महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २६५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा.

छत्रपतींची आग्रा भेट आणि आग्र्यातुन सुटका

By Discover Maharashtra Views: 25146 20 Min Read

छत्रपतींची आग्रा भेट आणि आग्र्यातुन सुटका –

पुरंदरच्या तहामुळे शिवाजी महाराज मोगलांचे अंकित झाले होते. १६ जानेवारी १६६५ रोजी विजापुरांच्या ताब्यातील पन्हाळ्यावरील महाराजांचा हल्ला फसला त्यामुळे सरनौबत नेताजी पालकर यांच्यावर महाराज रागवले. त्यासुमारास मोगलांनी नेताजी पालकर यांना तीन हजारी मनसब दिली. नेताजी पालकर पाच हजारी मनसब हवी यासाठी आग्रही होते त्यामुळे नेताजी पालकर विजापुरकरांना जावून मिळाले. गोवळकोंड्याचा कुतुबशहा विजापूरकरांच्या मदतीस धावून आला . अश्यावेळी शिवाजी महाराज विजापुरकरांना मिळाल्यास या तिन्ही एकत्र आघाड्यांशी मुकाबला करणे जयसिंगाला शक्य न्हवते . त्यामुळे महाराजांना उत्तरेत पाठवावे असे जयसिंगाने ठरवले. जयसिंगाने औरंगजेबाला पत्र लिहून शिवाजी महाराजांना आग्रा दरबारात भेटीस बोलवून घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्यास पाठवून देण्याचे फर्मान जारी केले.(छत्रपतींची आग्रा भेट आणि आग्र्यातुन सुटका)

औरंगजेबाचा कपटी स्वभावामुळे महाराज आग्रा भेटीस जाण्यास तयार न्हवते परंतु जयसिंगाच्या अदबशीर विनवणीमुळे व जयसिंगाने महाराजांच्या जीवित रक्षणाची पूर्ण हमी घेतल्याने महाराज आग्रा भेटीस जाण्यास तयार झाले . आग्रा भेटीस निघण्यापूर्वी महाराजांनी स्वराज्याचा दौरा केला. गडावरच्या किल्लेदाराना सतर्कतेचे आदेश देण्यात आले. मातोश्री जिजाबाई यांच्यावर स्वराज्याची जबाबदारी देण्यात आली व या कामी मदत म्हणून पेशवे मोरोपंत पिंगळे , निळो सोनदेव, मुजुमदार, सेनापती प्रतापराव गुजर यांची नेमणूक करण्यात आली. शंभूराजांना आग्रा भेटीस बरोबर घेऊन जाण्याची सूचना जयसिंगाणी शिवाजी महाराजांना दिली होती. महाराजांनी आपला वकील रघुनाथपंत कोरडे यांना औरंगजेबाकडे आग्र्यास भेटीस येत असल्याचे पत्र घेऊन पुढे पाठवले . औरंगजेबाने शिवाजी महाराजांच्या वाटखर्चासाठी शाही खजिन्यातून १ लाख होण मंजूर केले. राजगड ते आग्रा मार्गातील मुगल अधिकाऱ्यांना “ ज्या ठिकाणी महाराज मुक्कामास राहतील त्या ठिकाणी महाराजांना प्रत्यक्ष येऊन भेटावे व जो दाणापाणी लागेल तो द्यावा. शहजाद्यांप्रमाणे आदब चालवावा “ अशा सूचना देण्यात आल्या. जयसिंगांचा अधिकारी गाझी बेग हा आग्र्यापर्यंत महाराजांसोबत राहणार होता.छत्रपतींची आग्रा भेट.

महाराज आग्रा भेटीस निघाले –

सोमवार दिनांक ५ मार्च १६६६ रोजी महाराज नऊ वर्षांच्या शंभूराजांसह राजगडावरून औरंगजेबाच्या भेटीस आग्रास जाण्यास निघाले. प्रथम महाराजांनी निलंगा येथे जयसिंगांची भेट घेतली व पुढील मुक्कामी औरंगाबादला दाखल झाले. मोगल इतिहासकार भीमसेन सक्सेना त्यावेळी तेथे हजर होता तो लिहितो “ शिवाजी औरंगाबादला पोहचला . त्याच्या साथीला पाचशे खोगीरबंद उमद्या घोड्यांवर घोडेस्वार होते. त्याचप्रमाणे पाचशे हत्यारबंद सैनिकांचे पायदळ होते. त्याला पाहण्यासाठी हजारोंची गर्दी लोटली होती.” औरंगाबादचा कारभार पाहणारा तीन हजारी मनसबदार सफशिकनखान याने महाराज एक साधारण जमीनदार आहेत असे समजून त्याने आपला पुतण्याला महाराजांच्या स्वागतासाठी पाठवले व स्वतः दिवाण बक्षी व इतर अधिकाकाऱ्यासोबत सुभेदार दफ्तरी बसून राहिला. महाराजांनी स्वतःहून त्याला तेथे येऊन भेटावे असी त्याची इच्छा होती. सफशिकनखानच्या पुतण्याने “ खानसाहेब तुमची खास आममध्ये दफ्तरी वाट पाहत आहेत” असा नीरोप दिला. महाराजांनी “ सफशिकनखान कोण आहे ? तो माझ्या स्वागतास का आला नाही “ असे विचारत त्याला धुडकावून लागले व स्वतः जयसिंगांच्या हवेलीत मुक्कामास निघून गेले. सफशिकनखानची मिजास उतरली व तो स्वतः महाराजांच्या भेटीस आला. महाराजांनी काही दिवस औरंगाबादला मुक्काम केला वाटखर्चाची रक्कम व मिळालेले नजराणे घेऊन पुढील मुक्कामी निघाले. मोगल सैन्याची एक तुकडी संरक्षणासाठी सोबत देण्यात आली.छत्रपतींची आग्रा भेट.

५ एप्रिल १६६६ रोजी आग्र्याच्या प्रवासात महाराजांना औरंगजेबाचे भेटीला येण्याचे व महाराजांच्या सुरक्षीततेविषयीचे पत्र तसेच सन्मानार्थ पोशाख औरंगजेबाकडून मिळाला . २९ मे १६६६ च्या राजस्थानी पत्रात महाराजांच्या लावाजम्याचे व सैन्याचे तसेच शिवाजी महाराजांचे वर्णन पुढीलप्रमाणे आढळते “ शिवाजी महाराज शंभर सेवक आणि दोनशे ते साडेपाचशे संरक्षक यांच्यासह आले आहेत. शंभर स्वतःच्या घोड्यावर स्वार आहेत तर इतर बारगीर आहेत . काही समानवाहक उंट आहेत . शंभर बंजारी बैलगाड्यांनसोबत आहेत. काही अधिकारी पालख्यानसोबत प्रवास करत आहेत. तांबूस केशरी रंगाचे निशाण असून त्यावर सोनेरी नक्षीकाम केलेला शिक्का आहे. निशाणीचा हत्ती सर्वात पुढे असतो. त्या हत्तीच्या मागे दोन हत्ती असून त्यांच्यावर हौद बांधलेले आहेत. महाराजांची पालखी चांदीच्या पत्र्याची असून पालखीचे पाय आणि खुंट्या सोन्याच्या आहेत . प्रथमदर्शनी महाराज काहीसे कमी उंचीचे व सडपातळ दिसतात. ते रंगाने गोरे असून ते राजा आहेत हे पहाताचक्षणी लक्षात येते. त्यांचे तेज व मर्दपणा दिसून येतो . ते पराक्रमी असून दाढी ठेवतात. त्यांचा मुलगा ९ वर्षांचा असून तो देखणा व गोरा आहे.

महाराज आग्र्यात बादशहाच्या दरबारी –

औरंगजेबाने कुँवर रामसिंग यास महाराजांनी ११ मे ला आग्र्यास पोचावे अश्या सूचना दिल्या त्यानुसार महाराज ११ मे ला आग्र्याजवळ दाखल झाले. कुँवर रामसिंग व फिदाई खान यांनी महाराजांचे स्वागत करून त्यांना बादशहाच्या भेटीस घेऊन यावे अश्या सूचना औरंगजेबाने दिल्या . परंतु त्याचदिवशी रामसिंगावर बादशाहाच्या निवासस्थानाच्या संरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यामुळे महाराजांच्या स्वागतास प्रत्यक्षात कोणीही आले नाही महाराजांच्या अपमानास जाणीवपूर्वक सुरवात झाली. महाराज अपमान सहन करून मुलुकचंदच्या सराईत मुक्कामास गेले. महाराजांचे वकील रघुनाथपंत महाराजांस तेथे येऊन भेटले. रामसिंगला महाराजांच्या आगमनाची वार्ता कळताच त्याने एक कारकून गिरधारीलाल याला महाराजांसाठी सरोप्याची खास वस्त्रे व घोडा घेऊन स्वागतासाठी पाठवले. सर्वसाधारण कारकुनाने महाराजांना नजराणा देवून दुसऱ्या दिवशीच्या भेटीची व्यवस्था महाराजांना कळवली. १२ मे ला बादशहाच्या ५० व्या वाढदिवसानिम्मित महाराज बादशहाच्या दरबारात जाण्यास निघाले त्याचवेळी रामसिंग व मुखलीसखानदेखील महाराजांकडे येण्यास निघाले परंतु त्त्यांची चुकामुक होऊन त्यांची भेट नुरगंज बागेपाशी पडली. रामसिंगाने घोड्यावर स्वार असतानाच महाराजांना आलिंगन दिले. रामसिंगाने त्याच्या डेऱ्याजवळच महाराजांसाठी डेरे उभारले होते. महाराजांबरोबर असणारे हत्ती ह्या डेऱ्याजवळ बांधण्यात आले. त्यानंतर रामसिंग व मुखलीसखान महाराजांना घेऊन बादशहाच्या दरबारात गेले त्यावेळी औरंगजेब दिवाने आममधून ( सामान्य जनतेसाठी ) दिवाने खास ( खास मर्जीतील लोक ) येथे बसला होता. रामसिंगाने महाराज आल्याची वर्दी बादशहास दिली त्यानुसार औरंगजेबाने बक्षी आसदखानास महाराजांना घेऊन येण्यासाठी पाठवले. महाराज औरंगजेबाच्या दरबारी आले त्यांनी बादशहास तीन वेळा मुजरा केला. शिवाजी महाराजांनी १००० मोहरा व २००० रुपये यांचा नजराणा दिला आणि ५००० रुपये निसार ( ओवाळून टाकणे ) म्हणून ठेवले.

शंभूराजांनी ५०० मोहरा व १००० रुपये यांचा नजराणा दिला आणि २००० रुपये निसार केले. औरंगजेबाने शिवाजी महाराजांची साधी दखलसुद्धा घेतली नाही . महाराजांना राजा जयसिंग याच्या मागे उभे करण्यात आले. बादशहाच्या वाढदिवसानिम्मित पानाचे विडे वाटण्यात आले. शहजादे , उमराव यांना वाटप झाले त्यानंतर हे पानाचे विडे महाराजांना देखील मिळाले. विड्याचे वाटप झाल्यानंतर निवडक लोकांना मानाचा सरोपा ( वस्त्रे ) देण्यात आला. शहजादे , वजीर जफारखान, महाराज जसवंतसिंग यांना हि मानाची वस्त्रे मिळाली परंतु महाराजांना जाणूनबुजून यातून डावलण्यात आले. औरंगजेबाच्या दरबारात आल्यापासून महाराजांचा अपमान होत होता. आत मात्र महाराजांचा राग अनावर झाला त्यांना क्रोध आवरेनासा झाला. त्यांचे डोळे अतिक्षोभाने पाणावले दरबारी रीवाजाना धुडकावून संतापाने खाली बसले. औरंगजेबाचे लक्ष महाराजांकडे होते त्याने रामसिंगला महाराजांकडे जाऊन काय झाले आहे ते विचारण्यास सांगितले.

रामसिंग महाराजांनजवळ येताच महाराज गरजले “ तु पाहिलेस , तुझ्या बापाने पहिले आणि तुझ्या बादशाहने पहिले मी कोण आहे हे पहिले आहे तरीसुद्धा तुम्ही मला जाणूनबुजून इतका वेळ ताटकळत उभे केल आहे. मी तुमची मनसब झुगारून देतो. जर उभे करायचे होते तर दर्जानुसार उभे करायचे होते. “ महाराज बसली जागेवरून ताडकन उटले व रागारागाने बादशाहाकडे पाठ फिरवून सरदारांच्या रांगेतील जागा सोडून जाऊ लागले . रामसिंगाने महाराजांचा हात धरण्याचा प्रयत्न केला परंतु महराजांनी त्याचा हात झिडकारला व दरबारात एका बाजूला जाऊन बसले. रामसिंग महाराजांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागला तसे ते गरजले “ माझे मरण जर जवळ आले आहे. त्यामुळे तुम्ही तरी मला ठार मारा अथवा मी स्वतः मला मारून घेतो . माझा शिरच्छेद करून माझे शिर घेऊन जा परंतु मी बादशहाची हुजुरी करण्यासाठी दरबारी जाणार नाही “

महाराज ऐकत नाही हे पाहून रामसिंगाने बादशहास महाराजांचा निर्णय कथन केला. औरंगजेबाने मुल्लतफखान , अक्कीलखान आणि मुखालीसखान यांना शिवाजी महाराजांना सरोप्याची वस्त्रे देवून व समजावून त्याच्याजवळ आणण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिन्ही सरदार महाराजांजवळ येऊन सरोप्याची वस्त्रे देऊन विनंती करून समजूत काढू लागले. परंतु महाराजांनी त्यांना सुनावले तुमची सरोप्याची वस्त्रे नाकरली , बादशाहने जाणूनबुजून मला जसवंतसिहच्या मागे उभे करून माझा अपमान केला. माझ्यासारख्या माणसाला असे मुदामून उभे करण्यात आले. मी तुमची मनसब नाकारतो. मी त्याचा चाकर नाही . माझे प्राण घ्या , कैद करा परंतु मी तुमची सरोप्याची वस्त्रे घालणार नाही. ह्या तिघाही सरदारांनी बादशहास महाराजांचे म्हणने सांगितल्यावर बादशाहने रामसिंगास महाराजांस छावणीत नेऊन समजूत काढण्यास सांगितले. महाराज दरबारातून निघुन गेल्यावर महाराजांच्या या वर्तनामुळे बादशाही दरबारात महाराजांविरुद्ध नाराजी पसरली. परंतु तेथील जनतेच्या मनात महाराजांचा परखडपणा व स्वतंत्र बाण्याचे व धैर्याचे कोतूक होऊ लागले. अश्यारीतीने बादशाही वाढदिवसाची रंगत शिवाजी महाराजांनी बेरंग केली.

राजश्रीस चौक्या बसविल्या –

१३ मे रविवारी रामसिंग शंभूराजांसह बादशहाच्या दरबारी गेला व शिवाजी महाराजांना ताप आल्यामुळे ते आज दरबारी हजार राहू शकत नसल्याचे बादशहास निवेदन केले. बादशाहने शंभूराजांस सरोप्याची वस्त्रे , रत्नजडीत खंजीर व मोत्यांचा हार दिला . महाराजांच्या या वागण्यामुळे राजा जसवंतसिंह , बेगम जहांआरा , जाफरखान व दरबारातील इतर उमराव यांनी शिवाजी महाराजांच्या या उद्धट व अपमानकारक वर्तणुकीबद्दल बादशाहाकडे नाराजी व्यक्त केली म महाराजांच्या या अरेरावी व उन्मत वागणुकीबद्दल शिक्षेची मागणी केली. औरंगजेबाने शिवाजीला काय शिक्षा करावी मृत्यूदंड कि कैद हे ठरवण्यासाठी सिद्धी फौलादखानाला महाराजांना राजअंदाजखानच्या हवेलीत घेऊन जाण्याची आज्ञा केली. रामसिंगास हि बातमी कळताच त्याने औरंगजेबास कळवले कि “ बादशाहने महाराजांस मारण्याचा विचार केला आहे परंतु महाराजांना माझे वडिल मिर्झाराजांनी त्यांच्या जीविताची हमी दिली आहे व त्या वचनाच्या कौलावर महाराज येथे आले आहेत . बादशाहने पहिले मला व माझ्या मुलाला ठार मारावे नंतर महाराजांना जीवे मारावे .

“ शिवाजी महाराजांना तत्काळ शिक्षा केल्यास मिर्झा राजे व कुंवर रामसिंग यांचा विरोध सहन करावे लागेल हे ओळखून औरंगजेबाने रामसिंगास महाराजांसाठी जमीन राहण्यास सांगितले. १५ मे मंगळवारी महाराज रामसिंगाकडे आले व त्यांनी शपथपूर्वक आपल्या चांगल्या वर्तणुकीची हमी रामसिंगास दिली. रामसिंगाने निश्चिंत होऊन जामीनपात्र औरंजेबास दिले. १६ मे बुधवार रोजी औरंगजेबाने रामसिंगास शिवाजी महाराजांसह काबुल मोहिमेवर जाण्याची आज्ञा दिली. औरंगजेब आपली हत्या घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याची जाणीव महाराजांना झाली व त्यांनी काबुल मोहिमेवर जाण्यास नकार दिला. महाराजांनी वजीर जाफरखान व अन्य बादशाही सरदार व उमराव यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी नजराणे व काही द्रव्य व रक्कम देण्यास सुरवात केली .

महाराजांनी औरंगजेबास अर्ज करून पुरंदर तहानुसार बादशहास दिलेले किल्ले आपणास परत दिल्यास आपण २ कोटी रुपये देऊ तसेच शंभू राजांना आग्र्यात शाही चाकरीत ठेऊ तसेच, स्वतःस दक्षिणेत जाण्याची परवानगी द्यावी म्हणजे विजापूर विरुद्धच्या युद्ध मोहिमेत भाग घेता येईल . औरंगजेबास महाराजांचा सदर अर्ज मिळताच औरंगजेब संतापला व त्याने महाराजांस कुणालाही भेटण्यास बंधने आणली तसेच रामसिंगाच्या घरी जाण्यास देखील मनाई केली. औरंगजेबाने सिद्धी फौलादखानास महाराजांच्या छावणीस वेढा देऊन चौक्या बसण्याचा हुकुम दिला . २५ मे शुक्रवार रोजी राजश्रीस चौक्या बसविल्या आता महाराज सिद्धी फौलादखानाच्या मृत्यूच्या मगरमिठीत कैद झाले.

आग्रा कैदेतील पत्रव्यवहार व सुटकेचे राजकारण –

आग्र्यास शिवाजी महाराजांचे निवास्थान असलेल्या डेऱ्याजवळ सिद्धी फौलादखानाच्या चौक्या बसल्या व महाराज आग्र्यात कैद झाले. महाराजांनी याबद्दल आपली नाराजी सिद्धी फौलादखानाकडे व औरंगजेबाकडे व्यक्त केली . रामसिंगला दिलेल्या वचनामुळे महाराज चांगल्या वर्तणुकीसाठी वचनबध्द होते तर रामसिंग महाराजांच्या सुरक्षिततेसाठी वचनबध्द होता . महाराजांनी हा पेच सोडवण्यासाठी रामसिंगास महाराजांच्या सुरक्षिततेच्या हमीतून मुक्त होण्यास सांगितले परंतु रामसिंग दिलेला शब्द पाळणारा राजपूत होता त्याने महाराजांना यासाठी मनाई केली. रामसिंगाने महाराजांच्या जीवितास असलेला धोका लक्षात घेऊन स्वतःच्या विश्वासातील काही माणसे महाराजांच्या पहाऱ्याभोवती ठेवली. शाही दरबार , सरदार व सामान्य जनतेत “ महाराज जमिनीवरून १४ ते १५ हात लांब उडी मारतात व ४० ते ५० कोस एकाच वेळी चालत जातात अश्या अफवांना उधान आले. औरंगजेब बादशहा स्वतः नमाजासाठी मशिदीत जाताना ठिकठीकाणी चौक्या बसवून जाऊ लागला अश्या बातम्या येऊ लागल्या .

७ जूनला औरंगजेबाने महाराजांना निरोप पाठवून त्यांच्याकडील सर्व किल्ले स्वाधीन करण्याच्या व त्या बदल्यात महाराजांना मनसब देण्याचा निरोप पाठवला . महाराजांनी औरंगजेबाची मनसब नाकारली व गड किल्यांवर आता आपला ताबा नसल्याचे औरंगजेबास कळवले . महाराजांच्या या उत्तराने औरंगजेब संतापला व त्याने महाराजांना ठार करण्याचा हुकुम दिला . महाराजांच्या छावणीभोवती रामसिंगांच्या राजपूत सैन्याचा वेढा होता त्याबद्दल रामसिंगास औरंगजेबाने विचारणा केली असता रामसिंगाने आम्ही आपले पिढीजात नोकर असून आपण शिवाजीला कैद करू किंवा मारू शकता असे उत्तर दिले . बेगम जहानआराने औरंजेबास समजावले मिर्झा राजांच्या हमीवर शिवाजी महाराज येथे आले आहेत जर त्यांना मारले गेले तर बादशहाच्या वचनावर कोणी विश्वास ठेवणार नाही. औरंगजेबाने आपला हुकुम मागे घेतला व शिवाजी महाराजांवरचे प्राणघातक संकट काही काळासाठी टळले .

८ जूनला शुक्रवारी महाराजांनी औरंगजेबास अर्ज करून आपल्याबरोबर आलेल्या सर्व लोकांना परत दक्षिणेत पाठवण्यासाठीचा व त्या संबंधीचे परवाने देण्याविषयी विनंती केली. औरंजेबाने महाराजांच्या जवळील माणसे कमी होतील ह्या उद्देशाने त्वरित मंजुरी दिली. मिर्झा राजांचे पत्र औरंगजेबास आले यात त्यांनी महाराजांशी मैत्री केल्यास व दिलेले वचन पाळल्यास बादशाही प्रतिष्ठा वाढेल व महाराजांचा दक्षिणेत आपल्याला उपयोग होईल असे सुचवले. औरंगजेबाने मिर्झा राजांच्या पत्राचा विचार करून रामसिंगाची शिवाजी महाराजांच्या जामिनातून मुक्त्तता केली. मिर्झा राजांनी कुंवर रामसिंगास गुप्त संदेश देवून शिवाजी महाराजांच्या सुरक्षीततेबद्दल काळजी घेण्याची सूचना दिली .

१६ जूनला महाराजांनी औरंगजेबास पत्र पाठवून मला फकीर व्हावयाचे असून काशीला जाण्याची परवानगी देण्यात यावी अशी विनंती केली उत्तरादाखल औरंगजेबाने महाराजांची हि विनंती मान्य करत महाराजांनी फकीर होऊन अलाहाबादच्या किल्यावर राहावे असे सुचवले. महाराजांना अलाहाबादच्या किल्यावर राहणे मान्य नसल्याने परीस्थिती होती तशीच राहिली. शंभूराजे रोज रामसिंगाबरोबर बादशाही दरबारात मुजऱ्यासाठी जात असत. दोन महिने आग्र्याचा मुक्काम झाल्याने महाराजांना पैशाची चणचण भासू लागली त्यामुळे त्यांनी रामसिंगाकडून सहासष्ट हजार रुपयांचे कर्ज घेतले. महाराजांनी दक्षिणेत जाण्यासाठी औरंगजेबास परत एकदा अर्ज करून विनंती केली “ आपण बादशहास सर्व किल्ले देण्यास तयार आहोत त्यासाठी मला दक्षिणेत जाऊ द्यावे . केवळ माझ्या पत्राने माझे अधिकारी किल्ले आपल्या स्वाधीन करणार नाहीत. बादशहाने महाराजांची हि विनंती अमान्य केली व परत एकदा शिवाजी महाराजांचा सुटकेचा प्रयत्न फसला.

महाराज कैदेतून निसटले –

औरंगजेबाने मिर्झा राजांना पत्र लिहून शिवाजी महाराजांबद्दल कोणता निर्णय घ्यावा या विषयी विचारले त्याविषयीचे पत्र मिर्झा राजांनी औरंगजेबास पाठवले. “ शिवाजी महाराजांना दक्षिणेत परत न पाठवता तेथेच चांगल्या प्रकारे ठेवावे अन्यथा महाराजांविषयी परतीची निराशा मराठ्यांना माहित झाल्यास मराठे आदिलशाहीस सामील होतील व आमच्या विरोधात उभे ठाकतील. औरंगजेबास हे पत्र मिळताच त्याने महाराजांना ठार मारण्याची आज्ञा केली परंतु अचानकपणे आज्ञेत बदल करीत महाराजांना रामसिंगाच्या जवळील छावणीतून हलवून राजा विठ्ठलदासांच्या छावणीत नेण्याच्या आज्ञा दिल्या . शिवाजी महाराजांना बादशाही हुकुम माहित पडताच सत्यता जाणण्यासाठी रामसिंगाच्या छावणीत आले असता रामसिंगाने महाराजांस भेटण्यास नकार दिला व परत आपल्या निवास्थानी येण्यास महाराजांस मनाई केली. महाराज आता रामसिंगास दिलेल्या वचनातून मुक्त झाले होते तसेच आता आपला मृत्यू जवळ येत असल्याचे पाहून कैदेतून सुटण्यासाठी त्यांनी धाडसी योजना आखण्यास सुरवात केली .छत्रपतींची आग्रा भेट.

श्रावणवद्य नवमी श्रीकृष्ण जन्मोस्तवानिम्मीत मोठमोठे पेटारे भरून मिठाई वाटण्याचे महाराजांनी ठरवले व बादशहास अर्ज करून हे आमचे पूर्वापार व्रत असून ते करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली . बादशाहने अशी परवनागी लगेचच दिली. मिठाई भरलेले हे पेठारे आग्र्यातील प्रतिष्टीत मंडळी व सरदार , बादशाही वजीर तसेच फकीर , साधू व गरीब जनता यांच्याकडे जाऊ लागले. मिठाई वाटपाच्यावेळी शिवाजी महाराजांच्या निवास्थानी गर्दी होऊ लागली. पाहरेकरी पेटारे उघडून पाहणी करत असत मगच पेटारे बाहेर जात असत. महाराजांनी मुलचंद सावकारामार्फात सर्व जडजवाहीर . मोती , सोने , मोहरा दक्षिणेत पाठवून दिले. आता रोज पेठारे भरून मिठाई वाटण्यात येऊ लागली त्यामुळे पहारेकरी आता कसून तपास न करताच एखाद दुसरा पेटारा तपासात व उर्वरित पेठारे तसेच जाऊ देत .छत्रपतींची आग्रा भेट.

१६ ऑगस्ट गुरुवारी रामसिंग शंभूराजांसोबत औरंगजेबाच्या दरबारी मुजऱ्यास गेला असता औरंगजेबाने महाराजांनी मनसब कबुल करून , त्यांच्याकडील किल्ले बादशहास सोपवून काबुलच्या स्वारीवर जावे असे आदेश दिले. शिवाजी महाराजांनी बादशाहाच्या या आदेशास नाकारले . औरंगजेबाचा हा शेवटचा इशारा शिवाजी महाराजांना समजला व त्यांनी अग्र्यातून निसटून स्वराज्यात परतण्याची मोहिमेला पूर्णस्वरूप देण्याचे ठरवले. १७ ऑगस्ट रोजी जुम्माचा दिवस असल्याने औरंगजेबाचा दरबार आज बंद होता . मशिदीत बादशाहसहित सर्व जनता व दरबारी अधिकारी नमाजासाठी जाणार होते. शंभूराजे आज महाराजांसोबतच असणार होते. दुपारच्या सुमारास महाराजांचे डोके दुखू लागले प्रकृती ठीक नसल्याने महाराज झोपी गेले व एक मुलगा त्यांचे पाय दाबीत तेथे बसला. मथुरेतील ब्राम्हण व फाकीरांना मिठाई वाटण्यासाठी पेटाऱ्यात मिठाई भरली जाऊ लागली . महाराज झोपेतून उठले व त्या ठिकाणी हिरोजी फर्जंद हे झोपी गेले. संध्याकाळच्यावेळी पेटारे मथुरेस रवाना झाले त्यातील दोन पेटाऱ्यात शिबाजी महराज व शंभूराजे बसले . पहारेकऱ्यांनी पहिले दोन पेटारे तपासले व उर्वरित पेटारे ना तपासताच जाऊ दिले. महाराज आता बादशहाच्या कैदेतून निसटले होते.

महाराजांच्या शामियाण्याबाहेर असणारे पहारेकरी अधून मधून आत डोकावून पाहत . तेथे महाराजांच्या वेशातील हिरोजी हे महाराजांचा शेला पांघरून झोपी गेलेले व एक मुलगा हिरोजीरूपी महाराजांचे पाय चेपीत बसून होता व त्यांच्या डोक्याजवळ नेहमीचा मंदिल ठेवलेला होता . १८ ऑगस्ट शनिवारी सकाळी पहारेकऱ्यांनी आता डोकावून पहिले असता महाराज झोपलेले दिसले. थोड्यावेळाने महाराजांनी नेहमीप्रमणे सुका मेवा मागवून खल्ला व परत झोपी गेले. महाराज अजूनही उठले नसल्याने पहारेकऱ्यांनी चौकशी केली असता महाराजांचे डोके दुखत असल्याचे सांगण्यात आले . थोड्यावेळाने हिरोजी फर्जंद व तो मुलगा महाराजांचे डोके दुखत असून त्यांच्यासाठी औषध आणण्यासाठी जात असून महाराज झोपी गेले आहेत त्यांना त्रास देवू नये असे पहारेकऱ्यांना बजावत छावणीच्या बाहेर पडले. बराच वेळ झाला तरी काहीच हालचाल न लागल्याने पहारेकरी आत जाऊन पाहू लागले तर त्यास धक्का बसला महाराजांचा पलंग रिकामा होता. त्यांची पादत्राने व त्यांचा मंदिल इतकेच आतील खोलीत होते. महाराज कैदेतून निसटल्याची बातमी फौलादखानास देण्यात आली फौलादखानास कळेना महाराज जमनीत घुसले कि आकाशात उडाले. औरंगजेबास महाराज कैदेतून निसटल्याची बातमी देण्यात आली . आग्रा शहरात हि बातमी पसरली आणि दरबारापासून ते सामान्य जनतेत महाराज कसे निसटले, कुठे गेले याविषयीच्या चर्चा सुरु झाल्या . औरंगजेब ही बातमी ऐकून धास्तावून गेला.छत्रपतींची आग्रा भेट.

औरंगजेब मृत्यूपत्रात नमुद करतो कि त्याच्या क्षणिक निष्काळजीपणामुळे शिवाजीला पलायनाची संधी मिळाली आणि त्यामुळे निर्माण झालेल्या सततच्या संघर्षास अंत न्हवता.

संदर्भ:- शककर्ते शिवराय :- विजयराव देशमुख.
छत्रपती शिवाजी :- सेतू माधवराव पगडी.

नागेश सावंत

छत्रपतींची आग्रा भेट.

Leave a comment