मंदिरेमहाराष्ट्राचे वैभवमाझी भटकंती

विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हाडशी

विठ्ठल रुक्मिणी मंदिर, हाडशी

हाडशी हे मुळशी तालुक्यातील एक छोटेसे गाव. पुण्यापासून साधारण ६० किमीवर आणि पुणे – चांदनी चौक – पिरंगूट – पौड – उजवीकडे वळून चाले- कोळवण खोरे – हाडशी अश्या मार्गाने येथे पोहचता येते.

हाडशीचे मंदिर एका छोटय़ाश्या डोंगरावर उभारलेले आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या स्वागत कमानीवर विविध धर्माची चिन्हे कोरलेली आहेत. तेथून पुढेच डाव्या हाताला डोंगरावर जाण्यासाठी डांबरी रोड थेट मंदिरार्पयत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळ, आंबा अश्या हिरवीगार गर्द झाडीतून जाणारा वळणावळणाचा घाट रस्ता आपल्याला डोंगरावरच्या प्रशस्त वाहनतळावर पोहचवतो. पार्किग शेजारी पोटपूजा करण्यासाठी छोटे हॉटेलही आहे. पण इथे आम्ही आधी विठोबा मग पोटोबा असं ठरवून मंदिराकडे पायी निघालो.

शेजारीच मंदिराचे प्रांगण सुरू होते. आधी गणपती मंदिर आहे. पुढे काही पायऱ्या चढून गेल्यावर विठ्ठल मंदिराचे प्रांगण सुरु होते. संध्याकाळी या ठिकाणी कारंजे सुरू करतात. दोनही बाजूला गोल आकाराच्या कुंडात कमळे लावलेली आहेत. आजुबाजूचा सुंदर निसर्ग, सगळीकडे हिरवेगार लॉन्स, कारंजी पाहून मन प्रसन्न होते. मंदिरात शांतता आणि स्वच्छता आहे. मंदिराच्या भिंतीवर सत्यसाईबाबांची वचने, भजने आणि संदेश लिहिलेले फलक आहेत. मंदिराच्या उदघाटनाच्या कार्यक्रमाचे फोटोही आहेत. मंदिरातील विठ्ठल रखुमाई ची सुंदर मूर्ती आहे.

श्री सिद्धिविनायक, श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री शिर्डीसाईंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या शुभ हस्ते करण्यात आली आहे.

मंदिराच्या खाली शिर्डीसाईंच्या मूर्ती असलेले एक ध्यान मंदिर आहे. तेथे शेजारीच सत्यसाईबाबांनी लिहिलेली पुस्तके, कॅसेट, त्यांची प्रवचने असा संग्रह असलेले छोटे पुस्तकालय आहे.

मंदिरात एका ठिकाणी खालीलप्रमाणे मंदिराची माहिती दिली आहे.
“पुणे शहरापासून पश्चिमेस 40 किमोवर निसर्गरम्य परिसरात श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र हाडशी हे ठिकाण भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या प्रेरणोने व आशिर्वादाने उभारले आहे. सदर जागा श्री. जाधव कुटुंबिय व वनश्री सामाजिक वनीकरण संस्था मर्या. हाडशी, ता. मुळशी यांची मिळून 300 एकर शेती आहे. काळाची गरज ओळखून मंदिर परिसरात ‘केशर’ जातीच्या आंब्याची लागवड केली आहे. ‘साईकेशर’ या नावाने मुंबई, पुणे व स्थानिक बाजारपेठेत आंबा पाठविला जातो. येथील जागेवर जी वास्तू उभारली आहे तिची मूळ कल्पना जाधव कुटुंबियांची. जाधव कुटुंबिय भगवान श्री सत्यसाई बाबा यांचे परमभक्त आहेत.

पुणे परिसरातील सर्व भक्तांना श्री सत्यसाईबाबांचे दर्शन व्हावे या हेतूने जाधव कुटुंबियांनी बाबांना पुण्यास येण्याची विनंती केली. बाबांनी विनंती स्वीकारली ‘तुम विठ्ठल रुक्मिणीजीका मंदिर निर्माण करो. मैं प्राण प्रतिष्ठापना के लिए आऊँगा. आणि श्री सत्यसाई पांडुरंग क्षेत्र हाडशी, ता. मुळशी येथे मंदिर उभारले गेले. मिती कार्तिक शुद्ध प्रबोधिनी एकादशी गुरुवार दिनांक 29 ऑक्टोबर 2009 ला श्री सिद्धिविनायक, श्री विठ्ठल-रुक्मिणी व श्री शिर्डीसाईंच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली. प्राणप्रतिष्ठापने नंतर सर्व धर्मियांसाठी मंदिर खुले झाले आहे.” तसेच मंदिराच्या परिसराची माहिती या फलकावर लिहिण्यात आली आहे.

येथे संतदर्शन हे एक संग्रहालय आपल्याला पहायला मिळते. या संग्रहालयात कलात्मक, सांस्कृतिक, ऐतिहासिक गोष्टींचा संग्रह आणि इतर वस्तूंचा संग्रह देखील आहे. तेव्हा आपण हे संग्रहालय तिकीट काढून पाहू शकता. या सोबतच तुम्ही कोळवण गावाजवळ असलेल्या चिन्मय विभूती आश्रमातील टेकडीवर उभारलेल्या प्रणव गणपती मंदिराला ही भेट देऊ शकतात. मंदिराला भेट देण्यासाठी जातांना आश्रमाच्या गेटवर नोंदणी करावी लागते. सुंदर मंदिर त्यात सुंदर आणि भव्य अशी गणेशाची मूर्ती पाहून मन प्रसन्न होते.

सुंदर व शांत असा निसर्ग आणि तो ही अध्यात्माच्या सानिध्यात अजून काय हवे एका भटक्याला 😊

माहिती साभार – माझी भटकंती फेसबुक पेज

Website आणि Android App चा हेतू महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी हा आहे.
आपल्याकडे काही लेख असतील तर आम्हाला नक्की पाठवा ते तुमच्या नावासह टाकण्यात येतील.

लेख पाठवण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close