भोसलेकालीन तान्हा पोळा
नागपुरातील सर्वात मोठा लाकडी बैल
बैलपोळा हा महाराष्ट्रातील, विशेषतः विदर्भातील शेतकरी जीवनाशी अतूट नाते सांगणारा महत्त्वाचा सण. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि त्यांच्या श्रमांचा सन्मान करण्याचा हा दिवस. पोळ्याच्या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून पूर्ण विश्रांती दिली जाते. त्यांना नदी, विहीर किंवा तलावावर नेऊन स्वच्छ अंघोळ घातली जाते. अंगाला तेल लावून, शिंगांना रंग देऊन आणि गळ्यात घुंगरांच्या माळा, झुली व विविध प्रकारच्या सजावटीच्या वस्तूंनी त्यांना सजवले जाते. त्यानंतर घरातील बैलांची विधिवत पूजा केली जाते. त्यांच्या आवडीचे गोडधोड पदार्थ, विशेषतः पुरणपोळी, खाऊ घातली जाते. बैलांना सजवून गावातून मिरवणूक काढण्याची परंपराही अनेक ठिकाणी पाहायला मिळते. या दिवशी शेतकरी आणि त्याच्या कुटुंबासाठी बैल हे केवळ पशुधन नसतात, तर शेतीच्या संसारातील एक महत्त्वाचा साथीदार म्हणून त्यांचा सन्मान केला जातो.
लहान मुलांचा तान्हा पोळा :
मात्र, लहान मुलांना मोठे बैल सांभाळणे किंवा त्यांना मिरवणुकीसाठी घेऊन जाणे शक्य नसते. मुलांचीही पोळ्याच्या उत्सवात सहभागी होण्याची हौस पूर्ण व्हावी, यासाठी ‘तान्हा पोळा’ ही सुंदर परंपरा निर्माण झाली.
तान्हा पोळ्याच्या दिवशी लहान मुले लाकूड किंवा इतर साहित्यापासून तयार केलेले छोटे बैल सजवतात. या छोट्या बैलांना रंगवले जाते, त्यांना आकर्षक सजावट केली जाते आणि खऱ्या बैलांप्रमाणेच त्यांची पूजा केली जाते. मुले आपल्या छोट्या बैलांना घेऊन घराघरांत जातात आणि मोठ्या उत्साहाने तान्हा पोळा साजरा करतात. काही ठिकाणी मुलांसाठी छोट्या बैलांच्या मिरवणुका काढल्या जातात. मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद, सजवलेले लाकडी बैल आणि गावातील उत्सवी वातावरण यामुळे तान्हा पोळ्याला एक वेगळीच रंगत येते.
भोसलेकालीन परंपरेची आठवण :
विदर्भातील लोकपरंपरेनुसार नागपूरकर भोसल्यांच्या शासनकाळात तान्हा पोळ्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. पुढे ही परंपरा विदर्भातील विविध भागांत रूढ झाली. आजही विदर्भातील अनेक गावांमध्ये आणि शहरांमध्ये तान्हा पोळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
तान्हा पोळा हा केवळ मुलांचा खेळ किंवा उत्सव नाही. त्यामागे शेती, बैल, शेतकरी आणि पुढच्या पिढीला आपल्या ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारी परंपरा दडलेली आहे. आजच्या आधुनिक काळात शेतीची साधने आणि पद्धती बदलत असल्या, तरी पोळा आणि तान्हा पोळ्यासारख्या परंपरा आपल्याला आपल्या कृषी संस्कृतीशी जोडून ठेवतात. लहान मुलांच्या माध्यमातून ही परंपरा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते, हीच या सणाची खरी खासियत आहे. मातीशी, शेतीशी आणि आपल्या संस्कृतीशी असलेले नाते जपणारा हा सुंदर सण म्हणजेच तान्हा पोळा!
नागपुरातील सर्वात मोठा लाकडी बैल :
नागपूर शहरात बैलपोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरवण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. सन 1789 मध्ये दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) यांनी या उत्सवाची सुरुवात केल्याचे सांगितले जाते. लहान बालगोपालांना बैलांचे महत्त्व समजावे, या उद्देशाने लाकडी बैलांच्या तान्हा पोळ्याची परंपरा सुरू करण्यात आली. श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) यांनी लाकडी बैल तयार करून मागवले आणि ते लहान मुलांना वाटण्यात आले. जिवंत बैलांप्रमाणे या लाकडी बैलांना सजवले जात असे. आंब्याच्या पानांचे तोरण तसेच जिलेबी, फळे आणि इतर खाद्यपदार्थांनी सजवलेले तोरण बैलांना बांधले जात असे. त्या तोरणामध्ये मुलांना उभे करून बैलांची पूजा केली जात असे.
पूजा झाल्यानंतर तोरण तोडून, पोळा फोडून वाजतगाजत हनुमान खिडकीचे दर्शन घेतले जाई. हनुमानाला नारळ अर्पण करून परतल्यानंतर मुलांना खाऊ आणि पैसे वाटले जात असत. काळानुसार या खाऊमध्ये चॉकलेट, बिस्किटांचे पुडे आदींचीही भर पडली.
या आगळ्यावेगळ्या परंपरेला यंदा 237 वर्षे पूर्ण होत आहेत. आजही राजे मुधोजी महाराज भोंसले यांनी ही ऐतिहासिक परंपरा कायम ठेवली आहे. त्यांच्या सिनियर भोंसला पॅलेस, महाल, नागपूर येथील निवासस्थानी या परंपरेतील भव्य लाकडी बैल जतन करण्यात आला आहे. या लाकडी बैलाची उंची सुमारे 8 फूट आणि लांबी 6 फूट असून, त्याच्या पायात चांदीचा तोडा घातलेला आहे. नागपूरातील तान्हा पोळ्याच्या परंपरेतील हा भव्य लाकडी बैल विशेष आकर्षण ठरतो.
श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) यांच्या काळात ज्या पद्धतीने वाजतगाजत मिरवणूक काढली जात असे, त्याच परंपरेचे आजही पालन केले जाते. 200+ वर्षांनंतरही ही ऐतिहासिक परंपरा आजही जिवंत आहे, हे नागपूर आणि विदर्भाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे एक सुंदर उदाहरण आहे. राजे मुधोजी महाराज भोंसले यांनी ही परंपरा नियमितपणे सुरू ठेवली असून, पुढील पिढ्यांपर्यंतही ती अशीच सुरू राहील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
Written By: Vidarbha Darshan