देवळाणे येथील एक प्राचीन स्तंभ शिलालेख !!!

Uploaded By: Discover Maharashtra
Views: 1
2 Min Read

देवळाणे येथील एक प्राचीन स्तंभ शिलालेख !!!

उपलब्धि व स्थळ: हा शिलालेख नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील दोध्याड नदीकिनारी असलेल्या मौजे देवळाणे गावातील जोगेश्वर महादेव मंदिराच्या मुख्य सभामंडपाच्या डाव्या बाजूच्या खांबावर कोरलेला आहे . सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून दोन ओळीचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. लेख अनेक वर्ष उघड्यावर तसेच वातावरणाचा परिणाम त्यावर झाला असून लेखातील अक्षरे झिजून पुसट झाली आहेत . लेखावर खडूने छाप घेतला असता त्यावरील मजकूर स्पष्टपणे वाचता येतो

शिलालेख वाचन:-
१. सोमदेवाचेनि राहीदेवे षांबा
२. घडीला
अर्थ : सोमदेवाचा पुत्र राहिदेव याने मंदिराचा खांब घडविला….

शिलालेख महत्व :-
या लेखात “सोमदेवाचेनि”, “राहीदेवे”, “घडीला” अशी रूपे आढळतात. “-चेनि” हा तृतीया विभक्तीचा प्राचीन प्रयोग असून तो यादवकालीन व मध्ययुगीन मराठी शिलालेखांत वारंवार दिला जायचा . त्यामुळे हा लेख प्राचीन मराठी भाषेच्या विकासाचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाचा आहे.
लेखात सोमदेव व राहीदेव ही नावे दिलेली आहेत. ही नावे त्या काळातील स्थानिक प्रमुख दाते, पिता पुत्र किंवा कारागीर असण्याची शक्यता आहे. अशा नोंदींमुळे त्या प्रदेशातील सामाजिक व प्रशासकीय रचना समजण्यास मदत होते.

“षांबा घडीला” या वाक्यामुळे खांबा जोगेश्वर महादेव (शिवाशी संबंधित रूप) या देवतेशी संबंधित प्रतिमा किंवा स्थापत्य निर्माण केल्याचा उल्लेख दिसतो. त्यामुळे हा लेख शैव धार्मिक परंपरा व देवपूजेच्या प्रथांचा पुरावा देतो.घडीला” या शब्दाचा अर्थ घडविला / तयार केला असा आहे. त्यामुळे हा लेख मंदिराचा मुख्य भाग किंवा मंदिराचा सभामंडप निर्माण केल्याची नोंद असल्याचे दर्शवतो. हे उदाहरण त्या काळातील कला व स्थापत्य परंपरेच्या अभ्यासासाठी उपयुक्त आहे.भाषाशैली व शब्दरूपांवरून हा लेख सुमारे इ.स. १२वे–१३वे शतक (यादवकाळ प्रारंभीचा काळ असावा) कारण हे मंदिर यादवांनी बांधल्याचा इतिहास आहे .

शिलालेख वाचन:- अनिल दुधाणे, अथर्व पिंगळे
मंदिर फोटो:श्री रोहन गाडेकर
सदर कार्यात श्री महेंद्र महाले यांची विशेष मदत व सहकार्य लाभले

Written By: Anil Dudhane

Leave a Comment