महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

लाकुड नव्हे हा दगड आहे

By Discover Maharashtra Views: 2354 2 Min Read

लाकुड नव्हे हा दगड आहे –

वेरूळ लेण्यातील ३२ क्रमांकाच्या लेणीत स्तंभावरील हे नक्षीकाम नजरेस पडले आणि पाय अक्षरश: थिजलेच. पर्णयुक्त घटाचे शिल्प खुप ठिकाणी पहायला मिळते. त्यावर उत्तम नक्षीकामही केलेले असते. पूर्ण कलशास स्त्री गर्भाचे प्रतिक मानले जाते. हे मंगल प्रतिक आहे. पूर्ण कलश म्हणजेच पाण्याने भरलेला, त्यावर पर्ण आणि या कलशास हार, रत्नांच्या माळांनी शृंगारलेले असते.(लाकुड नव्हे हा दगड आहे)

वेरूळच्या या स्तंभावर प्राचीन मांगल्य संकल्पना प्रमाणे शिल्पांकन आहेच. पण मुख्य म्हणजे शिल्पकाराने कलाविष्कारासाठी स्वातंत्र्य घेत ज्या अप्रतिम पद्धतीने बारकावे कोरले आहेत ते थक्क करणारे आहेत. कलशाच्या मुखातून खाली लोंबलेली पाने आणि त्यांना समतोल करण्यासाठी सोन्याचा मोत्याचा गोफ अशा माळा बघत रहाव्यात अशा आहेत.

कलशावर पण नक्षी कोरलेली आहे. हे सगळं एका अखंड स्तंभाचा भाग आहे. सगळं दालनच एका दगडात कोरलेलं. चुकीला जागाच नाही. मंदिराच्या उभारणीत तरी एखादा दगड शिल्पकामात डावा वाटला तर बाजूला काढता येतो. लेणीत म्हणजेच लयन स्थापत्यात चुकीला जागाच नाही. हे लक्षात घेतलं म्हणजे या कामाचे मोल कळते. कलशाच्या चारही बाजूला खाली यक्ष किन्नरही कोरलेले आहेत. वेरूळचे वैशिष्ट्य म्हणजे भव्यता. पण कुठेही बोजडपणा नाही. कवेत येणार नाहीत असे रूंद आणि उंच खांबही विलक्षण सुंदर आहेत. कलात्मक दृष्ट्या नाजूक कलाकुसरीने मढलेले आहेत.

या लेण्यांच्या शिल्पकलेने वेडे होवून परत परत भेट देणार्‍यांची संख्या प्रचंड आहे. वेरूळ अजिंठ्याचा नाद लागला की माणूस “आषाढी कार्तिकी” वार्‍या करत राहतो. Vincent Pasmo  हा आमचा वेडावलेला फ्रेंच मित्र वर्षातून किमान एकदा तरी वेरूळची वारी करतोच. काही परदेशी पर्यटक तर तिथेच मुक्काम ठोकुन असतात. भारतीय भावा बहिणींना हात जोडून विनंती तूम्ही कैलास लेण्याशिवाय बाकीच्या सुंदर लेण्यांना किमान एकदा भेट द्या. शांतपणे लेण्या बघा. कुठून कुठे जाताना रस्त्यात वेरूळ लागलं म्हणून वचावचा पाहून पळून जावू नका.

छायाचित्र Travel Baba Voyage

– श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

Leave a comment