अल्पकारकीर्दीत इतिहास घडवणारे विश्वासराव

अल्पकारकीर्दीत इतिहास घडवणारे विश्वासराव

अल्पकारकीर्दीत इतिहास घडवणारे विश्वासराव –

पेशवाईचा उत्तराधिकारी म्हणून नानासाहेब आपल्या ज्येष्ठ पुत्राकडे म्हणजेच विश्वासरावांकडे पाहत होते. विश्वासराव दिसायला विलक्षण सुंदर होते. पेशवे घराण्यात थोरल्या बाजीरावांनंतर त्यांच्याइतका राजबिंडा, देखणा पुरुष झाला नाही.

विश्वासरावांच्या सौंदर्याचे वर्णन करताना बखरकार रघुनाथ यादव म्हणतात,

” पुरुषांत देखणा विश्वासराव व बायकांत देखणी मस्तानी बाईसाहेब समशेर बहादूर यांची मातोश्री. ”

भावी पेशव्याच्या दृष्टीने विश्वासरावांना राजनितीचे व युद्धनितीचे शिक्षण दिले जात होते.

डिसेंबर, १७५७ साली सिंदखेड येथे निजामाविरूद्ध विश्वासरावांनी आपल्या आयुष्यातील पहिली लढाई लढली. या लढाईचे सेनापतीत्व दत्ताजी शिंदे करत होते. जानेवारी, १७६० मधील प्रसिद्ध अश्या उदगीरच्या लढाईत विश्वासरावांनी हत्तीवरून उत्तम तिरंदाजी केल्याचे उल्लेख मिळतात. आपल्या लष्करी कामगिरीतून त्यांनी आपली योग्यता सिद्ध केली होती.

उत्तरेतील प्रदेशांची, तिथल्या राजकारणाची ओळख व्हावी शिवाय मोहिमांचा अनुभव घेण्यासाठी विश्वासरावांना देखील अफगाणांविरुद्धच्या उत्तरेतील ( पानिपत ) मोहिमेत सदाशिवरावभाऊंसोबत पाठवले होते. मोहिमेचे नेतेपण विश्वासराव यांना देण्यात यावे, अशी नानासाहेबांनी इच्छा दर्शवली. भाऊंचे विश्वासरावांवर पुत्रवत् प्रेम होते. त्यांनी या गोष्टीस संमती दिली. पानिपतच्या या संपूर्ण मोहिमेत विश्वासरावांनी दाखवलेला सुज्ञपणा वाखाणण्याजोगा होता.

दि. १४ जानेवारी, १७६१ सालच्या पानिपत संग्रामात दुपारी दोनच्या सुमारास आपल्या दिलपाक नावाच्या घोड्यावरून लढत असता जंबुटकाची गोळी छातीवर लागल्याने विश्वासराव जागीच गतप्राण झाले. त्यानंतर युद्धाचा नुरच पालटला. भावी पेशवाच मारला गेल्याने मराठी सैन्यात गोंधळ माजला. मराठ्यांचा पराभव झाला.

विश्वासरावांचा मृतदेह ठेवलेला हत्ती पठाणांनी अब्दालीसमोर आणला. विश्वासरावांचा तो देह पाहण्यासाठी अफगाणी गोटातील अबालवृद्ध जमा झाले. १८-१९ वर्षाच्या, सुंदर अश्या विश्वासरावांना पाहून अफगाण देखील हळहळले. क्रूरकर्मा अब्दलीही हळहळला.

शेषधर पंडित व गणेश पंडित वेदांती या पुरोहितांकरवी भाऊसाहेब, विश्वासरावांच्या पार्थिव शरीराचे अंत्यविधी करण्यात आले. पानिपतावर भिमार्जुनाप्रमाणे पराक्रम गाजवीणारी काका – पुतण्याची जोडी पंचतत्वात विलीन झाली.

संदर्भ –
चित्रगुप्त बखर
मराठी रियासत – गो. स. सरदेसाई
पेशवे घराण्याचा इतिहास – प्रमोद ओक
पानिपतचा रणसंग्राम – शं. रा. देवळे
पेशवाई – कौस्तुभ कस्तुरे

© सौरभ नायकवडी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here