महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 87,71,645

विठ्ठल मूर्ती आणि स्थलांतरे !

By Discover Maharashtra Views: 1523 7 Min Read

विठ्ठल मूर्ती आणि स्थलांतरे !

महाराष्ट्रातील कष्टकरी, सामान्य, शेतकरी, श्रीमंत – गरीब अश्या सर्वांचे श्रद्धास्थान म्हणजे पंढरपूरचा विठोबा. याच्या दर्शनासाठी लोक दुरून येतात. चंद्रभागेत स्नान करताना, वाळवंटी भक्त पुंडलिकाचे दर्शन घेत विठूचा गजर करीत फुगड्या घालत, पताका नाचवत अठ्ठावीस युगे विटेवरी उभा असलेल्या वैकुंठीचा राया अर्थात विठोबाचे दर्शन घेत त्यासोबत एकरूप होऊन आपल्या मार्गी पुन्हा मार्गस्थ होतात. आदि शंकराचार्य, ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, नामदेव, नरहरी सोनार, गोरोबा काका, तुकोबा इत्यादी संतांनी विठ्ठलाला आराध्य मानून इथल्या सामान्य जनते मध्ये भक्तीचे, श्रद्धेचे आणि परमार्थाचे बीज रोवले. या संतांनी आपले जीवनच विठ्ठलमय केले.(विठ्ठल मूर्ती आणि स्थलांतरे !)

विठ्ठल मूर्ती ही केव्हाची म्हणजे मूर्तीचे वय काय? मंदिर केव्हा पासून अस्तित्वात होते हा आजच्या लेखाचा विषय नाही. मध्ययुगीन काळात देवाची मूर्ती पंढरीच्या बाहेर किंवा मंदिराच्या बाहेर काढल्याचे उल्लेख आहेत. तुर्कांचा अर्थात मुसलमानांचा (ऐति. शब्दकोश, केळकर पृ.५७०) म्हणजेच इस्लामी आक्रमकांचा उपसर्ग मंदिराला झाल्याचा उल्लेख कागदपत्रात आहे. ही उल्लेख वेग वेगळ्या काळातील आहेत, त्यामुळे त्यावर विचार करणे आवश्यक आहे. अशा घटनांची माहिती/नोंद ही बखरीतून, मराठी कागदपत्रांतून, फार्सी कागदातून, पत्रातून, किंवा अगदीच छोट्या छोट्या नोंदीतून मिळतात. बहुतांशी या सामान्य वाचकास त्यातील भाषेमुळे क्लिष्ट ठरतात, या कारणे शक्य तितक्या सोप्या भाषेत त्यातील माहिती उकल करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तरी आपण आता नोंदी पाहु यात.

• अफजल खानाच्या स्वारी दरम्यानचे उल्लेख (इ.स.१६५९)

1) भविष्य सांगणाऱ्या शके १५८१(इ.स. १६५९) एका कागदात वैशा (वैशाख मासी) पंढरपुरीचा विठल मूर्ति काडिली, तुळजापुरीची मूर्ति काहिली, कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्ति काडिली होती. इथे काडीली म्हणजे त्रास पोहचवला असा अर्थ होतो. (शिवचरित्र साहित्य खं. १ ले. ४७)
2) ते पंधरावीस हजार फौज व पायदळ दहा हजार गारद(शिपाई) व तोफखाना व मावळे लोक त्या प्रांतातील माहित असावे म्हणून तीन हजार ठेऊन दरमजल.. पंढरपुरी आले त्या स्थळी उपद्रव केला. परंतु देव बडवे यांनी लपवून राखीला. (सप्त प्रकरणात्मक चरित्र पृ ६९)

3) फौज एकत्र करून पंढरीस आले. भिमातिरी उतरले. देवास उपद्र देऊन वाईस आले.( सभासद पृ.११)
4) निवाडा करावा तो क्षेत्रास खाने अजम अफजलखानाची तसवीस लागली ताटे व थिटे याणी विठल आराध्याचा खून करून मोगलाईमधे …(मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड २० ले २१७)

5) तेथुनि कुच केलं कटकाला । अबदुल दरमजली चालिला ॥ मजलीवर मजल । वेगी पंढरपुरा आला ॥ फोडिला विठोबा | पुंडलिक पाण्यांत टाकिला ॥ (ऐत. पोवाडे पृ.१२)
6) शिवाजीराजे जावळीस पावले ह्मणावयाचें कळून, पंढरपूरचे मार्गाने जाणार वाटेनें न जातां विठोबाचे मूर्तीस उपद्रव करावयाची योजना केली । त्यास विठा अप्रत्बा होऊन त्या वेळेस मूर्ती दृष्टीस पडेनासी। झाली । (मराठ्यांच्या इतिहासाची साधने खं.९, तंजावर शिलालेख)

• वरील नोंदींवरून निष्कर्ष पुढील प्रमाणे –

I. चिटणीसच्या म्हणण्या नुसार पंढरीत खानाने थैमान घातलं. तो येणार या भीतीने बडव्यांनी म्हणजे पुजाऱ्यानी मूर्ती लपवून ठेवली. ही मूर्ती कोठे, कधी लपवली याचा तपशील दिलेला नाही.
II. सभासद बखरीत नुसते देवाला उद्रव दिला असा उल्लेख आहे. मूर्ती फोडली का? किंवा कुठे दुसरीकडे हलवली किंवा इतर कोणता ही तपशील दिलेला नाही.

III. अज्ञानदासच्या पोवाडा नुसार खान पंढरपूरला आला, विठ्ठलाची मूर्ती फोडली आणि पुंडलिक पाण्यात बुडवला. पुंडलिकाचे मंदिर हे चंद्रभागेच्या तीरी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
IV. वरील सर्व नोंदींमधून खानाने क्षेत्र पंढरपूर आणि मंदिरास त्रास दिला हा निष्कर्ष निघतो. मूर्ती बद्दल अधिकसा तपशील उपलब्ध नाही.

• मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धातील उल्लेख (इ.स. १६८९-१७०७)

1) छत्रपति राजाराम महाराजांची २४ एप्रिल १६९४ चे ३ पत्र उपलब्ध आहे. मराठी लष्कराचा उपद्रव होत असे. देवाला, पुजारी लोकांना तसेच गावकरी व क्षेत्राला कोणताही उपद्रव देऊ नये त्यास काडीचा आजार लागता कामा नये, देवाचा उत्सव यथासांग चालवा अशी आज्ञा पत्रात केली आहे. (पत्राचा फोटो व लिप्यंतर जोडले आहे, पहा चित्र क्रमांक १)
2) तर उर्वरित एक अभयपत्र तर एक आज्ञापत्र आहे. पंढरपूर जवळील देगाव या गावात विठ्ठलाची मूर्ती लपवली जायी. या गावला मराठी लष्कराचा उपद्रव होत असे. हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही याच कारणास्तव महाराजांनी ही पत्र फर्मावले आहेत. ( शिवचरित्र साहित्य खं.११ ले.५३-५४)

3) संताजी घोरपडे याचे २४ जुलै १६९५ चे पत्र उपलब्ध आहे. त्यात श्री [विठ्ठल] देवाची मूर्ती मोहोळच्या देगाव मध्ये आहे. मौजे मजकुरासी कोणतेही प्रकारचा उपद्रव न देणे आणि कोणी दिलाच तर त्याचे पारिपत्य करणे अशी आज्ञा केली आहे. (कित्ता खंड ११ ले.५५
4) १६९५ साली मोगलांच्या धामधुमीच्या प्रसंगी, पंढरपूरच्या देवालयातील मूर्ती सुरक्षिततेसाठी मोहोळ प्रांतातील देगाव येथे घेऊन जाण्यात आल्या. आणि त्यानंतर चार वर्षांनी १६९९ साली देगावातून कार्तिकी एकादशीला पंढरपूरला परत नेण्यात आल्या. २ ऑक्टोबर १६९५ आणि १३ ऑक्टोबर १६९९ चे दोन महजर उपलब्ध आहे. (शिवचरित्र साहित्य खं.११ ले ५-६) [दोन्ही महजर दिलेले आहेत ते पाहणे]

5) याच काळात औरंगजेबाचा मुक्काम ब्रम्हपुरी येथे होती. पंढरपूर ते ब्रम्हपुरी हे अंतर केवळ १७ मैलांचे आहे. अशा परिस्थितीत मध्ये धर्मवेड्या बादशहा पासून मूर्तीचे रक्षण करणे हे परम कर्तव्य बडव्यांनी समजल आणि मूर्ती मोहोळ प्रांतातील देगाव येथे सुरक्षित ठेवली हे दिसून येत.
6) २ जानेवारी १७०५ ला बादशहाचा मुक्काम हा पंढरपूरला होता. हिंदूंची गर्दी तेथे होते, यात्रा भरते, बहुसंख्येने लोक पूजा वगैरे करतात ही बातमी औरंगजेबाला कळते तेव्हा त्याने पंढरपूरचे मंदिर पाडून टाकण्याचे आदेश दिले. तसेच मंदिरात गायी कापावी असे ही फर्मावले. त्याच्या हुकुमाची अंमलबजावणी झाली व देऊळ पाडून टाकण्यात आले. (मोगल दरबारची बातमीपत्रे खं.३)

निष्कर्ष –

i. जेव्हा जेव्हा पंढरपूरला तांब्रांचा म्हणजेच मुसलमानांचा उपद्रव झाला आहे तेव्हा तेव्हा देवाची मूर्ती ही मोहोळ प्रांतातील देगाव मध्ये सुरक्षित ठेवण्यात आली अशी कागदपत्रांतून दिसून येते.
ii. आक्रमण शांत झाल्यावर किंवा, परिस्थिती सुधारल्यावर मूर्ती पुन्हा मंदिरात म्हणजे पंढरपुरात आणली जायी.
iii. जेष्ठ इतिहास संशोधक श्री. ग. ह. खरे आपल्या महाराष्ट्राची चार दैवते या पुस्तकाच्या उपसंहार लिहितात की, हल्लींची मूर्ति मध्ययुगाच्या आरंभीची तर दिसत नाहींच. पण मध्युगाच्या अखेरची तरी आहे कीं नाहीं याविषयीं शंका आहे. या मूर्तिवर अनेक गंडांतरें आलीं होतीं. त्यांतून ती सलामत सुटली असेल असें वाटत नाहीं.(कित्ता पृ.२४५)

संदर्भ :-
1. मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ९, २०, इतिहासाचार्य राजवाडे
2. महाराष्ट्राची चार दैवते, डॉ. ग. ह. खरे
3. महजर – महाराष्ट्राच्या इतिहासाचे दस्तऐवज इ.स. १५०० ते १८००, डॉ. अनुराधा कुलकर्णी
4. शिवचरित्र साहित्य खंड ११, डॉ. ग. ह. खरे
5. मोगल दरबारची बातमीपत्रे खंड ३, सेतू माधवराव पगडी
6. सभासद बखर, संपादक र. वि. हेरवाडकर
7. श्री शिवछत्रपतींचे सप्तप्रकरणात्मक चरित्र, संपादक र. वि. हेरवाडकर
8. ऐतिहासिक पोवाडे, केळकर

– प्रथमेश खामकर

Leave a Comment