नर्तकाची देखणी मूर्ती

नर्तकाची देखणी मूर्ती

नर्तकाची देखणी मूर्ती –

अजिंठ्याच्या जवळ अन्वा (ता. भोकरदन, जि. जालना) येथे उत्तर चालूक्य कालीन मंदिर आहे. या मंदिवरील विष्णु शक्तीच्या मूर्तींमुळे  अभ्यासकांचे लक्ष इकडे वेधले गेले. याच मंदिरावर प्रदक्षिणा पथावर उजव्या बाजूला ही नर्तकाची मूर्ती मला आढळून आली. या पूर्वी तीन चार वेळा मंदिर बघितले पण ही मूर्ती लक्षात आली नव्हती. नर्तकी, अप्सरा, सुरसुंदरी या नावाने ओळखल्या जाणार्‍या स्त्री  शिल्पांची माहिती होती. अशी भरपुरं शिल्प मंदिराच्या बाह्य भागावर आढळून येतात. पण या तूलनेत मोठ्या आकारातील (शिल्पाची उंची दीड फुट) नृत्य पुरूष (नर्तक)  शिल्पांची संख्या फारच कमी आहे.(नर्तकाची मूर्ती)

या नर्तकाचे कानातले, गळ्यातले, दंडावरचे ठळक ढोबळ वाटणारे दागिने वेगळेपण सांगतात. स्त्रीयांचे दागिने नाजूक कोरलेले असतात. कमरेला असलेली मेखला जाड माळेसारखी दाखवलेली आहे. स्त्रीयांच्या मेखलेचा नाजूकपणा इथे नाही. नर्तकी-नर्तकांचे डोळे काजळाने अधोरेखीत केले असल्याने ठसठशीत दिसून येतात. या नर्तकाचे डोळे तसेच आहेत. ओडीसी नृत्यात यासारखी मुद्रा असलेले गुरू केलूचरण महापात्रा यांचे छायाचित्र प्रसिद्ध आहे. कथ्थक मध्येही याला साधर्म्य साधणारी मुद्रा आढळते. लेणी आणि मंदिरांवर आढळून येणार्‍या नृत्यमुद्रांवरूनच नंतरच्या काळातील नृत्य प्रकार समृद्ध होत गेले असं अभ्यासक सांगतात.

या मंदिर सभामंडपात भव्य अशी वर्तुळाकार रंगशीळा आहे. भोवती आसन कक्ष आहेत. म्हणजे देवतेच्या समोर नृत्य सादर केले जायचे व ते पाहण्यासाठी लोक आसनांवर बसून असायचे. मंदिरांचा मुख्य मंडप हा कलाविष्काराचे केंद्र होता.

छायाचित्र सौजन्य – संदिप देशमुख कौठेककर.

श्रीकांत उमरीकर, औरंगाबाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here