शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड भाग 3

Discover Maharashtra 2

शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड भाग 3

आपण पेशव्यांचे अंकित आहोंत हें फत्तेसिंग कबूल करी, परंतु त्यांच्या संमतीवांचून आपणांस आपला मुलुख दुस-यास देतां येत नाहीं हें मात्र त्यास मान्य नव्हतें. आपण मुलूख परत द्यावा हें त्याचें देखील इंग्रजांपाशी मागणे होतें. परंतु याचें कारण तो असें सांगे कीं, ज्याकरितां हा मुलूख इंग्रजांस दिला तें कार्य राघोबादादा हे साध्य करूं शकले नाहींत. म्हणून तो प्रांत इंग्रजांनां देण्याचें आतां कांही प्रयोजनच राहिलें नाहीं. पुढें (१७७८) त्यानें पेशव्यांनां मागील सर्व बाकी, साडे दहा लक्ष रूपये खंडणी व ५ लक्ष रूपये नजर देऊन सेनाखासखेलीचीं वस्त्रें मिळविलीं. त्यामुळें गोविंदरावाचा हक्क कायमचा नष्ट झाला.
फत्तेसिंगानें गॉडर्ड याशीं तह करून, पेशव्यांशीं चाललेल्या तत्कालीन युद्धांत त्याच्या मदतीस ३००० फौज देण्याचें कबूल (२६ जाने. १७८०) केलें. तथापि युध्द चाललें असतांहि गायकवाडानें आपली शिरस्त्याची खंडणी पेशव्यांस देण्याचें बंद करूं नये अशीहि एक अट होती.

यावेळीं इंग्रजानें त्याला महीच्या उत्तरेकडील प्रांत देण्याचें कबूल केलें व त्याबद्दल त्यानें इंग्रजांनां सुरत व भडोच प्रांत दिले; आणि वर सांगितल्याप्रमाणें फत्तेसिंग हा इंग्रजांचा हस्तक बनला. पुढें इंग्रजांनीं पेशव्यांशीं तह केला (१७८१), त्यांत फत्तेसिंगाजवळ असलेला मुलुख तसाच असावा, त्यानें पेशव्यांनां नेहमींप्रमाणें खंडणी द्यावी असें ठरलें. यापुढें मरेपर्यंत फत्तेसिंगानें राज्य सुरळीतपणें चालविलें.

शेवटीं (१७८९ डिसेंबर २१) फत्तेसिंग आपल्या वाड्याच्या वरच्या मजल्यावरून खाली पडून मरण पावला. मरेपर्यंत फत्तेसिंग हा सायजीचा मुतालिकच होता. त्याच्या मरणाच्या वेळीं त्याचा धाकटा भाऊ मानाजी हा बडोद्यासच होता. त्यानें लागलीच सयाजीस आपल्या ताब्यांत घेऊन जहागिरीचा अधिकार बळकाविला. या वेळीं गोविंदराव हा पुण्याजवळ अज्ञातवासांत रहात होता. त्यानें संस्थानचा अधिकार आपणांस मिळावा अशी नाना फडणविसास विनंति केली. परंतु मानाजीनें पुणें दरबारास ३३,१३,००१ रूपये नजर करून व फत्तेसिंग गायकवाडाकडे राहिलेल्या ३६ लाखांची मागील बाकीची भरपाई करण्याचें अभिवचन देऊन आपला अधिकार कायम करविला. हें पाहून महादजी शिंद्यांनीं गोविंदरावाची बाजू घेऊन मानाजीची नेमणूक पेशव्यांकडून रद्द करविली. तेव्हां मानाजी इंग्रजांकडे गेला व गॉडर्ड व फत्तेसिंग यांच्या तहाच्या आधारावर त्यांनीं आपणांस मदत करावी असें म्हणूं लागला; परंतु सालबाईच्या तहानें मागचा तह रद्द झाला असें सांगून इंग्रजांनीं ह्या वादांत पडण्याचें नाकारलें.

नान फडणवीस तडजोड करण्यास तयार होते; पण गोविंदरावाच्या हट्टामुळें तडजोड झाली नाहीं. इतक्यांत एकाएकीं (१ ऑगष्ट १७९३) मानाजीचें देहावसान झालें. मानाजी मेला तरी गोविंदरावास बडोद्यास जाण्याची परवानगी मिळाली नाहीं. पुण्यांतील कारभारीमंडळ गोविंदरावास म्हणूं लागले कीं तुम्ही पूर्वीच्या सर्व अटी कबूल करून शिवाय सन १७८० सालीं इंग्रजांनां देऊं केलेला तापीचा दक्षिणेकडील स्वतःचा प्रदेश व सुरतच्या वसूलांतील आपला वांटा सरकारांत द्या. इंग्रजांनीं यावर हरकत घेतली कीं, सालबाईच्या तहान्वयें गायकवाडाचें कोणतेंहि काम न केल्यामुळें त्यांचा मुलूख घेण्याचा पेशव्यांस अधिकार नाहीं. पुढें गोविंदराव बडोद्यास गेला. तेथें त्याला खंडेरावाचा मुलगा मल्हारराव याच्याशीं लढाई करावी लागली; तींत मल्हारराव पराभव पावला व गोविंदराव सयाजीचा मुतालिक म्हणून राज्यकारभार पाहूं लागला.

आबा शेलूकर नांवाचा इसम गुजराथेंत पेशव्यांतर्फे सुभेदार होता. तो दौलतराव शिंद्याकडे गेला असता तेथें त्यास कैद करण्यांत आलें. हें कृत्य रावबाजीच्या सांगण्यावरून झालें. त्यांत गोविंदरावाचा हात होता. परंतु शेलूकरानें दहा लाख रूपये देण्याचा दौलतरावाशीं करार करून आपली सुटका करून घेतली व परत येऊन तो अहमदाबादचा कारभार पाहूं लागला. शेलूकर हा नाना फडनाविसाच्या पक्षाचा असल्यामुळें बाजीरावानें गुप्तपणें गोविंदरावास त्याच्या विरूध्द पुन्हां उठविलें. याच सुमारास शिंद्यानेंहि रकमेच्या भरपाईचा तगादा लावल्यामुळें शेलूकरानें गायकवाडाच्या कांही गांवांपासून पैसा उकळला. त्यामुळें दोघांमध्यें पुन्हां भांडणें सुरू झाली. इ. स. १७९९ सालीं सुरतचा नबाब मरण पावला. तेव्हां सुरतेच्या चौथाईचा गायकवाडाचा हिस्सा प्राप्त करून घ्यावा असा इंग्रजांनीं मनसबा ठरविला व त्याप्रमाणें त्यांनीं गोविंदरावास विनंति करून तो हक्क तर मिळविलाच; परंतु त्याबरोबर चौ-याशी जिल्हाहि आणखी पदरांत पाडला.

वास्तविक १७९३ सालीं पेशव्यांनां जशी या सुरतेच्या हक्काबद्दल इंग्रजानीं हरकत घेतली तशी या वेळेस पेशव्यांनांहि घेतां आली असती. पण पेशवे सध्या निर्बळ झाले होते. या देणगीबद्दल इंग्रजांनां गोविंदरावानें शेलुकराविरूध्द मदत मागितली पण इंग्रजांनीं त्याबद्दल टाळाटाळच केली. तथापि थोडक्याच दिवसांनीं अहमदाबाद गायकवाडच्या हातीं आलें, आबा शेलूकर कैद झाला व पेशव्यांनीं गायकवाडास आपला गुजराथेंतील हिस्सा वार्षिक पांच लाख रूपयांवर पांच वर्षांकरितां इजा-यानें दिला (१८०० ऑक्टोबर). इकडे गोविंदराव सप्टेंबरांतच मरण पावला. त्याच्या मागून त्याचा मुलगा कान्होजी हा मुतालकीचा कारभार पाहूं लागला. परंतु त्याच्या उद्दाम वागणुकीनें थोड्याच दिवसांत आरबसैन्यानें त्याला पदच्युत करून आनंदराव (त्याचा भाऊ) यास कारभारी केलें. त्यामुळें आनंदराव व त्याचा चुलता मल्हारराव यांत वैर माजलें. तेव्हां आनंदरावाचा दिवाण रावजी आप्पाजी यानें इंग्रजांकडे मदत मागितली व ती त्यांनीं दिली. यावेळीं सर्व सत्ता आरबांच्या हाती गेली होती.

इंग्रजांच्या मदतीनें आनंदरावानें मल्हाररावाचा पराभव करून त्याला नडियादकडे (कडी प्रांतांत) कांही जहागीर दिली. या सुमारासच गणपतराव व मुरारराव गायकवाड यांनीं बंडाळी माजविली होती. त्यांचा पराभव होऊन ते धार येथें पळून गेले. या दोन तीन प्रसंगी केलेल्या मदतीबद्दल इंग्रजांनीं आपली तैनातीफौज गायकवाडावर रावजीआप्पाजीच्या तर्फे लादली; व तिच्या खर्चासाठीं बराचसा प्रांत घेतला; तसेंच स्वारीखर्चाबद्दलहि भरपूर पैसा मिळविला. लागलीच डंकन (गव्हर्नर) यानें रावजीशीं त्यानें केलेल्या या गोष्टींबद्दल गुप्त तह करून त्याचें व त्याच्या वंशजांचें रक्षण करण्याचें वचन दिलें. पुढें. (१८०२). गायकवाडांचें आरबसैन्य काढून टाकण्याबद्दल इंग्रजांनीं आनंदरावास लकडा लाविला. परंतु आपली बाकी दिल्याशिवाय आरब जाईनात. उलट त्यांनी आनंदरावास कैद केलें. तेव्हां इंग्रजांनीं त्याची सुटका करून आरबांची रक्कम देऊन टाकून टाकून त्यांनां काढून लाविलें. यानंतर कान्होजीनें बंड उभारलें पण तें इंग्रजांनीं मोडलें व तो उज्जनीकडे पळून गेला. इतक्यांत मल्हाररावानें पुन्हां उचल केली. पण विठ्ठलराव नांवाच्या सरदारानें त्याला कैद करून त्याचें बंड मोडलें. रावजी आप्पाजीनें गायकवाडीराज्याची सर्व सत्ता इंग्रजांच्या ताब्यांत दिल्यानें, प्रजा त्याला घरभेद्या म्हणूं लागली. परंतु इंग्रज म्हणतात कीं त्यानें दूरवर दृष्टी देऊन योग्य मार्ग स्वीकारला. यापुढें काठेवाड आपल्या ताब्यांत असावा अशी हांव इंग्राजांस उत्पन्न होऊन त्यांनीं गायकवाडाशीं १८०५ त तशा प्रकारचाएक तहहि केला.

शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड १
शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड भाग २
शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड भाग 3
शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड भाग ४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here