महाराष्ट्राच्या अस्मितेची ध्वजा जगाच्या काना कोपर्‍यात जाऊन पोहचावी याप्रेरणेने आम्ही Discover Maharashtra हा उपक्रम हाती घेतले आहे. Discover Maharashtra वरून महाराष्ट्राचा सोनेरी इतिहास, महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राच्या मातीतील माणसे दाखवण्याचा हा आमचा छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न आहे.वेबसाईट वरती विविध लेखकांचे ५४ हुन अधिक विषयांवर २७५०+ लेख आहेत.वाचा, शेअर करा आणि महाराष्ट्राचे सोनेरी वैभव जगाला दाखवा. Total Website Views: 85,83,369

नानासाहेब पेशवे

By Discover Maharashtra Views: 8199 5 Min Read

नानासाहेब पेशवे…

धोंडोपंत उर्फ नानासाहेब पेशवे यांच्या आई गंगाबाई व वडील नारायण भट्ट हे दुसर्या बाजीराव पेशव्यांच्या सेवेत होते. छोट्या धोंडोपंतांची हुशारी पाहून बाजीराव पेशव्यांनी त्यांना आपला वारस म्हणून दत्तक घेतले.

इसवी सन  १८५१मधे दुसर्या  बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांना ईस्ट इंडिया कंपनी कडून  मिळत असलेले  सालाना ८ लाख  सालाना पेन्शन रद्द केली  गेली आणि इथेच पहिल्यांदा नानासाहेबांच्या अभिमानाला ठेच पोहोचली. त्यांनी लंडनच्या राणीकडे आपल्या वकिलामार्फत निरोप धाडला, पण इंग्रजांचे इरादे स्पष्ट होते.”फक्त भारतीयांची लूट ” इसवी सन १७५७ मधे बंगालचा नवाब “सिराज उद्दौला” ह्याचा  प्लासीच्या लढाईत पराभव केला आणि भारतात ब्रिटिशांनी आपले पाय रोवायला सुरूवात केली.

दक्षिणेत टिपू सुलतान चा श्रीरंग पट्टणम च्या लढाईत पाडाव झाला आणि ब्रिटीश राजवट हळू हळू आपले पाय पसरू लागली. ईस्ट इंडिया कंपनी पाहता-पाहता एक एक राजवट उलथवून आपला जम बसवू लागली.

ईस्ट इंडीया कंपनी विरोधात भारतीय जनतेत आणि विशेषकरून भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण व्हायला सुरुवात झाली .आणि यात भर पडली ती कंपनी सरकारने आणलेल्या बंदुकामुळे .सैनिकांमध्ये माहिती पसरली की ह्या बंदुकीच्या काडतुसामधे  गाईच्या आणि डुकराच्या चरबीचा वापर केला आहे .

“हिंदूंना गाय पवित्र होती आणि मुसलमानांना डुक्कर निषिद्ध होते .कंपनी सरकारने हीच बंदूक वापरण्यास सुरुवात केली आणि स्वातंत्र्य युद्धाचा भडका उडाला. वेगवेगळे संस्थानिक आणि कंपनी सरकारमधील सैनिकांनी दिल्लीचा बादशहा ह्यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांविरुद्ध कंबर कसली आणि ह्या सगळ्याचे नियोजन करणार होते ! नानासाहेब पेशवे आणि त्यांचे सेनापती तात्या टोपे : नानासाहेबांनी ब्रिटिशां विरोधात कंबर कसली.५३ नेटिव्ह इन्फंट्री चे सैनिक नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र झाले.नानासाहेबांचे नाव ऐकतात पंधरा हजाराच्या आसपास सैनिक जमा झाले .

नानासाहेबांनी जनरल व्हिलर आणि सैन्यावर कानपूरच्या किल्ल्याला वेढा देऊन जोरदार हल्ले सुरु केले .१० दिवस अहोरात्र गोळीबार करताच व्हिलर ची मती गुंग झाली.

मुत्सद्दी नानासाहेबांनी आपले दूत पाठवून तह केला.इंग्रजांना कानपूर सोडून अलाहाबाद ला पळून जाण्यास सांगितले .नानासाहेबांनी इंग्रजांवर पहिला विजय मिळवला.

सैन्यामध्ये नाना बहाणे करून निरनिराळया ठिकाणी लोक पाठवून सैनिकांपर्यंत ते आपला हेतू पोहोचवत होते. ब्राह्मण, कीर्तनकार, प्रवचनकार, मुल्लामौलवी, फकीर असे निरनिराळे वेष धारण करून शेकडो क्रांतिदूत ते सैन्यात पाठवत होते.

ब्रिटिश सत्ता रानटीपणाने न्याय-अन्याय न बघता भारतात सर्व ठिकाणी दडपशाही करत होती. शेतक-यांपासून संस्थानिकांपर्यंत सर्वत्र जुलूमशाहीचा रणगाडा फिरत होता. त्यातही मुख्य पिळवणूक आर्थिक होत होती. असे कित्येक संस्थानिक होते की, त्यांचे दत्तक वारस मान्य न करता त्यांची संस्थाने ताब्यात घेतली.

संस्थानातली सगळी संपत्ती सरकारजमा केली. त्यांच्या तोंडावर निर्वाहापुरते निवृत्तीवेतन देण्यात आले . सैन्यात दडपशाही, न्यायालयीन चौकशीला नकार, केव्हाही अकारण बडतर्फी, भावनांचा अपमान अशी सर्व बाजूंनी गळचेपी होत होती. या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणं आवश्यक होतं. ती जबाबदारी नानासाहेब पेशव्यांनी उचलली.

श्रीमंत नानासाहेब पेशवे हे दुस-या बाजीरावांचे दत्तक पुत्र होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांना देण्यात येणा-या आठ लक्ष रुपयांच्या पेन्शनवर त्यांचा हक्क नाकारण्यात आला. त्याबरोबरच पेशवे म्हणून असणारे इतर सन्मानही ब्रिटिशांनी काढून घेतले. नानासाहेबांनी आपला एक हुशार वकील अजीमुल्लाखान याला विलायतेला पाठवलं. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

या स्वातंत्र्य युद्धासाठी बाहेरची राष्ट्रे काही मदत करतील का हे बघण्यासाठी त्यांनी वकिलाला रशियात पाठवले. जागतिक राजकारणाचा अभ्यास आणि मुत्सद्दीपणा त्यांच्याजवळ होता. दिसण्यात अतिशय रुबाबदार आणि छाप पाडील असं सुंदर व्यक्तिमत्त्व होतं. ते विद्याशास्त्र संपन्न आणि युद्धशास्त्रातही पारंगत होते. उत्तम संघटन चातुर्य होतं. इंग्रज अधिक-यांना खिळवून ठेवणारं प्रभावी वक्तृत्व होतं. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कर्तृत्वाची प्रशंसा इंग्रज अधिकारीही करत.

इंग्रजांविरुद्ध संघटित उठावाची उभारणी ब्रह्मावर्तातच झाली. नानासाहेब कधी केवळ एका ठिकाणी बसून पत्रव्यवहार करत होते. कधी तीर्थयात्रेचे निमित्त काढून भाऊ आणि वकील यांच्यासह दिल्ली, अंबाला, सिमला, लखनौ, काल्पी व इतर अनेक ठिकाणी जाऊन निरीक्षण करून येत. त्यांच्याविषयी लोकांच्या मनात प्रेमाची आणि आदराची भावना होती.

नानासाहेबांच्या प्रयत्नामुळे दिल्लीचा बादशहा बहादूरशहा जाफर, बेगम झिनतमहक, झाशीची राणी लक्ष्मीबाई, जगदीशपूरचा महाराणा कुमारसिंहजी हे सर्व राजपुरुष जीवावर उदार होऊन हाती असलेल्या शस्त्रांसह एकदिलाने या क्रांतीला सिद्ध झाले होते. ३१ मे १८५७ ही उठावाची तारीख ठरली होती. पण मंगल पांडे या सैनिकाच्या अतिरेकी उत्साहामुळे एक महिना आधीच सर्व उठाव बरबाद झाला.

हातात शस्त्र धरून उठावाला सिद्ध झालेले क्रांतिकारी क्रांतिकारकांच्या मार्गाने जाऊन हुतात्मे झाले. रणरागिणी लक्ष्मीबाई गेली. रणशूर तात्या टोपे, ऐंशी वर्षाचे कुमार सिंहजी गेले.नाना म्हणजे हिंदभूचा साक्षात क्रोधच, नाना म्हणजे या भूमीचा नरसिंहमंत्रच. नानासाहेब पेशव्यांनी क्रांतिकारकांना घेऊन  बरीच मोठी कामगिरी केली. परंतु दुर्दैवाने त्यांना यश आले नाही.

शत्रूला सतत झुंजवत ठेवून आपल्या अतुल पराक्रमाची शर्थ करून शेवटी आपल्या सैन्यासह नानासाहेब नेपाळमध्ये गेले. नेपाळच्या राजाची मदत मिळावी, अशी अपेक्षा होती. पण ती सफल झाली नाही आणि १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाचा हा महान प्रणेता नेपाळातच ६ आॅक्टोबर १८५८ मधे अंतर्धान पावला.

लेखन – डाॅ सुवर्णा नाईक-निंबाळकर

Leave a comment