महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

नगरकर वाडा | Nagarkar Wada, Pune

By Discover Maharashtra Views: 2353 2 Min Read

नगरकर वाडा | Nagarkar Wada, Pune –

बुधवार पेठेतील तापकीर गल्ली इथे एक आगळावेगळा आणि सुंदर असा १३४ वर्ष जुना वाडा आहे. तो दगडी वाडा या नावाने प्रसिद्ध आहे. हा वाडा इ.स. १८९० मध्ये रघुनाथ नगरकर यांनी बांधला. तो नगरकर वाडा किंवा रघुनाथ दाजी निवास या नावाने सुद्धा ओळखला जातो. या वाड्याच्या बांधकामात मराठा, व्हेनिशियन आणि गॉथिक शैलीचा अंतर्भाव केलेला दिसून येतो. हा वाडा २ मजली असून मोठा आणि सुंदर दिंडी दरवाजा आहे. सजावट केलेल्या कमानीच्या मध्यभागी गणपतीचे शिल्प आहे. आतल्या बाजूला मोठे अंगण आहे.

नावाप्रमाणेच हा दगडी वाडा पूर्णपणे विटाच्या विरूद्ध म्हणजे दगडाने बनविला गेला आहे, जो नियमितपणे बांधकामात वापरला जातो. संपूर्ण वाड्यात दगडी नक्षीकाम आणि फुले कोरलेली आहेत. वाडा अंदाजे चार हजार चौरस फूट जागेत बांधला आहे. वाड्याचे बांधकाम वैशिट्यपूर्ण असून या बांधकामात कमानी, त्रिदळी कमानी, एकमेकांत गुंफलेले खांब, दिंडी दरवाजाची व्हिक्टोरियन पद्धतीची कमान, तिचे खांब आणि कंगोरे, उत्तम लाकडाचा परंतु भारतीय पद्धतीशी नाते सांगणारा दरवाजा, दरवाजाच्या वर उजव्या व डाव्या बाजूस कोपऱ्यात कमलाकार पद्धतीचे नक्षीकाम, कमानीच्या की-स्टोनवर कोनाडा, त्यात विघ्नहर्ता श्री गणेश, मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूस त्रिदली इंग्रजी शैलीचे गवाक्ष, कमानीवरील एडक्याची मुखे, जाळीदार नक्षीकाम, यक्षमुख वा कीर्तिमुख, खांबावरील सिंहमुख, अस्वल मुख, चित्याचे मुख यासारखी शिल्पे बघायला मिळतात. मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस देवड्या, दिवाणखान्यात जाण्यासाठी जिना, चुन्यातील नक्षीयुक्त पट्टया, पाने-फुले, पोपट, माकड यांच्या आकृत्या, या शिवाय वाड्यात एकूण दोन चौक असून त्यात ४७ खोल्या आहेत, तसेच ३२ x १६ फूट आकाराचा दिवाणखाना बघण्यासारखा आहे.

सध्या वाड्याची दुरावस्था झालेली आहे. वाड्याचा मागचा भाग पुर्ण कोसळलाय. वरच्या मजल्यावरचं छतही पडायला आलेलं आहे. रघुनाथ नगरकरांच्या निधनानंतर या वाड्याची देखभाल त्यांचे चिरंजीव हरी नगरकर पहात असत. पुढे हरी यांच्या निधनानंतर या वाड्याला भारतीय पुरातत्व खात्याने, तसेच पुणे महानगरपालिकेने वारसास्थळाचा प्रथम श्रेणीचा (Grade-1) दर्जा दिला आहे. या वाड्यास न्या. महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, ना. गोपाल कृष्ण गोखले, सोनोपंत दांडेकर यांचे पाय लागले आहेत. पुणे नगर वाचन मंदिर आणि पूना सार्वजनिक सभा ही सामाजिक संस्थाही याच वाड्यात सुरू करण्यात आली होती.

पत्ता : https://maps.app.goo.gl/oF7DYxQs7r2NAnja9

आठवणी इतिहासाच्या

Leave a comment