चौमुखी गणेश, जवळगाव, यवतमाळ
भारतीय संस्कृतीत गणरायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सामान्यतः आपणास एकमुखी गणेशाचे लोभस रूप परिचित आहे. मात्र, नेर तालुक्यातील ऐतिहासिक आणि दुर्लक्षित जवळगाव येथे गणेशाची एक प्राचीन व दुर्मिळ चतुर्मुखी मूर्ती आढळून आली आहे. विदर्भात अशा प्रकारच्या मोजक्याच प्रतिमा असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या मूर्तीला प्राचीन काळात विशेष महत्त्व असावे. या अनुषंगाने पुरातत्त्व विभागाने या मूर्तीचा सखोल अभ्यास व संशोधन करणे गरजेचे आहे.
नेर तालुक्यात प्राचीन गणेशाचे हे स्थान असूनही ते अद्याप फारसे प्रकाशझोतात आलेले नाही. या तालुक्याला मोठा सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारसा लाभला आहे. काळाच्या ओघात अनेक ऐतिहासिक वास्तू आणि पुरातन अवशेष दुर्लक्षित होत आहेत. त्यामुळे या वारशाचे संवर्धन आणि जतन होणे आवश्यक आहे.
जवळगाव येथे आढळलेली गणेशाची ही प्रतिमा वैशिष्ट्यपूर्ण आहे. एकाच पाषाणात चार गणेश प्रतिमा अंकित करण्यात आल्या आहेत. प्रतिमाशास्त्रात अशा प्रकारच्या प्रतिमेला ‘सर्वतोभद्र’ असे संबोधले जाते. जवळगावची गणेशमूर्ती याच प्रकारातील आहे. ही मूर्ती उत्तम स्थितीत असून, पूर्वी ती उघड्यावर होती. ग्रामस्थांनी तिची स्थापना एका छोट्या मंदिरात केली आहे.
काळ्या पाषाणात कोरलेली ही प्रतिमा अंदाजे ७०० वर्षे प्राचीन असल्याचे सांगितले जाते. चारही गणेश प्रतिमा चतुर्हस्त असून, अर्धपर्यंकासनात विराजमान आहेत. त्यांच्या हातात हस्तिदंत, परशू, अंकुश आणि मोदक धारण केलेले दाखविण्यात आले आहे. या प्रतिमेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चारही गणेशांच्या मस्तकावर सुंदर नक्षीकाम केलेले भव्य मुकुट आहेत. या मुकुटांमुळे दुरून पाहिल्यास ही सर्वतोभद्र गणेश प्रतिमा एखाद्या छोट्या मंदिराची प्रतिकृती असल्याचा भास होतो.
गणेशाच्या अन्य अलंकारांमध्ये ठळकपणे दिसणारा अलंकार म्हणजे ‘सर्प उदरबंध’. हातांवर केयूर आणि बाजूबंदही आहेत. अशा प्रकारची सर्वतोभद्र गणेश प्रतिमा धार्मिक तसेच सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
तज्ज्ञांच्या मते, अशा प्रतिमा ज्या ठिकाणी चार वाटा किंवा मार्ग एकत्र येतात, अशा ठिकाणी स्थापन केल्या जात असाव्यात. म्हणजेच वाटसरूंना चारही दिशांचा संकेत देण्याच्या दृष्टीने या प्रतिमांचा प्राचीन काळात व्यावहारिक उपयोगही होत असावा. याला पूरक असा संदर्भ संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीत आढळतो. ज्ञानेश्वरीत ‘चतुष्पथीचे गणपती’ असा उल्लेख येतो. हा उल्लेख अशाच प्रकारच्या प्रतिमांशी संबंधित असावा, असे अभ्यासकांचे मत आहे.
या गणेशमंदिराच्या शेजारी हेमाडपंथी शिवालय आहे. त्याच परिसरात पूर्वी श्रीविष्णूचेही मंदिर होते. त्यासोबत गणपतीचे मंदिरही अस्तित्वात होते. मात्र, सध्या विष्णू आणि गणपती मंदिरांचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. या मंदिरांतील श्रीविष्णू आणि गणेशाच्या मूर्ती मात्र सुस्थितीत आहेत.
गावाच्या पश्चिमेस आणखी एक हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिरात श्रीविष्णूची आणि गरुडाची मूर्ती स्थानांतरित करून ठेवण्यात आली आहे. ही दोन्ही हेमाडपंथी मंदिरे आजही गावचा ऐतिहासिक वारसा जपून आहेत.
जवळगावात एक गढीही असून, तिच्याशी संबंधित मोठा ऐतिहासिक वारसा आहे. गावात भवानी मातेचे अर्धपीठ असून, हे पीठ जेठसिंग यांच्या वंशजांनी तुळजापूरहून आणल्याचे गावातील ज्येष्ठ नागरिक महादेव गुघाणे आणि ग्रामपंचायत सदस्य बाळू घोडे यांनी सांगितले.
नेरमधील मानाच्या गणपती मठासोबतच आता जवळगावातील या दुर्मिळ चौमुखी गणेश प्रतिमेचे महत्त्वही समोर आले आहे. या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाचा विकास व्हावा, तसेच पुरातन वारशाचे जतन व संवर्धन व्हावे, अशी अपेक्षा भाविक आणि लोकप्रतिनिधींकडून व्यक्त केली जात आहे.
Vidharbh Darshan FB Page
