आग्रा ते राजगड!

आग्रा ते राजगड!

आग्रा ते राजगड! अर्थातच शिवरायांची आग्र्याहून सुटका!!

पुस्तक लेखमाला क्रमांक २३ –

१६५९ च्या अफजलखान वधाच्या प्रसंगानंतर छत्रपती शिवाजी महाराजांवर आलेला सर्वात मोठा जीवघेणा प्रसंग म्हणजेच आग्रा भेट आणि त्यातून केलेली धाडसी सुटका! त्यामुळे ही घटना मराठयांच्या इतिहासात खूप महत्वाची आहे असे म्हणल्यास अजिबात वावगे ठरणार नाही. म्हणजेच अफझलखान प्रकरणानंतर तब्बल ६ वर्षानंतर हा प्रसंग घडला  आणि या ६ वर्षामध्ये स्वराज्यात बऱ्याच महत्त्वाच्या घडामोडी ही झाल्या होत्याच. आदिलशाही खिळखिळी होणाच्या मार्गावर होती.तसेच अनेक गड किल्ले स्वराज्यात सामील झाले होते. हे सर्व मुघल सम्राट औरंगजेब च्या नजरेत खुपत होतेच.दख्खन  वर हल्ला करून हे सर्व किल्ले मुघलांना परत मिळविण्यासाठी मग औरंगजेब ने योजना आखून आपल्याकडील मिर्झा राजे जयसिंग यांना या मोहिमेसाठी पाठविले.(आग्रा ते राजगड!)

मिर्झा राजेंनी अचूक अभ्यास करून शिवरायांनी मिळविलेले किल्ले परत जिंकायला सुरुवात केली. हे जात असलेले किल्ले  पाहून कुठे तरी हे थांबवणे गरजेचे आहे आणि स्वराज्याचे अधिक नुकसान न व्हावे यासाठी शिवरायांनी मग मुघलांशी ३ महिन्यांनी तह करण्याचे योजिले.

या सुप्रसिद्ध अश्या “पुरंदर” तहानुसार मग मुघलांना स्वराज्यातील एकूण २३ किल्ले,४ लाख होनाचा मुलुख, संभाजी राजांना पंचहजारी मनसबदारी आणि औरंगजेब च्या ५० व्या वाढदिवसाला आग्रा दरबारात भेट घेण्यास भाग पाडले गेले. त्यावेळेस दुसरा काहीच पर्याय नसल्याने पण सुरक्षेची हमी घेऊन शिवरायांनी या अटी मान्यही केल्या.

त्यानंतर ३६ वर्षीय शिवराय आपल्या ९ वर्षेच्या शंभूराजे आणि निवडक ५०० मावळ्यांच्या निशी दिनांक ५ मार्च १६६६ ला आग्राला निघाले. आग्रा ला जाताना ते बुऱ्हाणपूर मार्गे गेले. तिथे पोहचल्यावर त्यांची उत्तम बडदास्त राखली गेली. पण ऐन वाढदिवसाच्या दिवशी (१२ मे १६६६)त्यांना दरबारात अपमानास्पद वागणवूक दिली गेली. त्यानंतर त्यांना नजरकैदेत ठेवले गेले. मात्र हळूहळू ही नजरकैद अक्षरशः जीवघेणी ठरत गेली. त्यात शिवरायांना मारण्याची योजना बनवली गेल्याची कुणकुण लावल्याने त्यांनी तिथून निसटण्याचा बेत आखला. मग आजारी आहोत असे दाखवून मिठाई पाठविली गेली.

त्यानंतर योग्य संधी साधून शिवराय आणि सोबतीला असलेल्या शंभूराजे आणि इतर मावळ्यांनी वेषांतर करून आग्रा शहरातून निसटण्यात यश मिळविले.(२०ऑगस्ट १६६६).येथून मग वेषांतर करून शिवराय तब्बल ९० दिवसांनी स्वराज्यात किल्ले राजगडावर पोहचले आणि स्वराज्यात आनंदाची दिवाळी साजरी झाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजीराजे यांनी औरंगजेबाच्या कैदेतून आग्रा येथून अत्यंत हुशारीने करून घेतलेल्या सुटकेची इतिहास नोंद असलेली तारीख आहे १७ ऑगस्ट १६६६. त्यांनतर थोड्याच दिवसांनी पाठोपाठ शंभूराजे ही किल्ले राजगडावर पोहचले.

हा वर दिलेला अत्यंत संक्षिप्त इतिहास आपण सर्वजण  जाणतोच किंवा अनेक पुस्तकांमध्ये वाचला ही असेलच!

छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या नजरकैदेतून आग्रा येथून करून घेतलेली सुटका हि शिवचरित्रातील अत्यंत महत्वाची घटना!या संदर्भात इतिहासकारात विविध मतमतांतरे आहेत. सुटकेच्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेले योग्य नियोजन,बहिर्जी नाईक तसेच त्यांचे गुप्तहेर यांनी बजावलेली अचूक कामगिरी,मोगल सरदारांना भेटवस्तू देऊन गाफील ठेवण्याचे केलेले राजकारण आणि सुटकेचा घेतलेला धाडसी निर्णय यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूवर प्रकाश पडतो.औरंगजेबाच्या देखरेखी खाली लिहून पूर्ण झालेल्या महमद काजम या लेखकाच्या “आलमगीरनामा” या ग्रंथात या पेटाऱ्याचा उल्लेख येत नाही तर महाराज वेषांतर करून निघून गेले असा उल्लेख आढळतो.

अशा विविध नोंदी पाहता छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या मगरमिठीतुन कसे निसटले यापेक्षा एवढा प्रचंड पहारा असताना सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून ते कैदेतून अलगद बाहेर पडले हे महत्वाचे आहे .परतीच्या मार्गात जवळपास १५०० मैलाचा प्रवास करून शिवराय आग्र्याहून निघून किल्ले राजगडी पोहोचले.

या सर्वात एक महत्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे किल्ले सिंधुदुर्ग बांधणी. छत्रपती शिवराय आग्र्याला कैदेत जरी होते ,तरी इकडे स्वराज्यात किल्ले सिंधुदुर्ग पूर्ण बांधणी केला गेला.तसेच बाकीची राज्यव्यवस्था अगदीच चोख होती. छत्रपती शिवराय आणि आऊसाहेब जिजाबाई यांनीच हा परिपाठ घालून दिला होता अनेकांना!

शिवरायांच्या या आग्रा भेट प्रकरणासंबंधी जशी मराठी साधने उपलब्ध आहेत त्याप्रमाणे इतर भाषेतील “समकालीन” साधने देखील उपलब्ध आहेत. त्यापैकी महत्वाच्या नोंदी १९६६ साली सर जदुनाथ सरकार यांनी  ‘Shivaji’s Visit to Aurangzib at Agra’ या ग्रंथात समाविष्ट केले आहेत.  एकूण ६८ पत्रे यात समाविष्ट असून यात मुख्यत्वे परकालदास आणि कल्याणदास या राजस्थानी अधिकाऱ्यांमधला हा पत्रव्यवहार आहे. यातूनच आग्र्यातील दैनंदिन घडामोडी दक्षिणेत मिर्झाराजांना  समजत होत्या.

तसेच याच विषयावर अलीकडेच मूळ इंग्रजीत असलेला “shivajis visit to agra” या डॉ. केदार फाळके लिखित महत्त्वाच्या संदर्भ ग्रंथाचे श्री विद्याचरण पुरंदरे यांनी मराठीत भाषांतर केलेले “समरधुरंधर” हा एक अतिशय माहितीपूर्ण ग्रंथ आहे. यात त्यांनी १६३६ पासून ची स्वराज्याची हालचाल आणि एकूणच आग्रा प्रकरणामागील पार्श्वभूमी अतिशय सोप्या भाषेत मांडलेली आहे.

संदर्भ ग्रंथ नसला तरीही वारकरी संप्रदायातील एक श्री कुलदीप देसाई यांनी आग्रा ते राजगड अशी तब्बल १५०० किलोमीटर ची पायी पदयात्रा आपल्या २४ साथीदारांना सोबत घेऊन करून , त्यांना आलेले काही अनुभव त्यांनी “आग्रा ते राजगड” या पुस्तकात लिखित केलेले आहेत.तब्बल ३ महिन्यांच्या या पदयात्रेत त्यांना आलेले अनेक अनुभव वाचताना आपण ही शिवकाळात निघून जातो. अर्थातच त्यांनी केलली पदयात्रा ही चांगल्या रस्त्यामार्गे होती. पण शिवराय आग्रा मार्गे किल्ले राजगडी निसटून आलेल्या गरुड झेपेचा मार्ग अजूनही अनुत्तरीतच आहे हे मात्र आपल्याला मान्य करावेच लागेल!!

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रांचा अभ्यास करताना मला हे महत्वाचे संदर्भ ग्रंथ इथे आपणासाठी उधरोत करावेसे वाटतात.आपणही अजून काही महत्वाचे संदर्भ ग्रंथ असल्यास त्यातून माहिती मिळवून अभ्यास करत राहावे हाच या लेखमागील उद्देश.

पुढील लेखमालेत आपण शिवचरित्राच्या संबंधित असलेल्या महत्वाच्या साधनांचा धांडोळा घेणार आहोत.आपणही योग्य संदर्भ ग्रंथ वाचन करीत राहावे आणि योग्य माहितीचे आकलन करीत राहावे हाच या लेखामागील एकमेव उद्देश!!

बहुत काय लिहिणे?अगत्य असू द्यावे.

किरण शेलार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here