योग नरसिंह, मावळंगे

योग नरसिंह, मावळंगे

योग नरसिंह, मावळंगे –

भगवान विष्णूच्या चौथा अवतार असलेला नरसिंह आपल्याला माहिती असतो तो अत्यंत रौद्र आणि हिरण्यकशिपूचे पोट फाडून आतडी बाहेर काढणारा. याला विदरण नरसिंह असे म्हणतात. कराडजवळ असलेल्या कोळे नरसिंहपूर इथे त्याची अतिशय सुंदर रेखीव अशी मूर्ती पाहायला मिळते. तसेच बेलूर, हळेबिडू इथल्या मंदिरांवर सुद्धा या विदरण नरसिंहाच्या आकर्षक मूर्ती कोरलेल्या आहेत. या विदरण नरसिंहाशिवाय खांबातून बाहेर पडणारा स्थौण नरसिंह, नुसता उभा असलेला केवल नरसिंह, लक्ष्मीला आपल्या मांडीवर घेऊन बसलेला लक्ष्मी नरसिंह असे नरसिंहाच्या मूर्तीचे विविध प्रकार आहेत. याच प्रकारात मांडी घालून बसलेला आणि पायाला योगपट्ट बांधलेला अशी ‘योग नरसिंहाची’ मूर्तीपण असते.(योग नरसिंह, मावळंगे)

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या कोकणप्रांती, गर्दीपासून दूर ऐन झाडीमध्ये अशीच एक सुंदर योग नरसिंहाची मूर्ती वसलेली आहे. मुळातच कोकणात नरसिंहाचे स्वतंत्र मंदिर तर नाहीच आणि मूर्तीसुद्धा फारच कमी. इतक्या दुर्मिळ असलेल्या या देवतेची त्यातही दुर्मिळ असलेली मूर्ती कोकणात वसलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यात असलेल्या ‘मावळंगे-माखजन’ या गावी सुंदर नरसिंह मंदिर गर्द झाडीत वसलेले आहे. हे मावळंगे गाव स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे अध्यक्ष असलेल्या दादासाहेब मावळंकरांचे गाव. तसेच रियासतकार सरदेसाई हे देखील याच मावळंगे गावचे सुपुत्र. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर नजीक असलेल्या तुरळ यागावातून इथे जाण्यासाठी फाटा आहे. तुरळ-धामापूर-मावळंगे असा रस्ता आहे. हाच रस्ता पुढे माखजनला जातो.

या मंदिराबद्दल अशी कथा सांगतात की श्रीनृसिंहभट हे कौशिक गोत्री ब्राह्मण कोकणात आले. नृसिंहाचे दृष्टांत दिल्यानुसार ते इथेच स्थायिक झाले. त्यांचे नातू दुसरे नृसिंहभट यांना कोल्हापूरच्या शिलाहार राजा विजयार्क कडून संगमेश्वर हे गाव इनाम मिळाले. पुढे नृसिंहभटांचा मुलगा कृष्णाजी याने मावळंगे गावाचा भाग इनाम मिळवला. त्यानेच हे नृसिंह मंदिर बांधल्याचे सांगतात. नृसिंहभट यांचा मुलगा गोविंदभट यांना नृसिंहाने दृष्टांत देऊन सांगितले की तू पुणे जिल्ह्यातील नीरानरसिंगपूर इथे जाऊन साधना कर. त्यानुसार गोविंदभट नीरा नरसिंगपूरला १५ वर्ष राहिले आणि तिथे नृसिंहाची उपासना केली. त्यांना देव प्रसन्न झाले आणि तू परत मावळंगे इथे जाऊन रहा, तुला आयुष्यात कसलीच कमतरता पडणार नाही असे सांगितले.

देवाच्या आदेशावरून गोविंदभट मावळंगेला येताना वाटेत कोल्हापूरला थांबले. तेव्हा तिथे शिलाहार राजा विजयार्क राज्य करीत होता. याचा काळ इ.स. ११४३ ते ११९० असा आहे. या राजाने त्यांना संगमेश्वर आणि मावळंगे ही गावे इनाम दिली. त्यानंतर हे घराणे संगमेश्वर इथे राहू लागले. गोविंदभटांना जो मुलगा झाला त्याचे नाव नृसिंहभट असे ठेवले. यांना सन ११८६ मध्ये कृष्णभट हा पुत्र झाला. कृष्णभट मोठे झाले तेव्हा कोल्हापूर इथे शिलाहार भोजराजा राज्यावर आला होता. त्याने यांना विशाळगड आणि आजूबाजूच्या ७० गावांचा मोकासा दिला. त्यानंतर थोड्याच काळात शिलाहारांचे राज्य जाऊन यादवांचे राज्य या भागावर आले. यादवांचा राजा सिंघान हा कृष्णभट सत्यवादी यांचे कामावर आणि विद्वत्तेवर खुश झाला आणि त्याने या भागाची सरदेशमुखी किंवा सरदेसाईपण यांना दिले. तेव्हापासून यांचे आडनाव सरदेसाई पडले. मावळंगे इथे राहणारे म्हणून हे मावळंगकर हे आडनावही लावू लागले. लोकसभेचे पहिले सभापती दादासाहेब मावळंगकर तसेच प्रसिद्ध इतिहास संशोधक रियासतकार गो. स. सरदेसाई हे याच घराण्यातील आहेत.

गाभाऱ्यातील नृसिंहाची मूर्ती अतिशय देखणी आणि आकर्षक आहे. पायाला योगपट्ट बांधलेल्या स्थितीत नृसिंह बसलेले आहेत. त्यांच्या डाव्या मांडीवर लक्ष्मी विराजमान झालेली आहे. नृसिंहाच्या उजव्या खालच्या हातात कमंडलू असून वरच्या हातात चक्र आहे. वरच्या डाव्या हातात शंख धरलेला असून डाव्या खालच्या हाताने लक्ष्मीला आलिंगन दिलेले दिसते. अतिशय मोहक अशी ही मूर्ती आहे. मूर्तीच्या प्रभावळीमध्ये दशावतार कोरलेले असून दशावतारांचा क्रम उजवीकडून डावीकडे असा कोरलेला आहे. दशावतारातील सुंदर बाब अशी की मत्स्य आणि कूर्म अवतार हे मानवी रुपात दाखवलेले आहेत. देवाला करंडमुकुट दाखवलेला असून त्याच्यावर नागाचा फणा कोरलेला आहे. अजून एक वैशिष्ट्य म्हणजे योगासनात बसलेल्या देवाच्या मांडीवर लक्ष्मी विराजमान असून ही अगदी मराठमोळ्या दागिन्यांनी नटलेली आहे. नऊवारी साडी नेसलेल्या देवीच्या केसांचा अंबाडा बांधलेला आहे. त्यात मूद, अग्रफूल, केवडा, केतकी, शिवाय बुगड्या, नाकात नथ असे दागिने आहेत. गळ्यात दोन वाट्यांचे मंगळसूत्र आणि पुतळ्यांची माळ अशा अलंकारांनी ही देवी नटलेली आहे.

इतकी वैशिष्ट्यपूर्ण नृसिंहाची मूर्ती याठिकाणी विराजमान झालेली आहे. इथे आल्यावर चहुबाजूंनी असलेली गर्द झाडी, मंदिरापर्यंत उतरणारी जांभ्या दगडाची पाखाडी आणि त्यात असलेले हे मनोरम मंदिर पाहून इथून हलूच नये असे वाटते. मंदिराचा सध्या जीर्णोद्धार जरी झालेला असला तरीसुद्धा मूळ गाभारा आणि त्याचा दरवाजा हा जुनाच ठेवलेला आहे. इतक्या आडबाजूला एवढी सुंदर मूर्ती बघायला मुद्दाम वाकडी वाट करूनच जायलाच हवे.

आशुतोष बापट

1 COMMENT

  1. बापट सर खुप सुंदर माहिती दिली आहे आपण .आपला इतिहास जगासमोर यायला पाहिजे.संस्क्रुती टिकली पाहीजे. मी देखील धामापूरच्या इतिहासाबद्दल लिखान करत आहे. क्रुपया मला मार्गदर्शन करावे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here