विठ्ठल रखुमाई मंदिर, श्रीगोंदा

By Discover Maharashtra Views: 1352 2 Min Read

विठ्ठल रखुमाई मंदिर, श्रीगोंदा –

नगर जिल्ह्याच्या दक्षिणेकडे असणारे श्रीगोंदा हे ऐतिहासिक व पौराणिक वारसा लाभलेले शहर होय. श्रीगोंदा हे शहर सरस्वती नदीच्या काठी वसलेले असून प्राचीनकाळी या नगरीला ‘श्रीपूर‘ असे नाव होते. या श्रीपुरचे मध्ययुगात ‘चांभारगोंदे’ झाले व आज श्रीगोंदा म्हणून ओळखले जाते. श्रीगोंदा या नगरीला दक्षिण काशी म्हटले जाते कारण या ठिकाणी प्राचीन असंख्य मंदिरे आहेत. या ठिकाणची प्राचीन, यादवकालीन व मराठाकालीन मंदिरे पाहिली की श्रीगोंदा शहराच्या वैभवाची आपल्याला साक्ष पटते.(विठ्ठल रखुमाई मंदिर, श्रीगोंदा)

श्रीपूर हे नाव श्रीलक्ष्मीच्या येथील वास्तव्यावरून पडल्याचे श्रीपूर महात्म्य ग्रंथात म्हटले आहे. पांडू विप्र नावाच्या भक्तासाठी श्री विष्णूंनीही या ठिकाणी बालरूपात अवतार घेतला म्हणून त्यांची म्हणजेच श्री रखुमाई व श्री पांडुरंगाची स्वतंत्र मंदिरे येथे पहावयास मिळतात. पंढरपुरचे श्री विठ्ठल व श्रीगोंद्याचे श्री पांडुरंग ही दोन स्वतंत्र दैवते असल्याचेही या ग्रंथात दिले असून सदर श्रीपूर नगरीचे वर्णन स्कंद पुराणात सापडते. श्री लक्ष्मी पांडुरंगाशिवायही अनेक देवतांची मंदिरेही शहरात जागोजागी आहेत.

श्रीगोंदा शहरातील मध्यवर्ती भागात, तेली गल्लीत विठ्ठल व रखुमाई अशी दोन स्वतंत्र मंदिरे शेजारी-शेजारी उभी आहेत. दोन्ही मंदिरे पूर्वाभिमुख असून यादव काळाच्या अखेरीस बांधली गेली असावीत. मंदिरांना रंगरंगोटी करण्यात आली आहे. मंदिरांची रचना मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी असून दोन्ही मंदिरे स्थापत्य व शिल्पंकलेच्या दृष्टीने सारखीच आहेत. एका मंदिराच्या गर्भगृहात विठुरायाची व दुसऱ्या मंदिराच्या गर्भगृहात रखुमाईची शाळीग्राम शिळेतील सुबक मूर्ती आपल्या नजरेस पडते.

चारही बाजूने लोकवस्ती असल्याने प्रथमदर्शनी लगेच मंदिरे आपल्या नजरेस येत नाही. शहरातील पुरातन लक्ष्मीमाता मंदिराचा शोध घेत असताना आमच्याही अकस्मातच ही मंदिरे नजरेस पडली. कधी श्रीगोंदा इथे आलात तर एकदा आवर्जून ही मंदिरे पहावीत. या नगरीच्या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेला एक ऐतिहासिक ठेवा पाहिल्याचे समाधान आपल्याला नक्की मिळेल.

– रोहन गाडेकर

Leave a comment