीनखानानें दमाजीचा चुलतभाऊ केदारजी यास आपल्या मदतीस बोलावले. याबद्दल तीन लक्ष रूपये केदारजीस देण्याचें ठरलें. परंतु केदारजीच्या मदतीवांचूनच अचीनखानाचें कार्य झाल्यानें तो ती रक्कम देण्यास टाळाटाळ करूं लागला. त्यावर केदारजीनें सुरतच्या आसपास लुटालूट करण्यास आरंभ केला. तेव्हां अचीननें नाइलाज होऊन त्या रकमेची फेड होईपर्यंत सुरतच्या वसुलाचा एकतृतीयांश हिस्सा केदारजीनें घ्यावा असें ठरविलें व तें केदारजीनेंहि दमाजीच्या सल्ल्यानें मान्य केलें. दमाजी पुण्यास पेशव्यांच्या कैदेंत होता त्यावेळीं (इ. स. १७५२-१७५४). पुनः सुरत येथें बरीच बेबंदशाही माजली होती. तिचा फायदा घेतां यावा म्हणून पुढें दिल्याप्रमाणें दमाजीनें पेशव्यांशीं करार करून आपली सुटका करून घेतली (१७५४). यावेळीं असें ठरलें कीं दमाजीनें १५ लक्ष रूपये देऊन मागील बाकीचा फडशा करावा; गायकवाडाकडे गुजराथेंत जो मुलूख आहे त्याचा अर्धा वांटा पेशव्यांस मिळावा व पुढेंहि त्यांनीं नवीन मुलूख जिंकल्यास त्याचाहि अर्धा हिस्सा पेशव्यांस मिळावा.

अतःपर स्वार्‍यां-मध्यें जो कांही पैसा मिळेल त्यांतून स्वारीचा खर्च वजा जातां बाकी राहिेलेल्या रकमेचा अर्धा हिस्सा पेशव्यांस देत जावा. दहा हजार फौज चाकरीस ठेवून गरज पडेल तेव्हां पेशव्यांस मदत करावी, दाभाडे सेनापतीचे मुतालिक या नात्यानें गुजराथ प्रांताच्या वसुलांतून दरसाल सवापांच लक्ष रूपये सरकारांत द्यावे आणि छत्रपतींच्या इतमामासाठीं दरवर्षी कांहीं रक्कम पाठवीत जावी वगैरे. कैदेंतून सुटण्यासाठीं दरबारखर्च म्हणून दमाजीनें दहापंधरा लक्ष रूपये खर्च केले. सुटका झाल्यानंतर (१७५४) पावसाळ्याच्या अखेर राघोबादादांच्या गुजराथच्या स्वारींत दमाजी त्यांस येऊन मिळाला व ते दोघे खंडण्या गोळा करीत अहमदाबाद शहरीं (१७५५) आले. त्यांनीं शहरास वेढा देऊन तें हस्तगत केलें. येथील अधिकारी जवानमर्दखान बाबी याची नेमणूक मोमीनखान यांच्या भावानें केली होती. त्यानें कित्येक दिवसपर्यंत शहराचें रक्षण केलें, परंतु शेवटीं पट्टण, बंडनगर, राधनपूर, विजापूर आणि साबरमती व बनास या नद्यांमधील अहमदाबादच्या उत्तरेकडचे गुजराथेंतील कांही जिल्हे स्वतःस जहागीर घेऊन (एप्रिल महिन्यांत) त्यानें तें शहर मराठ्यांच्या स्वाधीन केले. अहमदाबाद हस्तगत झाल्यावर त्याचा वसूल गायकवाड व पेशवे यांनीं अर्धा अर्धा वांटून घ्यावा असें ठरलें. वरील बाबीच्या जहागिरीपैकीं बराचसा मुलूख पुढें १० वर्षांनीं दमाजीनें परत मिळवि.

इ. स. १७६० मध्यें भाऊसाहेब हिंदुस्थानांत जावयास निघाले तेव्हां चंबळेच्या अलीकडेच पेशव्यांच्या आज्ञेवरून दमाजी त्यांस जाऊन मिळाला. पानिपतच्या अखरेच्या घनघोर लढाईंत दमाजी व इब्राहिमखान हे दोघेहि बरोबरच रोहिल्यांशीं लढत होते. नंतर मल्हारराव होळकरानें रणभूमीवरून पाय काढल्यावर दमाजीनेंहि त्याचेंच अनुकरण केलें. पुढें (१७६३) निजामाशीं झालेल्या तांदुळज्याच्या लढाईंत (पेशव्यांतर्फे) दमाजी हजर होता. नंतर (स. १७६८) दमाजीनें आपला मुलगा गोविंदराव याजबरोबर फौज देऊन त्याला थोरले माधवराव यांच्याविरूध्द राघोबादादास मदत करण्यास पाठविलें. इ. स. १७६८ च्या सुमारास दमाजी मरण पावला. त्याला सयाजी, गोविंदराव, मानाजी व फत्तेसिंग असे चार मुलगे होते. यांपैकीं सयाजी सर्वांत वडील होता पण तो पहिल्या बायकोचा नव्हता.

गोविंदराव पहिल्या बायकोचा होता पण धाकटा होता. दमाजी मेला तेव्हां गोविंदराव हा राघोबादादास मदत केल्यामुळें पुण्यास अटकेंत होता. त्यानें सुटकेसाठीं भूर्दंड व नजर मिळून ५०॥ लक्षांवर रूपये देऊन, ७ लक्ष ७९ हजार रूपये दरसाल खंडणी देण्याचें आणि पुण्यास नेहमीं ३ हजार फौज व लढाईच्या वेळीं ४ हजार फौज ठेवयाचें कबूल करून सेनाखासखेल हें पद मिळविलें. सयाजी स्वतः वेडा होता पण फत्तेसिंगानें त्याचा हक्क पुढें मांडून पेशव्यांकडूनच (१७७१) आपल्या भावासाठीं सेनाखासखेल ही पदवी मिळविली व आपण त्याचा मुतालिक झाला. यामुळें गोविंदराव व फत्तेसिंग यांच्यामध्यें वैमनस्य आलें. तेव्हां गोविंदरावानें बंड केल्यास गुजराथेंत शांताता राखता यावी म्हणून फत्तेसिंगानें पेशव्यांनां दरसाल ६॥ लक्ष खंडणीचा करार करून आपलें सैन्य पुण्याहून काढलें. पुढें दादासाहेबांस पेशवाई मिळाल्यावर त्यांनी गोविंदरावांस पुन्हां ‘सेनाखासखेल’ केलें. तेव्हां गोविंदरावानें लागलीच गुजराथेंत स्वारी केली. पुढें दादासाहेब हे त्याची मदत घेण्याकरितां बडोद्यास आले (३ जाने. १७७५). तेव्हां त्यानें फत्तेसिंगास (बडोदे येथें) वेढा दिला होता. यावेळीं गोविंदरावाचा चुलता व नडियादचा जहागीरदार खंडेराव हा गोविंदरावाच्या मदतीस आला. परंतु पुण्याच्या कारभार्‍यांनी त्याला आपल्या बाजूस वळवून घेतलें. हरीपंत फडके दादांच्या पाठोपाठ आले. तेव्हां गोविंदराव बडोद्याचा वेढा उठवून दादाबरोबर नदीच्या पलीकडे गेला. तेथें महितीरी वासद खेड्याजवळ हे छावणी देऊन राहिले असतां फत्तेसिंग व हरीपंत यांनी नदी उतरून यांच्यावर अचानक हल्ला केला व यांचा पराभव केला (१७ फेब्रु.) तेव्हां दादा हे इंग्रजांकडे खंबायतेस गेले व गोविंदराव पालनपुराकडे गेला.

पुढें (१९ एप्रिल) राघोबादादा हे कीटिंगसह गोविंदरावाच्या सैन्यास खंबायतच्या ईशान्येस ११ मैलांवर दरमज येथें येऊन मिळाले. गोविंदरावांच्या विनंतीवरून इंग्रजांनीं बडोदें घेण्याचे ठरविलें. तेव्हां फत्तेसिंग इंग्रजांशीं तह करण्यास कबूल झाला. या तहानें इंग्रजांनीं दादासाहेबांमार्फत गोविंदराव व फत्तेसिंग यांचा समेट करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढें गोविंदरावांनें हा तह पाळला नाहीं. फत्तेसिंगानें ३००० स्वारांनिशीं दादांच्या चाकरीस रहावें; थोरले माधवराव पेशवे यांच्याशीं केलेल्या कराराप्रमाणें, गोविंदरावासाठीं गुजराथेंत ३ लक्षांची जहागीर आतां त्यानें राखून ठेवू नये; कारण दादा हे दक्षिणेंत १० लक्षांची जहागीर गोविंदरावास देण्यास कबूल होते. फत्तेसिंगाने दादांनां २६ लक्ष रूपये द्यावे व त्यानें भडोचच्या वसूलावरील आपले हक्क व दुसरी कित्येक खेडीं इंग्रजांस द्यावी असें या तहान्वयें ठरलें. या तहानें इंग्रजांचा पुष्कळ फायदा झाला. पुरंदरच्या तहांत (१७७६) असें एक कलम होतें कीं, पेशव्यांच्या संमतीशिवाय गायकवाडास आपला मुलुख दुस-यास तोडून देतां येत नाहीं; तसें सिध्द झाल्यास, इंग्रजांनीं फत्तेसिंगाचा मुलुख त्यास परत द्यावा.

शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड १
शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड भाग २
शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड भाग 3
शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड भाग ४
Leave a comment