महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,82,818

विजापूर साधनातील अफझलखान वधाच्या नोंदी

By Discover Maharashtra Views: 8529 14 Min Read

अफझलखानाचा वध

( विजापूर साधनातील अफझलखान वधाच्या नोंदी )

मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी शके १५८१ म्हणजे १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज्यांनी नरसिंह अवतार घेऊन दैत्यरुपी हिरण्यकश्यपू अफझलखान नावाचा ३२ दातांचा बोकड फाडला . विजापूर सरदार अब्दुलाखान भटारी म्हणजेच अफझलखान . अफझलखान स्वराज्यात का चालून आला होता विजापूरच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कि विजापूरच्या सीमा वाढवण्यासाठी . शिवाजी महाराजांना कैद करण्यासाठी कि मारण्यासाठी . विजापूर अलीआदिलशहाच्या मनात शिवाजी महाराजांन बद्दल नक्की काय भावना होती. शिवाजी महाराजांविरुद्ध कोणते कट करण्यात करण्यात येत होते याचे उत्तर विजापूरच्या दरबारातील समकालीन असलेल्या लेखकांनी लिहिलेल्या साधनातील अफझलखान वधाच्या नोंदीतून दिसून येते त्याचा आढावा घेऊ.(अफझलखानाचा वध)

अफझलखानाच्या कौर्याचा आणि दगलबाजीच्या घटनांचा एक आढावा. अफझलखानाला आपल्या शक्ती व कौर्यावर गर्व होता त्याने विजापूर पासून जवळ असलेल्या अफझलपूर या आपल्या गावी एक शिलालेख कोरला आहे त्यात तो स्वतःचे वर्णन करतो.

कातिले मुतमरीदान काफ़िरान , शीक्न्नन्दा – इ – बुतान

अर्थ :- काफ़िरांचि व बंडखोरांची कत्तल करणारा आणि पायापासून मूर्ती उखडून टाकणारा

दिन दार क्रूर्फाशिकन ! दिन दार बुतशिकन !

अर्थ :- मी काफिरांचा संहार करणारा माझ्या धर्माचा सच्चा सेवक आणि अन्य धर्माच्या मूर्तीचा भंग करणारा आहे

अफझलखानाच शिक्का देखील त्याच्या गर्वाची साक्ष देतो

गर अर्ज कुदन सिपिहर अअला

फजल फुजला व फजल अफजल

अज हर मलकी बजाए तसबीह

आवाज आयद कि अफजल अफजल

अर्थ :- उच्चातल्या उच्च स्वर्गाला विचारणा केली कि सामान्य माणूस आणि अफझलखान यांच्यात कोण श्रेष्ठ आहे तर जपमाळेतूनही आवाज येईल अफझल अफझल

संदर्भ :- समरधुरंधर :- विद्याचरण पुरंदरे

अफझलखानाच्या दगलबाजीचा इतिहास

औरंगज़ेब आणि विजापूर सरदार अफझलखान व वझीरखान महंमद यांच्यात युद्ध चालू होते. या युद्धात औरंगजेब या विजापूर सरदार अफझलखान व वझीरखान महंमद यांच्या वेढ्यात अडकला त्यावेळी तो कैद झाला असता किंवा युद्धात मारला गेला असता. त्यावेळी औरंगजेबाने वझीरखान महंमदला पत्र लिहिले “ हा मुघलांचा शहजादा आपल्या सुरक्षिततेच्या हमीची याचना करत आहे कृपया मला मदत करा. जर माझे काही बरे वाईट झाले तर दिल्लीच्या फौजा विजापूर उध्वस्त करून धूळधाण करून टाकतील “ .

वझीरखान महंमदने घाबरून औरंगजेबला पळून जायला वाट दिली. अफझलखानाला हि बातमी समजताच त्याने विजापूर दरबारी वझीरखानची तक्रार केली. वझीरखान विजापूर दरबारी भेटण्यास येत असताना अफझलखानाने दग्याने रस्त्यातच त्याचा खून केला.

विजापूर सेनापती रणदुलाखानाने अफझलखानास शिरेपट्टण येथील कस्तुरीरंगनायक या राजावर मोहिमेस पाठविले . त्याने शिरे किल्यास वेढा देऊन राज्यास शरण येण्यास भाग पाडले. अफझलखानाने राजा कस्तुरीरंगनायक यास तह करण्यासाठी आपल्या छावणीत बोलावले . अफझलखानाने कुराणावर हात ठेऊन शपथ घेऊन कस्तुरीरंगनायकास आश्वासन देऊन समक्ष भेटीस बोलावले . राजा कस्तुरीरंगनायक छावणीत येताच त्याचा एकदम शीरच्छेद केला आणि शिरे राज्य खालसा करून आदिलशाही राज्यास जोडले.

शहाजीराजे भोसले यांचा अफझलखानवर राग होता कारण कनकगिरीच्या हल्ल्याच्या वेळी अफझलखानाने शहाजींचा पुत्र संभाजी यास नीटशी मदत केली नाही त्यामुळे संभाजी ठार झाले . विजापूर सेनापती रणदुलाखान याच्या हाताखाली शहाजीराजे भोसले आणि अफझलखान सरदार होते त्यामुळे संभाजीस मदत न करण्याचे कारण शहाजी राज्यांस शह देणे होते .

मोहिमेस निघण्यापूर्वी अफझलखान फकिराच्या दर्शनास गेला त्या फकिराने त्याला आशीर्वाद देताना तुझे अनिष्ठ होईल असे भाकीत वर्तविले. अफझलखानाच्या दुर्दैवाचे फेरे आता सुरू झाले. अफझलखाना तेथून विजापूर जवळील अफझलपूर या आपल्या गावी आला तिथे त्याने आपल्या ६४ बायकांना उंच टेकडीवरून खाली पाण्यात लोटून बुडवून ठार मारले. नंतर त्यांना मूठमाती देऊन त्यांच्या कबरी एकाच ठिकाणी बांधल्या . बायकांना मारण्याचा त्याचा उद्देश एकच होता आपल्या मृत्यूनंतर त्या बायका कोना दुसऱ्या परपुरुषशी संबंध ठेऊन त्याच्या लौकिकास कलंक लागू नये.

अफझलखान किती क्रूर होता याचे हे उदाहरण

विजापूर दरबारातील समकालीन मुहंमद नुस्त्रती त्याच्या “ अलीनामा व तारीखे -इस्कंदरी “ या काव्यमय ग्रंथात शिवाजी महाराजांचे व अफझलखान वधाविषयीचे वर्णन पुढीलप्रमाणे करतो

शिवाजी नावाचा एक भांडखोर होता . तो चोर , अशांतप्रीय व रक्तपिपासू इसम आहे . त्याने दक्षिणेत भांडणाचे बीज पेरले व त्यामुळे सर्व मुलुख वैराण झाला. हा स्वतः काहीच मिळवू व लढाई जिंकू शकत नसे , पण याने बादशहांनमध्ये लढाया मात्र घडवून आणल्या. मोगलाई व दख्खन ( आदीलशाही ) याच्या दरम्यान त्याचे वस्तीस्थान असून तो पर्वतराजीत गुप्त ठिकाणी राहतो . परधर्मीयांचा द्वेष करण्यात तो फिरंग्यानपेक्षाहि कठोर असून मुसलमानी धर्माचा कट्टर वैरी होता. दंगेधोपे व लढाई करणे हि त्याची हजसाठी जाण्यापेक्षा मोठी देवपूजा होती. देवळात सापडला तरी तो मारण्यालायक होता. त्याने आपल्या चातुर्याने , युक्तीने, कुणभट , खनती लाऊन चोऱ्या करणारे दरोडेखोर व दुष्ट जमवले. . ते त्याच्यासारखेच कारस्थानी होते. चोरट्यांचा मुखंड बनवून एक अखंड , अभेद्य अशी सेना उभी केली

शिवाजी अराजक निर्माण करणारा काफिर ( धर्मद्वेष्टा ) होता . तो जणू काही फिराहून नावाच्या जुलमी राजाची सावलीच होता. जोपर्यंत सैतानाला जगात वाव आहे , तोपर्यंत त्याच्या दुष्ट्तेची गती वाढतच जाते. जेथे वाऱ्यालादेखील प्रवेश करण्याची मजल न्हवती तिथपर्यंत त्याच्या घोड्याची दौड होती. जणू काय आकाशाचे बच्चे असे जे गगनचुंबी गड होते. ते त्याने शेकडो युक्त्या प्रयुक्त्या करून , हल्ले चढवून घेऊन टाकले .

बादशहास त्याची प्रत्येक गोष्ट नापसंत असल्याने या डूकरास मारून जेर करण्यासाठी त्याने अफझलखान नावाच्या एका वाघास त्यावर पाठविले. वाघाने त्यावर चढाई केली असता , त्याने कपटाने त्यावर जय मिळवून त्यास मारिले . नंतर या डुकराने आपल्या मुसंडीने विलायत सर्व बाजूने उध्वस्त केली व एका चोरमार्गाने जाऊन दग्याने पन्हाळा गडही घेतला . एव्हापासून दंग्याचे राज्य सुरु झाले व देशामध्ये गोंधळ उडाला .

संदर्भ :- दख्खनी हिन्दीतील इतिहास व इतर लेख :- देवीसिंग व्यंकटसिंग चौहान

विजापूर दरबारातील महंमद हुसेनी त्याच्या “ तारीख-इ-अली “ या ग्रंथात शिवाजी महाराजांचे व अफझलखान वधाविषयीचे वर्णन पुढीलप्रमाणे करतो

स्वर्गवासी बादशहा ( महंमद आदिलशहा ) आजारी पडला तेंव्हा लाबडीत किवा कपटविद्येत दुष्ट सैतानाचा गुरु असलेला बहिष्कृत काफिर सिवा भोसले याने तळकोकणचा संपूर्ण मुलुख लुटीच्या झाडूने साफ करून त्या मुलखातील राहीरचा ( रायरीचा ) किल्ला काबीज केला. स्वर्गवासी बादशहा निधन पावला तेंव्हा ती बातमी त्या दुष्ट काफिराने विजयवार्तेपेक्षा आनंददायी मानून त्या मुलखातील आणखी किल्ले हस्तगत केले . अधाशी व भुकेलेल्या कुत्र्याने प्रेताच्या हाडाने तृप्त न होता वारंवार अधिकाची अपेक्षा करीत असावे त्याप्रमाणे तो जुलमाचा व अन्यायाचा हात लांबवून लुट करीत होता आणि ईशचिंतनात निमग्र असलेल्या धर्मश्रध्र ( मुसलमान ) लोकांवर अन्याय करीत होता.

हि बातमी समजल्यावर बादशाहाने ( अली आदिलशहाने ) मुहम्मदी ( मुसलमान ) धर्माच्या पालनाला बादशहाच्या रक्तपिपासू तलवारीच्या पाण्याशिवाय टवटवी येणार नाही आणि काफिरत्वाचे व अनेकश्वरोपासनेचे ( हिंदू धर्माचे ) काटवन शत्रूला जाळणाऱ्या तलवारीच्या आगीशिवाय जाळणार नाही , म्हणून त्या दुष्ट बहिष्कृतास ( शिवाजीस ) मुळापासून उखडून काढण्याकरिता अफझलखानाची दहा हजार स्वारांसह नेमणूक केली की क्रोधाग्नी तीव्र करून त्याच्या ( शिवाजीच्या ) आयुष्याची शिल्लक रक्कम विनाशाच्या मुशीत वितळवावी आणि त्याच्या आयुष्याचे शेत घोड्यांच्या टापांखाली तुडवावे. अफझलखानाची रवानगी करताना बादशहाने त्याला अशी सूचना दिलेली होती कि त्या काळतोंड्या काफिराने ( शिवाजीने ) लबाडीचे पत्र पाठविले तरी त्याचे लबाडीचे व तोंडपूजेपनाचे म्हणणे न ऐकता त्याच्या आयुष्याच्या पिकावर मृतूचा अग्नी फेकण्याशिवाय आणि त्याच्या जीविताची गाधी पाडण्याशिवाय दुसर काहीही करू नये.

शिवाजीला तंबी देण्याकरता व उखडून टाकण्याकरिता अफझलखान दहा हजार स्वारांसह नेमिले. खानाने येऊन शिवाजीच्या नवीन जिंकलेल्या मुलुखात धुमाकूळ घातला. हि हकीकत शिवाजीस समजली. सर्व लोक हताश झाले आहेत असे पाहून व दुसरा उपाय न राहिल्यामुळे त्याने अफझलखानास पत्र घातले की “ माझ्या दुबळ्या वडिलांवर बादशांहानी कृपा केली व त्यांचा उत्कर्ष झाला. त्याप्रमाणे माझ्यावर कृपा करतील , तर मी एक केसभरही वाकडा न जाता सुखाने राहीन . वास्तविक , मीच भेटण्याला यावयास पाहिजे . परंतु केलेल्या कृत्यांची अतिशय लाज वाटत असल्यामुळे मला येववत नाही. आपण कृपा करून प्रतापगडावर आला व मला दिलासा दिलात तर माझ्यावर मेहरबानी होईल . बादशहाने अफझलखानाला जाते वेळी सांगितले होते की , ‘ शिवाजीने वाटेल ते सांगितले तरी त्याचे बिलकुल न ऐकता त्याच्या जीविताच्या हंगामावर अग्नी टाकण्याशिवाय व त्याच्या जीवितभिंतीचा नाश करण्याशिवाय इतर काही करू नकोस. पण त्याच्या ठिकाणी शहाणपणाचा अंश नसल्यामुळे शिवाजीचे हे म्हणणे म्हणजे खरेपणाच्या बाबतीत जणू काय चीत्रगुप्ती वही , असे तो समजला आणि एखादा तरुण आपल्या नवपरिणीत पत्नीच्या सौंदर्याने व प्रेमाने मोहित होऊन उल्लूपणाने व अर्धावटपणाने समागमाच्या हेतूने तिजकडे जातो , तसा हा थोडक्याच दिवसात स्वतःच्या सर्व शिपायांसह त्या किल्याच्या जवळ पोहचला . शिवाजीला या गोष्टीने अतिशय आनंद होऊन त्याने निरोप पाठवला कि , उद्याचाच दिवस आपल्या भेटीसाठी मक्रूर केला आहे. अफझलखानापाशी अक्कल नसल्याने तो दुसरे दिवशी सकाळी १२ लोकांसह किल्ल्यावर गेला . पण शिवाजीने त्यास मारिले आणि हे पाहून त्याचे प्यादे व स्वार गर्भगळीत होऊन पळून गेले.

संदर्भ :- श्री राजा शिव छत्रपती :- गजानन मेहंदळे

श्री छत्रपती शिवाजी महाराज :- वा. सी. बेंद्रे

बुसातीन-इ-सलातीन ( विजापूरची आदिलशाही ) हा पर्शियन ग्रंथ फकीर महंमद झुबेरी याने लिहिला . या ग्रंथात फकीर महंमद झुबेरी शिवाजी महाराजांचे व अफझलखान वधाविषयीचे वर्णन पुढीलप्रमाणे करतो

शिवा भोसला याजला फार गर्व व अभिमान झाला. दिवसेंदिवस अधिकाधिकच दांडगेपणा करू लागला. तेव्हा अली आदिलशाहा पादशहा यांनी जाणले की , या महिन्यात आता चालढकलीवर नेणे व गाफिलगीरी करणे हे पादशाही कायद्यास फार विरुद्ध आहे. आता शिवाचे पारिपत्य करण्यास सुस्ती केली असता राज्य बुडण्याचे कारण आहे. शिवाचे बंडाव्याचा अग्नी विझवणे प्राप्त आहे.त्याजला फारच गर्व व अभिमान झाला आहे, तो दूर केला पाहिजे. असे जाणोन महान प्रराक्रमवान अफझलखान , दक्षिणचे सर्व मुलुखात तसा कोणी शूर व हिंमतदार मनुष्य नव्हता असा सर्व शुरांत श्रेष्ठ होता . शिवा त्या अफझलखानाचा धाक व भय फारच वागवीत होता. त्या अफझलखानास निवडकपुर्ण हिंमतदार दहा हजार स्वार समागमे देवून त्या धण्यासी बदलणारे बेइमानाचे , म्हणजे शिवाचे , पारपत्यावर रवाना केले. अफझलखान तेथे जाऊन पोहचला . युद्ध पराक्रम करून शत्रूचे फौजेचा मोड करून शिवा याणी जबरदस्तीने मुलुख घेतला होता , तो मुलुख त्याचे हातून सोडवून घेण्यास प्रारंभ केला . शिवाने पहिले कि , आता अफझलखानापुढे सामर्थ्य चालत नाही व याचेपुढे युद्धास उभे राहण्यास दम चालत नाही असे जाणले. तेंव्हा शिपाईगिरी व शूरत्व करण्याचा मार्ग सोडून देऊन पळून जाऊ लागला. लबाडीने काकुलती येणे, लटकाच गरिबपणा दाखवून सख्य करण्याचे बोलणे घातले. फार काकुलती येऊन व अति नम्रतेचा मजकूर लिहून ते विनंतीपत्र त्या निष्कपट अंत:करणाचा , भोळसर मनाचा व लबाडीचे डावपेच न जाणणारा असा जो अफझलखान , त्या अफझलखानाकडे पाठवले . आता आपले अ आमचे साम्य असावे व मजकडून जे अपराध घडले ते क्षमा करावे. मी बादशहाची चाकरी करेन व आज्ञेत वागेन व पुन्हा असा दांगडेपणा करणार नाही , असे त्या विनंतीपत्रात लिहिले. अफझलखान हा साफ दिलाचा शूर होता. त्यामुळे त्या लबाडाचे व ठकबाजाचे डावपेच लक्षात आले नाहीत. शिवाजीच्या गोड बोलण्यावर विसंबून सख्य करीत झाला. सख्य झाले तेंव्हा शिवा अफझलखानाचे डेऱ्यास येऊन अति नम्रतेने अफझलखानाची भेट घेतली . शिवाजी याणी आपले मनातील कपटपणा व वाकडेपणा होता तो मनातले मनात कायम ठेऊन लटकाच गरिबीचा भाव दाखवून अफझलखानास बहुत गोड बोलण्यानी विनंती केली की , आपणास मेजवानी करावयाची आहे याकरिता आपण मेहेरबानी करून प्रतापगड पेठा जावली या किल्यावर भोजनास यावे , असे आमंत्रण केले. शिवाजी त्यासमई प्रतापगडावरच राहिला होता. तेथे भोजनास बोलविले . अफझलखान हा जातीचा मुसलमान साफ दिलाचा , भोळसर होता. यामुळे शिवाजीस केवळ आपला असे समजून व शिवाजीचे मनात काही एक कपट नाही असे जाणोन गाफिलपणाने आपली एकंदर फौज किल्याचे माचीस ठेऊन बारा आसामी चाकर लोक बरोबर घेऊन किल्यावर गेला. त्या ठकबाजी व कपटी पुरषाने, म्हणजे शिवाजीने गुपातपणे शत्रूस जीवे मारण्याची तयारी व बंदोबस्त करूनच ठेवला होता.अफझलखान किल्ल्यावर चढून येताच याचे समागमे कोणी एक स्वारशिबंदी वैगरे हत्यारबंद माणूस नाही , हा एकटाच गाफिलपणाने आला आहे असे समजताच तत्काळ अफझलखानावर गर्दी करून तरवारीचा वार करून जीवे मारिला. अफझलखान किल्यावर चढून येताच किल्याचे दरवाजे बंद करावे , अशी दरवाजेवरील पहारेकऱ्यास आधी सूचना होतीच. त्या सूचनेप्रमाणे दरवाजे बंद झाले होते. अफझलखानास शिवाजीने या प्रकारची मेजवानी केली . अफझलखान याचे एकंदर लष्कर किल्याचे तळास राहिले होते. त्या फौजेने आपला धनी ठार झाला असे पहिले , तेंव्हा एकामागे एक टी फौज सुसाट पळून गेली. हे प्रकर्ण सन १०७० ( १६५९ इ.स. ) साली झाले

संदर्भ बुसातीन-इ-सलातीन ( विजापूरची आदिलशाही ) :- वा. सी. बेंद्रे

विजापूर दरबारातील लेखकांच्या संदर्भ ग्रंथाच्या आधारे वीजपुर दरबारी शिवाजी महाराज म्हणजे लुटारू व काफिर होते व त्यामळे शिवाजी महाराजांना ठार मारण्याच्या उद्देशाने अलीआदिलशहाच्या सांगण्यानुसार अफझलखान स्वराज्य बुडवण्याच्या हेतूने स्वराज्यावर चालून आला होता . अफझलखानाच्या कौर्याचा व वचन देऊन दगाबाजी करण्याचा पुर्वेइतिहास पाहता शिवाजी महाराजांनी कुलस्वामिनी भवानी मातेच्या मंदिरास उपद्रव करणाऱ्या , स्वराज्यातील गोरगरीब रयतेस छळणाऱ्या व गायींच्या हत्या करणाऱ्या अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून ३२ दातांच्या बोकडाच्या रक्ताचा अभिषेख भवानी मातेच्या चरणी अर्पण केला.

छायाचित्र साभार गुगल

श्री. नागेश सावंत

Leave a comment