महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 83,96,428

शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड १

By Discover Maharashtra Views: 2745 4 Min Read

शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड १

दमाजी गायकवाड- या गायकवाडांचें मूळ गांव पुणें जिल्ह्यांत धावडी हें होय. या घराण्याचा पूर्वज दमाजी हा खंडेराव दाभाड्याच्या सैन्यांतील एक सरदार होता. इ.स. १७२० मध्यें बाळापूर येथें निजामाशीं झालेल्या लढांईत दमाजीनें विशेष नांवलौकिक मिळविल्यामुळें खंडेरावाच्या शिफारसीवरून शाहू महाराजांनीं त्याला समशेर बहाद्दर असा किताब देऊन त्याची सेनापतीच्या मुतालिकीच्या जागीं नेमणूक केली. दमाजी हा १७२० त मरण पावला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुतण्या (जनकोजीचा पुत्र) पिलाजी याची नेमणूक झाली (१७२१). पिलाजी हा खानदेशांत नवापूर येथें प्रथम रहात होता. परंतु पोवारांनीं हरकत घेतल्यामुळें त्यानें सोनगड येथें किल्ला बांधून तेथें आपलें ठाणें दिलें. हें ठिकाण बरेच दिवस गायकवाडांची राजधानी होतें. पिलाजीनें राजपिंपळ्याच्या राजाच्या मदतीनें १७२० त प्रथम सुरत प्रांतावर स्वारी केली व चौथ मिळविली व अहमदाबाद येथें आपला गुमास्ता ठेवला.

इ. स. १७२४ मध्यें पिलाजीनें गुजराथचा नायब सुभेदार हमीदखान यास सरबुलंदखानाच्या (नवीन सुभेदार) विरूध्द मदत करून, त्याच्याकडून मही नदीच्या पूर्वेकडील मुलखांत चौथ बसविण्याचा हक्क मिळविला. पुढें १७२५ सालीं पिलाजीनें पुन्हां हमीदखानास मदत करून अहमदाबादेजवळ अदालेदजी येथें सरबुलंदचा पराभव केला. तेव्हां पिलाजीशीं सख्य ठेवण्याकरितां सरबुलंदानेंहि गुजराथेंत चौथ बसविण्याचा अधिकार त्यास दिला. कंठाजीकदम बांडे यानेंहि हमीदखानास मदत केली होती. त्यामुळें चौथाईबद्दल त्यालाहि कांही हक्क मिळाले होते. त्या संबंधांत पिलाजी व कंठाजी या दोघांत तंटे माजले. त्याचा निकाल हमीदनें लावला. कंठाजीनें महीच्या पश्चिमेकडील व पिलाजीनें पूर्वेकडील प्रांतांची चौथ गोळा करावी असें ठरलें. नंतर पिलाजी सोनगडास गेला. पुढें सरबुलंद यानें गुजराथची सरदेशमुखी व चौथाई थोरले बाजीरावासच दिली (१७३१). बाजीराव व दाभाडे यांच्यांत डभई येथें युध्द झालें, त्यांत पिलाजी दाभाड्यांकडून लढत होता. या युद्धांत बाजीरावाचा सरदार आवजी कवडे याचा पिलाजीचा मुलगा दमाजी यानें पराभव केला.

डभईच्या लढाईंत पिलाजीचा एक मुलगा मारला गेला व पिलाजीहि जखमी झाला. पुढें यशवंतराव दाभाड्यास सेनापतीचीं वस्त्रें मिळालीं, तेव्हां पिलाजीस त्याच्या मुतालकीच्या जागीं कायम करण्यांत येऊन ‘समशेरबहाद्दर’ या किताबाशिवाय सेनाखासखेल हा नवीन किताब त्यास देण्यांत आला. डभईच्या लढाईच्या वेळीं डभई व बडोदें हीं दोन्हीहि शहरें पिलाजीच्या ताब्यांत होतीं. सरबुलंदखानानें मराठ्यांस चौथाई सरदेशमुखीच्या सनदा करून दिल्यामुळें बादशहाची त्याच्यावर खप्पामर्जी होऊन त्याच्या जागीं जोधपूरचा राजा अभयसिंग याला गुजराथच्या सुभेदारीचें काम देण्यांत आलें. अभयसिंगानें थोड्याच दिवसांत बडोद्याचा किल्ला मराठ्यांकडून काबीज केला. परंतु पिलाजीनें इतरत्र बरेच जय मिळवून कित्येक मुख्य मुख्य ठाणीं बळकाविली होती, म्हणून अभयसिंगानें पिलाजीशीं कायमचे करारमदार करून टाकण्यासाठीं त्याच्याकडे आपले वकील पाठविले व त्यांच्याकरवीं डाकोर येथें त्याचा एके दिवशीं विश्वासघातानें खून केला (१७३२).

पिलाजीच्या मृत्यूमुळें अभयसिंगास कांहीच फायदा झाला नाहीं. कारण पिलाजीचा दोस्त पाद्य्राचा (बडोद्याजवळील एक गांव) देसाई दिल्ला याच्या चिथावणीवरून सर्व देशभर कोळी व भील लोकांनीं बंड केलें. अभयसिंगाचें सैन्य त्यांचें बंड मोडण्यांत गुंतलें आहे असें पाहून पिलाजीचा भाऊ महादजी (हा जंबूसर बळकाऊन बसला होता) यानें बडोद्यावर स्वारी करून तें घेतलें (१७३२). येथपासून बडोदें ही गायकवाडांची राजधानी झाली. पिलाजीचा वडील मुलगा जो दमाजी त्यानेंहि याच सुमारास सोनगडाहून निघून गुजराथेंतील पश्चिमेकडचे बरेच मुख्य मुख्य जिल्हे पादाक्रांत केले. त्याच्या स्वा-या जोधपूरपावेतों जेव्हां जाऊं लागल्या तेव्हां आपल्या दुय्यम अधिका-याच्या स्वाधीन अहमदाबाद करून अभयसिंग हा जोधपूरच्या रक्षणार्थ तिकडे निघून गेला (१७३२).

पुढें दमाजीनें कंठाजी कदम वांडे यास गुजराथेंतून हांकून लावलें (१७३४); म्हणून कंठाजीनें पुढच्या सालीं मल्हारराव होळकरासह गुजराथेंत अकस्मात स्वारी करून बनास नदीपावेतों खंडण्या वसूल केल्या व ईदर, पालनपूर वगैरे कित्येक शहरें लुटलीं. या स्वारीनंतर लवकरच गुजराथच्या सुभेदारीचें काम अभयसिंगाकडून काढून नजीब उद्दौला मोमीनखान याच्याकडे देण्यांत आलें. पण अभयसिंगाच्या वतीनें गुजराथचा कारभार पहाणारा नायब सुभेदार हा अहमदाबाद सोडण्यास तयार नव्हता. तेव्हां मोमीनखानानें त्याला हांकून लावण्याकरितां दमाजीची मदत घेतली (१७३५). व ते दोघे पगडीभाई झाले. याप्रमाणें अहमदाबाद हस्तगत झाल्यावर तेथील सत्ता व वसूल या दोघांनीं वांटून घेतली (१७३७). बाजीराव उत्तरेस गेला आहे असें पाहून दमाजीनें माळव्यांत स्वारी केली (१७४२).

शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड भाग २
शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड भाग 3
शूरवीर मराठा सरदार दमाजी गायकवाड भाग ४
Leave a comment