इतिहासप्रवासमहाराष्ट्र दर्शन

श्रीगोंदा नगरीचा इतिहास

श्रीगोंदा नगरीचा इतिहास

श्रीगोंदा हे नगर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील एक ऐतिहासिक व पौराणिक सुवर्णसंपन्न वारसा लाभलेले नगर होय. श्रीगोंदा नगरीला प्राचीनकाळी ‘ श्रीपूर ‘ असे नाव होते. या श्रीपुरचे ‘ मध्ययुगात चाम्भारगोंदे’ झाले हे आजचे श्रीगोंदे होय. श्रीगोंदा या नगरीला दक्षिण काशी म्हटले जाते कारण या ठिकाणी प्राचीन असंख्य मंदिरे आहेत.या ठिकाणची प्राचीन,पूर्वयादव,यादवकालीन,मराठाकालीन मंदिरे पहिली कि श्रीगोंदा शहराच्या वैभवाची साक्ष पटते. मंदिरांबरोबरच शिंद्यांच्या राजवटीतील ऐतिहासिक व भव्य वाडे हेही श्रीगोंद्याचे एक वैषीष्ट्यच. अनेक मंदिरे वाडे व त्यासोबतच विविध साधू संतांच्या वास्तव्याने हि नगरी पुनीत झाली आहे.

श्रीपूर हे नाव श्रीलक्ष्मीच्या येथील वास्तव्यावरून पडल्याचे श्रीपूर महात्म्य ग्रंथात म्हटले आहे . पांडू विप्र नावाच्या भक्तासाठी श्री विष्णुंनीही या ठिकाणी बालरूपात अवतार घेतला म्हणून त्यांची श्री लक्ष्मी व श्री पांडुरंगाची स्वतंत्र मंदिरे येथे पहावयास मिळतात. पंढरपुरचे श्री विठ्ठल व श्रीगोंद्याचे श्री पांडुरंग हि दोन स्वतंत्र दैवते असल्याचेही या ग्रंथात दिले असून. सदर श्रीपूर नगरीचे वर्णन ‘ स्कंद पुराणात ‘ सापडते. श्री लक्ष्मी पांडुरंगाशिवायही अनेक देवतांची मंदिरेही शहरात जागोजागी आहेत. १२ महादेव( ३ अन्य ), अष्टविनायक ( अन्य ३) , अष्टभैरव,नवदुर्गा, ११ मारुती याशिवाय श्री बालाजी, लक्ष्मी नारायण, एकमुखी दत्त, विठ्ठल रुक्मिणी, श्रीराम, श्रीकृष्ण, शनी महाराज, श्री भगवान कार्तिकेय, खंडोबा अशी अन्य मंदिरेही आहेत.

श्रीगोंदा नगरीचा इतिहास

याशिवाय भारतात अत्यंत थोड्या ठिकाणी असणारे सूर्य मंदिरही होते पण सध्या ते अस्तित्वात नाही. त्याच बरोबर श्रीगोंदा नगरीत होऊन गेलेल्या विविध संताची मंदिरेही आहेत त्यात श्री संत शेख महम्मद महाराज, संत प्रल्हाद महाराज, संत गोधडे महाराज, संत राउळ महाराज, संत गोविंद महाराज चांभार, संत वामनराव पै यांचे गुरु संत नानामहाराज श्रीगोंदेकर, संत मोदोबा महाराज तेली अलीकडील काळातील संत तात्या महाराज महापुरुष असे विविध जाती- धर्मातील संत या भूमीत होऊन गेले त्या सर्वांची मंदिरेही शहरात आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पदस्पर्शही येथे झाला असून दांडेकर मळा येथे त्यांचे मंदिर आहे. श्रीगोंदा हे प्रामुख्याने ज्या संताच्या नावाने ओळखले जाते ते संत शेख मह्म्मद महाराज यांची संजीवन समाधी हेही या नगरीचे आणखी एक विशीष्टय म्हणता येईल.

श्री शेख महम्मद महाराजांच्या जन्म बीड जिल्ह्यातील किल्ले धारूर येथे झाला त्यांचे मुळ गाव बीड जिल्ह्यातीलच आष्टी तालुक्यातील पुंडीवाहिरे हे होते. त्यांचे घराण्याचा खाटकाचा व्यवसाय होता. पण त्यांना ईश्वरभक्तीची ओढ लागली व वारकरी संप्रदायाचा त्यांनी पुरस्कार केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे यांनी महारांना गुरु मानले होते त्यांनीच श्रीगोंदा येथे मकरंद पेठ वसवून तेथे महाराजांना मठ बांधून दिला.महम्मद महाराज हे संत तुकाराम महाराजांचे समकालीन होते त्यांनी तुकाराम महाराजांचे कीर्तन सुरु असताना आग लागली त्यांनी हाताने येथूनच देहूचा मंडप विझविल्याची आख्यायिका सांगितली जाते.

श्रीगोंदा नगरीचा इतिहास

संत शेख महम्मद महाराज यांनी विपुल लेखन केले असून ‘ योगसंग्राम व पवन विजय ‘ हे त्यांचे प्रमुख ग्रंथ आहेत. शेख महम्मद अविंध / त्याचे हृदयी गोविंद // असे ते एका अभंगात म्हणतात. सर्वभूती ईश्वर एक असल्याची शिकवण संत शेख महम्मद महाराज यांनी दिली.शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांचा या शहराशी ऋणानुबंध होता.मालोजी राजेंनी या ठिकाणी मकरंदपूर नावाची पेठ निर्माण करून शेख महम्मद महाराजांसाठी मठ बांधला.त्या ठिकाणी भव्यवाडा निर्माण करून देऊळगाव राजे वरून मालोजी श्रीगोंद्यास वास्तव्यास आल्याचे ऐतिहासिक पुरावे मिळतात. श्रीगोंदा नगरीत मोठ्या सराफी व व्यापारी पेठा होत्या वेरुळच्या घ्रुश्नेश्वरचे बांधकामासाठी येथीलच शेशाप्पा नाईक पुंडे यांच्या पेढीतून रक्कम नेत असल्याचीही नोंद सापडते.

थोर मराठा सेनानी महादजी शिंदे, दत्ताजी शिंदे,राणोजी शिंदे यांच्या वास्तव्याच्या व शिन्देकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक इमारती आजही भग्नावस्थेत का होईना उभ्या आहेत. शिंदे घराण्यातील सती गेलेल्य स्त्रियांच्या छत्र्या मैनाबाईचा माळावर पहावयास मिळतात तसेच महादजी शिंदे यांच्या पादुकाही पहावयास मिळतात.खर्ड्याच्या लढाईचा विजयोत्सव भगवा झेंडा फडकावून केला होता त्या स्थानाला “विजय चौक झेंडा” असे नाव दिले आहे.ज्या वेशीतून शिंदे घराण्यातील वीरपुरुष बाहेर पडले व परत आलेच नाहीत त्या “दिल्ली वेशीला” आजही अपशकुनी समजले जाते लोक चांगल्या कामासाठी व गावाबाहेर जाण्यासाठी या वेशीचा वापर आजही करीत नाहीत.

श्रीगोंदा नगरीचा इतिहास

सांस्कृतिक परंपरा, ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले श्रीगोंदा हे तालुक्याचे शहर पूर्वी दुष्काळी म्हणून ओळखले जायचे. शिवाजीबाप्पू नागवडे यांच्या नैतृत्वाखाली १९५२-५३ मध्ये कुकडी पाणी प्रश्नासाठी मोठा संघर्ष केला .घोडसाठी लोकचळवळ निर्माण करून या संघर्षातून श्रीगोंद्यात पाणी प्रश्न सोडवण्यासाठी यशस्वी लढा दिला.आज कुकडी घोडच्या पाण्यामुळे या शहराची समृद्धतेकडे वाटचाल सुरु झाली आहे.

माहिती साभार शिवाधिन आशुतोष देशमुख यांच्या फेसबुक वरून

Website आणि Android App चा हेतू महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी हा आहे.
आपल्याकडे काही लेख असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.

लेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close